Homeनागपूर न्यूजतक्रारकर्ता एक,९४ जणांवर गुन्हे दाखल!

तक्रारकर्ता एक,९४ जणांवर गुन्हे दाखल!

Advertisements


ताजबाग अतिक्रमण विरोधी आंदोलनाने घेतले वेगळे वळण

ज्वाला धोटे यांच्यावरही गुन्हा दाखल

पिडीतांची पत्र परिषद ऐनवेळी झाली रद्द:पत्र परिषद घेणारेच सक्करदरा पोलिस ठाण्यात बंदिस्त

संविधानातील नागरिकांचे मूलभूत अधिकार मंत्री आणि संत्र्यांनी पायदळी तुडविल्याचा व्यक्त होतोय संताप

आता खुदाच्या दारी येण्यासाठी देखील विशवस्ताची परवानगी लागणार!

धोटे उद्या घेणार पत्र परिषद:मांडणार भूमिका

नागपूर,ता.१० ऑगस्ट २०२२: शहरातील सुप्रसिद्ध तीर्थस्थळ असणारे मोठ्या ताजबागचे सध्या जागतिक दर्जाचे देवस्थान बनविण्याचे काम सुरु असल्याच्या सबबीखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण तोडले जात आहे मात्र ऐन पावसाळ्यात कोणाच्याही डोक्यावरील छप्पर तोडू नये असे स्पष्ट आदेश देशातील सर्वोच्च न्यायालयाचे असताना देखील, नागपूरातील ताजबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऐन पावसात शेकडो लोकांच्या घरांवर व दूकानांवर बुलडोजर चालविले जात असल्याने येथील जनमानस पेटून उठला आहे.अश्‍यातच ताजबाग ट्रस्टच्या विशवस्ताच्या विरोधात सोमवारी मोठा रोष बघायला मिळाला.

येथील शेकडो पिडीतांनी ‘अन्याय निवारण समितीच्या’अध्यक्षा ज्वाला धोटे यांना फोन करुन या ठिकाणी बोलावले व अन्यायाचा पाढाच वाचला.सातत्याने कोसळणा-या पावसात विशवस्ताच्या कारवाईचे बुलडोजर, अनेकांच्या डोळ्यातही अश्रूंचा महापूर आणत असल्याचे बघून ज्वाला धोटे यांनी या ठिकाणी भेट दिली मात्र आता त्यांच्याही विरोधात सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फक्त एकाच व्यक्तीच्या तक्रारीवरुन सक्करदरा पोलिसांनी तब्बल ९४ नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा एक ऐेतिहासिक विक्रम नोंदवला आहे!

विशेष म्हणजे रात्री बारा वाजताच्या अंधारात पोलिसांनी या भागातील अनेकांना साखर झाेपेतून उठवून त्यांना मारत-मारत पोलिस ठाण्यात आणले असल्याचे सांगितले जात आहे.आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांना तंबी देऊन सोडण्यात आले,महत्वाचे म्हणजे आज सायंकाळी ५ वाजता ताजबाग येथील पिडीतांनी ताजबागच्या विशवस्त तसेच नागपूरातील मंत्री,संत्री यांच्याद्वारे चालविल्या जात असलेल्या अन्याय,अत्याचारा विरोधात प्रेस क्लब येथे पत्र परिषद आयोजित केली होती,मात्र याच पिडीतांना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरातून पोलिसांनी कोणताही समन्स न बजावता किंवा अटक वॉरंट न दाखवता उचलले व तब्बल २४ तास डांबून ठेवले.त्यांना न्यायालयात देखील हजर करण्यात आले नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लागू केलेल्या संविधानाची व संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराची गळचेपी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीच महाराष्ट्राच्या उपराजधानीत कश्‍याप्रकारे ताजबाग येथे केली जात आहे या विषयीचा संताप सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात आता व्यक्त होत आहे.

हा संपूर्ण प्रभाग मुस्लिम बहूल आहे.या समाजात पर्दा प्रथा आढळते.तरी देखील मध्यरात्री पोलिसांनी तब्बल शंभरच्या वर नागरिकांना घरुन उचलल्याने आम्हाला आता आत्महत्या करावीशी वाटत असल्याची भावना अनेक महिलांनी व्यक्त केली.

मी फक्त आमंत्रित पाहूणी,मुख्य आयोजक नव्हते:ज्वाला धोटे(अध्यक्ष,अन्याय निवारण समिती)
सध्या मोठ्या ताजबाग परिसरात सत्ता आणि दंडूकेशाहीच्या भरवश्‍यावर जे काही घडत आहे ते खरोखरंच माणूसकीला काळीमा फासणारेच आहे.ऐन पावसाळ्यात अतिक्रमणाच्या नावाखाली अनेकांची घरे बुलडोजरने पाडली जात आहेत.तरुणांच्या हातातला रोजगार हिसकावला जात आहे.अतिक्रमणाला माझे समर्थन नाही मात्र अतिक्रमण काढण्यासाठी देखील काही कायदेशीर बाबी असतात की नाही?की ‘आलीया विशवस्तांच्या मनी…’असा कारभार अन्याय निवारण समितीची अध्यक्ष या नात्याने मी चालू देणार नाही.

माझ्यावर देखील इतर शंभर नागरिकांसोबतच कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.जीवे मारण्याचा प्रयत्न,धमकावणे,परवानगी न घेता सभा घेणे वगैरे आरोप माझ्यावर लावण्यात आले.मला अश्‍या एफआयआरची पर्वा नाही,मी न्यायाची लढाई लढण्यास समर्थ आहे.लोकांचे अश्रू पुसणे,त्यांचे दू:खं ऐकूण घेणे हा गुन्हा आहे का?
सोमवारी मी मोठ्या ताजबाग परिसराला या अन्यायग्रस्त पिडीतांच्याच आग्रहाखातर गेले होते.मला बघताच २०० लोकं जमा झाली.अगदी गाडीतून उतरण्यापासून तर परत बसे पर्यंत तेथील लोकांनी व्हिडीयो शूट केलेत.मी त्यांना बोलावले नव्हते किवा कोणतीही चिथावणी दिली नाही.ना कोणता मोर्चा काढण्यात आला ना कोणतेही आंदोलन त्या ठिकाणी झाले.

ते फक्त मला त्यांच्या ठिकठिकाणचा उधवस्त संसार दाखवत होते.विशेष म्हणजे अतिक्रमण काढतानाही त्या विशवस्ताने ‘राजकारण’केल्याचे त्यांनी माझ्या निर्दशनास आणून दिले.विशवस्ताचा विरोध करणा-यांची घरे,दूकाने लक्ष्यपूर्वक पाडण्यात आली तर विशवस्ताशी जवळीक असणा-यांची दूकाने,घरे यांच्यावर बुलडोजर चाललाच नाही.चार घरे पाडल्यानंतर पाच घरे सोडून देण्यात आली.चार दूकाने तोडल्यानंतर तीन दूकाने सोडून देण्यात आली,याला अतिक्रमण विरोधी कारवाई म्हणायची की सूडबुद्धिची?

मलाच कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली सक्करदरा पोलिस ठाण्यातील पीआय यांनी तेथून निघून जाण्यास सांगितले मात्र बूलडोजर लाऊन भर पावसाळ्यात नागरिकांची घरे पाडताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित होत नाही का?ज्वाला धोटे त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जाताच कायदा आणि सुव्यवस्था बिघडते का?

पोलिसांनी शंभरच्या वर नागरिकांना अटक केली त्यात ५० टक्के हे १८ वर्ष वयापेक्षा कमी वयाची तरुण मुुुुुुुुुुुुुुुुले आहेत!भारतातील कोणता कायदा अल्पवयीन यांना मध्यरात्री त्यांच्या घरातून उचलून पोलिस ठाण्यात नेण्याचा अधिकार पोलिसांना देतो?मोर्चा,आंदोलन काहीही न करता माझ्यावरच फक्त एका व्यक्तिच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला,हा व्यक्ती ताजबागच्या विशवस्ताचा अतिशय ‘खास’माणूस असल्याची माहिती ही मला मिळाली आहे.पोलिसांच्या या अश्‍याच घटनाबार्ह्य वागणूकीमुळे अतिशय साधे भोळे व खुदाचे नेक बंदे असणारे लतीफ बाबू यांचा ह्दयघाताच्या झटक्याने मृत्यू झाला होता.अशीच घटना या परिसरात आणखी एका सामान्य नागरिकासोबत घडली.सक्करदरा पोलिस ठाण्यातील अधिकारी हे विशवस्ताच्या सांगण्यावरुन ’अबू का गुर्गा’ठरवून कोणालाही पोलिस ठाण्यात नेऊन बसवून ठेवतात,खाकी वर्दीची जरब निर्माण करतात,काल देखील तब्बल शंभर लोकांची धरपकड पोलिसांनी केली,त्यातही अनेक मुले ही अल्पवयीन होती.

विशेष म्हणजे सोमवारी मी या परिसराला भेट दिल्याने हे विशवस्त महोदय मला फोन करुन,त्यांना पूर्व सूचना न देता कश्‍या काय या परिसरात आल्या?असा प्रश्‍न मला फोनवर विचारत होते!आता खुदाच्या दारी येण्यासाठी देखील या देशातील नागरिकांना एका मंत्र्यांचा वरदहस्त असणा-या एका विशवस्ताची परवानगी घ्यावी लागणार आहे का?मी फक्त त्या भागाला भेट दिली होती.मला पाहताच शे-दोनशे नागरिक जमा झाले.व्हिडीयो काढू लागले.अनेकांचे शौचालयच बुलडोजरने हेतूपुरस्सर तोडून टाकले.एकीकडे या देशाचे पंतप्रधान स्वच्छतेसाठी अतिशय आग्रही आहेत वरुन आता तर त्यांनी ’हर घर तिरंगा’मोहीमच चालवली आहे,मुस्लिम बहूल भागात घरेच राहणार नाहीत तर तिरंगा उपक्रमाचे औचित्य तरी या देशात कसे काय साधणार?

या भागात महिलांसाठी कौतुकास्पद उपक्रम राबविणा-या समाज सेविका रुबिना पटेल यांच्याही विरोधात गुन्हा दाखल झाला,कारण काय?तर मला पाहताच त्या देखील माझ्या पाठीमागे चालत-चालत आल्या!

मी उद्याच पत्र परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी खास ‘सत्ताधीश’कडे सांगितले.आजची पत्र परिषद जी रद्द झाली त्यात मी फक्त निमंत्रित पाहूणी होते. मोठा ताजबाग येथील अन्यायग्रस्त नागरिक हेच, पत्र परिषद घेणारे आयोजक होते व ते आपापली भूमिका माध्यमांसमोर मांडणार होते मात्र काल मध्यरात्रीच त्या सर्वांना अटक झाली,इतरांना ही धमकावण्यात आले,किमान या शहरात तरी एक सत्ताधारी राजकीय पक्ष पुरस्कृत ‘लोकशाहीची हत्या’ मी होऊ देणार नाही.

Latest बातम्या