

केतकी चितळे प्रकरण:सोशल मिडीयावर नाही आता ‘सुप्त’ मनात धगधगतेय आग
नागपूर,ता.१५ मे २०२२: केतकी चितळे या गुणी मराठी अभिनेत्रीचे अचानक ग्रह फिरले,तिने तिच्या खासगी फेसबूक साईटवर कुण्या ॲड.नितीन भावेंची एक पोस्ट आपल्या फेसबुकवर शेअर केली,ती नेमकी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील नेटके यांच्या निर्दशनास आली,यानंतर महाराष्ट्रात जे घडले ते संपूर्ण मराठी माणसांनी पाहीले.म्हणजे केतकीवर क्रिमिनल ऑफेन्स दाखल झाला,तिच्या पोस्टमध्ये भडकाऊ शब्द होते की तिच्या पोस्टमुळे दंगली झाल्या कि तिच्या पोस्टमुळे जातीय तेढ निर्माण झाली,नेमके काय झाले हे महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनाही कळले नाही,महत्वाचे म्हणजे तिने जेव्हा ही पोस्ट आपल्या खासगी अकाऊंटवर शेअर केली तेव्हा तिच्या बाळबुद्धीलाही याच्या परिणामांची कल्पना नसावी की याचे एवढे गंभीर परिणाम होतील की तिला न्यायालयीन कोठडी न मिळता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळेल!तिने केलेल्या ’अक्षम्य’अपराधाची चौकशी साधे पोलिस न करता चक्क गुन्हे शाखा तिला ताब्यात घेतील!तिला हे कळले असते तर तिने असा हा ‘महाघोर अपराध’केलाच नसता,तिच्या वयाकडे व जिवनातील अनुभवाकडे बघता तिला याची कल्पना असती तर तिने राजकीय वादात सापडणारी पोस्ट ही शेअर केलीच नसती असे अनेकांचे ठाम मत आहे मात्र तिचे समर्थक आता सोशल मिडीयावर उघडपणे बोलण्यात धजत नसून, संताप आणि चीड आणनारी आग मात्र मना-मनात धगधगतेय,हे मात्र निश्चित.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते ’साल्यांनो आम्ही तुमच्या देवांचेही बाप आहोत!’ते नेते आहेत त्यांनी कोणाचाही बाप काढला,अगदी देवी देवतांचाही तरी जातीय तेढ निर्माण होत नाही कारण त्यांना संविधानाने ‘जणू’ तो अधिकार दिला आहे!
त्यांनी राज्यातील सवर्णांच्या कितीही भावाना दुखावल्या तरी तो गपगुमान सहनच केला पाहिजे कारण सध्या राज्यात त्यांची ‘सत्ता’आहे.१२ कोटी जनतेच्या महाराष्ट्राने २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला फक्त ५६ जागा दिल्या होत्या हे विशेष मात्र राज्यात कोणाची सत्ता येते,कोण कोणाच्या पाठीत खंजिर खूपसतोय,कोण कोणाला थडग्यात गाडणार आहे याच्याशी सर्वसामान्य लाेकांना काहीही घेणे देणे नाही कारण त्यांचे रोजच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न हे फार-फार वेगळे असतात.केतकी चितळे हिने अशी ही राजकीय पोस्ट शेअर करायला नको होती असे अनेकांचे म्हणने आहे मात्र यानंतर तिच्यासोबत पुरोगामी महाराष्ट्रात जे घडले ते देखील मुळीच ‘समर्थनीय’नव्हते,असेच अनेकांचे मत आहे.
केतकी व शरद पवार यांच्या वयात,अनुभवात जमीन-असमानाचे अंतर आहे.मुरलेले राजकारणी,द्रष्टा नेते असणारे शरद पवार यांना सवर्णांची आपुलकी मिळवण्याची एक नामी संधी होती,त्यांनी खूप मोठ्या मनाने जी मुलगी त्यांच्या नातीच्या वयाची आहे,जिला ‘अक्कल’नाही तिच्याकडे एक तर दुर्लक्ष करायला हवे होते किवा आपली तळी उचलणा-या समर्थकांना स्पष्ट शब्दात ‘केतकी सारख्या र्निबुद्ध असणा-यांना अनुल्लेखाने मारा’असे निर्देश द्यायला हवे होते आणि हेच त्यांच्या वयालाही शोभले असते मात्र असे घडले नाही!
केतकीला अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी ज्याप्रकारे तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला,तिला मारहाण केली,अंडी फेकली,शाई फेकून तिचे तोंड काळे केले,ते निदान महाराष्ट्रासारख्या ‘सुसंस्कृत‘ राज्याला न शोभणारेच होते.ते दृष्यच एवढे चीड आणनारे होते की राष्ट्रवादीच्या या महिला पदाधिकारी यांच्याकडेच केतकीला सोपवून द्यायला हवे होते,असे आता म्हटल्या जात आहे.देशातील न्यायालयाने नव्हे तर तुम्हीच एक महिला म्हणूनही केतकीचा मुडदा पाडा,शिक्षा द्या,न्यायालयाची गरजच काय आहे?असे ते दृष्य सांगत होते
महाराष्ट्रात तुमची सत्ता आली, आता तुम्ही मालक झालात,जनता तुमची गुलाम आहे असे ते दृष्य बघून सुजाण नागरिकांना वाटले.आमच्या सत्ता काळात विशेषत:सवर्णांनी आपली वैयक्तीक मते समाज माध्यमांवर मांडू नये,आम्ही मात्र एखाद्या ‘बिग्रेड‘च्या माध्यमातून तुमचे कितीही वस्त्रहरण केले,मानाहानी केली तरी गपगुमान सहन करावे,आम्ही आमच्या सोशल मिडीयावर सवर्ण हे किती नालायक होते,देशातील एक विशिष्ठ धर्मीय किती चांगले होते,मराठे कश्याप्रकारे त्यांच्या पदरी इमाने इतबारे काम करीत होती,सवर्णांनी मात्र कसा राजेंना त्रास दिला, याचा ‘इतिहासच’ आपल्याला त्यांच्या सोशल मिडीयावर वाचायला मिळतो,त्यांच्या या पाेस्ट जातीय तेढ निर्माण करणा-या नसतातच मुळी तर जातीय ‘अभिमान’वृद्धिंगत करणा-या असतात का?असा प्रश्न आता विचारला जातोय.
केतकीच्या कुटुंबियांच्या आत्मसन्मानाला ज्याप्रकारे पुरोगामी महाराष्ट्रात तडा दिला गेला आहे त्याचे कोणतेही सोयरसुतक नेते मंडळींना नाही उलट केतकीचे संस्कार काढले जात आहे.तिच्या जन्मदात्यांवर खालच्या शब्दात टिका केली जात आहे ते ऐकून केतकी ही ’चितळे’नसती व तिचे आडनाव आणखी काही वेगळे असते तर?असेच बोल लावले गेले असते का?असा प्रश्न सुजाण मनाला भेडसावतोय.मुंबईतील राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकारीने तर पवार यांच्या घरीच नव्हे तर माझ्या ही घरी मोलकणीन बनून राहण्याची देखील त्या चितळेची लायकी नाही,अश्या शब्दात माध्यमांना प्रतिक्रिया दिली!
आश्चर्य म्हणजे गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर एस.टी.कर्मचा-यांनी चपला,जोडे,बांगड्या फेकून तीव्र अांदोलन केले होते मात्र या घटनेत ज्यांना अटक झाली तो ‘बहूजन‘समाज होता,कोणी ‘चितळे’नसल्याने त्यांना ‘न्यायालयीन’कोठडी नाही मिळाली,केतकी ही देखील ’चितळे’नसती तर कदाचित वेगळा न्याय मिळाला असता,अशी अनेकांना मनातली ’धग’जाळत आहे.
शरद पवार यांनी ज्या पद्धतीने देवांचाही बाप काढला त्यांच्या या विधानामुळे हिंदू समाज हा चांगलाच दुखावला गेला, कदाचित हिंदू समाजाचे लक्ष या मुद्दावरुन विचलीत करण्यासाठीच चितळे हिच्यावर कारवाई झाली असल्याचेही बोलले जात आहे.
केतकी प्रकरणाच्या अनुषंगाने पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्याचे ग्रंथालय हे ज्या पद्धतीने जाळले गेले त्या जखमेला ही नख लागले.पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येताच ज्या पद्धतीने दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून मध्य रात्री क्रेनने उखडून तलावात बुडवून टाकण्यात आला त्या घटनेची जखमही उसवल्या गेली.गोडसेनी केलेल्या गांधी हत्येनंतर ज्या प्रकारे संपूर्ण देशात व महाराष्ट्रातही ब्राम्हणांची घरे-दूकाने जाळण्यात आली त्या उधवस्ततेला ही नख लागले व त्या वेदना पुन्हा ठसठसायला लागल्या.
नागपूरातच शुक्रवारी तलावा जवळील एका वयोवृद्ध शास्त्रीय गायकांची २०१३ साली मुलाखत घेताना त्यांच्या डोळ्यातून त्या आठवणींने अश्रू ओघळत होते,शुक्रवारी तलावाजवळीत त्यांचा उदर निर्वाहाचे एकमेव साधन असणारे दूकान,त्यांचे राहते घर ते फक्त ब्राम्हण असल्याने जमावाने पेटवून दिले होते,गांधी हत्येत त्यांचा व असंख्य ब्राम्हणांचा काय दोष होता?अक्षरश:राखेतून पुन्हा याच देशात,याच महाराष्ट्रात,याच भूमीत पुन्हा सगळं गतवैभव निर्माण करने हे, देशातील इतर घडलेल्या दंगलीतील पिडितांप्रमाणे, अशक्य व कधीही न भरुन निघणारेच दु:ख होते मात्र स्वातंत्र्यांच्या सत्तरीनंतर देखील या देशात झाडून पुसुन सर्वच दंगलींबद्दल भरभरुन बोलल्या जातं मात्र गोडसेच्या कृत्यानंतर ब्राम्हणांच्या वाट्याल आलेली उधवस्ता याचा उल्लेखही देशातील एक ही नेता करीत नाही कारण ब्राम्हण वर्ग हा त्यांच्यासाठी ‘वोट बँक’नाही,तेव्हा ते ३ टक्के होते आता ७ टक्के जरी झाले असले तरी त्यांच्या मतांवर निवडून येणे शक्य नाही हे त्यांनी गृहीतच धरले आहे मात्र आजची तिसरी पिढी ही,आमच्या मतांवर निवडून येणे जरी शक्य नसले तरी आमची मते न मिळाल्यास पराभूत होऊ शकता,हे विसरु नका,असा इशारा सोशल मिडीया ग्रुप्सवर देत आहेत,हे हे नेत्यांनी आता लक्षात घ्यावे!
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचीही केतकी प्रकरणावरील प्रतिक्रिया फार दाहक होती.’ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.ही एक प्रवृत्ती नसून,मानसिक विकृती आहे.तिला वेळीच आवर घालायला हवी’अशी तीव्र प्रतिक्रिया असणारे पत्र त्यांनी तातडीने जारी केले.
शरद पवारांवर सोशल मिडीयातून आक्षेपार्ह पोस्ट करणा-यांना लाज वाटली पाहिजे.अशा प्रकारे चीड निर्माण करणा-यांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे.मग ती अभिनेत्री असो कि कुणीही,त्यावर कारवाई झालीच पाहिजे’अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.या मागे मनुवाद आहे का?हे सुद्धा तपासले पाहिजे,अशा लोकांचे सोशल मिडीयावर खाते कायमस्वरुपी बंद करायला हवे,अशी मागणी त्यांनी ‘ नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करणा-या’देशात केली.एवढंच नव्हे तर त्यांनी या प्रकरणात, गोडसे हे बारातीतही पैदा झाले पाहिजे अशी केतकीने पोस्ट केल्याचा आरोप ही केला मात्र हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वैयक्तिक जीवनावर विखारी .शब्दात टिका करणा-यांना भाजप आणि राष्ट्रीस स्वयंसेवक संघाचे पाठबळ असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माजी आमदार विद्या चव्हाण यांनी केला.
सूर्यावर थंूकले म्हणून सूर्याचे महत्व कमी होत नाही,ही नशेबाज लोक आहेत,यांना एक वेगळ्या प्रकारची नशा चढली आहे,त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे,असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नमूद केले.
केतकी इतकी विकृत विचारांची असेल असे वाटले नव्हते,तिने काय लिहले आहे हे जरा वाचा,तुमच्या आजोबा अथवा वडीलांबद्दल असे कोणी लिहले तर काय वाटेल याचाही विचार करा’असे राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.आजारपणावर टिका करीत असाल आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्यास तुम्हाला काही बोलता ही येणार नाही!’असा इशारा या मंत्री महोदयांनी ’भेदभाव करणार नाही’अशी संविधानाची शपथ घेतल्यावरही दिला!
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात सतत खालच्या पातळीवर टीका सुरु असून केतकीसारख्या विकृतींना संघाचे पाठबळ आहे,असा अारोप राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुलक्षणा सलगर यांनी केला.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची देखील प्रतिक्रिया शरद पवारांना सुखावणारीच होती.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार नवनीत राणा यांनी देखील केतकीला समज दिली.
केतकी विरोधात राज्यात आता अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे.कळवा पोलिस आणि ठाणे गुन्हे शाखा समांतर तपास करीतच आहे,
हिंगोली येथील पत्रकार परिषदेत केतकीच्या पोस्टबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारले असता त्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले.केतकी चितळेला मी ओळखत नाही,हे प्रकरण काय आहे मला माहिती नाही,असे त्यांनी सांगितले.
मात्र या राज्यातील अनेक सुजाण नागरिकांना वाटतं,शरद पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखवण्याची एक चांगली संधी गमावली.केतकी ही माझ्या नातीच्या वयाची आहे,तिचे वय व अनुभव बघता या गोष्टीला इतक्या गांर्भीयाने घेण्याची गरज नाही,तिच्या बाळबुद्धीकडे दुर्लक्ष करावे,एवढं जरी पवार बोलले असते तरी भविष्यातील इतिहासात महाराष्ट्राला घडविण्यात त्यांच्या अनेक योगदानासोबतच ही देखील घटना कायमची नोंद झाली असती.शरद पवार हे कायम ज्या शाहू,फूले,आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा उल्लेख करतात त्या शाहू,फूले,आंबेडकरांना या राज्यात कोणी शत्रूच नव्हते का?कोणी विरोधकच नव्हते का?असा प्रश्न आता सवर्ण समाजातील तरुणाई विचारत आहे.मग शाहू,फूले,आंबेडकरांनी आपल्या विरोधक किवा शत्रूंशी असाच व्यवहार केला का?
ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा गजर महाराष्ट्रात होताे त्या छत्रपतींची महिलांप्रतिची भावना काय होती?पराभूत शत्रूंच्या स्त्रियांना शिवरांयोसमोर हजर केले असता,त्यांच्यात ही आपली आई बघणारा व त्यांचा यथोचित सन्मान करुन रवाना करणा-या राजा शिवछत्रपतींकडून आपण काय बोध घेतला?
नुकतेच राज ठाकरे यांनी पवार यांच्या ब्राम्हण द्वेषावर भर सभेत टिका केली.इतिहासतज्ज्ञ बाबासाहेब पुरंदरे हे फक्त ब्राम्हण असल्याकारणाने या महाराष्ट्रात मृत्यूपर्यंत कसे छळल्या गेले,याचे दाखलेच त्यांनी भर सभेत दिले होते.
सोनिया गांधी यांच्या विदेशी मूळाच्या मुद्दावरुन राष्ट्रवादी पक्ष स्थापन करणा-या शरद पवारांना महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा जम बसवण्यासाठी कोणता तरी मुद्दा हवाच होतो, यातूनच ब्राम्हण-मराठा वाद जोपासण्यात आला,राष्ट्रवादीच्या स्थापने पूर्वी या राज्यात जातीचा अभिमान तर होता मात्र जाती-द्वेष नव्हता असा आरोप राज ठाकरे यांनीच भर सभेत केला.इतक्या उघडपणे ब्राम्हणांची बाजू घेऊन कोणीही बोलला नव्हता.राज ठाकरे यांच्या भाषणाने खरे तर राज्यातील सवर्ण वर्ग पराकोटीचा सुखावला होता.
दक्षीण मधल्या राज्यातही जातीवाद आहे मात्र तिथे भाषेचा प्रश्न येतो,जात-पात,पंर्थ,धर्म विसरुन भाषेसाठी सगळेच एकत्रित येतात तसा महाराष्ट्रातील मराठी माणूस आलाच नाही.उलट इतर धर्मियांच्या काही चॅनलवर सतत ब्राम्हण द्वेषाचेच कार्यक्रम प्रसारित होत राहतात,याला काय म्हणावे?मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर एखाद्याने आपल्या स्वत:च्या फेसबुकवर कुण्या दुस-याची पोस्ट फक्त ‘शेअर’केली तर हे कृत्य चक्क क्रिमिनल ऑफेंसमध्ये मोडतं!
केतकीच्या या पोस्टवर ब्रिगेडच्या मावळ्यांनी अतिशय घाणेरडे कमेंट्स केले आहेत,हे कोणत्या संस्कारात मोडतं?
केतकीने आज न्यायालयात वकील न घेता स्वत:ची बाजू स्वत:च मांडली,ती माझी स्वत:ची खासगी भिंत होती ज्यावर मी फक्त एक पोस्ट शेअर केली,मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का?असा सवाल तिने आपली बाजू मांडताना न्यायालयाला केला.
या देशात भारत मातेचं नग्न चित्र काढणा-यांचे व परदेशात पळून जाणा-यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गळे काढले जातात,एका लहान वयाच्या,बालबुद्धीच्या तरुण अभिनेत्रीच्या एखाद्या पोस्टवर मात्र तिला बेड्या ठोकल्या जातात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाता करणारे गप्प बसतात कारण काय?तरी ती ’चितळे’ आहे म्हणून?
केतकीचं हे नशीबच म्हणावे लागेल की नुकतेच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशात देशद्रोहबाबतच्या कायद्याला स्थगिती दिली.असे जर घडले नसते तर या सुसंस्कृत महाराष्ट्रात देशद्राेह किवा राजद्रोहाच्या गुन्ह्यात एका खासदार व आमदाराला ज्याप्रकारे अटक झाली व ११ दिवस तुरुंगात डांबण्यात आले तीच अवस्था केतकी चितळे हिच्या वाटेला देखील आली असती.देशद्रोह हा अतिशय गंभीर गुन्हा असून देशात व महाराष्ट्रात या कायद्याचा कश्याप्रकारे उपयोग आपल्या विरोधकांना तसेच विरोधी विचारधारेच्या लोकांना संपविण्यासाठी करण्यात आला यावर सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी चांगलेच ताशेरे ओढले आहे.या कायद्याला सर्वोच्च न्यालयाने स्थगिती दिली नसती तर आज महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात केतकी चितळेवर देखील फक्त एका फेसबुक पोस्टवरुन देशद्राेहाचा गुन्हा दाखल झाला असता यात काेणालाही शंका नाही.
केतकीने कोणताही सारसार विचार न करता हे कृत्य केले जे समर्थनीय नाहीच मात्र त्यानंतर तिच्यासोबत पुरोगामी महाराष्ट्रात जे घडले ते देखील समर्थनीय म्हणता येणार नाही.राज्य महिला आयोग हे राज्यातील अर्धी लोकसंख्या असणा-या महिला वर्गाच्या आत्मसन्मानाच्या रक्षणाकरिता स्थापन झालेला असतो आज मात्र एका महिलेवर मानहानिचा दावा ठोकण्या ऐवजी मारहाणीचा प्रयत्न केला जातो त्याचेच समर्थन केले जात आहे जे दूर्देवी आहे.
केतकीच्या कुटूंबियांना आपली गुणी मुलगी फक्त एका फेसबुक पोस्टमुळे तीन दिवस तुरुंगात खितपत पडल्यामुळे ज्या वेदना होत असतील त्या जगातील कोण्याही जातीच्या,धर्माच्या आई-वडीलांच्या वेदनांसारख्याच आहे,यात भेद करता येत नाही.त्यामुळेच शरद पवारांनी मनाचा उदारपणा दाखवित केतकीला मोठ्या मनाने क्षमा केले असते,आपल्या महिला कार्यकर्त्यांना समज दिला असता तर या ज्येष्ठ नेत्याचे मोठेपण आणखी उजळून निघाले असते.
कुरुक्षेत्राच्या रणभूमीत अर्जून शस्त्र उचलण्यास धजत नव्हता कारण रणांगणात जे समोर होते ते शत्रू नसून त्याचे बांधव होते.भगवान श्रीकृष्णाने त्यावेळी अर्जुनाला उपदेश देताना हेच सांगितले,जे तुझ्या समाेर आहे त्यांचा आधीच मृत्यू झालेला आहे,या सजीव सृष्टित एक कृमीही जन्माला येत असेल तरी जन्मासोबतच तिच्या मृत्यूची वेळ ही आधीच ठरलेली असते त्यामुळे तुला शस्त्र उचलावेच लागेल असा उपदेश श्रीकृष्णाने अर्जूनाला दिला होता.केतकीने पवार यांचा मृत्यू, शेअर केलेल्या पोस्टमध्ये चिंतला,हे असे संस्कार मला मिळाले नाहीत असे आज पत्रकार परिषद घेऊन खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितले.या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू चिंतणारे अनेक पोस्ट याच देशात पोस्ट केले जातात,आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान इतके वास्ट आहेत की तुम्ही प्रत्येकाच्या खासगी सोशल मिडीयावरील पोस्ट तपासू शकत नाहीत,लक्ष ठेऊ शकत नाही,केतकीने जे केले त्याचे समर्थन कोणीही करीत नाही,ज्याचा त्याचा मृत्यू हा नियतीने आखून दिलेल्या वेळेवरच होत असतो मात्र जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या या प्रवासात माणूस म्हणून कर्म करने,इतरांच्या चूका माफ करने,लहानांच्या चूका उदार मनाने पदरात घेणे हेच फक्त आपल्या हातात असतं.मृत्यू हा राजकारणी असो किवा अभिनेत्री प्रत्येकालाच गाठणारच आहे मात्र त्यासाठी बालबुद्धी असणा-या एका अभिनेत्रीलाच आयुष्यातून उठवणे हे तरी माणूसकीच्या कोणत्या व्याख्येत बसतं?
कलावंत व राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये गोडसेंची भूमिका एका चित्रपटात साकारली होती.त्यावेळी त्यांना माहिती ही नव्हतं एक दिवस ते राष्ट्रवादी नावाच्या पक्षाचे शिलेदार होतील.२०२२ मध्ये मात्र त्यांच्या या भूमिकेचा खरपूस समाचार सोशल मिडीयावर घेण्यात आल्याने या कलावंताने चक्क माफी मागितली आणि मी ती भूमिका साकारायला नको होती,असे विधान केले.जो कलावंत आपल्या कलेप्रति प्रामाणिक नाही तो एखाद्या पक्षाप्रति किती समर्पित राहील?असा सवाल त्यावेळी उपस्थित झाला होता.आता तेच अमोल कोल्हे ज्या भाषेत केतकीवर टिका करताना बोललेत,ते शब्द ही उमटवू शकण्यासारखे नाही.
राज्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खूश करण्याची जणू स्पर्धा चाललेली दिसतेय.यात बळी जातोय आपल्याच सुसंस्कारीत महाराष्ट्राचा याचे भान कोणीही बाळगताना दिसत नाही.विरोधकांनाही सन्मानाने वागणवारे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या राज्याने बघितले आहे.ती पिढी खरंच खूप भाग्यवान होती ज्यांच्या काळात राजकारण्यांद्वारे नीती आणि मुल्ये जपल्या जात होती.आजचा महाराष्ट्र हा ‘सूडनाट्याने’ भारलेला आहे,हे या महाराष्ट्रातील तिस-या तरुण पिढीचे दूर्देव आहे,असे आता म्हणावे लागेल.




आमचे चॅनल subscribe करा
