

मैत्री परिवारच्या सदस्यांनी घेतली मुंबईत भेट
नागपूर, २४ मे २०२२: अचलपूर, अमरावतीमध्ये अचानक उद्भवलेल्या दंगलीमागची कारणे शोधण्यासाठी मैत्री परिवार संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या सत्यशोधन समितीने तयार केलेला अहवाल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सादर करण्यात आला. राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे तसेच, योग्य ते सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले.
सत्यशोधन समितीचे अध्यक्ष, वरिष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. उदय निरगुडकर, मैत्री परिवार संस्था नागपूरचे अध्यक्ष संजय भेंडे व संयोजक चंदूजी पेंडके यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यान, अचलपूर, अमरावती दंगलीमागील वास्तव, समितीने केलेल्या शिफारशी आदी विषयांवर राज्यपालांशी विस्तृत चर्चा करण्यात आली.
मैत्री परिवार संस्था नागपूरने अचलपूर, अमरावती येथे झालेल्या दंगलींच्या संदर्भात वरिष्ठ पत्रकार व सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी न्यायमूर्ती मीरा खडक्कार, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिल बोबडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर आणि पत्रकार प्रवीण मुधोळकर यांच्या नेतृत्वात सत्यशोधन समितीचे गठन केले होते. या समितीतील सदस्यांनी२ ते ४ मे दरम्यान अचलपूर व अमरावतीचा दौरा करून दंगलीमागील वास्तव शोधून काढण्याचा प्रयत्न केला. समितीने सामाजिक नेते, डॉक्टर्स, वकील, पोलीस अधिकारी, राजकीय नेते इत्यादी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांच्या भेटी घेऊन अहवाल तयार केला. त्यात समितीने काही शिफारशीदेखील केल्या आहेत.

आमचे चॅनल subscribe करा