Homeनागपूर न्यूजसर्वाधिक भ्रष्ट मेट्रो मेन आता महान विकास पुरुष:प्रशांत पवारांच्या भूमिकेत बदल

सर्वाधिक भ्रष्ट मेट्रो मेन आता महान विकास पुरुष:प्रशांत पवारांच्या भूमिकेत बदल

Advertisements

(रविवार विशेष)

बृजेश दीक्षीतांचे डेव्हलपमेंटचे काम प्रशंसनीय:प्रशांत पवार 

गेल्या सात वर्षांपासून दीक्षीतांवर सातत्याने शरसंधान करणारे प्रशांत पवार यांच्याच हस्तेच दीक्षीतांचा सत्कार!

दीक्षीतांना मेट्रोच्या प्रगतीसाठी जेव्हा कधी आमची मदत लागेल आम्ही सोबत असू :प्रशांत पवार यांची मुक्ताफळे

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,(Nagpur)ता.१४ ऑगस्ट २०२२: महामेट्रोमध्ये अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्ट कारभाराला सर्वस्वी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षीत हेच जबाबदार असून दीक्षीत यांची तर या पदावर नियुक्तीच अवैध व गैरकायदेशीर असल्याचा आरोप करणारे व सातत्याने गेल्या सात वर्षांपासून दीक्षीत व महामेट्रोवर, पत्र परिषदा घेऊन कंठशोष करणारे ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी काल शनिवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी दूपारी ४ वाजता दीक्षा भूमी समोरील मेट्रो (Metro)भवनातच याच, महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांचा जेव्हा संघटनेच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित केला तेव्हा समस्त नागपूरकांसाठी ती एक ‘ब्रेकिंग न्यूज’च ठरली.

विशेष म्हणजे नागपूरातील हे मेट्रो भवन म्हणजे एक फाईव स्टार हॉटेल असून ही जागा देखील दीक्षीत यांनी भ्रष्ट मार्गाने मिळवली असल्याचा आरोप याच प्रशांत पवारांनी एका पत्र परिषदेत केला होता. त्याच मेट्रो भवनाच्या सभागृहात त्यांनी याच दीक्षीतांचा भव्य दिव्य हार घालून सत्कार केल्याने, प्रशांत पवार यांच्या अचानकपणे बदललेल्या भूमिकेबाबत संशयाचे धूके साचले व चर्चेला उधाण आले.

दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल यांच्यासह याच मेट्रो भवनात प्रशांत पवार यांची एक ‘अति महत्वाची’ बैठक पार पडली होती.या बैठकीत असा कोणता ‘समझौता’झाला की प्रशांत पवार यांनी मेट्रो भवनासमोर याच वर्षी फेब्रुवरी महिन्यापासून, लोकल वेंडर्सच्या भूगतानासाठी तसेच महामेट्रोतर्फे ओबीसींच्या ९०० पेक्षा अधिक जागांबाबत झालेल्या,केलेल्या अन्यायाविरोधात तंबू ठोकून भजन-कीर्तन आंदोलन चक्क गुंडाळून ठेवले!याचा शोधही आता घेतला जात आहे.

वेंडर्स व ओबीसींबाबतच्या आमच्या मागण्या मान्य झाल्याने आंदोलन गुंडाळण्यात आले असा खुलासा प्रशांत पवार यांनी केला मात्र गेल्या सात वर्षांपासून ज्या दीक्षीतांच्या विरोधात प्रशांत पवार यांनी आरोपांची राळ उठवली होती त्या सर्व अतिशय गंभीर आरोपांचे काय?या प्रश्‍नाबाबत मात्र ते मौन बाळगतात.

दीक्षीत यांची महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्तीच त्यांनी अवैध ठरवली होती,लोकल वेंडर्स यांच्या भूगतानाची मागणी मान्य केल्याने दीक्षीतांवरील हा आरोप ते मागे घेतात का?दीक्षीत यांची महामेट्रोमध्ये दिनांक २४ डिसेंबर २०१४ रोजी प्रतिनियुक्तीवर संचालक पदी निवड झाली होती.भारतीय रेल्वेकडून त्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी महामेट्रोमध्ये प्रतिनियुक्ती(डेप्यूटेशनवर)पाठविण्यात आले होते.प्रतिनियुक्तीचा कालावधी २३ डिसेंबर २०१७ ला संपत असल्याने त्यांनी सदर कालावधी वाढवून मिळण्यासाठी अर्ज केला.सोबतच त्यांची पाच वर्षांसाठी कायमची नियुक्ती करावी असा अर्ज केला.

त्यांना २३ डिसेंबर २०१७ नंतर मुदत वाढ मिळाली नाही.परंतू महाराष्ट्र शासनाकडून त्यांना कायमची नियुक्ती मिळावी असा प्रस्ताव रेल्वे बोर्ड,मंत्रालय,भारत सरकार यांच्याकडे पाठविण्यात आला.तथापी,रेल्वे बोर्डच्या नियमानुसार जो पर्यंत भारतीय रेल्वेकडून सदर व्यक्तीचा राजीनामा स्वीकारल्या जात नाही तोपर्यंत त्यांची कायमची नियुक्ती करता येत नाही हा नियम आहे.

त्याप्रमाणे रेल्वे बोर्डला बृजेश दीक्षीत यांनी राजीनामा पाठवला.सदर राजीनामा मंजूर झाल्याचे पत्र नवी दिल्लीतून २५ एप्रिल २०१८ रोजी रेल्वे बोर्डचे महामेट्रो कंपनीला मिळाले.परंतू २५ एप्रिल रोजीचे हे पत्र प्राप्त होण्या आधीच १६ एप्रिल २०१८ रोजी दीक्षीत यांनी महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार कायमच्या नियुक्ती तत्वावर स्वीकारला होता.याचा अर्थ केंद्र व राज्य शासनाची दीक्षीत यांनी फसवणूक करुन नियमबाह्यरित्या हे पद मिळवले,असा अारोप प्रशांत पवार यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी पत्र परिषदेत केला होता.

त्याच दीक्षीतांचा सत्कार लोकल वेंडर्सचे ४० टक्के भूगतान दीक्षीतांनी केल्याने व उर्वरित भूगतानही लवकरच येत्या काळात करणार असल्याच्या सबबीखाली प्रशांत पवार व वेंडर्स संघटनेने काल शनिवारी केला. तरी ज्या दीक्षीतांची नियुक्तीच अवैध असल्याचा कंठशोष प्रशांत पवार यांनी केला होता,त्याच दीक्षीतांचा सत्कार सोहळा आयोजित करुन प्रशांत पवार यांनी त्यांच्या अवैध नियुक्तीवर आता शिक्कामोर्तब केले आहे का?किवा त्यांची एवढ्या मोठ्या व महत्वाच्या पदावरील नियमबाह्य नियुक्ती आता प्रशांत पवार यांना मान्य आहे का?या प्रश्‍नांची उत्तरे अनुत्तरीतच रहातात.

ज्या दीक्षीतांना महाराष्ट्र शासनाने नियुक्तीचा आदेशच दिला नाही,त्यांचे वेतन,भत्ते,सवलती,नियुक्तीचा कालावधी ठरविण्यातच आला नाही ते दीक्षीत कोणत्या अधिकाराने पदावर आहेत?दीक्षीत व महामेट्रो प्रशासकीय मंडळाने शासनाची फसवणूक केली असून दीक्षीत यांची नियुक्ती अवैध ठरवित त्यांनी घेतलेला पगार व भत्ते परत घेऊन त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी प्रशांत पवार यांनी केली होती.जो पर्यंत चौकशी पूर्ण होत नाही दीक्षीतांना पदावरुन दूर ठेवावे,दीक्षीतांनी अवैधरित्या शासनाचा कोट्यावधी रुपयांचा पगार व भत्ते घेतले असून हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याची वल्गना प्रशांत पवार यांनी केली होती,या आरोपाचे आता काय झाले?असा प्रश्‍न आता नागपूरकरांना पडला आहे.

एवढंच नव्हे तर दीक्षीत यांनी कश्‍याप्रकारे वैद्यकीय उपचारांवर जनतेचा कराचा पैसा खर्च केला,याची आकडेमोडच त्यांनी समोर ठेवली होती.दीक्षीत यांनी आपल्या वैद्यकीय उपचारावर एकाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा खर्च केला.त्यामुळे एक तर ते फारच गंभीर आजारी आहेत त्यामुळे अश्‍या या आजारी अधिका-याची एवढ्या महत्वाच्या पदावरुन त्वरित उचलबांगडी करावी किवा त्यांनी कोणत्या ‘तारांकित’ रुग्णालयांमध्ये उपचार घेतले त्याची चौकशी करण्याची मागणीही प्रशांत पवार यांनी केली होती.

महामेट्रोचे कामकाज नेहमीच भ्रष्टाचाराने युक्त राहीले असल्याने शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात महामेट्रो कश्‍याप्रकारे अग्रेसर आहे याचा पाढाच गेल्या सात वर्षात आपल्या अनेक पत्र परिषदांमध्ये त्यांनी वाचला.इमारत बांधकाम परवानग्या नाहीत,विविध जागांचे अधिकृत अधिग्रहण झाले नाही.अधिकारी व कर्मचारी भरती घोटाळा,अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नसताना मेट्रो प्रवाश्‍यांचा जीव धोक्यात टाकणे,रस्त्यावरुन जाणा-या वाहतुक व्यवस्थेची सुरक्षा नाही,महामेट्रो म्हणजे सत्ताधारी पक्षाचा ‘महा घोटाळा ’असून महामेट्रोमधील अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करण्यासाठीच ‘जय जवान जय किसान ’ संघटनेने आंदोलन छेडले असल्याचा दावा प्रशांत पवार यांनी वारंवार आपल्या पत्र परिषदांमध्ये केला मग प्रफूल्ल पटेल यांच्यासोबच्या दीक्षीतांच्या फक्त ‘एकाच ’ बैठकीत अडीच हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप हवेत कसे विरलेत!हे काेडं नागपूरकर जनतेला उलगडत नसल्याचे दिसून पडत आहे.

दीक्षीत यांनी लोकसभा निवडणूकीत आचार संहितेचा भंग करुन कश्‍याप्रकारे २०१९ मध्ये १४ अधिकारी व ३ कर्मचा-यांना पदोन्नती देऊन सुमारे २०००० रुपये प्रति महिन्याप्रमाणे त्यांच्या पगारात वाढ केली यावर देखील प्रशांत पवार यांनी मेट्रो विरोधात विशेष पत्र परिषदेचे आयोजन केले होते.या नियमबाह्य पदोन्तीमुळे कश्‍याप्रकारे हजारो मतदार प्रभावित झाले व लोकसभा निवडणूक प्रक्रिया दोषपूर्ण झाली,अशी तक्रार करणारे प्रशांत पवार यांनी कालच्या सत्कार सोहळ्यात ‘आमचा लढा मेट्रो किवा दीक्षीतांच्या विरोधात नसून मेट्रोतील काही प्रशासकीय बाबीं विरोधात’ असल्याची मुक्ताफळे उधळताच अनेकांच्या भूवया उंचावल्या.

ज्या मेट्रो राईडमुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला होता,तीच मेट्रो ‘और आगे बढनी चाहीये,उलट मेट्रोला विकासात जेव्हा कधी मदत लागेल आम्ही तुमच्या सोबतच!’ प्रशांत पवार यांचे हे विधान देखील अनेक अनुत्तरीत प्रश्‍ने निर्माण करुन जाणारेच ठरले.

७ सप्टेंबर २०१९ रोजी पंतप्रधान मोदी हे सिताबर्डी ते खापरी या रिचवर स्टेशनचे बांधकाम अपूर्ण असतानाही उद् घाटनासाठी येणार होते मात्र आम्ही पंतप्रधान कार्यालयाला तातडीने मेल केला व त्यांचा नागपूर दौरा रद्द केल्याची पाठ ही प्रशांत पवार यांनी थोपटून घेतली होती. दीक्षीतांनी देशाच्या पंतप्रधानांचाच जीव धोक्यात आणला असल्याचा आरोप करणारे पवार हे काल ’दीक्षीतांचे डेव्हलपमेंटचे काम प्रशंसनीय ’असल्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे झालेत!

दीक्षीतांनी महामेट्रोला प्रमाणपत्र देणारे सीएमआरएसचे प्रमुख गर्ग यांच्यावर कामे अपूर्ण असतानाही प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव आणला असल्याचा गंभीर आरोपही याच पवारांनी केला होता.असे धमकीबाज दीक्षीतांचे पद ,काल प्रशांत पवारांना, केंद्रिय मंत्र्यांच्या समकक्ष असल्याचा साक्षात्कार ही झाला!

महामेट्रोचे जागतिक दर्जाच्या स्टेशन्सची भर पावसाळ्यात पोल खोलही प्रशांत पवारांनी केली होती.दीक्षीत हे सर्व प्रसार-प्रचार माध्यमांमध्ये स्वत:ची वाहवा करुन घेत पाठ थोपटवून घेतात मात्र नागपूरच्या वरुणराजाने दिक्षीतांचा शहाणपणा कसा उघडकीस आणला,याची पोलखोल करणारे रंगीत छायाचित्रेच प्रशांत पवारांनी माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिली होती.महामेट्रोचे हे स्टेशन्स जागतिक दर्जाचे नसून एखाद्या खेडे गावातील बस स्थानकांपेक्षाही निम्न दर्जाचे असल्याची परखड टिका करणारे प्रशांत पवार हेच काल सत्कार सोहळ्यात दीक्षीत यांच्या ‘कल्पक बुद्धिमत्तेचे’ कायाल झालेले आढळलेत!न्यू एअरपोर्टच्या पंप रुम स्टेशनमध्ये सुद्धा पाणी जमा झाल्याची छायाचित्रे प्रसिद्ध करुन बृजेश दीक्षीत यांनी केलेल्या हजारो कोटींच्या महाघोटाळ्याला नागपूरमध्ये बसरणा-या वरुणराजाने घोटाळ्याची पावतीच दिली व दीक्षीत यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली होती.

गडकरी व मुख्यमंत्र्यांना तसे पत्र ही लिहले.जीएसटी कर चोरीमध्ये कश्‍याप्रकारे दीक्षीत यांचा सहभाग आहे यावर देखील प्रशांत पवार यांनी विशेष पत्र परिषद आयोजित केली होती.मुंबईमधील जीएसटी खात्याने जीएसटी कर चोरी प्रकरणी महामेट्रोच्या कंत्राटदाराला अटक केली होती.याच पार्श्वभूमीवर ,महामेट्रोच्या कंत्राटदारांचे बिलांचे भूगतान वेळेवर मेट्रो प्रशासन करीत नाही.दीक्षीत हे नेहमीच कंत्राटदारांची बिले न देण्यासाठी हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप या पत्र परिषदेत पवार यांनी केला होता.फक्त ‘कमिशन’पोहोचलं नाही यासाठी दीक्षीत ही बिले अडवून ठेवतात,असा गंभीर आरोप प्रशांत पवारांनी केला.नागपूरच्या जीएसटी विभागाने मेट्रोच्या सर्व आर्थिक बाबींची तपासणी करावी अशी मागणी करीत, महामेट्रो प्रशासनाने,कंत्राटदारांनी कर चूकवून सुद्धा इनपूट टॅक्स क्लेम केला असल्यामुळे, त्या कर चोरीसाठी दीक्षीत यांना अटक झाली पाहिजे,अश्‍या मागणीसाठी रान पेटवणारे प्रशांत पवार हे कालच्या सत्कार सोहळ्यात चक्क त्याच दीक्षीतांच्या गळी भला मोठा हार घालताना दिसून पडलेत!

महामेट्रोला आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १६१.७८ कोटी रुपयांचा शुद्ध तोटा झाला असून सुरवातीला साढे सात हजार कोटींचा हा प्रकल्प आता बारा हजार कोटींचा झाला असून नागपूरकरांना कश्‍याप्रकारे याचा भुर्दंर्ड बसणार आहे,यावर प्रशांत पवार यांचा ऊर गहीवरुन आला होता.२०४२ पर्यंत मनपाने महामेट्रोचे देणे फेडण्यासाठी कश्‍याप्रकारे बांधकाम व्यवसायिकांवर १०० टक्के विकास शुल्क लादला,याचे ही सविस्तर विवेचन त्यांनी केले होते.

महामेट्रोचे दक्षता अधिकारी अनिल कोकाटे यांनी कश्‍याप्रकारे कर्तव्यात कसूर करुन महामेट्रोचा पैसा गडकरी यांचे खाते असणा-या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एनएचएआय)यांच्या कामांसाठी वापरला,असा धक्कादायक प्रकार देखील प्रशांत पवार यांनी नागपूरकर जनतेसमोर मांडला होता.महामेट्रोने एनएचएआय कडून पैसा प्राप्त होण्या पूर्वीच काम सुरु करुन आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये सुमारे ३७३.३२ कोटी रुपयांची कामे केली व आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १६९.२९ कोटींची कामे केली याचे कागदोपत्री पुरावेही सादर केले होते.या भ्रष्ट कारभारासाठी त्यांनी लेखापरिक्षक व मुख्य दक्षता अधिकारी यांच्यावर बरीच आगपाखड केली होती,कोकाटे यांनी नियमबाह्यरित्या आपल्या स्वत:च्या मुलीलाच इतरांचा हक्क डावलून महामेट्रोत महत्वाच्या पदावर बसवले असल्याचा गंभीर आरोप ही प्रशांत पवार यांनी केला होता.मात्र कालच्या, त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात याच कोकाटे यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला!एवढंच नव्हे तर कोकाटे यांच्यामुळेच दीक्षीतांपर्यंत ‘सर्व बाबी ’पोहोचल्याचे’ऊर भरुन गुणगानही पवार यांनी केले!

महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी कश्‍याप्रकारे इतरांचा हक्क डावलून ही खूर्ची पटकावली आहे यावर देखील प्रशांत पवार यांनी पत्र परिषदेत बरेच तोंडसूख घेतले होते,त्या हळवे यांचाही मंचावर बोलावून प्रशांत पवार आयोजित सोहळ्यात सत्कार होणे, बरेच काही सांगून जाणारा होता.विशेष म्हणजे सोहळ्या पूर्वी अखिलेश हळवे व प्रशांत पवार यांची सभागृहातील ‘कानाशी कुजबुज’ही देखील लक्षवेधक होती!

गडकरी यांनी मेट्रो रेल्वे संबधी बीओटी तत्वा संदर्भात केलेले विधान प्रशांत पवार यांना धक्कादायक वाटले होते.मेट्रो रेल्वेच्या नागपूरच्या डीपीआरमध्ये मेट्रो रेल्वे फायद्यामध्ये धावणार असे असताना मेट्रो रेल्वेचे खासगीकरण करण्याची चर्चा करने म्हणजे नागपूरातील मेट्रो येत्या ५० वर्षातही नफ्यात येणार नसल्यावरचे शिक्कामोर्तब असल्याची जळजळीत टिका प्रशांत पवार यांनी केली होती.सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची अफरातफर असलेली महामेट्रो रेल्वे कधीच नफ्यामध्ये धावणार नसल्याचा दावा आम्ही पहील्या दिवसापासूनच सांगत असल्याचे पवार म्हणाले होते,तीच मेट्रो पवारांना काल नागपूरच्या विकासाची द्योतक वाटू लागली.

मेट्रोला मनपा व नासुप्रच्या मालकीच्या १० हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या जागा अगदी फूकटात देण्यात आल्याबाबतही त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले होते.मेट्रोचे खासगीकरण म्हणजे या दहा हजार कोटींच्या जागेचेही खासगीकरण व संपत्तीकरणावर डोळा असल्याचा आरोप करीत पवार यांनी मेट्रोचे वाभाडे काढण्यासाठी महामेट्रोची ‘सिलेब्रिशेन ऑन व्हील्स’या योजने अंतर्गतची राईड वाढदिवसाच्या नावाने बूक करुन अक्षरश: तृतीयपंथीयांना नाचवले होते.जुगार खेळण्यात आला होता.याचे व्हिडीयो चांगलेच व्हायरल झाले व संपूर्ण जगात नागपूरची बदनामी ही झाली होती.यावरही सुरक्षा मॉक ड्रीलमध्ये मेट्रो नापास झाल्याचा आरोप ही पवार यांनी केला होता.मेट्रोच्या जॉय राईडमध्येही ७५ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला होता.

२५० कोटींचा भ्रष्टाचार मेट्रो खांबांच्या पेटिंगच्या करारात करण्यात आला असल्याचे सांगून, दीक्षीत व मेट्रो अधिका-यांना शासनाने त्वरित निलंबित करुन निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.

दीक्षीत यांनी दोन हजार कोटींचा आर्थिक अपहार केल्याचा आरोप करीत नागपूरातील स्थानिक व्यापा-यांच्या शोषणाविरुद्ध प्रशांत पवार यांनी महामेट्रोच्या विरोधात याच दीक्षाभूमी समोरील महामेट्रोच्या भव्य-दिव्य कार्यालयासमोर साखळी उपोषणालाही सुरवात केली.सिताबर्डी ते खापरी-मिहान या रिच-१ वर सर्व स्टेशन व मेट्रो लाईन टाकण्याचे काम आयएल ॲण्ड एफएस या कंपनीला देण्यात आले होते.या कंपनीसोबत २१ जुलै २०१६ रोजी सुमारे ५३३ कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता.या कंपनीने नागपूरातील अनेक व्हेंडरर्सकडून कामे करवून घेतली.ही कंपनी एनसीएलटीकडे गेल्यामुळे त्याचा कामावर परिणाम झाला.त्याचा फायदा घेऊन महामेट्रोने आयएलएफएस कंपनीसोबतचा आपला करार रद्द करुन पातक केल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला व यामुळे कामे केलेल्या स्थानिक व्हेडर्संचे जवळपास ३८.८७ कोटी थकीत झाले.

या कंपनीसोबत करार रद्द करुन थकीत कामे कोणत्याही निविदा न काढता इतर २००० कोटींची कामे इतर व्हेंडर्सना देण्यात आली.मेट्रोच्या अंकेक्षणामध्येही ही बाब नमूद करण्यात आली नाही.त्यामुळेच अंकेक्षकाची जबाबदारी सिद्ध करण्यासाठी त्यांची एलएजी व आयसीएआय या संस्थांना तक्रार करण्याची तयारी व्यापा-यांनी केली असून, जोपर्यंत बृजेश दीक्षीत यांना अटक होत नाही,त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत स्थानिक व्यापारी स्वस्थ बसणार नाही असा निर्धार व्यक्त करीत, मेट्रो भवनासमोर साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली.आयएलएफएसने स्थानिक व्यापा-यांच्या भूगतानसंबंधी मेट्रोला दिलेल्या पत्रान्वये व्यापा-यांचे पैसे न दिल्यास, फसवेगिरी केल्याबद्दल गुन्हे नोंदविण्यात येणार असल्याचा निर्धार देखील व्यक्त करण्यात आला होता.

मात्र या संपूर्ण नाट्यमय घडामाेडींवर प्रफूल्ल पटेल,प्रशांत पवार तसेच बृजेश दीक्षीत यांच्या अति महत्वाच्या बैठकीत कायमचा पडदा पडला,पवार यांच्या आंदोलनाचा,साखळी उपोषणाचा तंबू ’मागण्या मान्य झाल्याच्या’सबबीखाली पाऊस पाण्यात वाहून गेला.दीक्षीत यांच्या विरोधातील त्यांच्या सद् बुद्धिसाठीच्या भजन-कीर्तनाचे टाळ,मृदंगही त्या विशेष ‘बैठकी‘नंतर शांत झाले एवढंच नव्हे तर विजयकुमार शिंदे,अरुण बनकर व प्रशांत पवार ही त्रयी,ज्या दीक्षीतांच्या विरोधात प्रत्येक पत्र परिषदेत आरोपांचा धुराळा उडवून देत असे, त्यांनीच आपल्या मंच संचालन,प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शनात दीक्षीतांचे तारसप्तकात गोडवे गायले व ‘लाेकांच्या हक्कासाठीचा’जय जवान जय किसान संघटनेच्या प्रर्दीर्घ लढ्याला असा‘सुखद’ अंत लाभल्याचे समाधानही मानून घेतले.

यावर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पीएच.डी साठी संशोधन देखील करता येईल,असा व इतका हा लढा प्रेरणादायी होता,अशी कालपासून चर्चा रंगली आहे.

आता प्रशांत पवार यांचा लढा महाजनको,कोल वॉशरीज,दोन विशिष्ट अधिकारी व कोल वॉश कंपनीजच्या महाभ्रष्ट कारभाराविरुद्ध सुरु आहे.गेल्या सात वर्षांपासून महामेट्रोच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईची परिणीती अशी सुखद झाल्याने लवकरच किवा येत्या काही दिवसात,वर्षात अशीच एक ‘अति महत्वपूर्ण बैठक’ या कोल वॉश कंपनीच्या संचालकांसोबतही झाल्यास,पवार यांच्या या लढ्यालाही असेच यश मिळेल,अशी खात्रीही आता नागपूरकरांना पटली आहे.

 

Latest बातम्या