
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर नवे आव्हान:२०१९ चे उट्टे पूर्णत: काढण्याची चर्चा
बाळासाहेबांच्या विचारांची महाराष्ट्रात सरकार:एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
‘ते पुण्य’फडणवीसांनी कमवले:शिवसेनेचा मुख्यमंत्री
नागपूर,ता.३० जून २०२२:साठीच्या दशकात महाराष्ट्रात शिवसेना नावाचे वादळ घोंघावले.मराठी माणसाच्या हक्काची लढाई बाळासाहेब ठाकरेंची ही सेना रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे लढत होती.बघता-बघता शिवसेनेने मराठी मनात आपली मजबूत पकड निर्माण केली.तत्कालीन राजकारणाच्या विरुद्ध बाळासाहेबांनी हिंदूत्वाचा आक्रमकपणे पुरस्कार केला.‘गर्व से कहो हम हिंदू है’हा नारा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजला.भिंती-भिंतीवर हा नारा काेरल्या गेला आणि बाळासाहेब ठाकरे हे हिंदूंच्या ह्दयाचे अभिषिक्त सम्राट बनलेत.
राजकारणात ‘पक्ष’म्हणून शिवसेनेचा उदय झाला आणि बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना पक्षाचे ‘किंग मेकर‘बनलेत.अनेक दशके ठाकरे कुटूंबिय हे किंग मेकरच्याच भूमिकेत राहीले.प्रत्यक्ष निवडणूका लढणे किवा सत्तेत सहभागी व्हायचे धोरण, बाळासाहेब हयातीत असे पर्यंत कोणीही राबवले नाही.२०१२ मध्ये बाळासाहेब गेलेत तरी देखील तब्बल सात वर्षे ठाकरे कुटूंबिय बाळासाहेबांच्याच धोरणावर चालत राहीले.
महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेची युतीची सरकार आली त्यावेळी देखील उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष राजकारणाबाहेर राहूनच पक्ष वाढवित होते,त्यांच्याच शब्दानुसार युतीच्या सरकारधमील शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे ठरली होती.बाळासाहेबांच्या हयातीत मनोहर जोशी,नारायण राणे हे शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसलेत मात्र अंतर्गत राजकारणातून त्यांना पदाचा त्याग ही करावा लागला.
हा अनुभव बघता २०१९ मध्ये विधान सभेच्या निवडणूकीनंतर तीन पक्षांची आघाडी सरकार जेव्हा सत्तेत आली त्या वेळी मात्र आक्रित घडले!ठाकरे घराण्याने आपल्या ’किंग मेकर’च्या भूमिकेला चक्क तिलांजली देत पूत्र आदित्य ठाकरेंना आधी वरळीतून विधान सभेची निवडणूक लढवली,यानंतर आघाडी सरकारमध्ये अनेक ज्येष्ठ व अनुभवी आमदारांना डावलून,पर्यावरण खात्याचे मंत्री पदच बहाल केले.
स्वत: उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना शरद पवार यांच्या शब्दाखातर मुख्यमंत्री पदी विराजमान झाले व सहा महिन्यांच्या आत, विधान परिषदेचे सभासद होत, आपली मुख्यमंत्री पदाची खूर्ची ही वाचवली.भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी,काँग्रेस व शिवसेनेची आघाडी सरकार स्थापन होईपर्यंत ते ‘किंग मेकरच्याच’भूमिकेत होते,या क्षणापर्यंत पक्षाचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते मात्र,मनोहर जोशी,नारायण राणे यांच्या बाबतचा अनुभव बघता व तिन्ही पक्षात ज्येष्ठ नेते असल्याने समन्वय साधून राहण्यासाठी मधला ‘मिडीएटरच‘नको, असा आग्रह शरद पवारांनी धरला आणि तुम्हीच मुख्यमंत्रीची खूर्ची सांभाळा,आम्ही फक्त मलाईदार खाती सांभाळतो,अश्या ‘स्वरुपाचा’ सल्ला उद्धव ठाकरेंना मिळाला,व ठाकरे कुटूंबाचे उद्धव ठाकरे यांनी तो सल्ला ‘शिरोधार्ह्य’मानला!
आज शिवसेना अस्तित्वाच्या ज्या वळणावर पोहोचली आहे किंबहूना संजय राऊत नावाच्या दूभाषिकांनी शिवसेनेला जिथे पोहोचवलं आहे,ते बघता ठाकरे कुटूंबिय हे ‘किंग मेकर्स’च्याच भूमिकेत राहीली असती तर शिवसेना नावाच्या पक्षावर एवढे गहिरे संकट ओढवलेच नसते,असे आता उघडपणे बोलले जात आहे.
आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित करुन २०१९ च्या त्या अपमानाचे,विश्वासघाताचे संपूर्ण उट्टे काढल्याची चर्चा समाज माध्यमात रंगली.शिंदेच्या सेनेलाच फडवीसांनी शिवसेना घोषित केली.राज्यपाल यांनी देखील शिंदेंच्या सेनेलाच शिवसेना म्हणून बहूमत सिद्ध करण्यासाठी आमंत्रित केले.फडणवीस यांना विधान सभेच्या पटलावरील बहूमताच्या आकड्यांपेक्षा, शिंदे गटाला खरी शिवेसना म्हणून विधान सभेत सिद्ध करण्यास जास्त रुची आहे किंबहूना तोच त्यांचा सूड आहे,यात शंका नाही.निवडणूक आयोगाची, शिंदे शिवेसनावर शिक्कामोतर्ब व पक्ष चिन्हासाठी कायदेशीर संघर्ष, हे टप्पे देखील लवकरच महाराष्ट्राच्या जनतेला अनुभवायला मिळणारच आहेत.
हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब हे ताहयात कधीही राजकारणात कोणत्याही पदावर आरुढ झाले नाहीत.पक्षाची धूरा देखील त्यांनी पूत्र मोहातून राज ठाकरेंना डावलून उद्धव ठाकरेंवर सोपवली.आज २०२२ मध्ये ती शिवेसना फक्त एका अभद्र राजकीय व पक्षीय आघाडीमुळे कुठे पोहोचली ?याचा विचार शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर राज्यातील प्रत्येक शिवसैनिक करीत आहे.
बाळासाहेब आजन्म काँग्रेस व शरद पवार यांच्यावर शरसंधान साधत होते मात्र त्यांच्याच पक्षाचे सरसेनापती संजय राऊत व नातू आदित्य ठाकरे हे सत्तेमुळे, ‘असत्याची’ कास धरत,बाळासाहेब व शरद पवार यांचे किती मधूर संबंध होते!ही वल्गना करीत होते.दिवसा भर सभेत शरद पवारांवर बाळासाहेब कितीही कठोर प्रहार करीत असले तरी रात्रीच्या अंधारात बाळासाहेब व शरद पवार हे एका ताटात जेवीत असत!असे त्यांच्यातील सख्याचे गोडवे गाऊन दाखवले जात असे व हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला ऐकावे लागत होते.
अलीकडच्या काळात तर या गोडव्यांनी ‘भारुडाची’ जागा घेतली होती.सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पवारांच्या गुणगाणांची आख्याने व पूर्वरंग माध्यमांवर झळकत होती.या सर्वांचा अंत काल सायंकाळी महाविकासआघाडी सरकार कोसळण्यात झाला.शिवसेनेच्या ४० आमदारांनी आघाडी सरकारचा पाठींबा काढल्याचे पत्र राज्यपालांना तर सोपवलेच मात्र इथेच न थांबता,आमचीच शिवसेना ही हिंदूत्ववादी बाळासाहेबांची खरी सेना आहे म्हणून उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण करती झाली.
महाराष्ट्राच्या राजकारणाला २१ जूनच्या विधान परिषदेच्या निवडणूक मतमोजणीनंतर जी कलाटणी मिळाली त्याचा ‘क्लायमेक्स’ही आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला.शिवसेनेचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे आज राज्याच्या मुख्यमंत्री पदी घोषित झाले व सायंकाळी साढे सात वाजता त्यांचा शपथविधी ही झाला.राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी पत्र परिषद घेऊन शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आणि संपूर्ण महाराष्ट्राला भाजपचे शीर्षस्थ नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठवण आली ज्यांना, भारताच्या जनतेला असेच धक्कांतत्र देण्याची सवय आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुधवार दिनांक २९ जून २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाचा विधान सभेत बहूमत सिद्ध करण्याचा आदेश आल्यानंतर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.ते विश्वासदर्शक मतदानाला सामाेरे न जाता, फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधल्यानंतर स्वत: कार चालवित राज्यपालांकडे गेले आणि त्यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवला.
तत्पूर्वी त्यांनी जनतेला संबोधित करत, भावनिक संवाद साधताना पक्षातील बंडखोरांना उद्देशून ‘ज्या शिवसेनेमुळे ऑटोचालक,पानटपरी चालकसारखे कार्यकर्ते आमदार झालेत,मंत्री झालेत त्यांनी आज त्याच शिवसेनाप्रमुख हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रालाच मुुख्यमंत्री पदावर खाली खेचण्याचे ‘पुण्य’कमावले,असा टोला कधीकाळी ऑटोचालक असणारे एकनाथ शिंदे व पानटपरी चालवणारे गुलाबराव पाटील यांना हाणला.मला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचून शिवसेनेचा शिवसैनिक जर मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंदच आहे,या शब्दात भाजपलाही कोंडीत पकडले.
फडणवीस यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री पदावर बसवून आज आपल्या पदरात ‘पुण्य’कमावले असल्याची त्यामुळेच चर्चा रंगली.याशिवाय त्यांनी आम्ही शिवसेनेसोबतच सरकार स्थापित करीत असल्याचे सांगून,ठाकरे यांची एकाधिकारशाही व घराणेशाहीची मक्तेदारी असणा-या शिवसेनेच्या अस्तित्वालाच आव्हान दिले.
फडणवीस यांच्या या खेळीमुळे बाळासाहेबांच्या मुलाला पदावरुन खाली खेचलं हा आरोप धूवून निघाला व दूसरीकडे एका शिवसैनिकालाच मुख्यमंत्री बनवण्याचे उद्धव ठाकरेंच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास‘पुण्य’ही प्राप्त झाले.शिंदे यांच्या पक्षालाच खरी शिवसेना भाजपने ठरवल्यानंतर आता उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेच्या अस्तित्वालाच आव्हान निर्माण झाले आहे.
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्या बाळासाहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे ‘शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनणार’ हे वचन पूर्ण केले मात्र बाळासाहेबांनी ‘ठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री होणार’,असे वचन कधी मागितले नसतानाही ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री ‘बाळासाहेबांना दिलेले वचन’यासबबीखाली पदावर आरुढ झाले.राजकीय सारिपाटात मात्र आज बाळासाहेबांच्या त्याच पूत्राला मुख्यमंत्री पदावरुन शिवसैनिकांनीच खाली खेचल्याची इतिहासात नोंद झाली.
ट्टिट आणि ट्वीस्ट-
पत्र परिषदेत आज फडणवीस यांनी धक्कातंत्र देत ज्याप्रकारे शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित केले तो आवेश ते स्वत: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना नदारद होता.पत्र परिषदेत मी मात्र मंत्रीमंडळात नसणार असून बाहेरुन नव्या सरकारला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी घोषित केले होते.
राजभवनात मंचावर देखील राज्यपाल व शिंदे यांच्याचसाठी दोन खूर्च्या ठेवण्यात आल्या असताना अचानक एक खूर्ची वाढवण्यात आली.याच वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी एका वाहीनीवरुन फडणवीस यांनी प्रत्यक्ष मंत्री मंडळात सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची जवाबदारी स्वीकारावी व महाराष्ट्राला प्रगती पथावर न्यावे अशी बाईट दिली.याच वेळी नड्डा व गृहमंत्री अमित शहा यांनी ट्टीट करुन फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा देखील प्रदान केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही दोन वेळा फडणवीस यांना कॉल आल्याचे समोर आले.फडणवीस यांच्यावर पक्ष श्रेष्ठींचा दबाव आल्याने अतिशय अनिच्छेने त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र पत्र परिषदेतील त्यांचा जोश,आवाची पट्टी,देहबोली, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना नदारद होती,हे अवघ्या महाराष्ट्राने बघितले.
फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते आज राजकीय पटलावर शिंदे हे मुख्यमंत्री झालेत तर फडणवीस त्यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असणार आहेत.
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण,त्यांचे पुत्र अशोक चव्हाण किवा नारायण राणे यांच्याही राजकीय जिवनात हे ट्वीस्ट आले हाेते.शंकरराव चव्हाण आधी मुख्यंत्री होते नंतर केंद्रिय मंत्री झालेत यानंर त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री पदावरही काम केले असे राजकारणातील जाणकार सांगतात.अशोक चव्हाण हे देखील मुख्यमंत्री होते,आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले तर नारायण राणे यांच्याही वाटेला हीच नियती आली होती.
फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शिंदे मंत्रिमंडळात सहभागी व्हावे अशी मनधरणी स्वत: मोदींना करावी लागली.
आजचा दिवस महाराष्ट्राच्या जनतेसाठी संपूर्ण सस्पेंसनीच भरलेला होता,शेवटपर्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडत गेल्याने एका धक्क्यातून सावरत असतानाच दूसरा धक्का बसत राहीला.यामुळे पुन्हा एकदा २०१९ च्या ऑक्टोबरच्या राजकीय भूकंपाची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला झाली.
राज्यापालांनी मुख्यमंत्री शिंदेंना येत्या शनिवारी बहूमत सिद्ध करण्याचे आदेश दिले असून येता काळ असाच राजकीय धक्क्यांचाच असणार आहे,यात शंका नाही.
काय म्हणाले फडणवीस?-
२०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजप,शिवसेना व अपक्ष मिळून १७० लोकप्रतिनिधींचे बहूमत प्राप्त झाले असताना देखील दूर्देवाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतल्याने, आम्ही सत्ता स्थापित करु शकलो नाही असे फडणवीस पत्र परिषदेत म्हणाले.आजन्म हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा विरोध केला व ज्यांनी हिंदूत्व व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध केला,अश्या पक्षांशी उद्धव ठाकरे यांनी आघाडी केली.

हा सरळ-सरळ महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या जनाधाराचाच अपमान होता.जनतेने काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेसाठी नव्हे तर विरोधी पक्षात बसण्यासाठी मते दिली होती.या तीन पक्षांच्या सरकारने मागील अडीच वर्षात राज्याचा कोणाताही विकास केला नाही मात्र प्रचंड भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांनी केला.महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या इतिहासात राज्याचा गृहमंत्री तुरुंगात गेले नाहीत.एका मंत्र्यावर मुंबई बॉम्ब स्फोटाचा अारोपी दाऊद इब्राहीमच्या हस्तकांसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप होऊन ते ही तुरुंगात गेले मात्र या सरकारने त्यांचा शेवटपर्यंत राजीनामा घेतला नाही.या दोन्ही पक्षांसोबत आघाडी असल्यामुळे शिवसेनेने आपली हिंदूत्ववादी विचारधारा बासनात गुंडाळून ठेवली.काल सत्ता जाणार हे दिसताच औरंगाबादचे संभाजीनगर,उस्मानाबादचे धाराशिव व नवी मुंबईच्या विमानतळाला वि.बा.पाटील यांच्या नामांतरणाचा निर्णय घेण्यात आला मात्र राज्यपालाच्या बहूमत चाचणीच्या सूचनेनंतर मंत्रीमंडळाची बैठक घेता येत नाही,ती कायद्यानुसार वैध मानली जात नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचे हे तिन्ही निर्णय देखील अवैध ठरतात मात्र आमची सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा त्या निर्णयांवर संमतीची मोहोर उमटवू.
एकनाथ शिंदे व शिवेसनेच्या आमदारांची कूचंबना आघाडी सरकारमध्ये होत होती.ज्यांच्याशी ताहयात मतदारसंघात लढलो त्यांच्यासोबत आज सत्तेत आहोत.उद्याही त्यांच्याच विरोधात लढावे लागणार आहे मात्र ते कशाच्या भरवश्यावर लढायचे?आघाडीचा काेणताही फायदा शिवसेना आमदारांना मिळत नव्हता.त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आर्थिक बळ दिले जात होते.अनेकदा उद्धव ठाकरे यांना या अडचणी सांगून देखील त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ सोडली नाही.यामुळेच शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३९ आमदार यांनी आघाडी सरकारचा पाठींबा काढून घेतला.
आता भाजप व शिवसेना मिळून राज्यात एक स्थिर सरकार देणार.मी नेहमी हेच सांगत आलो आघाडी सरकार पडले तरी जनतेच्या डोक्यावर पुन्हा निवडणूका लादणार नाही.भाजप ही सत्ता किवा मुख्यमंत्री पदाच्या मागे नसते.ही तत्व व हिंदूत्वाची लढाई होती म्हणून भाजपने शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचे सरकार महाराष्ट्रात स्थापित होत असल्याचे ते म्हणाले. शिंदे हे बंडखोर नसून आवाज बुलंद करणारे नेते आहेत,असे ही फडणवीस म्हणाले.

आमचे चॅनल subscribe करा