Homeनागपूर न्यूजनागपूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पाचशे विद्यार्थ्यांची फसवणूक !

नागपूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पाचशे विद्यार्थ्यांची फसवणूक !

गरजू विद्यार्थ्यांना भाजप आमदार मोहन मते यांची आश्‍वासनाची ‘रेवडी’

एक महिना होऊनही अद्याप विद्यार्थ्यांना शालेय बॅग्स मिळाल्याच नाहीत

गर्दी जमविण्यासाठी गरीब विद्यार्थी व पालकांना वेठबिगारासारखे धरले वेठीस!

नागपूर,ता.१८ ऑक्टोबर २०२२: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर हा वाढदिवस भारतातच नव्हे तर जगभरातच भारतीयांनी मोठ्या थाटात साजरा झाला.नागपूरात देखील भारतीय जनता पक्षाच्या आमदार,खासदारांनी आपापल्या परीने या दिवसाचे औचित्य साधून ‘दानपुण्य’ कमविण्याची नामी संधी साधली.अनेकांनी रक्तदान पासून अन्नदानापर्यंतचे उपक्रम राबविले. भाजपचे दक्ष्ण मतदारसंघाचे आमदार मोहन मते यांनी देखील रेशीमबाग मैदानावर पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले व मते यांनी दोन हजार शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅग्सचे वितरण करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी त्यांनी मनपाच्या शाळांसह शहरातील काही खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना बैठकीसाठी बोलावले. या बैठकीमध्ये आम्ही तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग्स देणार आहोत. बॅग्समध्ये टिफीन, वाॅटर बॉटल, कंपास, वह्या असं शैक्षणिक साहित्य राहणार असल्याचं सांगितलं व आपापल्या विद्यार्थ्यांना १७ सप्टेंबरला शनिवारी दुपारी चार वाजता रैशीमबाग मैदानावर पाठविण्यास सागंण्यात आलं.

आमदार मते यांच्या वतीनं ‘सारंग गोडबोले’ यांनी मुख्याध्यापक, शिक्षकांशी संपर्क व संवाद साधला होता. आमदार मते यांच्या लेटरपॅडवर संबंधित शाळांना पत्रही देण्यात आलेत. शाळेकडून विद्यार्थ्यांच्या नावांची मोबाईल क्रमांकासह यादी देखील मागविण्यात आली. रेशिम बाग येथे या उपक्रमात गर्दी दिसावी यासाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही पाठवायचं आहे, असे फर्मान ही सोडण्यात आले त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला शैक्षणिक साहित्य असणारी बॅग मिळणार आहे, या निरागस आशेने रेशीम बाग मैदान गाठले मात्र एक महिना उलटून देखील अद्याप शेकडो विद्यार्थी आमदार मोहन मते यांच्यातर्फे बॅग मिळणार असल्याच्या आनंदापासून वंचितच आहेत. यातील सर्वाधिक विद्यार्थी हे नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील गरीब,गरजू विद्यार्थी असून,विशेष म्हणजे यातील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्या दिवशी आपल्या पाल्यांच्या आनंदासाठी आपली दिहाडी,रोजी रोटी सोडून रेशिम बाग गाठले होते.

बॅग्सचा पत्ता नाही मात्र दोन हजार पासेस केल्या वितरीत!

या शालेय विद्यार्थ्यांनी आमदार मोहन मते यांच्या उपक्रमाची माहिती आपापल्या पालकांना दिली व १७ सप्टेंबरला शनिवारी मोदींच्या वाढदिवसानिमित्त रेशीमबाग मैदानावर जायचं असल्याचा अट्टहास धरला. त्याठिकाणी पालक विद्यार्थ्यांसह आल्यास त्यांना बॅग्स देण्यात येणार असल्याचे अभिवचन सारंग गोडबोले यांनी मुख्याध्यपकांना दिले होते.या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन हजार विद्यार्थ्यांना बॅग्स मिळवण्यासाठी पासेस देखील वाटले. ज्यांच्याकडे पास असतील आणि जे पालकांसह येतील, त्यांनाच बॅग्स दिल्या जाणार ही ‘तुघलकी’ अट देखील घालण्यात आली होती.

याशिवाय विद्यार्थ्यांना मैदानामधील विविध खेळण्यांवर पास दाखवून ‘मोफत‘ खेळता येणार असे आमिष देखील दाखविण्यात आले. परंतु, विद्यार्थी तिथं गेल्यानंतर त्यांना फक्त एका पासवर एकाच झुल्यावर खेळू दिल्याचं कटू वास्तव विद्यार्थ्यांनी सांगितलं.

दोन हजार पासेस तर वाटण्यात आले मात्र दोन हजार बॅग्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. काही विद्यार्थ्यांच्या बॅग्स त्यांच्या शिक्षकांकडं देण्यात आल्या. पण, बऱ्याचं विद्यार्थ्यांना तुमच्या शाळेत बॅग्स नंतर पाठविणार असल्याचं सांगून रिकाम्या हाताने परत पाठविण्यात आले.त्यामुळं हिरमुसले होऊन विद्यार्थी परत आलेत. ज्या कामासाठी आपण गेलो ते काम न झाल्यानं पालक देखील नाराज होऊन परतलेत.

मनपा शाळेत शिकणाऱ्या पालकांचे वडील मजूर वर्गातील आहेत. असे पालक रोजीरोटी सोडून मुलांच्या आग्रहाखातर रेशीमबाग मैदानावर गेले होते. त्यांचा तिथं हिरमोड झाला. विद्यार्थी आम्हाला बॅग्स केव्हा मिळणार म्हणून आज ही विचारत आहेत,पालकांचा राग देखील शाळांच्या मुख्याध्यपकांवर निघत आहे. सारंग गोडबोले हे मात्र आता फोनचं उचलत नाहीत, अशी तक्रार मनपाचेच शाळा प्रशासन आता करीत आहेत.

विद्यार्थी बॅग्सविषयी सतत चौकशी करीत असतात. पण, सुमारे एक महिन्याचा कालावधी होऊनही अद्याप त्यांना बॅग्स मिळाल्या नाहीत. यासंदर्भात आमदार मते यांच्या वतीनं हे काम पाहणारे सारंग गोडबोले यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला. तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरं देत होते. आम्ही दोन हजार पासेस वाटल्या मात्र दीडच हजार बॅग्स वितरीत करु शकलो,लवकरच उर्वरित पाचशे शालेय बॅग्स देण्यात येईल,अशी(आश्‍वासक!) उत्तरे त्यांच्याकडून ‘सत्ताधीश’ला मिळाली.केव्हापर्यंत उर्वरित विद्यार्थ्यांंना या बॅग्स मिळतील?यावर देखील त्यांनी उत्तर देणे टाळले,महत्वाचे म्हणजे ‘सत्ताधीश‘च्या प्रतिनिधीलाच,तुम्ही नेमके कूठे आहात?माहिती कूठून मिळाली?वृत्तासंबंधीची माहिती लावणार आहात का?असे चमत्कारिक प्रश्‍न विचारण्यात आले!

पत्रकार म्हणून वाचकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे कार्य करीत असून, उर्वरित गरीब,गरजू व आशा लाऊन बसलेल्या मनपाच्या शालेय विद्यार्थ्यांना कधीपर्यंत शालेय बॅग्स पोहोचवणार आहात?असा प्रश्‍न केला असता,यावर,पाच मिनिटात फोन करुन सांगतो म्हणून गोडबोले यांनी फोन ठेवला,व नंतर कॉलच केला नाही.

आमदार मोहन मते यांना देखील संपर्क केला असता कॉल उचलला गेला नाही.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागपूरातील भाजपच्या आमदारांनी जी फूकट आश्‍वासनाची ‘रेवडी‘गरीब,गरजू,निरागस शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाटली त्याची ठसठस,दिवाळी तोंडावर आल्यानंतर देखील मनपा शालेय विद्यार्थ्यांच्या मनातून गेली नाही. उदाहरणादाखल दूर्गा नगर माध्यमिक शाळेतील ११४ विद्यार्थी हे मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला रेशीम बाग येथे आपापल्या पालकांसोबत गेले होते. त्यापैकी एकाही विद्यार्थ्याला अद्याप बॅग मिळाली नाही. मोदींचा वाढदिवस होऊन एक महिना उलटला तरी अद्याप ही मुले बॅग्सच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळी संपल्या नंतर तरी या बॅग्स मिळतील का, असा सवाल आता संतप्त पालकांनी उपस्थित केलाय.या शाळेत सर्वच अडीचशे विद्यार्थी हे गरीबी रेषेखालील आहेत,हे विशेष!

विशेष म्हणजे या उपक्रमात पंडित बच्छराज शाळेने देखील सहभाग नोंदवला होता.बच्छराज शाळेच्या विद्यार्थ्यांना बॅग्सचे वाटप झाले मात्र गरीबी रेषेखाली असणारे व हातावर पोट असणा-यांच्याच पाल्यांसोबत समता,बंधूता व समसरतेचे गोडवे गाणा-या पवित्र स्थळी, रेशिम बाग मैदानावर पराकोटीचा भेदभाव करण्यात आल्याचे पालक सांगत आहेत.

४०० पासेस, बॅग्स २००-

अशीच काहीसी परिस्थिती ही लालबहाद्दूर शास्त्री शाळेतील विद्यार्थ्यांची आहे. या शाळेतील चारशे विद्यार्थ्यांना पासेस दिले गेले होते. त्यापैकी दोनशे विद्यार्थ्यांना बॅग्स दिल्या गेल्या. बाकी दोनशे विद्यार्थी अद्याप बॅग्सची प्रतीक्षा करीत आहेत. या दोन्ही शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, सारंग गोडबोले यांना फोन करतात मात्र सारंग गोडबोले हे आता फोनच उचलत नसल्याचा आरोप दुर्गानगर शाळा प्रशासनाने देखील केलाय.

तर बॅग्स तयार होतील, तेव्हा देऊ, असं सारंग गोडबोले यांनी लालबहाद्दूर शाळेतील शिक्षकांना सांगितलं आहे. आम्ही आशा सोडली असल्याचं लालबहाद्दूर शाळेतील मुख्याध्यापक आता सांगत आहेत मात्र या ही शाळेतील निरागस विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनाची,पंतप्रधानांवरील सार्थ विश्‍वासाची जी फसवणूक, माननीय भाजप आमदारांकडून अनावधानाने किंबहूना त्यांच्या या योजनेच्या शिल्पकारांकडून ‘हेतुपुरस्सर ’‘अर्थगणित’साधण्यासाठी झाली त्याची भरपाई आमदार मते कशी करणार आहेत?माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांचा निधी हा दोन कोटींवरुन तीन कोटी केला आहे,हे विशेष!

इतक्या कोवळ्या वयात पंतप्रधानांवरच्या कार्यक्रमावरील विश्‍वास एका भावी पिढीचा संपुष्टात येणे, हे भाजप पक्षासाठी तरी येत्या काळात संयुक्तीक ठरणार का?याचा विचार आता भाजप आमदार मोहन मते व त्यांच्या कार्यक्रमाचे शिल्पकार सारंग गोडबोल यांनीच करावा,असा संताप देखील आता व्यक्त केला जात आहे.

सारंग गोडबोले यांनी दोन हजार पैकी दीड हजार विद्यार्थ्यांना बॅग्स दिले असल्याचा दावा केला आहे तरी देखील दोन हजार पासेस वाटण्यात आले असता ५०० विद्यार्थी व त्यांच्या ५०० पालकांना त्यांनी वेठीस धरले असून गेल्या महिन्याभरापासून सातत्याने ते आता आपल्या शब्दाला बगल देत आहेत.

सारंग यांच्या म्हणण्यानुसार, जर एकावेळी दोन हजार बॅग्स उपलब्ध नव्हत्या. तर तेवढ्या पासेस विद्यार्थ्यांना का वितरीत करण्यात आल्या?आमदार मते यांच्या खासगी कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी गरीब विद्यार्थी व पालकांना का वेठबिगारासारखे वेठीस धरण्यात आले? कामधंदे सोडून पालक मुलांच्या हौसेखातर तिथं गेले. तिथं गेल्यानंतर पालकांसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. काही जण पदरातला पैसा खर्च करुन ऑटोने, कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. पण, पासेस असूनही पाचशे विद्यार्थी रिकाम्या हाताने परत आलेत त्याचे काय? अद्याप त्यांना या बॅग्स मिळालेल्या नाहीत. त्यामुळं विद्यार्थी, पालकांच्या मनात आमदार मोहन मते आणि भाजपविषयी प्रचंड नाराजी उमटली आहे.

Latest बातम्या