Homeनागपूर न्यूजसेवा पंधरवडा :एकाच दिवशी १३ ठिकाणी शुभारंभ

सेवा पंधरवडा :एकाच दिवशी १३ ठिकाणी शुभारंभ

Advertisements
Advertisements

१७ सप्टेंबर २०२२: बदलत्या तंत्रज्ञानाने पारदर्शिता वाढविली असून आता जनतेला अतिशीघ्र न्याय देण्याची भूमिका प्रशासनाची असली पाहिजे. त्यामुळे येत्या पंधरवड्यात नागपूर सेवा पुरविण्यात देशातला अव्वल जिल्हा ठरला पाहिजे. सोबतच ही प्रक्रिया यंत्रणेच्या कायमस्वरूपी अंगिभूत झाली पाहिजे, असा सूर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज व्यक्त केला.

राज्यात आजपासून सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा, यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात आज एकाच दिवशी बारा तालुके व मुख्यालयात एक अशारितीने तेरा कार्यक्रम एकाच वेळी जिल्ह्यामध्ये घेण्यात आले.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत सभागृहामध्ये लाभार्थ्यांच्या भरगच्च उपस्थितीत घेण्यात आला. या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक विजय मगर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ उपस्थित होते. तर याचवेळी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये कळमेश्वर येथे माजी मंत्री आमदार सुनील केदार, उमरेड व भिवापूर येथे आमदार राजू पारवे यांच्याहस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन व लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप झाले. याशिवाय सावनेर, काटोल, हिंगणा, रामटेक, मौदा, नरखेड, कुही, कामठी, पारशिवनी या तालुक्यांमध्येही उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे व आवश्यक दस्तावेजाचे वाटप झाले.

या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. तर अनेक लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध योजनांमधील प्रमाणपत्र, निवडणूक ओळखपत्र, फेरफारपत्र, वय अधिवास, जातीचा दाखला, पट्टावाटप पत्र, शिधापत्रिका वाटप, नवीन सिंचन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, सोलर पंप, झोपडपट्टी पट्टा वाटप, मिळकत पत्रिका, भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र प्राप्त केले.

मुख्य कार्यक्रमांमध्ये संबोधित करताना आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यामधील प्रलंबित्व कशात आहे, याची यादी करून त्याकडे विशेष लक्ष द्यावे. गरिबी रेषेखालील यादीमध्ये चुकीचे लोक येणार नाहीत. सोबतच जे वंचित आहेत ते दुर्लक्षित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. घरांच्या संदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना आहेत. त्या योजनाची शंभर टक्के अंमलबजावणी झाल्यास ज्यांना खरोखर घरांची गरज आहेत त्यांना हक्काचे घर मिळेल. तसेच अनेक प्रकरणात वर्षानुवर्ष प्रलंबित कोणी राहणार नाही, याची काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले. नागपुरात उत्तम काम होत आहे. त्यामुळे या सेवा पंधरवड्याच्या कामांमध्ये जिल्हा अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पुढे राहील, यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रमाणपत्र वाटपांमध्ये कोणतेही प्रलंबित्व राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘प्रशासन आपल्या दारी ‘ या मंडल स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येत असून सर्व अधिकारी तहसीलदाराच्या समन्वयात उपस्थित राहत आहे. यावर उपविभागीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणार आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा या सेवा पंधरवड्यात अधिक उत्तम काम करेल, असे आश्वासित केले.

विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे यांनी अल्पसूचनेवरून जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी या उपक्रमामध्ये जोमाने सक्रिय झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सेवा पूरवणे हे आपले नियमित काम असले तरी आज या पंधरवड्याच्या रूपाने त्याला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने उत्सवामध्ये आपल्याला उत्साह संचारतो त्याप्रमाणे हे काम सचोटीने झाले पाहिजे. केवळ खानापूर्ती न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, असे त्यांनी सुचित केले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित्व कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी ग्राम पातळीवरून तालुका पातळीपर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी पोलीस दलातर्फे अश्वती दोरजे व विजय मगर यांनीही देखील समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन तहसिलदार चैताली सावंत तर आभार  निलेश काळे यांनी मानले.

 

Latest बातम्या