
भाजपचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांचे ऐकत नाही यावर विश्वास बसत नाही
लवकरच होऊ घातलेल्या कर्नाटकाच्या निवडणूकीत सीमावादाचे भाजपला लाटायचे आहे श्रेय
नागपूर,ता.१९ डिसेंबर २०२२:महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशनाच्या पहील्याच दिवशी,पहील्याच वाक्यावर आज विधान सभेत ’सीमावाद’पेटला.विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कामकाजाला सुरवात होण्यापूर्वीच कर्नाटक सरकारद्वारे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर होणा-या जुल्मी शासनाचा उल्लेख करीत, समितीचे आंदोलन ज्या पद्धतीने चिरडण्याचा जो प्रयत्न झाला, त्यावर प्रखर टिका केली,याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले मात्र नुकतेच केंद्रिय पातळीवर या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या ‘सामोपचाराच्या’ बैठकीनंतर देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपला हेका सुरुच ठेवला असल्याने,तोंडावर येऊन ठेपलेल्या कर्नाटक विधान सभेची निवडणूक जिंकण्यासाठीच,गृहमंत्र्यांच्या छुप्या आर्शिवादाने बोम्मई हा ’डबल गेम’खेळत असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे.
देशाचे इतके पॉवरफूल गृहमंत्री यांनी बैठकीत समज दिल्यानंतर व सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटकी(कर-नाटकी)बोम्मई हे सातत्याने महाराष्ट्रातील जनतेचे आक्रमकपणे खच्चीकरण करीत आहे.याचा अर्थ त्यांना सर्वोच्च स्तरावर फूस मिळण्याचेच हे संकेत मानल्या जात आहे.
भारतीय जनता पक्ष हा निवडणूक जिंकण्यासाठी साम,दाम,दंड भेदाच्या रणनीतीचा उपयोग करणारा राजकीय पक्ष असल्याचे २०१४ पासूनच सिद्ध झाले आहे.अश्यावेळी दक्ष्णेकडील एकमेव राज्य गमावणे भाजपला पडवणारे नसल्यानेच बोम्मई यांना आतून खुली छूट दिल्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा आहे.
सीमावाद हा दोन्हीकडील जनतेसाठी अतिशय संवेदनशील विषय आहे,मात्र हा वाद पेटवून महाराष्ट्र जिंकता येत नाही,कर्नाटक मात्र जिंकता येतो,हे चाणाक्ष गृहमंत्र्यांना देखील माहिती आहे.त्यामुळेच ‘मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर’चा खेळ केंद्रिय व राज्यस्तरीय पातळीवर रंगला असल्याचे बोलले जात आहे.
देशाच्या गृहमंत्र्यांसमोर बोम्मई यांनी चक्क ट्टीटर हॅण्डलवरच दोष ढकलून दिल्याने वरील उक्ती सत्य वाटायला लागते.एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाच ट्टिटर हॅण्डल हॅक होऊन त्यावरुन महाराष्ट्रात रण पेटवले जाते,व कर्नाटकात रान पेटवले जाते आणि देशाची इंटलिजेंस संस्था या डोळेझाक करुन पहूडली असते यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.
बोम्मई हे देशाच्या गृहमंत्र्यांशी खोटे ते ही रेटून खोटे बालण्याचे साहस करणार नाही,त्यामुळेच दाल मे काला नही’तर पूर्ण डाळच काळी असलेली दिसून पडतेय!
त्यामुळे भाजपचा डाव येनकेन प्रकरणे कर्नाटक जिंकने हाच असून त्यासाठीच ‘फोडा आणि झोडा’नीतीचा अवलंब केला जात असल्याची शंका व्यक्त होत आहे.
गृहमंत्र्यांच्या सूचनांना डावलून बोम्मई हे आपल्या राज्यातील करणी सेनेवर कोणताही लगाम घालत नाही,त्यामुळेच देशातील गृहमंत्र्यांच्या सूचना या फक्त प्रसिद्धीपुरतीच असल्याचा भास होतो.
आज अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनावर निर्बंध घालण्याची काहीच आवश्यकता नव्हती असे म्हटले आहे.महाराष्ट्रातील काही नेते गेले असता त्यांना परवानगी नाकारण्यात आली.आम्ही कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु,सीमावर्ती मराठी बांधवांच्या पाठीशी राहू, महाराष्ट्राच्या भूमिकेपासून तसू भर ही मागे जाणार नाही, असे ठराविक राजकीय ‘सुविचार’व्यक्त करुन वेळ मारुन नेण्याचा त्यांचा चाणाक्ष पणा ही कौतूकास्पदच आहे.
रक्ताच्या भावंडांना कानफडात बसतेय पण याचे आपल्या सरकारला काहीही वाटत नाही,असा टोमणा जितेंद्र आव्हाड यांनी मारला.आपले सरकार ते बोम्मईचे ट्टिटर मध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्सी होती,असे सांगून संभ्रम निर्माण करतात.त्यांचे कपडे सांभाळायला जाताय त्यामुळे तुमचे कपडे उतरतात आहे,त्याचे काय?असा जहाल प्रश्न ही ते करुन जातात.मराठी माणसांच्या गाड्या फूटल्या आम्ही मर्द मराठे मात्र गप्पच कारण तिथे ही भाजपचेच सरकार आहे,अशी टिका देखील ते करतात.
थोडक्यात अधिवेशनाचा पहीला दिवस हा सीमावादाने गाजला असला तरी बोम्मई यांच्या हिंमतीचा छूपा राखणदार कोण?यावर ही बरीच खलबते विधान भवनाच्या परिसरात आज ऐकू आली.सीमावाद पेटवून पुन्हा एकदा कर्नाटकाची निवडणूक भाजपाने जिंकली की पुन्हा साढे चार वर्षांसाठी हा सीमावाद कनार्टकींतर्फे पेटा-यात बंद होऊन जाईल,यात शंका नाही.

आमचे चॅनल subscribe करा