अखेर शिवसेनेचे जुने कार्यालय रिकामे करुनच घेतले
महिला कर्मचा-यांच्या डोळ्यात तरळले अश्रू
बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला आमदार होत्या मूक दर्शक!
नागपूर,ता.१९ डिसेंबर २०२२: असं म्हणतात सत्तेचा माज लवकर चढत असतो, मात्र तो लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणा-या विधान भवन परिसरातच जेव्हा हा चढलेला ‘माज’दाखवला जातो तेव्हा मात्र खरंच ‘संविधान खतरे में’ची जाणीव खोलवर होऊन जाते.महाराष्ट्राच्या उपराजधानीत अगदी विधान भवन परिसरातच ऐन अधिवेशनाच्या काळात, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातील महिला कर्मचा-यांसोबत, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या काही पदाधिका-यांनी शनिवारी व रविवारी जो र्दुव्यवहार केला,ज्या प्रकारची भाषा वापरली,पक्ष कार्यालय त्वरित रिकामे करण्यासाठी जी अर्वाच्य भाषेत दमदाटी केली,ते बघता वरील म्हणीची सत्यता सिद्ध होते.
मुंबईच्या विधीमंडळ पक्ष कार्यालयाचे काम बघणा-या या महिला कर्मचारी मागील ३३ वर्षांपासून याच पक्षाचे काम बघत आहे.याच वर्षी जागतिक योग दिनी म्हणजे २१ जून रोजी विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यावर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे तब्बल ५० आमदारांसोबत मुंबईतून सुरत व सुरतहून गोहावटीला प्रस्थान करते झाले,परिणामी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडीची सरकार गडगडली,व ३० जून रोजी मुंबईच्या विधान भवनात नवे शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले,३ जुलै रोजी विशेष अधिवेशनात बहूमत देखील सिद्ध झाले व सरकार संवैधानिकरित्या कामकाज करण्यास मार्गी ही लागले.
मात्र,या सर्व घडामोडींमध्ये पक्ष कार्यालयात काम करणा-यांचा काय दोष होता?त्यांनी तर मूळ शिवसेनेत उभी फूट पाडण्यात हातभार लावला नाही,ना कुण्या पक्षातील आमदारांना फितूर केले,करोनाच्या दोन वर्षांच्या काळात तर अधिवेशनच झाले नाही,आता राज्याच्या उपराजधानीत दोन वर्षांनंतर दहा दिवसांचे अधिवेशन सुरु झाले असले तरी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिका-यांच्या अंगी दहा हत्तींचे बळ आले असून, आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे ते ‘एक्शन’मध्ये आले,पण?कोणाच्या विरुद्ध?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार,नेते,कार्यकर्ते आदीं विरुद्ध ते एक्शनमध्ये आले असते तरी महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने समजून घेतले असते,पण,ते आपल्याच मूळ पक्षासाठी गेल्या ३३ वर्षांपासून इमाने इतबारे काम करणा-या कर्मचा-यांवर बसरले!यात दोन ज्येष्ठ महिला कर्मचा-यांचाही समावेश होता.
शनिवारी नागपूरात पोहोचताच या मगरुर व मुजोर पदाधिका-यांचा पहीलाच बॉम्बगोळा त्यांच्यावर बसरला ’तुम्ही ऑफिस कधी खाली करता?हाऊस सुरु झाल्यावर?’अशी भाषा वापरणारी ही सगळी मंडळी, मुख्यमंत्री शिंदे साहेबांची कर्मभूमी व मतदारसंघ असणा-या ठाण्यातीलच होती.
लाजिरवाणी बाब म्हणजे त्यांच्यासोबत दोन महिला आमदार देखील होत्या मात्र?त्या मूकदर्शक बनून होत्या. हे कार्यालय जबरीने हडपण्याच्या कटातील सहभागिता त्यामुळेच संशयास्पद होते!.मुख्यमंत्री शिंदेंच्या पदाधिका-यांचा हा माज बघून या महिला कर्मचा-यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.हेच सात-आठ महाभाग पुन्हा रविवारी देखील धडकले!पुन्हा अर्वाच्य भाषेत त्यांनी कार्यालयातील सात ही कर्मचा-यांचा चांगलाच ‘उद्धार’केला!
यामुळे मात्र या कर्मचा-यांने मूळ कार्यालय शिंदे गटाच्या पदाधिका-यांच्या सुपुर्द करीत बॅरकमध्ये कार्यालय थाटणे पसंद केले.खंत मात्र एकच मनात होती,महिला किवा आमदार कोणत्याही पक्षाच्या असोत,लोकशाहीच्या पवित्र मंदिरात असो किवा भगवंतांच्या मंदिरात,महिलांसोबत अश्या खालच्या दर्जाची भाषा वापरणे ही अक्षम्यच अशीच कृती ठरते.
अधिवेशन सुरु असताना विधान भवन परिसरातच ,संपूर्ण राज्याचेच पालक असणा-या मुख्यमंत्र्यांच्याच काही पदाधिका-यांकडून जे दु:स्साहस घडले ते निश्चितच निषेधार्ह्य आहे.
शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनीही या घटनेची योग्य दखल घेत,विधान सभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्याकडे लिखित तक्रार नोंदवली असून,जर विधान भवनाच्या परिसरातच कोणत्याही महिलेचा आत्मसन्मान जपल्या जात नसेल ‘एका मिनिटात बाहेर निघा’अशी दमदाटी केली जात असेल, तर विधी मंडळाच्या पटलावर महिलांच्या आत्मरक्षणाचे,आत्मसन्मानाचे कितीही कायदे पारित करण्यात आले व त्याचे कितीही गोडवे गायले गेले तरी त्याचा काहीही उपयोग नाही.
या महिला कर्मचा-यांनी बाळासाहेब ठाकरे गटाचे काम बघत असताना व आपले कर्तव्य चोखपणे बजावत असताना,मुख्यमंत्री मनोहर जोशींचाही काळ अनुभवला आहे,राणेंच्या बंडांचेही त्या साक्षीदार राहील्या आहेत मात्र अशी भाषा,अशी मुजोरी,असा माज त्यांनी पहील्यांदाज अनुभवला असल्याची माहिती सूत्राने दिली.

आमचे चॅनल subscribe करा