

आघाडी सरकार कोसळले:शिवसेनेसमोर पक्षाच्या अस्त्विाचीच अग्निपरिक्षा
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२९ जून २०२२: महाराष्ट्राच्या विशेष अधिवेशनात १ डिसेंबर २०१९ रोजी, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘मेरा पानी उतरता देख,किनारे पर घर मत बना लेना,मै समुन्दर हूं लौटकर जरुर आऊंगा’या शायरीतून राज्यातील नवस्थापित महाविकासआघाडी सरकारला इशारा दिला होता मात्र तेव्हा आकड्यांच्या खेळात तिन्ही पक्ष मिळून बहूमताचे संख्याबळ असल्याने, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी फडणवीस यांचा हा इशारा गांर्भीयाने घेतलाच नाही,आज विधानसभेतील त्यांचे ते शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात खरे उतरले,आपल्या चाणक्य नीतीने तिन्ही पक्षांचे ‘पानी उतरवून’,समुंदरप्रमाणे ते सत्तेत परतलेत.त्याच विधानसभेत तेच तिन्ही पक्ष मिळून, बहूमताचा आकडाही सिद्ध करण्याच्या परिस्थितीत नसल्याने, आज बहूमत चाचणीला सामोरे न जाताच,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि फडणवीस नावाच्या समुंदरात महाविकासआघाडी सरकारचे ‘टायटॅनिक’कायमचे बुडाले.
ऑक्टोबर २०१९ मध्ये राज्यात जेव्हा काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेनेने मिळून बहूमताचे सरकार स्थापित केले त्याच वेळी या सरकारने विधीमंडळात तर बहूमताचा खेळ जिंकला मात्र महाराष्ट्राच्या जनतेत आपापलं ’जनमत’गमावलं होतं.२०१९ च्या विधानसभेत राज्यातील जनतेने सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना या युतीलाच कौल दिला होता.भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेकडे ५६ जागा होत्या.
मात्र ’शिवसेनेचाच मुख्यमंत्री’‘बाळासाहेबांना दिलेले वचन’इत्यादी बाबी पुढे करुन शिवसेनेने भाजपला सत्तेत येण्यापाासून रोखले.जे ‘हिंदूत्व’या पक्षाची मूळ विचारधारा हाेती त्या विचारधारेशी फारकत घेत ‘धर्मनिरपक्षतेचे’घोंघडे पांघरणा-या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन,या तिन्ही पक्षांच्या विचारधारा किती ढोबल पायवांवर उभी आहेत हे सिद्ध केले.
आघाडी सरकार स्थापन झाल्यावर एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे, आमचा पक्ष हा अल्पसंख्यांक मतदारांमुळेच सत्तेवर, असा राग अलापत होते तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ‘मुस्लिमांममुळेच आमच्या पक्षाचे अस्तित्व’अश्या चमत्कारिक ’धर्मनिरपेक्षतेची’ भूपाळी गात होते.
या दोन्ही धर्मनिरपेक्ष विचारधा-यांच्या पक्षासोबत कट्टर हिंदूत्वावादी शिवसेनेने, सत्तेसाठी, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तसेच भाजपला विशेषत: फडणवीसांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक आघाडीकरुन सत्ता काबिज केली,त्याच वेळी ती कट्टर शिवसैनिकांना,महाराष्ट्राच्या जनतेला व तिन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या मतदारांना रुचली नव्हती.काँग्रेसला फक्त ४४ जागा तर राष्ट्रवादीला ५४ जागा देऊन विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला असताना देखील आकड्यांचा जो खेळ ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेत खेळण्यात आला,त्याच वेळी हे सरकार एक दिवस स्वत:च्या ‘विचारधारांच्या’ भारानेच कोसळणार हे विधिलिखित या सरकारचे ठरले होते.घडले ही तेच.‘हिंदूत्व’ या विचारधारेनेच शिवसेनेचा घात केला!
अगदी सत्ता स्थापित करतानाच ‘महाशिवआघाडी ’ यावर शरद पवार यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर आघाडीतील ‘शिव’शब्द गायब झाला व यानंतर आघाडीत काही ‘रामच’उरला नाही!‘हे सरकार पाच वर्षे टिकणार’ असा आत्मविश्वास पवारांमध्ये अगदी ठासून भरला होता,हा विश्वास ‘संजय राऊत’नावाच्या ‘नारायण नारायण’मुळेच प्राप्त होत होता हे अवघ्या महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनुभवलाच आहे.
तर दूसरीकडे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे पवार व सोनिया गांधींचे गुणगान गात राहीले,या दोघांच्याही पाठींब्यामुळे माझ्या सरकारला कोणताही धोका नाही या गफलतीत राहीले मात्र आपल्याच पक्षाच्या किती आमदारांचा पाठिंबा ’शिवसेनेला’आहे हे तपासण्यासाठी ‘वर्षा‘ची दारे, आपल्या आमदारांसाठी त्यांनी कधी उघडलीच नाहीत,ज्याचे परिणाम आघाडी अडीच वर्षात कोसळण्यात झाली.
शरद पवार व त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस कश्याप्रकारे शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात ‘अर्थाची’ गंगाजळी वाहून राष्ट्रवादीला बळकट करीत आहे व शिवसेनेला कमकुवत करीत आहे,हे बघण्याची,समजण्याची फुरसत ना मुख्यमंत्र्यांना होती ना त्यांच्यातील शिवसेना प्रमुखांकडे होती ना ‘पवार पवार’जपणा-या व महाराष्ट्राच्या राजकारणात महाभारत घडवून आणणा-या संजय राऊतांकडे होती.
एकीकडे फडणवीस हे ‘सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही‘असा खुलेआम इशारा आघाडी सरकारला देत होते,‘दिल्ली अभी दूर है,मी राज्यात सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,मी मैदान सोडून पळणा-यांपैकी नाही,आमचे सरकार पुन्हा आणणारच‘असे मुंबईत परळ येथे शिवसंग्राम कार्यक्रमात त्यांनी उघडपणे आव्हान केले मात्र आघाडीतील धुरीण त्यांची ‘मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन’या ना-याची टिंगल उडवण्यातच आपले श्रम खर्ची घालत राहीले.तीनचाकी रिक्षाप्रमाणे हे सरकार असून या रिक्षाची तिन्ही चाके विरुद्ध दिशेने धावत आहेत,हे फार काळ टिकणारे सरकार नाही,आम्ही कोणाचा विश्वासघात केलेला नाही,उलट आताचे ठाकरे सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे,हे फार काळ टिकणार नाही,असा हल्लाबोल फडणवीस करीत राहीले.
‘आता संवाद नाही संघर्ष करु’असे खुले आव्हान ते आघाडी सरकारला देत होते.नवनीत राणा व रवी राणा यांचा मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणाच्या अाव्हानामुळे त्यांच्यावर देशद्रोहाची कलम लावून अकरा दिवस त्यांना कारागृहात डांबण्यात आले.हिंदूत्वाची दहाड देणा-या शिवसेनेच्या राजवटीत, हनुमान चालीसाचे पठण आता राजद्रोह झाल्याची खरमरीत टिकाही त्यांनी केली.
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवू‘असे शिवजन्मस्थळाचे दर्शन घेताना विश्वास व्यक्त करीत होते दूसरीकडे मात्र त्यांनी ज्यांच्या सहकार्याने सत्ता स्थापित केली होती,त्यांचे विचार मात्र शिवसेनेच्या सहकार्याने सत्ता भोगत राहू,असे होते.‘अजितदादा इतकी वर्षे आपण उगाच दूर होतो.मधली वर्षे वाया घालवली,आपण आधीच एकत्र यायला हवे होते‘अशी खंत उद्धव ठाकरेंनी किल्ले शिवनेरीवर व्यक्त केली .मात्र त्यांच्यासोबत ‘आधीच’ एकत्र आले असते तरी शिवसेना पक्षाची आज जी राज्यात शक्कले झाली आहे ते बघता आतापर्यंत शिवसेनाप्रमुख पदीही इतर कोणीतरी विराजमान असता,याचा साधा विचारही उद्धव ठाकरेंना शिवून गेला नाही.
या शिवाय या सरकारने राज्यात फक्त आणि फक्त सूडाचे राजकारण केले हे देखील राज्यातील जनतेला पटले नाही,राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे अनेक व्हिडीयोज असलेला पेनड्राईव्ह विधानसभेत सादर करुन फडणवीसांनी राज्यात खळबळ उडवून दिली.आघाडी सरकाचे हे कृत्य ’जखमी वाघाला डिवचण्यासारखेच होते!’.
अल्पसंख्यांक विकास खात्याच्या अखत्यारीतील राज्याच्या वक्फ मंडळावर कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींची सदस्य म्हणून वर्णी लावण्याचा आरोपही त्यांनी विधानसभेत केला,यातून पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार ही कोणत्या दिशेने राज्य हाकत आहे,हे महाराष्ट्राच्या जनतेनेही बघितले आणि कट्टर शिवसैनिकांच्या काळाजाचेही पाणी-पाणी झाले.
‘हिंदूत्व’हा केवळ एक शब्द नाही तर आज एकविसाव्या शतकातील तिस-या दशकात ती या देशाची एक ‘मतपेढी’झाली आहे,याचा विसर शिवसेनाप्रमुखांना जरी पडला असेल, तरी तो कट्टर शिवसैनिकांना पडला नाही,त्यातूनच हे बंडनाट्य घडले.पेट्रोल भले ही २०० रुपये लिटर होवो,महागांईमुळे ताटात भाजी ही एकदाच मिळाली तरी चालेल,सायंकाळी आमटी करता येईल मात्र जो या देशात हिंदूत्वाची बूज राखेल त्यालाच ‘मतदान’ही मानसिकता आज देशात सर्वदूर नांदतेय,हे नाकारता येत नाही.
भाजप म्हणूनच देशातील अनेक राज्ये पादक्रांत करताना दिसतोय.काँग्रेस पक्षाने आपल्या विचारधारेत काळानुरुप परिवर्तन न केल्यानेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर महाराष्ट्रात शरद पवार यांच्या अल्पसंख्यांक तुष्टिकरणाच्या धोरणांचा उबग आल्यामुळेच त्यांचा पक्ष ५६ जागांवर थांबतो.
सत्तेच्या कितीतरी पलीकडे पोहोचलेल्या या पक्षांना २०१९ मध्ये नवसंजीवनी देण्याचे ‘पाप’ उद्धव ठाकरे यांनी केले,अशी जळजळीत प्रतिक्रिया हिंदूत्ववादी मतदार उघडपणे समाजमाध्यमांवर म्हणूनच मांडताना दिसतो,ठाकरे सरकार सत्तेतून पायउतार होताच याचा आनंद ही मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर साजरा होताना दिसतोय.
उद्धव ठाकरे हे अतिशय हळव्या व चांगल्या मनाचे असतानाही, त्यांना अश्यारितीने सत्तेतून पायउतार होताना बघताना,एक सल हिंदूत्वाद्यांच्या ह्दयातही बोचते,समर्थ रामदास स्वामींच्या ‘नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे,अति स्वार्थ नुरे पाप सांचे,घडे भोगणे पाप ते कर्म खोटे,न होता मनासारखे दु:ख मोठे‘या ओळी आज महाराष्ट्राच्या राजकारणावर आज म्हणूनच चपखल बसताना दिसतात.
एक मात्र खरे, महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याची सत्ता पुर्नकाबिज करण्यात मिळालेल्या यशामुळे दिल्लीत फडणवीस यांचे पारडे आणखी जड झाले असून ,महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाला आणखी झळाली प्राप्त झाली अाहे, महाराष्ट्राच्या राजकारणातले ते अभिषिक्त सम्राट ठरले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांच्या शब्दालाच या पुढे महत्व राहणार आहे,हे सांगण्यास कोण्या ज्योतिषाची गरज नाही

आमचे चॅनल subscribe करा