Homeनागपूर न्यूजबाबासाहेबांच्या एकमेव सांस्कृतिक भवनासाठी वीस तारखेला आंबेडकरी जनतेचा विशाल मोर्चा

बाबासाहेबांच्या एकमेव सांस्कृतिक भवनासाठी वीस तारखेला आंबेडकरी जनतेचा विशाल मोर्चा


भाजपच्या सत्ताकाळात आंबेडकरी जनतेसोबत घात

विदर्भातील वीसच्या वर संघटना होणार सहभागी

आजचा हा लढा फक्त २० एकर जागेसाठी:शाम हॉटेल ,पटवर्धन मैदानाचा विषय जोडल्यास मुख्य मुद्दाकडे दूर्लक्ष होईल:किशाेर गजभिये

माजी पालकमंत्र्यांच्या सहभागितेविषयी ‘नो कमेंट्स’

काँग्रेसचे कार्यकर्ते नरेंद्र जिचकार व भाजपच्या एका आमदाराची हातमिळवणी:खासगीत आंबेडकरी नेत्यांचा आरोप

वीस एकर जागा देऊन फक्त दहा हजार चौ.मी.जागा स्मारकासाठी घेणे मान्य नाही

७०० कोटींच्या जागेचे वर्षाचे भाडे सरकार घेणार फक्त १०० रुपये वार्षिक!

दीक्षाभूमी,ड्रॅगन पॅलेस,चिंचभुवनाचे स्मारक खासगी: संपूर्ण विदर्भात अंबाझरीतील एकमेव स्मारक होते शासकीय

५७ वर्षांपासून अस्तित्वात असलेले स्मारक भाजपने खासगी विकासकाशी संगनमत करुन केले भुईसपाट

गरुडा अम्यूझमेंट कंपनीसोबतच्या करारातील लीज ३० वर्षांवरुन केली ९९ वर्ष!तब्बल दोन पिढ्यां भरणार सरकारी जागेवरील मनोरंजनासाठी भुर्दंड!

अंबाझरी उद्यानाचा संपूर्ण प्रकल्पच रद्द करा:दोषींवर गुन्हा नोंदवा:(अंबाझरी)बचाव कृती समितीची मागणी

मोर्च्यासाठी निधी गोळा करने ही अपरिहार्यता:आयकर ही भरु तुम्ही काळजी करु नका:गजभिये

नागपूरातील अनेक बौद्ध मठात डॉ.आंबेडकर स्मारकाबाबत जनजागृतीपर सभांचा धडाका

नागपूर,ता.१४ डिसेंबर २०२२: शहरातील अंबाझरी तलावाशेजारी ४४ एकर जागेत, उद्यान व डॉ.बाबासाहेब सांस्कृतिक भवन हे गेल्या ५७ वर्षांपासून अस्तित्वात होते.ही जमीन महाराष्ट्र शासनाने १९६४ साली किवा त्या काळातील आसपास, नागपूर महानगरपालिकेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्मारक व उद्यानासाठी प्रदान केली होती.मनपातर्फे या खसरा क्र.१ मध्ये यातील २० एकर जागा ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरी सांस्कृतिक भवन व २४ एकर जागेवर उद्यान निर्माण करण्यात आले.मात्र यानंतर अचानक मनपातील भाजपच्या सत्ताधा-यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, मनपा सभागृहात ठराव पारित करुन ही जागा महाराष्ट्र शासनाला परत केली!महाराष्ट्र शासनाने २१ जुलै २०१७ रोजी शासन निर्णयान्वये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांना ही जागा भाडेपट्ट्यावर दिली.यानंतर पर्यटन विकास महामंडळाने २० सप्टेंबर २०१७ रोजी म्हणजे अवघ्या दोनच महिन्यात ही ४४ एकर जागा ‘मेसर्स गरुडा अम्युझमेंट पार्क ’या खाजगी कंपनीस लेटर ऑफ अर्वाड ६ सप्टेंबर २०१९ रोजी तर कनसेंशन अग्रीमेंट ११ नोव्हेंबर २०१९ अन्वये हस्तांतरित केले.या कंपनीने अंबाझरीतील ४४ एकर जागेवर आपले काम सुरु केले मात्र ऐन करोनाच्या काळात त्यांनी आंबेडकरी जनतेला अंधारात ठेऊन टिनाचे कंपाऊंड बांधून एका रात्रीत हे डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन बेकायदेशीररित्या भुईसपाट केले,हा भाजप सरकारकडून आंबेडकरी जनतेचा केलेला विश्‍वासघातच आहे,त्यामुळे खासगी कंपनीसोबतचा हा करारच रद्द करुन दोषींवर गुन्हा दाखल करावा व अंबाझरी येथील वीस एकर जागेवर बाबासाहेबांचे अद्यावत असे सांस्कृतिक भवन पुन्हा बांधून द्यावे,या मागणीसाठी येत्या २० डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम वरुन विधान भवनापर्यंत विशाल मोर्चा काढणार असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब सांस्कृतिक भवन परिसर(अंबाझरी)बचाव कृती समितीचे मुख्य संचोजक किशोर गजभिये यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की या जागेची बाजार किंमत अंदाजे ७०० कोटी रुपये आहे.मात्र,ही जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळने पी.के.हॉस्पीटेलिटी सर्विस प्रा.लि.या खासगी विकासकाला लीजवर दिली,महत्वाचे म्हणजे ७०० कोटींच्या या जागेचे भाडे दर वर्षी फक्त शंभर रुपये आकारले असून, दरवर्षी यात फक्त ५ टक्के वाढ नुसार करार केला.सुरवातीला ही लीज ३० वर्षांसाठी होती मात्र महाराष्ट्र शासनाने ही लीज ऑगस्ट २०१९ मध्ये ९९ वर्षे करारात वाढवून घेतली!

लगेच १५ दिवसांच्या आत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने लेटर ऑफ अवार्ड स्वाक्षरीत केले,यात निविदा काढताना ३० वर्ष लीजचाच उल्लेख होता व निविदा उघडल्यानंतर पी.के.हॉस्पीटेलिटी या कंपनीला फायदा होईल अशा रितीने ९९ वर्षे पर्यंत वाढवण्यात आली,त्यामुळे कोणाला तरी कोट्यावधींचा आर्थिक फायदा पोहोचवणारी ही संपूर्ण निविदा प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे गजभिये यांनी आरोप केला.

ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने ४४ एकर जागा नागपूर महनपाकडे हस्तांतरीत केली त्यावेळीच ४४ एकर जागेपैकी २० एकर ९ गुंठे जमीन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना करिता व उर्वरित २४ एकर ७ गुंठे जमीन उद्यानाकरिता वितरीत केली होती.बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतरच त्यांचे महापरिनिर्वाण झाले.त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मनपाने अंबाझरी येथे २० एकर जागेवर त्यांच्या नावाचे सांस्कृतिक भवन बनविण्याचा ठराव मनपात पारित केला होता,व कोट्यावधीच्या खर्चाने हे सांस्कृतिक भवन बांधण्यात आले होते.मनपाने हा पैसा नागपूरकर जनतेच्या कराच्या पैश्‍यातूनच खर्च केला होता.

मूळात ही जागा शासनाची असताना राज्यात सरकार बदलल्यानंतर या जागेचे हस्तांतरण खासगी विकासकाला जरी करण्यात आले आणि तो सरकारचा अधिकार जरी असला तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे आंबेडकरी जनतेच्या अस्मितेशीच जुळलेले असल्याने, पर्यटन महामंडळाला या जागेच्या पूर्व नियोजित वापरामध्ये बदल करता येणार नाही.स्मारकाची जागा बेकायदेशीररित्या खासगी विकासकाला फायदा होईल अशा रितीने हस्तांतरीत करता येणार नाही.

आता खासगी विकासकाकडून दहा हजार एकरमध्ये अद्यावत स्मारक बांधून देण्याविषयीची शासनाची बतावणी म्हणजे आंबेडकरी जनतेच्या डोळ्यात धूळ झोकण्याचाच प्रकार असल्याची घणाघाती टिका किशोर गजभिये यांनी याप्रसंगी केली.एकूण २० एकर जागा बळकावून दहा चौ.मी.जागेवर स्मारकाची निर्मिती आंबेडकरी जनतेला मंजूर नाही.पर्यटन महामंडळाच्या या कृतीमुळे तमाम आंबेडकरी जनता,संविधान प्रेमी,प्रबुद्ध नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे ते म्हणाले.

ही घडामोड म्हणजे दलित,आदिवासी,आंबेडकरी समाज व प्रबुद्ध नागरिक यांच्यावर अन्याय असून राज्य शासनाने ही अधिसूचना व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेले करारनामे कन्सेशन ॲग्रीमेंट व लेटर ऑफ अवार्ड आणि शासन निर्णय २० जुलै २०१७ ही सर्व धूळफेक तात्काळ रद्द करावी व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची जागा जशी त्या तशी स्मारकासाठी कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंबाझरी येथील जुने स्मारक व सांस्कृतिक भवन बेकायदेशीररित्या जमीनदोस्त करणा-या मेसर्स गरुडा अम्यूझमेंट पार्क या खासगी कंपनीच्या संचालकांवर पोलिसात गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी.

तसेच उद्यानातील ४४ एकर शासकीय जागा पूर्वीच्या नियोजनानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्मारक परिसर व उद्यान या प्रयोजनासाठीच राखीव ठेऊन बाबासाहेबांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात यावे,अन्यथा पूर्व विदर्भातून व नागपूर शहरातील आंबेडकरी जनतेचा भव्य मोर्चा २० डिसेंबर रोजी नागपूर विधानसभेवर धडकणार असल्याचे गजभिये यांनी सांगितले.या मोर्च्यात नागपूर विभागातील गोंदिया,भंडारा,गडचिरोली,चंद्रपूर व नागपूर अश्‍या पाच जिल्ह्यातील जनता सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

भव्य व विशाल मोर्चा हा फक्त अंबाझरी येथील स्मारकासाठी काढत असताना नागपूर शहरात आणखी दोन ठिकाणी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे धंतोली येथील पटवर्धन मैदान तसेच शाम हॉटल या ठिकाणी देखील दोन स्मारक बनविण्याचे आश्‍वासन दिले होते,याची देखील मागणी करणार आहात का?या प्रश्‍नाचे उत्तर देताना,मुळीच नाही,आम्हाला आमचे लक्ष्य भरकटू द्यायचे नाही,आमची मागणी सध्या फक्त आणि फक्त अंबाझरी येथील स्मारकासाठीच असल्याचे किशोर गजभिये यांनी सांगितले.

गरुडा अम्यूझमेंट पार्कचा हा संपूर्ण खेळ घडविण्या मागे कोणाचा हात आहे?या कोट्यावधीच्या करारात कोणत्या राजकीय नेत्याला किवा आमदाराला फायदा पोहोचणार आहे?या प्रश्‍नावर बोलताना,हा संपूर्ण करार पब्लिक डोमेनमध्ये असून याविषयीची माहिती बेवसाईटवर उपलब्ध आहे,यात काँग्रेसचे कार्यकर्ते नरेंद्र जिचकार यांचे नाव समोर आलेले आहे.

त्यांची भाजपच्या एका आमदाराशी हातमिळवणी झाली आहे की नाही किवा पूर्व पालकमंत्र्यांच्या घरी म्हणजे काँग्रेसचे आमदार डॉ.नितीन राऊतांच्या घरी ते तीन-चार वेळा गेले होते किवा नाही?या ऐेकीव माहिती विषयी मी कोणतेही राजकीय भाष्य करणार नसल्याचे गजभिये म्हणाले.

एवढी मोठी घटना पालकमंत्र्यांच्या काळातच नागपूरात घडली आणि पालकमंत्री असणारे नितीन राऊत यांना याचा पत्ता ही लागला नाही,यावर मत विचारले असता,हा प्रश्‍न तुम्ही त्यांनाच विचारा असे उत्तर गजभिये यांनी दिले,त्यांची या संपूर्ण प्रकरणात ‘सहभागिता’ आहे किवा नाही,याविषयी मी काहीच बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.मात्र,हे स्मारक जरी आघाडी सरकारच्या काळात तोडण्यात आल्याचा कांगावा सत्ताधारी करीत असले तरी याची संपूर्ण पेरणी फडणवीस हे मुख्यमंत्री पदी असताना २०१७ मध्येच झाली असल्याची जळजळीत टिका त्यांनी सांगितले.

नागपूर मनपा कोणीही मागणी केली नसताना सुरेश भट सभागृहाला सर्व मंजुरी मिळून भव्य असे भट सभागृह बांधून देते,मात्र अंबाझरी येथील स्मारकाची देखभाल करु शकत नसल्याने ती जागा शासनाला परत करण्याचा ठराव एकदा नाही तर दोन वेळा सभागृहात पारित करुन घेते,यातच भाजप सत्ताधा-यांचा डाव दिसून पडतोय,असा घणाघाती आरोप गजभिये यांनी केला.सुरेश भट यांच्या विषयी आम्हाला ही आदर आहे,ते नागपूरचे भूषणच आहेत मात्र भट सभागृहावर कोट्यावधीचा खर्च करणा-या नागपूर मनपाने, भाजपच्या सत्ताकाळात गेली दोन दशके हेतुपुरस्सर अंबाझरी येथील स्मारक उपेक्ष्त ठेवले,पुढे त्या स्मारकाची दूर्दशा झाली हे वास्तव आहे,दारे खिडक्या चोरीला गेली,अवांछिततत्वांचा त्या ठिकाणी वावर वाढला,अवैध,अनैतिक गतिविधी वाढल्या मात्र जरी ते स्मारक भग्नावस्थेत असेल, तरी त्या स्मारकावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव लिहले होते,ते विदर्भातील एकमेव शासकीय स्मारक होते,आंबेडकरी जनतेची अस्मिता असणा-या बाबासाहेबांचे नाव असणारे स्मारक, जमीनदोस्त करण्याचा हक्क कोणालाही नाही.आम्ही पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यासाठी जातो तेव्हा ते लिखितमध्ये आम्हाला सांगतात की यासाठी शासानाची परवागनी आणा!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन(अंबाझरी)बचाव कृती समितीतर्फे आतापर्यंत ठिकठिकाणी करण्यात आलेली आंदोलने,उपोषण व सर्व बौद्ध मठांमध्ये या विषयी जनजागृती केल्याने हा लढा आता अतिशय तीव्र झाला असून, स्मारकाची जागा पुन्हा बहाल केली जात नाही,हा करार पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरुच राहणार असल्याचे किशोर गजभिये यांनी सांगितले.

आमच्या आंदोलनाला काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे,अभिजित वंजारी,राष्ट्रवादीचे चंद्रिकापुरे आदी अनेकांनी पाठींबा दिला असल्याचे ते म्हणाले.यावर मायावती यांच्या बहूजन समाजवादी पक्षाचा पाठिंबा नाही मिळाला का?या प्रश्‍नाबाबत बोलण्याचे मात्र त्यांनी टाळले.

येत्या २० तारखेच्या मोर्च्यासंबंधी एक व्हॉट्स ॲप ग्रूप तयार करण्यात आला असून, त्यात सुधीर वासे यांच्या एसबीआई बँकेतील वैयक्तिक खात्यात लाखो रुपये जमा झाले,वैयक्तिक ऐवजी समितीच्या नावे बँक खाते का उघडण्यात आले नाही?वैयक्तिक खाते असल्याने तीन लाखांच्या वर पैसे जमा झाल्यास यावर आयकर बसणार नाही का?या प्रश्‍नाबाबत बोलताना,आयकर बसेल तर आम्ही बघून घेऊन याची काळजी तुम्ही करु नका,असे प्रतिउत्तर गजभिये यांनी दिले.आंबेडकरी समाजासाठी आंबेडकरी जनताच मदतीचा हात पुढे करीत असते,भव्य अश्‍या मोर्च्यासाठी पत्रके,बॅनर,पाण्याची व्यवस्था इत्यादी अनेक खर्च असून आतापर्यंत १ लाख ५६ हजार रुपये जमा झाले, त्यातील ५६ हजार कालच खर्च देखील झाले असल्याचे किशोर गजभिये यांनी सांगितले.हिशोबामध्ये पारदर्शिता विषयी विचारले असता,आम्ही पारदर्शिच काम करीत असल्याचे ते म्हणाले.

पत्र परिषदेला डॉ.धनराज डहाट,बाळू घरडे,प्रा.सरोज आगलावे,राहुल परुळेकर,सुधीर वासे,तक्षशिला वाघधरे,कल्पना मेश्राम,डॉ.सरोज डांगे आदी उपस्थित होते.

Latest बातम्या