Homeनागपूर न्यूजबिल्डरवर केंद्रिय मंत्र्यांचा वरदहस्त,सामान्यांचा वाली कोणीही नाही

बिल्डरवर केंद्रिय मंत्र्यांचा वरदहस्त,सामान्यांचा वाली कोणीही नाही

Advertisements

बर्डीतील दूकाने तोडण्यात केंद्रिय मंत्रीही सहभागी: योग्य वेळी उघडपणे नाव समाेर आणणार: दूकानदारांचा इशारा

हक्काच्या दूकानातील लाखो रुपयांचे लोखंड देखील बिल्डरने उचलू दिले नाही!

४८ तासात केली ३५ दूकाने भुईसपाट:संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट:न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढणार

नागपूर,ता. ४ मे २०२२:नागपूर सुधार प्रन्यासच्या पथकाने सोमवारी सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल उभारण्यात अडथळा ठरणारी ३५ दूकाने जेसीबीच्या सहाय्याने भुईसपाट केली.नासुप्रसोबत या दूकानदारांचा वाद हा फार जुना असून अनेक दूकानदारांनी न्यायालयात दाद मागितली होती.न्यायालयातून नासुप्रला आंशिक दिलासा मिळाला असतानाही व पुढील सुनावणी आज दिनांक ४ मे रोजी असताना देखील नासुप्रने ग्लोकल मॉलच्या बिल्डरसोबत हातमिळावणी करुन येथील ३५ दूकाने भुईसपाट केली,असा दावा करीत स्थानिक दूकानदारांनी चांगलाच संताप व्यक्त केला. या अनाधिकृत मॉलचे बांधकाम अधिकृत ठरवून त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्रिय मंत्र्यांनी अनेक पत्र नासुप्रला दिले असल्याचे सांगत लवकरच त्या मंत्र्याचे नाव सार्वजनिक करणार असल्याचा इशारा येथील दूकानदारांनी दिला.

विशेष म्हणजे नासुप्रकडून बिल्डरला आंशिक भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असतानाही व यावर सुनावणी पूर्ण झाली नसताना नासुप्रने बिल्डरच्या सहाय्याने आमच्या रोजीरोटीवर घाला घातला असा आरोप करीत, आता माझ्याच दूकानाच्या मलब्यातील लाखो रुपयांचा लोखंड देखील या बिल्डरची गुंड माणसे मला उचलू देत नसल्याची हताशा खास ‘सत्ताधीश’कडे त्यांनी व्यक्त केली.

दूकाने तोडण्याची कारवाईच अवैध असून ही कारवाई होत असताना गोयल गंगाचे मालक पुण्यातील आपले कामकाज सोडून स्वत: जातीने या ठिकाणी का उपस्थित होते?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.या प्रकल्पाला आंशिक भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे मात्र जणू त्यांना अधिकृत भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्याचा अर्हिभावात व न्यायालयात न्यायाची वाट बघत असणा-या दूकानदारांना नासुप्रने रस्त्यावर आणले.

नागपूर शहरातील हा एक असा प्रकल्प आहे ज्याने कोणत्याही बांधकाम नियमांचे पालन केलेच नाही.हा प्रकल्पच अनाधिकृत आहे मात्र तरीही एक केंद्रिय मंत्री हा या प्रकल्पाच्या बिल्डरच्या मागे भक्कमपणे उभा असून स्थानिक नागरिकांच्या विरोधात काम करीत असल्याचा आरोप येथील दूकानदारांनी केला.१९६६ पासून सीताबर्डीत या ठिकाणी ही दूकाने आहेत.बुटी यांना नासुप्रने ही जागा लीजवर दिली होती.या ठिकाणी बुटींच्या पुढाकाराने गाेयल गंगाने ‘ग्लोकल मॉल’हा प्रकल्प आणला.या प्रकल्पासाठी या बिल्डरने साम,दाम,दंड,भेद अश्‍या सर्व नीतींचा अवलंब केला असल्याचा आरोप या दूकानदारांनी केला.

ज्यांनी आपली जागा देण्यास विरोध केला त्यांच्यावर बिल्डरने आसूड उगारला.ना प्रकल्पात जागा दिली ना जागेचे,दूकानाचे पैसे दिले.केंद्र सरकारने रेरा हा कायद्या बिल्डरर्स लोकांवर लागू केला.त्या कायद्याचे देखील या प्रकल्पात सर्रास उल्लंघन करण्यात आले असून रेरामध्ये देखील अद्याप या बिल्डरने मंजुरीसाठी कागदपत्रे दाखल केली नसल्याचे ते सांगतात.कायदे कानून राजकीय नेते,सत्ताधारी व या देशातील बिल्डर लॉबीसाठी नसतात,ती फक्त आणि फक्त सामान्य माणसांसाठीच असतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नासुप्र,गोयल गंगाचे बिल्डर व केंद्रिय मंत्री यांची अभद्र युती ठलकपणे दर्शवित असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

८ एप्रिल २००२ पासून असून नासुप्रने त्यांना तात्पुरत्या स्वरुपात दूकाने बांधण्याची परवानगी दिली होती.मात्र २९ एप्रिल २०२२ रोजी या ३५ दूकानदारांना नासुप्रने नोटीस पाठवली.यातील ५ दूकानदार हे न्यायालयात गेले.१ मे रोजी यावर सुनावणी होऊन दूकानदारांना मुभा देण्यास न्यायालयाने नाकारले.२ मे रोजी ही संपूर्ण ३५ दूकाने भुईसपाट करण्यात आली.

दूकानदारांना यासाठी फक्त एक तासाचा वेळ देण्यात आला,त्यातही दूकानाच्या मलब्यातील लाखांच्या लोखंडांवर देखील बिल्डरच्या माणसांनी हक्क दाखवला.आम्ही नासुप्रकडे अडीच लाख रुपये जेसीबीचे भरले असल्याने या मलब्यातील लोखंडावर आमचाच हक्क असल्याचा युक्तीवाद बिल्डरच्या कर्मचा-यांनी केला.

नासुप्रचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर,पश्‍चिम विभागीय अधिकारी अविनाश बडगे,कार्यकारी अभियंता विनायक झाडे,सहायक अभियंता विवेक डफरे,अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख मनोहर पाटील यांनी ही कारवाई केली असून सीताबर्डी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली ५६ पोलिसांचा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला होता,हे विशेष!१२ टिप्पर,तीन पोकलेन मशिनी,चार जेसीबीच्या सहाय्याने ५० अधिकारी व कर्मचा-यांनी ही कारवाई केली होती,आता या सर्वांना प्रतिवादी करण्यात येणार असल्याचे येथील दूकानदार सांगतात.

केंद्रिय मंत्र्यांना आम्ही अनेक पत्र लिहली आता त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला देखील दाखल करणार असल्याचे दूकानदार पांडे यांनी सांगितले.आम्ही सुरवातीपासून या बिल्डरच्या विरोधात गेल्याने आम्हाला ना दूकान मिळाले ना पैसा मिळाला,असे त्यांनी सांगितले.आमच्या जागेवर तर केंद्रिय मंत्र्यांच्या ‘खासदार क्रीडा महोत्सवाचे’ थाटात कार्यालय थाटले गेल्याचे पांडे यांनी सांगितले.

उपराजधानीत विकासाच्या नावावर गुंडगिरी सुरु:ज्वाला धोटे(अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा)
उपराजधानीत विकासाच्या नावावर अक्षरश: गुंडगिरी, तानाशाही,हूकमशाहीच सुरु आहे.विकासाच्या नावावर अनेक नागरिकांना बेरोजगार करण्याचा जणू विडाच या शहराच्या खासदारांनी उचलला आहे.मूळात हा विकास आहे का? फूटपाथ दूकानदारांना सडकेवर भीक मागायला मजबूर करायचं,ज्यांचे पक्के गाळे होते,ज्यांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उचलला,न्यायालयात धाव घेतली त्यांना तुम्ही फूटपाथवर आणलं?जर असा विकास होत असेल तर नागपूरच्या जनतेला,गोरगरीब नागरिकांना,कामगारांना,फूटपाथ विक्रेत्यांना असा रस्त्यावर आणनारा विकास नको आहे.या दूकानदारांची दूकाने ज्या प्रकारे नासुप्र सारखी प्रशासकीय व्यवस्था आणि राजकारण्यांनी मिळून पाडली ताे अतिशय दूर्देवी प्रकार आहे.गेल्या सात वर्षांपासून ज्यांना आपण ‘विकास पुरुष’अशी उपमा देतो,त्यांनी नागपूरचा किती विकास केला?नागपूरच्या सर्वसामान्य जनतेचा किती विकास झाला?गोरगरीब,कष्टकरी,कामगारांचा कुठेच विकास झालेला आढळून येत नाही मात्र कंत्राटदार आणि बिल्डर्स यांची डोळे दिपून टाकणारी भरभराट मात्र झालेली दिसून पडते.ही जनता आहे ‘ये सब जानती है’.

या प्रकल्पात शहरातील ऐतिहासिक वैभव असणारी हॅरिटेज ‘बावडी’ विहीर देखील गाेयल गंगाचे बिल्डरने सिमेंट क्रांक्रिट टाकून बुजवून टाकली व त्यावर ’बाॅम्बेवाला’ हे दूकान उभारले.ऐतिहासिक धरोहरांचे अश्‍या पद्धतीने खासदार संगोपण करतात?आता या ठिकाणी असणारा ऐतिहासिक हॅरिटेज दरवाजा याला खेटून मॉलचे बांधकाम करण्यात आले,हे हॅरिटेज मनपा व महाराष्ट्र शासनाची धरोहर आहे,कुण्या खासदार किवा बिल्डरची नाही.गाेयल गंगाची व विकास पुरुषाची तानाशाही जी या प्रकल्पाच्या बाबत सुरु आहेत ती सगळी जनता बघत आहे.जनता आज गप्प आहे कारण त्यांना २०२४ ची वाट आहे.येणा-या लोकसभेच्या निवडणूकीत या शहराच्या खासदारांना हे फूटपाथ विक्रेते,जनता व हे दूकानदार त्यांना त्यांची जाग दाखवून देतील.ही वादळा पूर्वीची शांतता आहे,हे लक्षात घ्यावं,२०२४ मध्ये याचे परिणाम भोगण्यास तत्पर राहावे.

Latest बातम्या