Homeनागपूर न्यूजकोविड गेला मात्र नागरिक सहकारी रुग्णालयात दंदे फाऊंडेशनचे फलक कायम!

कोविड गेला मात्र नागरिक सहकारी रुग्णालयात दंदे फाऊंडेशनचे फलक कायम!

Advertisements

शासनाचे आदेश नसल्याने कोविड हॉस्पीटल बंद केले नाहीत:मनपा अधिका-यांचे ‘साचेबद्ध ‘उत्तर

नागपूर,ता. १२ ऑक्टोबर २०२२: शहराच्या मध्यभागी किंबहूना ह्दयस्थानी असणारे नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय हे गेल्या अनेक दशकांपासून भग्न अवस्थेत ‘ठेवण्यात’आले असल्याचे नागपूरकर बघतच होते अशात, जगभरात कोविड-१९ ची साथ आली आणि नागपूरात देखील सरकारी तसेच खासगी रुग्णायांमध्येही करोनाबाधितांना खाटा मिळत नसल्याने शासन धाेरणानुसार शहरातील हॉटेल्स,समाज भवन,शासकीय इमारती,विद्यापीठ भवन इत्यादी जागेवर तात्पुरते कोविड हॉस्पीटल उभारण्यात आले .या लाटेत नागपूर नागरी सहकारी रुग्णालयात मात्र ‘योगायोगाने’शहरातील सुप्रसिद्ध डॉ.पिनाक दंदे यांच्या फाऊंडेशनला हे भग्न,उधवस्त व अनेक दशकांपासून बंद असणा-या इमारतीत(रुग्ण सेवेसाठी!) कोविड हॉस्पीटल उभारण्याची परवानगी आधी जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार नागपूर महानगरपालिकेकडून प्राप्त झाली!

२८ एप्रिल २०२१ मध्ये जेव्हा शहरात कोविड-१९ ची महामारी उच्चांकावर होती त्यावेळी शहरातील इतर अनेक इमारती,संस्थाने व रुग्णालये सोडून नेमके नागपूर नागरीक सहकारी रुग्णालयातच डॉ.दंदे यांच्या फाऊंडेशनला कोविड रुग्णालय सुरु करण्याची परवानगी प्राप्त होताच अनेकांच्या मनात यात काही तरी काळेबेरे असल्याची शंका उपस्थित झाली होती.

गेल्या वर्षभरात कोविडची साथ ओसरती झाली असून देखील या रुग्णालयावरील डॉ.दंदे यांच्या फाऊंडेशनच्या फलकांचे दर्शन समस्त नागपूरकरांना घडत आहेत.याविषयी ‘सत्ताधीश’ने मनपाच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.नरेंद्र बहीरवार यांना विचारले असता,शासनाने अद्यापही कोविडची साथ संपली असल्याचे घोषित केले नाही, त्यामुळे कोविड काळात तात्पुरते कोविड रुग्णालये उभारण्याची परवानगी दिलेल्यांना आता इमारती रिकामी करण्याचे पत्र देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

ऐन करोना महामारीच्या काळात म्हणजे गेल्या वर्षी एप्रिल महीन्यात नागरीक सहकारी रुग्णालयाची इमारतच नेमकी इतर स्वयंसेवी संस्था किवा वैद्यकीय अधिका-यांना न देता दंदे फाऊंडेशनलाच का देण्यात आली?याची निवड कशाच्या आधारावर केली?यावर बोलताना,मनपाला जिल्हाधिकारी यांचे पत्र प्राप्त झाले होते, त्यात त्यांनी नागरीक सहकारी रुग्णालयाची इमारत दंदे फाऊंडेशनला द्यावी असे उल्लेख असल्याचे,डॉ.बहीरवार यांनी सांगितले.कोविड काळात प्रारंभी जिल्हाधिकारी पदावर डॉ.रविंद्र कुंभारे व त्यानंतर विमला आर.हे होते.

गेल्या वर्षी दंदे फाऊंडेशनसोबत तात्पुरता करार करण्यात आला असून त्यांना तात्पुरत्या स्वरुपात नागरी सहकारी रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरु करण्याच्या परवानगीचे पत्र दिले असल्याची माहिती बहीरवार यांनी दिली.

दंदे फाऊंडेशनकडून रुग्णालयाची इमारत परत घेण्याबाबतचा कालावधी विचारला असता,शासनाकडून अद्याप कोविड महामारी संपुष्टात आली असल्याची घोषणा केली गेली नसल्याने शहरातील संस्थांकडून कोविड रुग्णालयांसाठी ताबा दिलेल्या इमारती परत घेता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

एप्रिल २०२१ मध्ये जेव्हा करोनाने बाधित तसेच मृतकांच्या आकड्याने उच्चांक गाठला होता त्यावेळी दंदे फाऊंडेशनच्या वतीने नागपूर नागरी सहकारी रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात एकूण किती रुग्णांना उपचार मिळाला?यावर याचा नेमका आकडा सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.एप्रिल महिन्यात मनपाच्या पोर्टलवर रुग्णांविषयीची माहिती अपलोड होत असे,त्यात शोधावा लागेल,असे उत्तर त्यांनी दिले.
थोडक्यात दंदे फाऊंडेशनलाच नेमके हे अतिशय मोक्याच्या जागेवर कोविड रुग्णालय चालविण्यासाठी का देण्यात आले?वर्षभरा नंतर देखील दंदे फाऊंडेशनचे इमारतीवरील झळकणारे फलक हे नेमके काय सूचित करतात आहेत?यावर आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

मूळात एकेकाळी मेडीकल,मेयोसारखेच विदर्भातील सर्वसामान्य रुग्णांसाठी नागपूर नागरी सहकारी रुग्णालय हे आर्थिकदृष्टया परवडणारे रुग्णालय होते मात्र फक्त मोक्याच्या जागेवर डोळा ठेऊन नागपूरातील एका हॅवीवेट राजकीय नेत्याने विश्‍वस्तांना हाताशी धरुन या धर्मादाय रुग्णालयात जे ‘राजकीय विष’पेरले त्यातून हळूहळू हे रुग्णालय कायमचे बंद पडले,असे दबक्या आवाजात जुने जाणते पदाधिकारी सांगतात.

डॉ.सुभेदार यांनी या रुग्णालयासाठी फार मोठी लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढली असल्याचा इतिहास नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना मुखोद् गद आहे.असे असताना येत्या काळात दंदे फाऊंडेशनच्या घश्‍यात ,ही हेतूपुरस्सर बंद पाडण्यात आलेल्या रुग्णालयाची इमारत देण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे.

डॉ.दंदे यांचे रविनगर चौकात दोन प्रशस्त हॉस्पीटल असून शहरातील हॅवीवेट नेते,मंत्री व काही संपादकांसोबतचे त्यांचे ‘मधुर’संबंध यांची नेहमीच चर्चा रंगत असते.फाऊंडेशनच्या नावाखाली नागरीक सहकारी रुग्णालयाची मोक्याची जागाही दंदे यांना देण्या ऐवजी करोना काळातील आरोग्य क्षेत्राचा जो अनाचार,व्योभिचार आणि भ्रष्टाचार करोना बाधितांच्या आणि करोना बाधित मृतकांच्या वाटेला आला ते बघता,शासनाने पुढाकार घेऊन हे रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी पुन्हा उभारावे,अशी मागणी आता केली जात आहे.

एप्रिलमध्ये वाढलेल्या करोनाच्या रुग्णसंख्येने जिल्हातील आरोग्य व्यवस्थेचे पितळे उघडे पडले होते.खाटा नाहीत,ऑक्सीजन नाही,पुरेसे मुनष्यबळ नाही,अशा स्थितीत आप्तांचे जीव वाचवण्यासाठी नागपूरकरांनी दिवस-रात्र एक केला होता.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मेयो हॉस्पीटल व एम्स देखील करोना बाधित रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी खाटा उपलब्ध नसल्याने अपुरे पडले होते.खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची अक्षरश: लृट सुरु होती तर महानगरपालिकेचे दवाखाने माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे करोनाबाधित रुग्णांसाठी देखील ’उकीरडेच’ठरले होते.या पार्श्वभूमीवर रुग्णालयांची खरी गरज ठलकपणे करोना महामारीने अधोरेखित केली असताना,मेयो मेडीकलवरील ताण कमी करुन नागरीक सहकारी रुग्णालयाचा जीर्णोद्वार करण्यात यावा व कायमस्वरुपी कोविडसारख्या रोगावर उपचार करण्यासाठी शासनाने ही इमारत कोणत्याही संस्थेला न देता स्वत: पुढाकार घेऊन पुन्हा उभारावी व या रुग्णालयाला गतवैभव प्राप्त करुन द्यावे,अशी मागणी केली जात आहे.

या रुग्णायात दंदे फाऊंडेशनतर्फे काेविड रुग्णालय सुरु केल्याबद्दल ‘सत्ताधीश‘ने गेल्या वर्षी डॉ.सुभेदार यांच्याशी संपर्क साधला असता,हे रुग्णालय पुन्हा एकदा उघडण्यात तर आले,मला याचाच आनंद आहे. माझा यावर कोणताही आक्षेप नाही अश्‍या शब्दात, त्यांनी समाधान व्यक्त केले होते.

‘सत्ताधीश’ने २० नोव्हेंबर २०२० रोजी नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाविषयी प्रसिद्ध केलेली बातमी-

नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय मर्यादित: कोणाचा डोळा कोणाचा लढा?

नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय मर्यादित: कोणाचा डोळा कोणाचा लढा?

९० वर्षीय डॉ.बालचंद्र जागेश्‍वर सुभेदार यांचा चिवट यशस्वी लढा: त्याच ठिकाणी पुन्हा गरिबांसाठी रुग्णालयच उभारावे शेवटची ईच्छा

डाॅ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १ नोव्हेंबर:एकेकाळी नागपूर शहरातील गरिब आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी नॉर्थ अंबाझरी रोडवरील नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय मर्यादित हे मेडीकल-मेयापेक्ष्ा ही सुलभ आणि स्वस्त आरोग्य सेवा पुरविणारे रुग्णालय होते मात्र नागपूर शहराच्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी असणा-या आणि शहरातील नागरिकांसाठी अत्यंत स्वस्त असणा-या हे रुग्णालय बंद पडावे,खासगी उद्योजकांच्या घशात जावे यासाठी याच रुग्णालयाच्या विश्‍वस्तांच्या माध्यमातून जे प्रयत्न झाले व त्यांच्या या सर्व अपवित्र प्रयत्नांविरोधात या रुग्णालयाचे संस्थापक सदस्य ९० वर्षीय डॉ.बालचंद्र जागेश्‍वर सुभेदार यांनी जो प्रदीर्घ न्यायालीयन लढा दिला ते नव्या पिढीला ‘आदर्शवत’आहे,असेच म्हणावे लागेल.

सुरवातीला राज्य सरकारने या रुग्णालयासाठी आर्थिक देणगी दिली.यामुळे रुग्णालयासोबत राज्य सरकारचा सरळ सबंध प्रस्तापित झाला होता.मात्र या रुग्णालयातील विश्‍वस्तांनी राज्य सरकारचे जवळपास त्याकाळी ७ लाखांचे अनुदान परत केले आणि रुग्णालयावर स्वत:चा ताबा ‘हेतूपुरस्सर प्रस्तापित केला!याचा अर्थ नागपूर नागरिक सहकारी रुग्णलयाच्या विश्‍वस्तांनी सुरवातीपासूनच हे रुग्णालय बंद पडावे,शहरातील नागरिकांना स्वस्त दरात उपचार मिळावे,या उदात्त हेतूलाच स्वार्थ आणि लोभाची पाने पुसली.

यानंतर शहरातील सुप्रसिद्ध ह्दयविकार तज्ज्ञ अर्नेजा यांच्यासोबत विश्‍वस्तांनी या जागेचा करार केला. जवळपास साढे सात कोटी रुपये घेऊन हे रुग्णालयाच अर्नेजा यांना विकण्यात आले!मात्र अर्नेजा हे खासगी तज्ज्ञ असल्याने व रुग्णालयाची स्थापनाच हा सहकारी तत्वावर झाली असल्याने त्या हेतूलाच या करारामुळे धक्का पोहोचला,असे आव्हान डॉ.सुभेदार यांनी उच्च न्यायालयात केले.

या आव्हानाला उत्तर देत विशवस्तांनी असाच करार हैदराबादेतील रुग्णालयासोबत झाला असता डॉ.बालचंद्र यांनी त्या कराराला विरोध नाही केला,असे अपीलात नमूद केले.हैदराबादेतील ही संस्था देखील सहकारी रुग्णालय टेकओवरच करणार होती,मग डॉ.अर्नेजा यांच्यासोबतच्या कराराचा विरोध का?असा आक्ष्ेप नोंदवला.आता डॉ.अर्नेजा यांच्यासोबत कराराचे संपूर्ण कागदपत्रे प्रसिद्ध झाल्यानंतर या करारावर आव्हान दाखल करण्यात कोणतेही औचित्य नसल्याचे सांगून त्यांची याचिका खारित करण्यात यावी,अशी विनंती केली.

मात्र माननीय न्यायालयाने या संपूर्ण करारामागील ‘हेतू’यावर न्यायदानाचा निकाल दिला.मूळात हे रुग्णालय सहकारी तत्वावर,धर्मादायरित्या चालणारे या निकषावर निर्माण झाले असल्याने हे रुग्णालय संपूर्ण खासगीरित्या चालवायला देणे हे मूळ उद्देश तसेच कराराशी न्यायोचित नाही.याशिवाय राज्य शासनाच्या सचिवांनी विशवस्तांनी केलेल्या कराराला जी मान्यता दिली ती देखील उच्च न्यायालयाने अवैध ठरवली व ती मान्यता रद्द केली.

या विरोधात विशवस्तांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची याचिकाच खारिज करीत डॉ.बालचंद्र सुभेदार यांची बाजू उचलून धरली.न्यायमूर्ती रामण्णा व न्या.चंद्रचूड यांनी हा निकाल दिला.परिणामी मोक्याच्या जागेचे एक जीर्ण व भग्न झालेले रुग्णालय आज ही नागरिकांसाठी औत्सूक्याचा विषय ठरला आहे.उच्च न्यायालयातील लढा डॉ.बालचंद्र यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी जिंकला तर सर्वोच्च न्यायालयातील लढा २०१७ साली जिंकला.

नुकतेच करोनासारख्या महामारीने जगासोबतच नागपूर शहराला देखील मृत्यूच्या सापळ्यात अडकवले.नागपूर जिल्ह्यात साढे तीन हजारांच्या जवळपास करोना विषाणूमुळे सर्वसामान्य नागरिक हे मृत्यूमुखी पडलेत.संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच कोलमडून पडली. मेडीकल-मेयोमध्ये खाटा या हाऊसफूल झाल्या तर नागपूर महानगरपालिकेचे दहा रुग्णालय हे फक्त पांढरे हत्तीच ठरले. जवळपास तीन महिन्यांच्या करोनाच्या कोपानंतर काही खासगी रुग्णालयांना करोनावर उपचार करण्याची परवानगी प्राप्त झाली मात्र अनेक खासगी रुग्णालयांनी या विषाणूला खो-याने पैसे कमावण्याची सुवर्ण संधी मानली,सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात तर खासगी रुग्णालयांचे उपचार कधीही नव्हते मात्र सरकारी रुग्णालयांत देखील एकेका वेंटिलेटरसाठी ऑक्सीजनसाठी सर्वसामान्यांचे जीव गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका तसेच इंडियन मेडीकल असोसिएशनने मध्यंतरी सामान्य नागरिकांसाठी ४२ खाटांचे हे रुग्णालय पुन्हा सुरु करण्यासाठी बैठक ही पार पडली मात्र मनपाने जीर्ण इमारत झालेल्या या रुग्णालयाला पुन्हा आर्थिक पाठबळ देऊन सुरु करण्यास असमर्थता व्यक्त केली हे विशेष!

एकीकडे ३११ कोटींचे सिमेंट रसत्यांसाठी मनपा ही राज्य सरकारच्या आर्थिक सहाय्याने टेंडर काढते मात्र शहरातील सर्वसामान्यांसाठी शहराच्या मधोमध आणि अतिशय सोयीस्कर ठिकाणी असणा-या एका इमारतीवर मात्र काही कोटी प्रदान करुन जीर्णोद्धार करण्यास असमर्थ ठरते,यातच सगळं गौडबंगाल आले.

टेंडरशिवाय शहरात मेट्रो सुरु होऊ शकते रुग्णालय का नाही?
डॉ.बालचंद्र यांच्याशी ‘सत्ताधीश’ने खास संवाद साधला असता,वयाच्या नव्वदीतही त्यांची हीच एकमेव अपेक्ष्ा आहे की हे रुग्णालय त्यांच्या हयातीत पुन्हा सुरु झालेले त्यांना पाहायचे आहे. हे काम त्वरित सुरु झाले पाहीजे.या संपूर्ण खटल्यात एक प्रतिवादी म्हणून नागपूर सुधार प्रन्यासची भूमिका देखील चमत्कारिक आढळते.त्यांनी न्यायालयात ही संपूर्ण जीर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात यावी अशी विनंती केली आहे.मध्यंतरी कोर्टाने विचारले ही होते त्यावर उशिरा लक्ष्ात आले,वेळ नाही मिळाला,असे धोरण नसलेले उत्तर दिले.नागपूरात महामेट्रोचे काम हे टेंडरमध्ये अडकू नये यासाठी टेंडर प्रक्रिया बाजूला ठेऊन वेगाने मेट्रोचा प्रकल्प सुरु झाला त्याच धर्तीवर आता नागपूर शहरातील मंत्र्यांनी या धर्मादाय रुग्णालयाचे काम सुरु करावे,असे डॉ.बालचंद्र यांचे म्हणने आहे.निविदा प्रक्रियेमुळे बराच वेळ वाया जातो,सरळ अर्ज मागवा व कामाला सुरवात करा,अशी ईच्छा ते व्यक्त करतात.

नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाचे संस्थापक सदस्य म्हणजे डॉ.बालचंद्र सुभेदार यांनाच अंधारात ठेऊन रुग्णालयाच्या विक्रीसाठी विश्‍वस्तांनी जाहीराती दिल्या.एकाच विशिष्ट तज्ज्ञाने पाच नावाने अर्ज भरले,यातील चार अर्ज वेळेवर मागे घेण्यात आले व डॉ.अर्नेजा यांचाच अर्ज स्वीकार करण्यात आला.६ मे २०१४ रोजी मात्र उच्च न्यायालयात डॉ.बालचंद्र यांच्या बाजूने निकाल दिला.

आजही डॉ. बालचंद्र यांचा एकच हेतू आहे ज्या हेतूसाठी हे धर्मादाय रुग्णालय उभे राहीले,यशस्वीपणे चालले,नंतर मात्र आपापसातील हेवेदावे’ हेतुपुरस्सर’ निर्माण करुन २००७ मध्ये हे रुग्णालय तोट्यात आणले.’न नफा ना नुकसान’ तत्वावर अतिशय यशस्वीपणे चालणारे हे रुग्णालय नंतर युनियन लीडर्सच्या सततच्या आंदोलनातून हळूहळू रसातळात गेले.विशेष म्हणजे या रुग्णालयासमोरच अलंकार चित्रपटगृह आहे.रुग्णालयासमोरच चित्रपटगृह नसावे हा देखील नियम आहे, यासाठी देखील प्रदीर्घ न्यायालयीन लढाई पार पडली.मात्र रुग्णालयाच्या अगदी समारे चित्रपटगृह नसून दोन इमारतींनंतर रुग्णालय येत असल्याचा दावा न्यायालयाने स्वीकारला व अलंकार चित्रपटगृहाला परवानगी प्रदान करण्यात आली,अशी माहिती ते सांगतात.

आएमएमध्ये हे रुग्णालय चालू करण्याची किवा चालविण्याची क्ष् मता नसल्याचे डॉ.सुभेदार स्पष्टपणे सांगतात.जवळपास साढे चार चौ.वर्गामध्ये निर्मित हे रुग्णालय हे एकेकाळी सर्वसामान्य रुग्णासाठी अतिशय स्वस्त सेवा पुरवित होते.धरमपेठ भागात १९६५ ते ७० च्या काळात या भागातील रुग्णांसाठी अारोग्याची सेवा पुरविणारी रुग्णालयच नव्हते.त्यावेळी नासुप्रने धर्मादाय रुग्णालयासाठी ही जागा लीजवर दिली.आता नासुप्रने रुग्णालयाची लीज रद्द केली असल्याची माहिती डॉ.सुभेदार यांनी दिली.त्यावेळी डॉ.घाटे हे अध्यक्ष् पदी होते तरतत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तात्काळ या रुग्णालयाला अर्थसहाय्य प्रदान केले होते.या ठिकाणी आधी शासनाचे स्टोअर रुम होते.ते तात्काळ शिफ्ट करण्यात आले.तातडीने रुग्णालयाची इमारत बांधण्यात आली. नाशिकराव बाळासाहेब तिरपूडे हे अध्यक्ष् असताना डॉ.बालचंद्र हे रुग्णालय संस्थेच्या उपाध्यक्ष् पदी होते.तीन मजल्याच्या या रुग्णालयात शहरातील मोठमोठे व प्रसिद्ध सर्जन,फिजिशियन,गायनिक मेडिसिन डॉक्टर्सनी सेवा दिली.४२ खाटा होत्या.टायफाईड(विषम ज्वर)वरील उपचार,एक्सरे मशीन,पॅथोलॉजी लेबोरेटरीची सेवा देखील रुग्णालयात दिली जात होती.त्या काळी मात्र सीटी स्कॅन होत नव्हते.

त्याकाळी नागरिक हे मेडीकलला जाण्या ऐवजी नागरिक सहकारी रुग्णालयातच उपचारासाठी येण्यास प्राधान्य देत होते.बाबा आमटे यांच्यावर देखील याच रुग्णालयात उपचार झाले.तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यावर देखील याच रुग्णालयात उपचार झाले.मुंबईवरुन डॉक्टर्स आले होते.अकोल्याच्या भाजपच्या आमदार प्रमिला टोपले यांच्यावर देखील याच रुग्णालयात उपचार झाले.त्यांच्यावरील उपचाराची देयके काढण्यात आली नाही,मोफत उपचार केल्याने डॉ.बालचंद्र यांच्यावर पैश्‍यांचा अपहार केल्याचा ठपका ठेऊन या बाबीची वर्तमान पत्रात खूप प्रसिद्धी ही करण्यात आली होती! रुग्णालयाची सेवा ही रुग्णांसाठी अतिशय समाधानकारक होती.वकील,न्यायमूर्ती हे देखील या रुग्णालयात विश्‍वासाने उपचार घेत असे.या रुग्णालयाला सरकार फंड देत होती मात्र तरीदेखील हळूहळू रुग्णालय तोट्यात जाऊ लागले.हे रुग्णालय बांधण्यासाठी सहकारी बँकेकडून आम्ही कर्ज देखील घेतले होते,असे डॉ.बालचंद्र सांगतात.

डॉ.सुभेदार यांना रुग्णालयातून बाहेर काढण्यासाठी अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण खेळण्यात आले. तत्कालीन इतर विश्‍वस्तांनी डॉ.बालचंद्र सुभेदार हे रुग्णालयात येताच स्टाफनी बाहेर निघून जावे असे आदेश दिले होते.परिणामी डॉ.सुभेदार रुग्णालयात येताच स्टाफ बाहेर निघून जात होता. असे एक ना अनेक अपमानाचे चटके एवढ्या प्रामाणिक व वरिष्ठ डॉक्टरने ह्दयावर साहले!डॉ.सुभेदार यांच्याशी तत्कालीन युनियन नेते हे चक्क शिवीगाळ ही करायचे..या संपूर्ण राजकारणात रुग्णालयाची संपूर्ण पत लयात गेली.त्यांचा एकच उद्देश असायचा,आरडाओरड करायची व पेपरमध्ये छापून आणायचे.यावेळी सदावर्ते हे अध्यक्ष् पदी होते.याच सदावर्ते यांना नंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.यानंतर चौधरी अध्यक्ष् झाले मात्र रुग्णालयाची आवक कमी,अडचणी खूप इ.कारणे दाखवून त्यांना रुग्णालय बंद करण्याची अतिशय घाई झाली.त्यांनीच जाहिरात देऊन इतर संस्थांनी रुग्णालय चालविण्यासाठी पुढे यावे अशी मागणी केली.

दूर्देवाने यावेळी संघाच्या तत्कालीन प्रमुखाकडे रुग्णालयाशी संबंधित काही अतिशय प्रामाणिक डॉक्टर्स यांनी रुग्णालय वाचविण्यासाठी धाव घेतली मात्र….त्यावेळी संघांच्या नियमात एखादे रुग्णालय वाचविणे हे तत्वात बसत नव्हते! नंतरच्या काळात मात्र संघाने अनेक नियमात बदल केले!त्याच काळात नागपूरातील एका हेव्हीवेट मंत्र्यांकडे देखील धाव घेण्यात आली होती मात्र……?पक्ष् कोणताही असो….नेते कोणतेही असो… हे रुग्णालय वाचविण्यासाठी कोणीही मदत केली नाही,किंबहूना ‘हेतूपुरस्सर’ पुढाकार ही घेतला नाही…!कारण एकच….मोक्याची जागा…..!

जाहीरात दिली आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात!
डॉ.सुभेदार यांनी सांगितलेल्या आठवणीत आणखी एक मजेदार बाब म्हणजे हे रुग्णालय विकण्याचा चंग बांधणा-या विश्‍वस्तांनी रुग्णालय विकण्याची जाहिरात दिली ती ही एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात!भारतातील सर्वाधिक खप असणा-या वृत्तपत्रात जाहीरात देण्याचे नियम असतानाही हे असे घडले.यानंतर फेक टेंडर भरण्यात आले व पुढील सर्व नाट्य घडले….!४० वर्षे हे रुग्णालय डॉ.अर्नेजा चालवतील असा करार करण्यात आला….!यााठी डॉ.अर्नेजा यांच्याकडून साढे सात कोटी रुपये ही घेण्यात आले….!या विरोधात त्यावेळी ८३ वर्ष वय असणा-या डॉ.बालचंद्र सुभेदार यांनी न्यायालयात पीआयएल टाकली…!

केवळ आणि केवळ उपराजधानीतील एक धर्मादाय रुग्णालय वाचवण्यासाठी डॉ.सुभेदार या ९० वर्षीय डॉक्टरचा हा प्रदीर्घ न्यायालयीन लढा हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असाच आहे.आज या रुग्णालयाच्या बाजूलाच चममचणारे सेंट्रल मॉल आहे.या मालकाचा देखील डोळा या मोक्याच्या जागेवर होता,अशी माहिती आहे. या संपूर्ण लढ्यात एकीकडे राज्यशासनाचे ग्रामीण विकास विभाग,मुंबई, नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय मर्यादित, महानगरपालिका आयुक्त,इंडियन मेडीकल असोसिएशन तसेच नागपूर इंम्प्रूव्हमेंट ट्रस्ट एवढे प्रतिवादी होते,दूसरीकडे डॉ.सुभेदार यांचा एकट्याचा हा लढा होता…मात्र शेवटी ‘ खोटे हरले आणि जीत सत्याची झाली… ’प्रामाणिक माणूस कसा असतो,हे डॉ.सुभेदार यांच्याकडे बघितल्यावर कळतं आणि त्यांच्यासमोर मन आपादमस्तक होतं.

न्याय-अन्यायाच्या या लढाईत मोक्याची जागा सर्वसामन्य रुग्णासांठी टिकवून ठेवणा-या या चिवट विभूतीला ‘सत्ताधीश’चा मानाचा मुजरा.

Latest बातम्या