
आमदार जयस्वालांच्या भ्रष्टाचाराची प्रशांत पवारांतर्फे ‘प्रथमच’ वाच्यता!
आघाडी सरकारमध्ये उपराजधानीतही ‘बिघाडी’
नागपूर,ता.२५ जून २०२२: रामटेकचे अपक्ष आमदार तसेच पूर्वाश्रमी शिवसेनेचेच असणारे आशिष जयस्वाल यांनी महाजनको व कोल वॉशरीजसंदर्भात केलेला कोट्यावधींचा भ्रष्टचार, राष्ट्रवादीचे नेते व ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज पत्र परिषदेत विदीत केला,विशेष म्हणजे या पूर्वी कोल वाॅशरीजच्या संदर्भात प्रशांत पवार यांनी अनेक पत्र परिषदा घेतल्या,पुराव्यांनिशी कश्याप्रकारे कोल वॉशरीजचे कंत्राटदार हे वेस्ट कोळश्याच्या नावाने कोट्यावधींची लृट करतात, याचे दाखले मांडले मात्र कधीही त्यांनी आतापर्यंतच्या एकाही पत्र परिषदेत महाराष्ट्र राज्य खनीकर्म महामंडळ (एमएसएमसीचे )अध्यक्ष आशिष जयस्वाल यांच्या विरोधात ‘ब्र’देखील उच्चारला नाही,दोन दिवसांपूर्वी शिवसेनेत जो ’न भूतो न भविष्यती’असा राजकीय भूकंप आला व बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या गटासोबत, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल हे देखील गुहावटीत सहभागी झाले,यानंतर प्रशांत पवार यांना आशिष जयस्वाल हे किती मोठे भ्रष्टाचारी आहेत!याची उपरती झाली व त्यांनी ‘खास’या विषयावर आज पत्र परिषद घेतली!
महाराष्ट्र राज्य खनीकर्म महामंडळाला,महाजनकोने कोल वॉशरीजच्या कामासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.काेल वॉशची कोणतीही गरज नसताना कश्याप्रकारे आ.आशिष जयस्वाल यांनी या कामाचे कंत्राट भारतीय जनता पक्षाच्या निकटवर्तीयांना दिले आहेत,याचा पाढाच आज त्यांनी वाचला.हाच पैसा आता गुहावटी येथील बंडखोरांना पुरविला जात असल्याचा दावा ही त्यांनी केला.कोल वॉशरीजच्या माध्यमातून जमा झालेले कोट्यावधी रुपये, आमदार विकत घेण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाजनको ही कंपनी वेगवेगळ्या कोल माईन्सपासून कोळसा विकत घेते.कोळसा विकत घेऊन कोल वॉशरीजकडून हा कोळसा धूतल्या जातो व त्यानंतर वेगवेगळ्या पॉवर प्लँटमध्ये हा कोळसा वापरल्या जातो.कोल वॉशरीज, कोळसा धूतल्यानंतर जवळपास १५ ते २० टक्के कोळसा रिजेक्ट कोळसा म्हणून स्वत:कडे ठेवते व पुढे हाच करोडो टन कोळसा, कोल वॉशरीज कंपन्यांना अगदी फूकटात मिळतो.खुल्या बाजारात हाच रिजेक्ट कोळसा चार हजार ते पाच हजार प्रती मेट्रीक टन या हिशोबाने विकल्या जातो.हा रिजेक्ट काेल विकून या कंपन्यांचे कंत्राटदार हे अब्जोपती झाल्याचेही पवार सांगतात.
महाजनकोचे कार्यकारी संचालक व संचालक(मायनींग)यांच्या सन्मतीने हा संपूर्ण भ्रष्टाचार होत असल्याचा आारोप पवार यांनी केला.महाजनकोला डब्ल्यूसीएल,एमईसीएल व एसईसीएल यांच्याकडून चांगल्या दर्जाचा कोळसा मिळत असतानासुद्धा हेतुपुरस्सर कोळसा धुण्याचे षडयंत्र करुन कोट्यावधीची धांधली केली जात असल्याचा आरोप पवार यांनी विविध पत्र परिषदेमध्ये केला होता.
महाजनको या कोल वॉशरीज कंपन्यांना रिजेक्ट कोल विकत असताना जीएसटी देखील वसूल करीत नाही.जीएसटीचा तर ४०० रुपये प्रती मेट्रीक टन आहे.या कंपन्यांनी शासनाचा २५८ कोटींचा जीएसटी बुडवला असल्याचा देखील आरोप पवार यांनी त्यांच्या एका पत्र परिषदेत केला होता.
हा संपूर्ण घोटाळा १ हजार २१ कोटींच्या घरात जाणारा असूनसुद्धा आज ‘प्रथमच’ प्रशांत पवार यांनी उघडपणे आ.आशिष जयस्वाल यांच्यावर निकटवर्तीयांना दिलेल्या कंत्राट व भ्रष्टाचाराचे आरोप केले.भाजप व आशिष जयस्वाल यांची मिलीभगत या संपूर्ण भ्रष्टाचारी कारभारात असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोल वॉशरीज व कोळसा धुण्यासंबंधीचे गौडबंगाल हे महाजनकोच्या सनदी आधिका-यांकडून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळातच म्हणजे २०११ मध्ये सुरु झाले असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात प्रशांत पवार यांनी कबूल केले मात्र तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी,त्यांच्यापर्यंत हा संपूर्ण घोटाळा पोहोचल्यावर हे संपूर्ण कंत्राटच रद्द केल्याची पुश्ती त्यांनी जोडली.
२०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आली.भाजपनेही त्यांच्या संपूर्ण सत्ता काळात हे कंत्राट पुर्नजिवित केले नाही मात्र ऐन निवडणूकीचे वर्ष बघून २०१९ मध्ये तत्कालीन उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी पुन्हा ‘कोळसा धुण्याच्या गोरखधंद्याला पुर्नजिवित’ केले.पाच वर्षांसाठी जायस्वाल व भाजपच्या निकटवर्तीयांना ही कंत्राटे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
गुप्ता कोल,भाटिया यांची रुखमाई इन्फ्रा,हिंद मिनरल्स,महावीर इत्यादी कंपन्या व यांचे कंत्राटदार नेमके कोण आहेत?याची संपूर्ण कुंडली सोमवारी मुंबईला जाऊन शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मांडणार व चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.याशिवाय सोमवारी धंतोली पोलिस ठाण्यात देखील तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडीची सत्ता आहे.दोन दिवसांपूर्वीच आ.आशिष जयस्वाल हे बंडखोरांच्या गटात सहभागी झाले.हे बघता आता आशिष जयस्वाल यांची महाराष्ट्र राज्य खनीकर्म महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी होऊ शकते याचे ‘परफेक्ट टायमिंग‘राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी साधले व जयस्वाल यांच्या विरोधात पत्र परिषद घेऊन पहील्यांदा उघडपणे जयस्वाल यांच्यावर कोल वॉशरीजच्या संपूर्ण घोटाळ्याचे तेच ’जनक’असल्याचा आरोप केला.
‘आघाडीच्या बिघाडीत शिवसेनेची नासाडी’ झाल्याचे बघून खनीकर्म महामंडळाच्या अध्यक्ष पदावर आपली वर्णी लागू शकते,यासाठीच या पत्रपरिषदेचे ’आयोजन’करण्यात आल्याची चर्चा यामुळे चांगलीच रंगली.

आमचे चॅनल subscribe करा