Homeनागपूर न्यूजमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कानडी फलक!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कानडी फलक!

ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी फाडली जाहीरातपर फलके

नागपूर,ता.४ डिसेंबर २०२२: कर्नाटक सरकारने गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राला डिवचण्याचे उद्योग सुरुच ठेवले असून नुकतेच त्यात अनेक घटनांची भरच पडली आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावाद असणा-या गांवाविषयी नुकतेच आक्षेपार्ह्य व महाराष्ट्राला डिवचणारे विधान केले,असे असताना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावरील संपूर्ण रस्त्यावर कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागातर्फे ‘चला कर्नाटक नव्याने पाहू या’असे जाहीरातपर फलक लागले असल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी संतप्त होत, आज कर्नाटकमधील पर्यटनस्थळांची जाहीरात करणारी फलके तीव्र आंदोलन करुन फाडून फेकली.

कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाने वर्धा रोड ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या मार्गावर कर्नाटकामधील विविध पर्यटनस्थळांची जाहीरात करणारी शेकडो फलके शनिवारी रात्री लावली.ही बाब उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना माहिती हाेताच रविवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरत येण्याच्या काही वेळेपूर्वी त्यांनी विमानतळ परिसर गाठला आणि कर्नाटक सरकारच्या जाहीरातीपर फलके फाडून तीव्र संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्री आज शहरात येत असल्यामुळेच जाणीवपूर्वक ही फलके लावण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे(ठाकरे गट)शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी केला.मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असले तरी ते संपूर्ण महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत.अश्‍यावेळी कुरापती काढण्यासाठी व आपले बळ दाखवण्यासाठीच एका रात्रीत ही फलके लावण्यात आल्याचा आरोप नितीन तिवारी यांनी केला.

हा फक्त मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर महाराष्ट्र राज्यालाच खिजवण्याचा प्रयत्न कनार्टक सरकारने केला.यानंतर देखील कर्नाटकाने महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तिवारी यांनी दिला.

शिवसेनेच्या(ठाकरे गट) या आंदोलनानंतर विमानतळ प्राधिकरणातर्फे कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागातर्फे लावण्यात आलेले सर्व फलक काढून टाकण्यात अाले.

एअरपोर्ट अथॉरिटी अंतर्गत जरी जाहीरातीचा विषय येत असला तरी कर्नाटक सरकारच्या सातत्याने महाराष्ट्रावर कुरघोडीचा इतिहास बघता, या नंतर देखील अशी फलके फाडून टाकण्यात येतील,असा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांतर्फे देण्यात आला.

आंदोलनात शहर प्रमुख दीपक कापसे, जिल्हा संघटक सुशीला नायक , शहर संघटक मंगला गवरे,मुन्ना तिवारी , नीलिमा शास्त्री , प्रीतम कापसे, विशाल कोरके, अंकुश भोवते, गजानन चकोले,अब्बास अली , आशीष हाडगे, सोनू शाहू,सलमान ख़ान ,दीपक पोहनेकर, शैलेंद्र अंबिलकर, सुरेंद्र आंबिलकर, ललित बावनकर, सोनू शैख़, वेंकी, सौरभ ,विष्णु पोटफ़ोडे , श्रीकान्त खंडाडे, किरण शेडके, गौरव मोहोड, कार्तिक नारनवरे, राजेश वाघमारे तसेच इतर अनेक शिवसैनिकांचा सहभाग होता.

Latest बातम्या