
.’

तळागाळात पोहाेचवणारी ‘मोडस ओपरेंडी’
नागपूर,ता.८ जुलै २०२२: सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावणकुळे हे नगरपालिका,नगरपंचायतचे नगराध्यक्ष व ग्रामपंचायतीचे सरपंच यांची निवड थेट जनतेतूनच करण्याची पूरजोर मागणी करीत आहेत.एका अर्थाने ‘लोकांचे,लोकांद्वारे,लोकांसाठीचे’ राज्य ही लोकशाहीची कल्पना मान्य केली तर ही मागणी अगदी रास्तच आहे मात्र या मागणीमध्ये किंबहूना या मागणीमागे भाजपची मोडस ओपरेंडी नेमकी काय आहे?यावर चर्चेचे गु-हाळ सध्या उठले आहेत.
महत्वाचे म्हणजे,गाव खेड्यामंध्ये भाजपने वेगवेगळे ‘सेल ’निर्माण केलेले आढळतात.ओबीसी मोर्चा,अनुसूचति मोर्चा,एसटी मोर्चा,मुस्लिम मोर्चा,शेतकरी मोर्चा,विद्यार्थी मोर्चा इ.वेगवेगळे गट भाजपने निर्माण केले असून या गटांच्या माध्यमातून भाजप हा गाव खेड्यांमध्ये अगदी तळागाळातल्या मतदारांपर्यंत पोहोचला आहे.भाजपची अगदी ‘झोपडपट्टी’आघाडी देखील असून शहरातील स्लम भागातही भाजपचे स्लम पदाधिकारी कार्य करताना दिसून पडतात.
काँग्रेसची पक्ष बांधणी मात्र अद्यापही त्याच जुन्या ढ-र्यावर चाललेली आहे.एकीकडे भाजप एखादा गट निर्माण करतो,उदा.बहूजन आघाडी माेर्चा,या गटात १५० ते २०० पदाधिकारीच असतात.हे पदाधिकारी मग आपल्या ग्रामीण भागातील कमीत कमी दीड ते दाेन हजार मतदारांना आपल्यासोबत जोडून घेतात.
काँग्रेसची पदरचना अद्यापही एखाद्या गटाचा अध्यक्ष,उपाध्यक्ष,ब्लॉक अध्यक्ष व त्यानंतर कार्यकर्ते अश्या उतरंडीत सुरु असताना भाजपमध्ये मात्र अध्यक्ष,उपाध्यक्ष,संपर्क मंत्री,महामंत्री अशी पदांची उतरंड असून महामंत्र्यांच्या संख्येला तर मर्यादाच नाही.एका गटात एक अध्यक्ष असेल तर किमान १५ उपाध्यक्ष असतात.४–५ महामंत्री असतात.मंत्री पद हे जरी एकच असले तरी १५ ते २० मंत्री भाजप पक्षात आढळतात. परिणामी १५०० लोकसंख्येच्या गावामध्ये ७०० ते ८०० मतदार सहज भाजपसोबत पदाधिका-यांच्या मार्फत जुळल्या जातात,एवढ्यासाठीच ‘पदांची खिरापत’ पदाधिका-यांना वाटली जाते.
परिणामी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा एक प्रकारे कोणत्या ना कोणत्या भाजप सेलचा ‘पदाधिकारीच’ असतो.एखाद्या पोलीस ठाण्यातही गेल्यास भाजपच्या अमूक सेलचा अमूक पदावरचा मी पदाधिकारी आहे,अशी ओळख देण्यास तो मोकळाच…..!भाजपचा कॅडर हा अतिशय मजबूत असून पेज प्रमुखापासून त्याचे संघटन बळकट असलेले दिसून पडतं.
भाजपच्या प्रभाग अध्यक्षाच्या शब्दालाही प्रदेश अध्यक्षाला मान द्यावा लागतो.कोणाला नगरसेवक म्हणून उमेदवारी द्यावी हे जर प्रभाग अध्यक्ष ठरवित असेल तर त्या नावाला सहसा प्रदेश अध्यक्षही टाळू शकत नाहीत,प्रभाग अध्यक्षाने सूचविलेल्या नावाचा भाजपचे प्रदेश अध्यक्ष ही गांर्भीयाने विचार करतात.
काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी नाना पटोले यांनी विधान परिषदेसाठी डॉ.छोटू भोयर यांचे नाव पुढे करुन उमेदवारी दिली मात्र काँग्रेसचेच मंत्री सुनील केदार व नितीन राऊत हे या निवडणूकीत अधिकृत उमेदवारा ऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दर्शवतात व त्याच प्रमाणे निवडणूकीची रणनीती आखून मतदान करतात व काँग्रेसच्याच अधिकृत उमेदवाराला पाडताना दिसतात!.भाजपमध्ये पक्षाने ठरवलेला उमेदवार हाच ‘अंतिम’मानण्याची ‘परंपरा’ आहे,त्यामुळेच फक्त अडीच वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले असून आज भाजप पुन्हा सत्तेवर आलेला आढळतो.
अधिकाधिक मतदारांशी जुळण्याच्या मोडस ओपरोंडीमध्ये भाजपने तर शहरात तसेच ग्रामीण भागात करोनाच्या काळात ‘वैद्यकीय आघाडी’ स्थापन करुन समाजातील हा उच्च विद्याभूषित वर्ग ही सहजरित्या आपल्याकडे खेचला आहे.या आघाडीतही एक अध्यक्ष आहे,उपाध्यक्ष आहे,संपर्क मंत्री आहे,अगदी शेवटच्या उतरंडीपर्यंत ‘पदेच पदे’ आहेत.
खरं तर वैद्यकीय व्यवसाय हा काही राजकारणाचा विषय नाही मात्र तरीही या वैद्यकीय आघाडीत १५ ते २० डॉक्टर्स हे उपाध्यक्ष आहेत!३ संपर्क प्रमुख आहेत.२०-३० मंत्री आहेत.उत्तर व दक्षीण नागपूरातील ३० ते ४० डॉक्टर्स या आघाडीत सहभागी आहेत.त्यांचे वैद्यकीय आघाडीतील पद भाजपच्या बॅनरखाली, ठलकपणे त्यांच्या क्लिनिकमध्ये दर्शनीस्थानी, त्यांच्याकडे येणा-या रुग्णांना दिसत असल्यामुळे, समाजातील एवढा प्रतिष्ठित वर्ग हा भाजप पक्षाला मानणारा असेल तर निश्चितच भाजप पक्ष हा चांगला पक्ष आहे,अशी मानसिकता तयार होत असते.
भाजप हा पक्षच ‘मानसिकता’तयार करणारा पक्ष मानला जातो.मानसशास्त्रातील तत्वांचे तंतोतंत पालन करणारा पक्ष म्हणून भाजपचे नाव घेता येईल.महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या राजकीय भूकंपात शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकार ‘जाणार की वाचणार’ या विवंचनेत बैठकांमध्ये व्यस्त होती त्याच वेळी, भाजपचे कद्दावर नेते व माजी वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नागपूरात २०२४ च्या लोकसभेच्या रणनीतीसाठी बैठकीत व्यस्त असताना दिसून पडलेत,हाच, भाजप व इतर राजकीय पक्षांमध्ये ठलकपणे असलेला फरक दिसून पडतो.भाजपचा ‘वकील पॅनल’ देखील असाच मजबूत आहे….!
आता बावणकुळे मागणी करतात त्याप्रमाणे जनतेतूनच सरपंच,नगराध्यक्ष निवडावा ही मागणी स्वागताहा-र्यच आहे यामुळे ग्रामीण पातळीवरील घोडेबाजार थांबेल.पूर्वी ग्राम पंचायतीचे समजा १० सदस्य असतील तर त्यातूनच सरपंच निवडला जात असे.यात ही काँग्रेसचे किवा भाजपचे पॅनल निवडून आले तर सरपंच किवा नगराध्यक्ष निवडीसाठी घोडेबाजार ठरलेलाच असायचा.
नुकतेच नांदागुमुख या सावनेर तालुक्यातील गावातील ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य हे काँग्रेसचे आहेत मात्र सरपंच हा भाजपचा झाला!हीच लोकशाहीची कमाल आहे. लोकशाहीत सरपंचचे अधिकार हे देखील महत्वपूर्ण मानले जातात.निधी वाटपाच्या नाड्या नगराध्यक्ष व सरपंचाच्याच हातात एकवटले असतात.सरपंचाला पदावरुन पदच्यूत करनेही आता सोपे राहीले नाही.तहसीलदाराला विशेष ग्रामसभा यासाठी घ्यावी लागते.
आता लोकांमधूनच सरपंच निवडला गेल्यास,प्रामाणिकपणे काम करणा-यांसाठी ती एक योग्य संधी आहे.ग्रामीण भागातील जनतेलाच यामुळे त्यांच्या गावाचा नेता कोण बनेल या निवडीचा अधिकार मिळतो.घोडेबाजारला लगाम बसेल.भ्रष्ट कारभारालाही ब-याच प्रमाणात आळा बसेल.
आघाडी सरकारने २०१९ मध्ये सत्तेवर येताच युती सरकारच्या अनेक ध्येय धोरणांना,निर्णयांना स्थगिती दिली होती त्यातील एक निर्णय हा सरपंच व नगराध्यक्ष निवडीचा ही होता.आघाडी सरकारने पूर्वीचा युती सरकारचा निर्णय फिरवून पुन्हा ग्राम सदस्यांमधून सरपंच निवडीचा अधिकार बहाल केला होता.
जनतेतून थेट सरपंचाची निवड हीच ख-या लोकशाहीला अभिप्रेत असणारी मागणी आहे,राजकीय पक्षांच्या पाया पडण्याची गरज यातून संपुष्टात येते,हे महत्वाचे.

आमचे चॅनल subscribe करा