Homeनागपूर न्यूजअधिवेशनात होणार शक्तीप्रदर्शन:नागपूरच्या अधिवशेनाची आठवण

अधिवेशनात होणार शक्तीप्रदर्शन:नागपूरच्या अधिवशेनाची आठवण

Advertisements

डाॅ.ममता खांडेकर
(Senior Journilist)

नागपूर,ता.१ जुलै २०२२: महाराष्ट्रात २१ जून नंतर घडलेल्या चित्तथरारक आणि नाट्यमय घडामोडींचा ‘सनदशीर’शेवट परवा ३ जुलै रोजी नव्या सरकारच्या बहूमत चाचणीद्वारे होणार असला तरी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली फक्त सहा मंत्र्यांचे मंत्रीमंडळ घेऊन नागपूरात पार पडलेल्या पहील्या हिवाळी अधिवेशनाच्या आठवणी ताज्या झाल्या.

१६ ते २१ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या या अधिवशेनात राज्यात नुकतेच सत्तेत आलेल्या महाविकासआघाडीचे सरकार आणि हाता तोंडाशी आलेली सत्ता गमावणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पराकोटीची शाब्दिक खडाजंगी बघायला मिळाली होती.हिवाळी अधिवेशन फक्त ६ दिवसांचे असले तरी सरकारचा कार्यकाळ ५ वर्षांचा आहे असे सांगून विरोधकांनी उपस्थित केलेले आणि जनतेच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आम्ही कृतीतून देऊ,असे ठाकरे म्हणाले.

विशेष म्हणजे महाविकासआघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार हे हिवाळी अधिवेशना दरम्यान दोन दिवस नागपूरात देवगिरीत तळ ठोकून होते.कोणताही प्रशासकीय अनुभव नसणा-या उद्धव ठाकरे सरकारला कुठेही दगाफटका होऊ नये म्हणून शरद पवार हे लक्ष घालून होते. त्यामुळेच उद्या मुंबईत पार पाडल्या जाणा-या विशेष अधिवेशनातही आता शिवसेना नामक शक्कले झालेल्या पक्षाला व उर्वरित आमदारांच्या मदतीला,सत्तेत बरोबरीचे वाटेकरी असणारे राष्ट्रवादी व काँग्रेसचे किती आमदार व मंत्री सरसावतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

राज्यापालांनी शिंदे सरकारला दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात बहूमत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्याने, उद्या शनिवार व ३ जुलै रविवार रोजी पार पडणा-या विशेष अधिवेशनातही तेच राजकीय पक्ष,तेच राजकीय नेते असणार आहेत तरी देखील या वेळी मुख्यमंत्री हे बदलले आहेत,नागपूरात ठाकरे सरकारच्या पहील्याच हिवाळी अधिवशेनात विरोधी पक्ष नेते पदी देवेंद्र फडणवीस होते ते आता राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खंदे कट्टर शिवसैनिक व मंत्रीमंडळातील मंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत,त्यामुळे विधीमंडळाचे अधिवेशन तेच असले तरी संदर्भ बललले आहे,सत्ता बदलली आहे,मोहरे बदलले आहेत,सत्ता पक्ष व विरोधक बदलले आहेत.

प्रशासनाचा कोणताही अनुभव नसणारे उद्धव ठाकरे यांनी नागपूरातील आपल्या पहील्याच अधिवेशनात त्यांचा प्रमुख शत्रू हा भाजपच असल्याचे सिद्ध केले होते तर भाजपनेही उद्धव ठाकरे यांना हिंदूत्व व विचारधारेच्या कोंडीत पकडण्याची एक ही संधी त्या अधिवेशनात सोडली नव्हती.

त्या अधिवेशनात पहील्याच दिवशी वाद उफाळला तो काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील विधानामुळे.दिल्ली येथील सभेला संबोधित करताना राहूल गांधीनी ’मी राहूल सावरकर नाही,मी राहूल गांधी आहे,मी पळ काढणार नाही,मी माफी मागणार नाही’असे वादग्रस्त विधान केले होते.त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले होते.

विधीमंडळात त्यामुळेच भाजपने उद्धव ठाकरे व शिवसेनेला कोंडीत पकडले.सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घातला.सावरकरांवरील बॅनर झळकवत राहूल गांधी मुर्दाबादचे नारे लावले.नियम ५७ अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेऊन या मुद्दावर चर्चेची मागणी फडणवीसांनी केली.

बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने संमत झाल्यानंतर फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मांडत, काँग्रेस नेत्याने त्यांचा अपमान केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.मात्र,हे बोलणे रेकॉर्डवर न घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.त्यामुळे विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली,त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.या गोंधळामुळे अध्यक्षांनी सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केले.

सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर पुन्हा भाजपने गोंधळ घातला व सभागृहात सावरकरांचे बॅनर झळकवले.याच गोंधळात चार शासकीय विधेयके मांडण्यात आली शिवाय पुरवणी मागण्यांवर १९ व २० डिसेंबर रोजी चर्चा होईल,अशी घोषणा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

फडणवीस यांचे कोणतेही विधान कामकाजात नमूद केले जाणार नाही,असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी निर्देश देताच ‘ही स्वतंत्र भारताची विधानसभा आहे,की इंग्रजांची?सावरकरांबद्दल येथे नाही तर कोठे बोलायचे?मी वाईट बोललो का?असंसदीय बालेलो का?सावरकरांची महती सभागृहात मांडणे हे वाईट किवा असंसदीय आहे का?अशी विचारणा करीत सभागृहावर बहीष्कार घातला.विधान सभा परिसरात ‘मी पण सावरकर‘च्या भगव्या टोप्या घालून भाजपचेआंदोलन झाले.

मात्र, शिवसेनेची सावरकरांवर निस्सीम निष्ठा असताना देखील या संपूर्ण वादात शिवसेनेची भूमिका संदिग्ध होती.‘मी पाहिलेले उद्धव ठाकरे आता राहिले नाहीत’अशा शब्दात फडणवीस यांनी आपल्या मनातील खदखद याच अधिवेशनानंतर कोल्हापूर दौ-यात व्यक्त केली होती.काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिवावार सरकार आणले,ते बाळासाहेब ठाकरे यांना मान्य झाले असते का?अशी विचारणा आम्ही ठाकरेंकडे केली असता ’आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत’असे उत्तर आम्हाला शिवसेेनेकडून मिळाले.हे ऐकून मला आश्‍चर्य वाटले,मी पाहिलेले उद्धव ठाकरे आता राहिले नाहीत,अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली होती.

१६ डिसेंबर २०१९ रोजी अधिवेशनानिमित्त पहील्यांदा महाराष्ट्राच्या उपराजधानीत आलेल्या उद्धव ठाकरेंनी विमानतळावरच प्रतिक्रिया देताना ‘स्वत:ला राज्यकर्ते समजणा-यांची खोेड मोडली’अश्‍या शब्दात भाजपला डिवचले.विमानतळावर तिन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते.विमानतळावरच छोटेखानी सत्कार समारंभात त्यांनी भाजपला डिवचत ’सेना,काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते एकाच व्यासपीठावर असून, पुढे ही या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे बघून, महाराष्ट्राने देशाला एक वेगळी दिशा दिली असल्याचे ते म्हणाले.जे स्वत:ला राज्यकर्ते समजत होते,त्यांचा गैरसमज खोडून काढला.देशाला अभिमान वाटेल असे निर्णय सरकार घेईल.मुख्यमंत्री म्हणून ख-या अर्थाने नागपूरातून कारकिर्दीला सुरवात होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सार्वजनिक बांधकामंत्री नितीन राऊत यांनी महाआघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल,असा विश्‍वास व्यक्त केला.यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केवळ ५ नव्हे तर पुढील १५,२५ वर्षे महाआघाडील तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित राहतील,पुढील अनेक पिढ्यांपर्यंत महाआघाडीचेच सरकार राहिल,असे भाकीत वर्तवले,यावर महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गडगडाट व ठाकरे यांचा जयघोष केला.

मात्र,लवकरच मुंबई,ठाणेसह राज्यात १४ महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत,राज्यात तर महाविकास आघाडी अडीच वर्षात गडगडली,२५ वर्षांची आघाडी तर जाऊ द्या,निदान महानगरपालिकांच्या निवडणूकीत तरी आघाडीतील पक्ष हे एकत्रित लढतील का?असा प्रश्‍न आता त्यामुळेच जनसामान्यांसमाेर उभा ठाकला आहे!

याच अधिवेशनात नागरिकत्व धोरणावरुन देखील ठाकरे यांनी पवार यांची ‘रि’ओढीत,तीन देशांमधील पीडित शरणार्थींना आपल्या देशात आणून वसवणार कुठे?३७० आणि ३५(अ) हटविल्यानंतर काश्‍मीरमध्ये त्यांचे पुनर्वसन करणार आहात का?असा खोचक सवाल केला होता.‘आमच्या हिंदूना हात लावाल तर खबरदार,अशी ताकीद या देशांना देण्या ऐवजी पीडितांनाच येथे आणत आहेत,एवढीच हिंमत होती तर पाकिस्तान संपवायचा होता’असे खुले आव्हान त्यांनी मोदींना दिले.

कोणतीही स्पष्टता नसताना नागरिकत्व विधेयक कायदा मोदींनी आणला.जो त्याला विरोध करेल तो देशद्रोही आणि हिंदूविरोधी,पण शिवसेना काय आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे.आम्हाला मुखवटे घालण्याची गरज नाही.सत्तेत तुमच्यासोबत नाही म्हणजे आम्ही काही धर्मांतर केले नाही’असा टोलाही त्यांनी भट सभागृहात आयोजित पहील्या शिवेसना मेळाव्यात हाणला होता.

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही नागरिकत्व कायद्याबाबत व्हेरायटी चौकात केलेल्या आंदोलनात देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे विधान केले होते. तर याच मेळाव्यात संजय राऊत यांनी ‘नागरिकत्व विधेयकावर आज देशभर भडका उडाला असून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार,गोळीबार केला जात असल्याचे सांगितले.हे एक प्रकारचे राष्ट्रीय संकट असून यास सर्वस्वी भाजप सरकार जवाबदार असल्याचा आरोप केला होता.

आज शिंदे सेना ही शिवसेनेच्या ज्या हिंदूत्वासाठी आघाडी सरकारमधून बाहेर पडली,त्याची बीजे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच पेरली गेली असल्याचे त्यामुळेच सिद्ध होतं.

याच अधिवेशनात आघाडी सरकारवर भाजपने ‘स्थगिती सरकार’म्हणून आरोप केले होते.युतीच्या काळातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात स्थगिती दिली जात असल्याबाबत फडणवीस यांनी रोष व्यक्त केला होता.यावर ‘मागील सरकारने मंजूर केलेले प्रकल्प आणि विकासकामांमध्ये ‘घोटाळे’ असतील तर ते तसेच सुरु ठेवायचे का?अशी बोचरी टिका उद्धव ठाकरे यांनी केली होती. मेट्रोसाठी कारशेडचा प्रकल्प देखील त्यांनी पहिल्याच निर्णयात रद्द केला होता.

आज उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच फडणवीस यांनी मेट्रोचा प्रकल्प कारशेडच्या जागेवरच होणार असल्याचा पहीलाच शासन निर्णय घेऊन,नागपूरातील हिवाळी अधिवेशाचे उट्टे फेडले.यावर आज उद्धव ठाकरेंनी व्यथित होत,माझा सूड घ्यायचा असेल तर नक्की घ्या मात्र माझ्या मुंबईकरांवर सूड उगवू नका,कारशेड ऐवजी कांजूर रेल्वेच्या ठिकाणी मेट्रोचा प्रकल्प झाला पाहिजे,असे आवाहन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कारशेड व उद्धव ठाकरेंच्या आवाहनाबाबत प्रश्‍न विचारला असता ‘विकास प्रकल्प रोखल्या जाणार नसल्याचे’ सूचक विधान त्यांनी केले!यावरुन शिंदे-फडणवीस सरकारची,सरकार चालवण्याची पुढची दिशाही स्पष्ट होते.

सत्तेसाठी शिवसेना किती लाचार झाली आहे हे उद्धव ठाकरे यांचे विधानसभेतील विधानांवरुन अधोरेखित होते,अशी जळजळीत टिका फडणवीस यांनी केली होती.याच हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी ‘राजकारणाची धर्माशी घातलेली सांगड ही आमची मोठी चूक होती आणि त्याचे फटकेही आम्हाला बसले’असे आश्‍चर्यकारक व चमत्कारिक विधान हिंदूत्ववादी शिवेसेनेने केले होते!

हिंदूत्वावादावर एकीकडे देशात भाजपची ताकद वाढत असताना, ज्या पक्षाचे अस्तित्वच हिंदूत्ववादावर टिकून आहे त्यालाच वेशीवर टांगण्याचे काम शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐन विधानसभेत केले होते.

एकीकडे बाळासाहेबांचा शब्द पाळला,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही बाळासाहेबांचीच ईच्छा होती,अशी दवंडी पिटल्या जात असताना,बाळासाहेबांची ईच्छा उद्धव ठाकरेंनी, राष्ट्रवादी,काँग्रेसच्या भरवश्‍यावर मुख्यमंत्री होण्याची होती का?असा खोचक सवालही नागपूरच्या याच अधिवेशनादरम्यान विचारण्यात आला होता.

आघाडी सरकारमुळे ‘सत्व’ हरवलेल्या हिंदूत्ववादी शिवसेनेची बागडोर म्हणूनच कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी आता आपल्या हातात घेतली असून, उद्यापासून दोन दिवसीय पार पडणा-या विशेष अधिवेशनात त्यामुळेच विश्‍वासदर्शक प्रस्ताव जिंकल्यानंतर खरी शिवसेना कोणाची?याच्या ही सनदशीर लढाया महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळणार आहे.

Latest बातम्या