Homeनागपूर न्यूजअन् विधान परिषदेत गुंजला टपोरी आवाज ‘ए गप्प बस!’

अन् विधान परिषदेत गुंजला टपोरी आवाज ‘ए गप्प बस!’

(हिवाळी अधिवेशन विशेष)

अंबादास दानवेंची लक्षवेधी लांबल्याने सभागृहात टपोरी ‘माहोल’

नागपूर,ता.२२ डिसेंबर २०२२:विधान परिषद म्हणजे वरिष्ठ सभागृह.किमान या सभागृहातील सदस्यांकडून ‘उच्च’ नैतिक वर्तनाची अपेक्षा भारताचे संविधान व महाराष्ट्रातील नागरिक, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील करीत असतात!मात्र,या सभागृहाची गरिमा धुळीस मिळवण्याची ऐतिहासिक परंपरा अद्यापही खंडीत होताना दिसत नाही.आज याचा पुनश्‍च प्रत्यय या वरिष्ठ सभागृहात आला.

परिषदेत दुस-या क्रमांकाची विदर्भातील संत्रा मोसंबी उत्पादकांच्या नुकसानवरील लक्षवेधीवरील चर्चा जास्त लांबल्याने उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी या लक्षवेधीवरील चर्चा थांबवून प्रश्‍नोत्तराच्या सत्राकडे वळणयाचे संकेल दिलेे,या लक्षवेधी नंतर मात्र शिवसेनेचे आमदार व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मनीषा कायंदे,ॲड.अनिल परब यांची तिस-या क्रमांकाची लक्षवेधी लागणार होती.

राज्यात दिवाळी सणानिमित्त शासनाच्या अन्न व नागरि पुरवठा विभागाने चना डाळ,रवा,साखर व पामतेल हा फूड किट पुरवठा करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकी पूर्वीच ५१३ कोटी २४ लाख रुपयांची निविदा NCDEX Emarkets Limited या कंपनीला देण्यात आले.दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी कंपनीकडून परिपत्रक प्रसिद्ध झाले असून शासनाच्या निकषाप्रमाणे निविदाप्रक्रिया न करता संबंधित विभागाच्या अधिका-यांनी मनमानी पद्धतीने संबंधित कंपनीला कंत्राट देण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आणण्यासाठी तसेच पुणे,मुंबई,औरंगाबाद व राज्यातील अन्य जिल्ह्यात दिवाळी सणाच्या आधी रेशनकार्ड धारकांना ‘आनंदाचा शिधा’ मिळाला नसल्याच्या लाखो तक्रारी,जाहीर केलेले पाच जिन्नस एकाच वेळी एकाच पिशवीतून न मिळणे,बायोमेट्रिक यंत्रणा इत्यादीवर ही लक्षवेधी पुकारण्यात येणार होती.

मात्र,दुस-या क्रमाकांच्या लक्षवेधीवरच बराच वेळ चर्चा चालल्याने उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी लक्षवेधीवरील चर्चा थांबवून, पुढील प्रश्‍नोत्तराच्या तासाकडे वळण्याचे संकेत देताच अंबादास दानवे अस्वस्थ झाले व उभे होऊन, आमची लक्षवेधी यानंतर असल्याने ती पुकारण्यात यावी अशी मागणी केली.याच वेळी सत्ताधा-यांच्या बाकांवरुन ’ए गप्प बस’असा आवाज आला!

विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात अश्या असंवैधानिक भाषेमुळे सगळेच अचंभित झाले.अनेक सदस्यांनी अश्‍या या अरेरावीच्या भाषेबाबत सडकून टिका केली.सत्तापक्षाकडील भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी देखील अश्‍या भाषेबाबत आक्षेप घेत नाराजी नोंदवली.मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील तीव्र नापसंदी व्यक्त केली.

दोन्हीकडून गदारोळ झाल्याने उपसभातींनी पाच मिनिटांसाठी सभा तहकूब केली व आपल्या दालनात दोन्ही पक्षाकडील आमदारांना बोलवून चांगलीच कानउघाडणी केली.

यानंतर सभा सुरु झाल्यावर उपसभापतींनी अशी भाषा या सभागृहात बोलता कामा नये,अशी समज देत हा इशारा सभागृहाच्या पटलावर नोंदवला.एवढंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधा-यांच्या बाकांवरुन आलेल्या ’ए गप्प बस’या ध्वनिविषयी दिलगिरी देखील व्यक्त केली.

याची देखील चर्चा आज सकाळच्या सत्रात विधान भवन परिसरात चांगलीच रंगली होती.

थोडक्यात विधी मंडळ म्हटले की जनतेच्या नजरेसमोर मायबाप सरकार व विपक्षी नेत्यांकडून आपल्यासाठी आवाज उठवला जाईल असंच काहीसं चित्र असतं मात्र विधी मंडळातच आवाज उठवणा-या एखाद्या आमदाराला इतर आमदार ’ ए गप्प बस’म्हणत ‘गप्प’बसवत असतील तर….‘फाटेस्तोवर’ तोंड उघडून निवडणूकीत आमच्याकडे मत मागायला येताच कशाला?असा विचार ‘सुज्ञ’आमदारांच्या या कृतीमुळे राज्यातील जनतेला पडला असावा,यात दुमत नाही.

Latest बातम्या