Homeनागपूर न्यूजफूटालाच्या फाऊंटेनमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी तेलंगखेडीतील शेकडो हेरिटेज वृक्षांची ‘गैरकायदेशीर ’कत्तल

फूटालाच्या फाऊंटेनमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी तेलंगखेडीतील शेकडो हेरिटेज वृक्षांची ‘गैरकायदेशीर ’कत्तल

(रविवार विशेष)

मनपाच्या परवानगीची ‘गरज’आहेसच कोणाला?पर्यावरणवाद्यांचा संताप

आज ‘फूकट’उद्या ‘विकत’च्या गौडबंगालातून नागपूरकरांच्या खिश्‍याला दूहेरी कात्री

फूटाला फाऊंटेनमुळे फ्रेण्डस कॉलनीतील रहीवाश्‍यांना‘ सदर’चा फेरा!

फूटालाचे नैसर्गिक गतवैभव आता नागपूरकरांनाही आठवेना:तीस मिनिटांच्या म्यूझिकल फाऊंटन ‘शो’ नी घातली नागपूरकरांना भूरळ!

फूटाला तलावालाही एक ‘इतिहास’होता,याचे स्मरण नागपूरकरांच्या विस्मृतीत दफन!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२३ ऑक्टोबर २०२२:मानवी वसाहती आणि त्यांना होणारा भरपूर झाडांचा सहवास यांतून जन्म घेणारे सुष्ट वर्तुळ रहवाशांचे शारीर व मानसिक आरोग्य जपतेच.पण,त्याचा एकूण सामाजिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो असे ‘नासा’च्या प्रयोगांनी अमेरिकेत ,शहरी वनांचे महत्व अधोरेखित केल्याचा लेख नकुताच प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाला .मात्र,नागपूरात विविध प्रकल्पांच्या नावावर गेल्या काही वर्षात जी लाखो झाडे येनकेन प्रकरणे ’नियमात’बसवून किवा ‘विना परवानगीने ’कापण्यात आली ते बघता, किमान नागपूकरांच्या आरोग्याला येत्या काही वर्षात निसर्गाचे चांगलेच आव्हान पेलावे लागणार आहे,यात दूमत नाही.

फूटाला येथे साकारलेल्या म्यूझिकल फाऊंटन प्रकल्पात प्रेक्षकांची होणारी गर्दी व पराकोटीचा होणारा ट्रॅफिक जाम बघता तातडीने ‘पाथ वे’च्या नावाखाली तेलंखेडी उद्याना मागील हिरवीगार आमराई नामशेष करण्यात आली. या भागातून फूटाळापर्यंत रस्ता तयार करण्यासाठी शेकडो हॅरिटेज वृक्षांचा हकनाक बळी गेला आहे.दूर्देव म्हणजे अद्याप ही शेकडो वृक्षंाची कत्तल सुरु असून रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा ध्यास उपराजधानी नागपूरला आपली बाप दादांची जागीर समजणारे एका हेव्हीवेट नेत्याच्या मार्गदर्शनातून,येथील कंत्राटदाराने घेतल्याने शहरातील पर्यावरणप्रेमी चांगलेच संतापले आहेत.

सोशल मिडीयावर यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून ,विकासाच्या नावावर फूटाला तलावाचे ऐतिहासिक व नैसर्गिक सौंदर्याची पार बर्बादी केल्यानंतर आता तेलंगखेडी उद्याना मागील हिरव्यागार आमराईला निष्ठूरतेने कापण्यात आले असल्याची ओरड समाज माध्यमात फार मोठ्या प्रमाणात उमटली आहे. या ठिकाणाहून फूटालासाठी ‘पाथ वे’बनविण्याचे काम जोमाने सुरु असल्याने शहरातील ’ख-या’पर्यावरणवाद्यांनी यावर बरीच टिका समाज माध्यमांवर केलेली आढळते.

यात एका केंद्रिय मंत्र्यांचे उघडपणे नाव घेत भारत वनमध्ये न्यायालयाची चपराक बसल्यानंतर आता तेलंगखेडी उद्याना मागील या घनदाट,डौलदार आणि हिरव्यागार आमराईला निष्ठूरतेने कापण्यात येत असून, आधी येथील वृक्षांना ‘वाळवण्यात’ आले व नंतर पाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या ठिकाणी फूटाळापर्यंत ‘पाथ वे’बनत असल्याचा नावाखाली नागपूरकरांच्या डोळ्यात धूळ झोकल्या जात असल्याचे बोलले जात आहे.ही वृक्षे तब्बल शंभर ते दीडशे वर्ष जुनी असून चाळीस ते पन्नास फूट उंचीची होती.महत्वाचे म्हणजे एवढा मुसळधार पाऊस नागपूरात पडला असताना याच विशिष्ट आमराईतील ही झाडे कशी काय वाळली?हा मूलभूत प्रश्‍न उपस्थित करुन,या जागेवरुन सामान्य नागरिकांचे येणे-जाणे ही नसताना प्रदुषणाचा प्रश्‍नही उद् भवन नसल्याचे ते सांगतात.

आधी गांधी सागर तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली त्या तलावाचा सत्यानाश केला.वेगवेगळ्या योजनेत पैस खाण्यासाठी या तलावाला वारंवार सुकवून या ही ऐतिहासिक तलावाचे वाटोळे केले.त्यात आपल्याच चेले चपाट्यांना काम मिळवून देण्यासाठी हे सगळे उद्योग करण्यात येत असून नागपूरकर जनतेच्या करांच्या पैशाचा अक्षरश:चुराडा केल्या जात असल्याचा आरोप समाज माध्यमात व्यक्त झाला.

फूटाला तलावाच्या बर्बादी नंतर तेलंगखेडी उद्याना मागील हिरव्यागार आमराईला नागरिकांचा वाढता विरोध बघता,चोरुन लपून आमराईतील वृक्ष छाटण्यात आले.यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची देखील परवानगी घेतली नसल्याचे पर्यावरणवादी सांगतात.उद्यान विभागाचे प्रमुख अमोल चोरपगार हे स्वत: या ठिकाणी पाहीणी करण्यास आले होते मात्र अद्याप त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

सुरवातीला पाथ वे साठी आय ब्लॉक्स लावण्याच्या नावाने काम सुरु झाले मात्र फूटाला तलावामुळे या ठिकाणची माती ही निसरडी झाल्याने यावर आय ब्लॉक्स बसणे शक्य नसल्याने सिमेंट रस्त्याचे जाळे या ठिकाणी देखील विणले जाणार असून या परिसरातील संपूर्ण नैसर्गिक हिरवळ नष्ट केली जात असल्याचा संताप समाज माध्यमात उमटला आहे.

यासोबतच भारत वनाचे भूत पुन्हा एकदा मंत्री महोदयाच्या अंगात शिरल्याने आपली जिद्द व अहंकारातून कोणत्याही कायदे कानून वा नियमांची पूर्तता न करता फूटाला फाऊंटन शोची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी भारत वनातून मार्ग काढणे नितांत गरजेचे असल्याचे हे त्यांच्या ही लक्षात आल्यानेच या संपूर्ण पर्यावरण -हासाचा अट्टहास सुरु असल्याचा आरोप केला जात आहे.

अजनी रेल्वे स्टेशन भागातील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेने देखील यावर चांगलाच रोष व्यक्त करीत,फाऊंटन शोच्या वेळी अमरावती रोड कडून फूटालाकडे जाणारा रस्ता पूर्णत:बंद केल्या जात असल्याने त्यांना व्हाया ‘सदर’ते फ्रेंड्स कॉलनीत असणारे आपले घर इतक्या गर्दीतून गाठावे लागत असल्याचे सांगितले.नागरिकांना होणारी ही असुविधा व ओरड टाळण्यासाठीच भारत वनातून रस्ता नेणे हे या प्रकल्पधारकांना अत्यंतिक गरजेचे झाले असल्यानेच,पर्यावरणाची कितीही अपरिमित हानी झाली तरी आपल्या ‘तथाकथित’ विकास प्रकल्पाचा रेटा सत्तेवर असेपर्यंत रेटायचाच,ही हिटलरशाही उपराजधानीत सुरु असल्याचा चांगलाच संताप समाज माध्यमात तेलंगखेडी परिसरातील या झाडांच्या कत्तलीनंतर उमटला आहे.

सध्या नागपूरकरांसाठी खास ‘ट्रायल’(फूकट)शो चे आयोजन सुरु आहे.या शो चा आनंद घेणा-या काही नागपूरकरांसोबत खास ‘सत्ताधीश’ने संवाद साधल्यानंतर या फाऊंटन शोची अशी काही भूरळ त्यांच्या मनावर पडली आहे की,तरंगणा-या पाण्यावर नागपूरचा ‘इतिहास’पाहणार-या व ऐकणा-या नागपूरकरांना एकेकाळी फूटालाला देखील आपला एक गौरवशाली ‘इतिहास’होता,हे आठवावेसे नाही वाटले.उंचच उंच उडणा-या रंगबिरंगी पाण्याच्या फव्वा-यातील किती पाणी पुन्हा तलावातच साठत आहे?ऐन पावसाळात काठोकाठ तुडूंब भरलेले असलेल्या व या ही वेळी इतका धो-धो पाऊस नागपूरात पडला असतानाही फूटाला तलावाला अशी पाण्याच्या बाबतीत ‘अवकळा ’ का आली आहे?असा साधा विचार ही शिवत नाही,हे बघता ज्यासाठी या प्रकल्पाचा अट्टहास होता तो तंतोतंत साधला गेल्या असल्याचे नजरेस पडले.

यामुळे फक्त २०२४ चीच नव्हे तर २०२९ च्या ही म्हणजे किमान दोन टर्म आणखी आपल्या निवडणूक ‘तिकीटाची’ मक्तेदारी साधली गेली असल्याचे वास्तव ही समोर आले.राजकीय मंचावरुन इतरांना आपल्या भाषणात अनेकदा ‘आता आमची रेल्वेरुपी डब्यातून उतरण्याची वेळ आली आहे,तुमच्यासारख्या नव्या दमाच्या तरुणाईला राजकारणात भरपूर वाव आहे’अशी फूकाची वल्गना करणा-यांच्या मनात, आणखी किमान पुढील दोन वेळा तरी निवडणूकीच्या तिकिटावरील व सत्तेच्या मक्तेदारीवर आपला लोभ सुटत नसल्याचेच हे द्योतक नाही का?एवढा सत्यानाश झाल्यानंतरही याच फूटाल्यात ‘फ्लोटिंग रेस्तरा’देखील नेत्यांना उभारायता आहे,हे विशेष!

येथेही कोणतीही मुद्देसूद योजना न आखता फूटालावर प्रेक्षक दीर्घेचे बांधकाम करण्यात आले.आता ट्राफिक जामच्या जाचापासून सुटण्यासाठी पाथ वे च्या नावाखाली आणखी हिरवळ नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे.

दर वेळी भाषणात माझा ड्रीम प्रोजेक्ट सांगणारे नेते हा प्रकल्प दुबई येथे भर समुद्रात उभारण्यात आल्याचे सोयीस्कपणे विसरतात,नागपूरात एका तलावात याला उभारण्याच्या धाडसापायी साढे चारशे कोटी रुपयांचा भुर्दंड हे नेते आपल्या खिशातून देत नसून शेवटी या कराचा बोजा आम नागपूकरांवरच बसणार असल्याचे वास्तव समाज माध्यमांवर ते सांगतात.

हट्टाने नागपूरात मेट्रो आणण्यात आली,आता मेट्रोचा प्रकल्प हा बारा हजार कोटींच्या घरात गेला आहे.परिणामी आधीच मनपाने मेट्रोचे पैसे देण्यासाठी नागपूरकर विकासकांवर २०४२ पर्यंत १०० टक्के विकास शुल्क आकारले आहेत,त्यात आता फूटाला फाऊंटेनवर खर्च होणारे साढे चारशे कोटी असो किवा नाग नदी सौंदर्यीकरणासाठी जापान कडून मिळणारे अडीच हजार कोटी असोत,या सर्व प्रकल्पांचा भुर्दंड अखेर नागपूरकरांवर व येणा-या पिढ्यांवरच बसणार आहे,याचे भान मात्र कोणालाही नसल्याची खंत देखील व्यक्त होत आहे.

फूटालाचा शो आज जरी ट्रायलच्या नावाखाली ‘फूकट’दाखिविला जात असला तरी लवकरच येत्या काळात तो तीनशे रुपये प्रति व्यक्ती होणार आहे,कुटूंबातील चार व्यक्ती बाराशे रुपये खर्चून एवढा खर्चिक शो बघणार आहे का?मात्र या फाऊंटन शो ची एवढी जाहीरात करायची की नागपूरकरांनी तिकीट विकत घेऊन कंत्राटदारांच्या गुंतवणूकीची भरपाई करावी,अशी ‘रास्त’अपेक्षा या प्रकल्पाच्या धोरणकर्त्यांची असल्याची टिका समाज माध्यमात उमटली आहे.एकीकडे पैस देऊन शो ही बघा व दूसरीकडे प्रकल्पाचा भुर्दंड ही अनेक दशके कराच्या रुपात भरत रहा.

विशेष म्हणजे या पाथ वे चा पंजाबराव कृषि विद्यापीठ,माफसू आणि व्हेटरनिटी कॉलेजतर्फे दबक्या आवाजात विरोध करण्यात येत आहे.या आमराईमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय पक्षी मोरचे दर्शन नागरिकांना घडायचे.पोपट व इतर पक्ष्यांची वर्दळच या आमराईवर बहरते मात्र अट्टहासाने ही हिरवळ नष्ट करुन ‘पाथ वे’च्या निर्मितीमुळे या पक्ष्यांना देखील बेघर व्हावे लागले असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

जनता नेत्याला या साठी निवडते की त्याने निवडून आल्यानंतर जनतेसाठी ‘उपयोगी’ कामे करावीत मात्र नागपूरातील एक नेता फक्त आपल्या ड्रीम प्रोजेक्ट्सच्या विविध संकल्पना नागपूरकरांवर लादून फक्त पर्यावरणाचेच अतोनात नुकसान करीत नाहीत तर नागपूरकर जनतेच्या पैश्‍यांचाही चुराडा करीत असल्याचे बोल समाज माध्यमांवर उमटले.

या आमराईतील उरल्या सुरल्या वृक्षांना एका अहंकारी नेत्याच्या हव्यासापासून वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन समाज माध्यमात करण्यात आले असून, भारत वनात देखील हिरवेगार वृक्षे कापून महामेट्रोने रस्ता बनविण्याचा प्रयत्न केला होता.यावर न्यायालयाने स्थगिती आणल्यानंतरही मेट्रोने रस्ता बनविण्याचे काम थांबवले नसून यावरही चांगलाच संताप समाज माध्यमात व्यक्त झाला आहे.

मेट्रोचे संचालक हे एका नेत्याच्या इशा-यावर चालत असून माननीय न्यायालयाची देखील वृक्षांच्या पुर्नरोपणाच्या नावाखाली दिशाभूल केली व न्यायालय देखील मेट्रोच्या कावेबाज धूर्तपणाला बळी पडली अशी खंत व्यक्त करीत, तेलंगखेडी उद्याना मागील आमराईत देखील रस्ता नसून पाथ वे बनवित असल्याचा ‘कांगावा ’केला जात असून हे सरळ सरळ न्यायलयाला व नागपूरक जनतेला धोका देण्यासारखे असल्याची टिका समाज माध्यमावर उमटली आहे.

माफसू,पीकेव्ही व व्हेटरनिटी विद्यापीठ कोणीही या आमराईतून पाथ वे बनविण्याची परवानगी दिली नव्हती.तरी देखील त्यांच्या परवानग्या ‘गृहीत‘धरुन शेकडो डौलदार वृक्षे कापण्यात आली!व्हेटरनिटी विद्यापीठाद्वारे नेत्याच्या दडपणात पोलिस तक्रार देखील केली गेली नाही.कोणाचाही परवानगी नसतान महामेट्रो कोणाच्या अहंकारातून आणि राज्य सरकारकडून कोणत्या आधारावर निधी प्राप्त करुन नागपूर शहरातील हिरवळीचा सत्यानाश करीत आहे?यावर संशोधन झाले पाहिजे,अशी मागणी देखील केली जात आहे.

जनतेच्या पराकोटीच्या विरोधानंतर भारत वनातून जाणा-या रस्त्याची योजना ही रद्द केल्याचा कांगावा करीत, रद्द करण्यात आलेल्या रस्ता मार्गापासून फक्त शंभर फूटांच्या अंतरावरुन महामेट्रो धडाक्याने रस्ता निर्मितीत गुंतली आहे व हा संपूर्ण अट्टहास येत्या काळात फूटाला वरील गर्दीची कोंडी फोडण्यासाठीच केला जात असून, शहरातील ‘पर्यावरण’गेलं खड्डयात,शहरातील भावी पिढीला एका नेत्याच्या पराकोटीच्या अट्टहासातून, सर्व ऐतिहासिक तलाव हे छायाचित्रातच बघायला मिळणार असल्याची उपरोधिक टिका देखील समाज माध्यमांवर वाचायला मिळाली.

Latest बातम्या