
(हिवाळी अधिशेन विशेष)
आमदार कायंदे यांच्या टिपण्णीने परिषदेत गदारोळ
नागपूर,ता.२२ डिसेंबर २०२२: फलोत्पादन मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी विधान परिषदेत आज, विदर्भात १ लाख ७० हजार हेक्टरवर संत्री-मोसंबीची लागवड व अतिवृष्टिमुळे त्यावर झालेल्या रोगराईच्या संदर्भात, अमोल मिटकरी,विक्रम काळे,शशिकांत शिंदे,सतिश चव्हाण या सदस्यांनी लक्षवेधी लावली होती.यावरील चर्चा ही बरीच लांबली परिणामी ‘सहनशीलता’ संपल्याने शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी ’ही काय फालतू चर्चा सुरु आहे!’अशी ‘अचानक’ व तितकीच ’ अनावश्यक’ टिपण्णी केल्याने संपूर्ण सभागृह अवाक झाला.
त्यांच्या या अनावश्यक टिपण्णीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर व प्रवीण दटके यांनी‘प्राविण्याने’आक्षेप नोंदवला.कायंदे यांचे विधान सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली.
विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठीच नागपूर कराराप्रमाणे विदर्भात होत असलेल्या विधी मंडळाच्या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न नाही मांडणार तर कुठे मांडणार?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.शेतक-यांशी संबंधित एवढ्या महत्वाच्या समस्येला शिवसेनेच्या आमदार ‘फालतू’म्हणतात,यावर सभागृहातील पक्ष आणि विपक्ष दोन्हीकडच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
सदस्यांचे हे रौद्र रुप बघता कायंदे गप्प बसल्या होत्या.विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधारी आमदारांचे समर्थन केल्याने त्या एकट्या पडल्या होत्या.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी सदस्यांना शांत करुन कामकाज सुरळीत केले व पटलावरुन कायंदे यांची टिपण्णी काढून टाकण्याचे निर्देश दिले मात्र,आज विधान भवनाच्या परिसरात सकाळच्या सत्रात विदर्भाची ‘फालतू’संत्री हा विषय चांगलाच रंगला होता.
ही होती लक्षवेधी-
या वर्षी विदर्भात १ लाख ७० हजार हेक्टरवर संत्री-मोसंबीची लागवड करण्यात आलेली असून यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे विदर्भाती संत्री पिकावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे आढळून येत आहे.संत्री कोळशी या रोगराईमुळे काळी पडू लागल्याने व त्यामुळे संत्री उतपादनात घट झाल्याचे दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी दिसून पडले आहे.कोळशी या रोगाचा प्रादुर्भाव झाला असताना शासकीय यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने व संत्रा उत्पादकांना कसलेही मार्गदर्शन करण्यात आले नाही.उत्पादक शेतक-यांनी शासनाकडे अनेक तक्रारी केल्या असून काळी पडलेली व डाग असलेली संत्री व्यापारी सुद्धा खरेदी करीत नसल्यामुळे उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.याच पार्श्वभूमीवर संत्री उत्पादकांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे.परिणामी,विदर्भातील संत्रा उत्पादकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले असून उदासिनतेची भावना गडद झाली आहे.याबाबत शासनाने तातडीने चौकशी करुन नुकसान भरपाई देण्याप्रकरणी कारवाई करण्याची गरज व त्याबाबत शासनाची प्रतिक्रिया.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या: आमदार प्रवीण दटके
यावर्षी विदर्भात १ लाख ७० हजार हेक्टर वर संत्री-मोसंबीची लागवड करण्यात आली. परंतु यावर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भातील संत्री पिकावर त्याचा विपरीत परिणाम दिसून आला.
या दरम्यान संत्री कोळशी या रोगामुळे काळी पडू लागल्याने व अतिवृष्टीमुळे संत्री उत्पादनात घट झाली.
रोगामुळे काळी पडलेली तसेच अतिवृष्टीमुळे नासाडी झालेल्या संत्रामुळे शेतकरी तसे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले . त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संत्रा बागांचे पुनश्च सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेमध्ये केली .
यावेळी उत्तर देत असताना मंत्री उदय सामंत यांनी दुबार सर्वेक्षण करणार असल्याचे सभागृहाला आश्वासित केले.
……………………………………………………..

आमचे चॅनल subscribe करा