Homeनागपूर न्यूजजगाच्या पोशिंदाची शासनाच्याच दरबारी लृट!

जगाच्या पोशिंदाची शासनाच्याच दरबारी लृट!

Advertisements

कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात शेतकऱ्यांचा हरभरा कमी दरात खरेदी!

माजी आमदार सुधीर पारवे यांचा धक्कादायक आरोप:गैरव्यवहाराची उच्च स्तरीय चौकशीची मागणी

भिवापूर,ता.२१ मे २०२२: भिवापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात शेतकऱ्यांचा हरभरा कमी दरात खरेदी करून घेतलेला हरभरा, भंडारा जिल्हा, पवनी तालुक्यातील जगाचा पोशिंदा फार्मर प्रोडयुसरकंपनी मोखारा, केंद्र कोंढाकोसरा या एजन्सी मार्फत हरभरा साफ न करता नाफेडच्या बारदान्यामध्ये पॅकिंग व स्टंपिंग करून थेट वखार महामंडळ वडसा गोडाऊन मध्ये पाठवण्याचा गोरखधंद्याची व गैरव्यवहाराची उच्च स्तरीय चौकशी करून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणकी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी आज पत्रकार भवन येथे पत्र परिषदेत केली.याप्रसंगी प्रदेश किसान मोर्चा महामंत्री आनंदराव राउत, भाजप नेते अशोकराव धोटे, भाजपा महामंत्री अजय बोढारे, जिल्हा मंत्री भास्कर इंगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कपिल आदमने प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगिले की, त्यांना भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे गुरुवार दिनांक १९ मे रोजी, रात्री ११ वाजताच्या दरम्यान काही कार्यकर्त्यां सोबत ते कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात पोहचले असता, शेतकऱ्यांचा हरभरा हमीभावापेक्षा १००० ते १५०० रुपये कमी दरात खरेदी करून, घेतलेला हरभरा फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया शासकीय शिक्का असलेल्या बारदान्यामध्ये पॅकिंग व स्टम्पिंग करून थेट वखार महामंडळाकडे रवाना करण्याचा गोरखधंद्याचे धक्कादायक वास्तव त्यांच्या समोर आले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेत मालाला हमीभाव मिळण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने नाफेडद्वारे शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी व खरेदी प्रक्रिया राबविली जाते. भिवापूर तालुक्यात अशा प्रकारे तीन एजन्सींकडे सध्या स्थितीत नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र आहेत. तर महा. एफ. पी. सी. कडून भंडारा जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी करीता ‘जगाचा पोशिंदा’ फॉर्मर प्रोड्युसर कंपनी मोखारा, केंद्र कोंढाकोसरा या एजन्सीला नियुक्त केले आहे. या एजन्सीला भंडारा जिल्ह्यातच हरभरा खरेदी करावा लागतो परंतु ‘जगाचा पोशिंदा’ नामक जिल्ह्याबाहेरील एजन्सीने भिवापूर तालुक्यातील व शहरातील काही स्थानिक हेरगिरांना हाताशी धरून भिवापूर बाजार समितीच्या मार्केट यार्डात पाय ठेवला.

शेतकऱ्यांना सोडून या एजन्सी थेट अतडीयांकडून हरभरा खरेदी करतात. हरभरा चालणी व साफ न करता त्याला शासकीय बारदान्यात भरून मार्केट यार्डातच स्टंपिंग आणि पॅकिंग करण्याची हिम्मत करतात. मागील १५ दिवसांपासून हा गोरखधंदा सुरु आहे. त्यानुसार आत्तापर्यंत २० टन वजनाचे अंदाजे १० ते १५ ट्रक हरभरा बाजार समितीचा मार्केट यार्डातून थेट वखार महामंडळाच्या वडसा येथील गोदामात रवाना करण्यात आले असल्याचा अतिशय गंभीर अारोप त्यांनी केला.

केंद्र व राज्य शासनाची सर्रास फसवणूक सुरु आहे. रामकृष्ण गोंगल, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, भिवापूर, प्रविण निनावे, प्रशासक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, भिवापूर व जगाचा पोशिंदा फॉर्मर प्रोड्युसर कंपनी मोखारा, केंद्र कोंढाकोसरा या कंपनीचे संचालक व कर्मचारी तसेच बाजार समिती मधील अडतीया, दलाल व व्यापारी सदर गोरखधंद्यात व गैरव्यवहारात सहभागी असल्याचे दिसून येत आहेत. नाफेडचा हमीभाव प्रती क्विंटल ५,२३० रुपये हरभ-याचा भाव असताना सदर एजेन्सीने हरभ-याला, स्थानिक व्यापारी व बाजार समिती मधील काही कर्मचाऱ्यांना सोबत हात मिळवणी करुन शेतकऱ्यांच्या हरभरऱ्याला ४१०० रुपये प्रती क्विंटलने खरेदी करून, शेतकऱ्यांचे व शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले असल्याचा आरोप त्यांनी केला.

सदर गैरव्यवहारात काही मोठे व्यापारी, कर्मचारी, अधिकारी , व राजकीय नेत्यांचा वरदस्त असल्याचेही दिसून येत असल्यामुळे सदर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. त्र्यंबक गीरीपुंजे यांचे शासकीय हरभरा खरेदी केंद्र आहे. या केंद्रआड हा गोरखधंदा सुरु होता. धान्यांची ग्रेडिंग करणारा ग्रेडर व अन्य संबंधित मंडळींशी संगनमत असल्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला हरभरा साफ न करताच शासकीय गोदामात पाठविण्यात येत आहे.आत्तापर्यंत ३५ ते ४० हजार क्विंटल हरभरऱ्याची या पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने या कंपनींची संपूर्ण रक्कम थांबवावी व सदर कंपनीने खरेदी केलेल्या हरभऱ्याच्या पोत्यांतील मालाची तपासणी करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली.

तसेच शासनाने नाफेड मार्फत शेतकऱ्याचा माल प्रती हेक्टरी ३० क्विंटल घेण्यात यावा व मालाची रक्कम ही ८ दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी, नाफेडकडून माल घेण्याची प्रती हेक्टरी क्षमता देखील वाढली पाहिजे. भिवापूर, जि. नागपूर येथील बाजार समिती मार्केट यार्डातील घडलेला प्रकार हा सीमित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी, अडतीया व बाजार समितीचे कर्मचारी यांच्या संगमतीने शेतकऱ्यांची व शासनाची दिशाभूल करून, मोठ्या प्रमाणात गोरखधंदा व गैरव्यवहार राज्यभर सुरु असल्याचे दिसून येत असल्याचा धक्कादायक आरोप याप्रसंगी त्यांनी केला.

 

Latest बातम्या