Homeनागपूर न्यूजशिवछत्रपतींच्या मावळ्यांना हिंदूत्व सांगायची गरज नाही: आभा पांडेंचा राज ठाकरेंना टोला

शिवछत्रपतींच्या मावळ्यांना हिंदूत्व सांगायची गरज नाही: आभा पांडेंचा राज ठाकरेंना टोला

Advertisements

 

उमुख्यमंत्र्यांनी केले स्वत:च्याच निधीतून उभारलेल्या नामफलकाचे अनावरण!

आभा पांडे यांचा उपमुख्यमंत्र्यासमोरच नागपूर सुधार प्रन्यासवर संताप

अजित पवार यांच्या हस्ते पूर्व नागपूरात २ कोटी ३० लाख रुपयांच्या विकासकामाचे लोकापर्ण

नागपूर,ता. २९ एप्रिल २०२२: महाराष्ट्राचं वातवारण दुषित केल्या जात आहे,हल्ली महाराष्ट्राच्या जनतेला हिंदुत्व शिकवल्या जातंय मात्र शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात कोणालाही हिंदूत्व सांगण्याची गरज नाही,असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्या,माजी नगरसेविका व राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी लगावला.पूर्व नागपूरात उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते २ कोटी ३० लाख रुपयांच्या विकासकामांच्या लोकापर्ण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होता.याप्रसंगी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे,प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर,ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे,माजी आमदार दिनानाथ पडोले,रमेश बंग,प्रशांत पवार,सेवादलाचे ज्ञानबा मस्के,प्रदेश महामंत्री श्रीकांत शिवणकर,राजा टांकसाळे,दिलीप पनकुले,जावेद हबीब आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आभा पांडे म्हणाल्या,की हा फूले,शाहू,आंबेडकर व राजा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र असून असे राजकारण या राज्याला मान्य नाही.अशी तेढ राज्यातील नागरिक खपवून घेणार नाहीत.शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अंगणातील तुळस आहेत,त्यांच्याचमुळे देवघरातील देव आज सुरक्षीत आहेत,त्यांचेच आम्ही मावळे आहोत.जात,धर्म वाद उकरल्याने पोटाच्या भाकरीचा प्रश्‍न सुटणार नाही.राज ठाकरेंवर शरसंधान साधत, राज ठाकरे हे जर महागाईवर बोलले असते तर आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत उभे राहीलो असतो,अशी बोचरी टिका त्यांनी केली.आज राज्याचा शाश्‍वत विकास करणा-या सरकारचीच महाराष्ट्राला खरी गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी आपल्या प्रभागातील केलेल्या विकास कामांचा पाढा त्यांनी वाचून दाखवला.गेल्या २० वर्षांपासून प्रभागातील सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला.प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन दिले.या प्रभागात एकेकाळी ‘खंडणीखो’र फिरत होते.सर्वसामांन्यांना घर बांधण्यासाठी त्यांना खंडणी द्यावी लागत होती.घरांचे नियमितीकरण सुलभ केले व बाह्य शक्तींना बाजूला करुन प्रभागातील जनतेला दिलासा दिला.प्रभागातील जनतेसाठी चोवीस तास सेवारत राहत असून हीच सेवा काँग्रेस मध्ये असताना देखील केली मात्र त्या पक्षातील अनेक नेत्यांना मी त्यांची प्रतिस्पर्धी वाटत राहीली.माझ्यासोबत ’राजकारण’ खेळण्यात आले.ते माझ्या स्वाभिमानी मनाला पटले नाही.स्वाभिमानाशी समझौता केला नाही.चांगले काम करणा-याला प्रोत्साहन देणारे नेते राजकारणात तरी मी आजपर्यंत बिघितले नाही मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे खूप मोठ्या मनाचे आहेत त्यांनी चांगल्या कामाची दखल घेतली.आजवर राजकारणात मी परिक्षा खूप दिल्या मात्र माझ्या उत्तर पत्रिका बरोबर कोणी तपासल्याच नाहीत,असा टोला त्यांनी शहरातील काँग्रेसजनांना आपल्या भाषणातून हाणला.
अजित पवार यांनी डोक्यावर हात ठेवला आणि नवी प्रेरणा मिळाली,असे कौतुकोग्दगार त्यांनी काढले.

या प्रभागातील खैरीपुरा येथील सुभाषचंद्र बोस वाचनालयाची एकेकाळी दयनीय अवस्था होती.महापौरांना वारंवार या समस्येविषयी अवगत केल्यानंतर ते म्हणाले मी बघायला येतो आणि ते आले.त्यावेळी भाजपचे नगरसेवक हे देखील त्यांच्या सोबत होते.येऊन फक्त पाहणी दौरा करुन गेले,केले काहीच नाही!त्या वाचनालयावर २५ लक्ष खर्च करुन वाचनालयाचा कायाकल्प करण्यात आला.या वाचनालयाच्या बाजूला तीन झोपडपट्ट्या आहेत.आता तेथील गरीब मुले या वाचनालयाचा लाभ घेतात.काहींना राज्य तर काहींनी स्पर्धा परिक्षेसाठी याच वाचनालयातून तयारी करुन केंद्र सरकारच्या अधीन देखील नोक-या मिळवल्या असल्याचे आभा पांडे यांनी सांगितले.

करोना काळ हा तर अवघ्या मानव जातीसाठीच अत्यंत खडतर काळ होता.त्या ही काळात प्रभागातील जनतेसाठी अहोरात्र झटण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं.आज अनेक मतदार सांगतात तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला,तुझ्यामुळे माझे वडील वाचले तेव्हा मन भरुन येतं.परमेश्‍वरानेच माझ्याकडून चांगली कामे करुन घेतली हे मी माझं सौभाग्य समजत असल्याचे त्या म्हणाल्या.

मात्र या प्रभागात एका ई-लायब्ररीचीही नितांत गरज असल्याचे प्रतिपादीत करुन युवांच्या उज्जवल आयुष्यावर परिणाम करु शकणा-या या ई-लायब्ररीसाठी उपमुख्यमंत्र्यानी आणखी निधी द्यावा अशी मागणी आभा पांडे यांनी केली.याशिवाय उत्तम खेळाडू घडण्यासाठी या प्रभागात एका चांगल्या व अत्याधुनिक सुविधा असणा-या क्रीडा मैदानाचीही गरज त्यांनी प्रतिपादीत करीत यासाठी देखील निधी देण्याची विनंती त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री यांनी २५ जानेवारी रोजी मला राज्य महिला आयोगाचे सदस्यत्व बहाल केले,या पदाशी निगडीत जबाबदा-यांचे भान असून, अत्याचाराची माहिती मिळताच पिडीतांना मदतीचा हात देण्यास तत्पर असते.हे पद देताना जो विश्‍वास माझ्यावर दाखविण्यात आला त्या विश्‍वासाला तडा जाणार नाही असा शब्द याप्रसंगी आभा पांडेंनी अजित पवार यांना दिला.

नागपूर शहरात आजूबाजूच्या भागातून व विविध ठिकाणाहून अनेक महिला कामानिमित्त येतात मात्र त्यांना हक्काचं असं ठिकाण मिळत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी ‘वर्किंग वुमन वसतीगृह’ची व्यवस्था करण्याचा मानस असून यासाठी देखील निधी देण्याची मागणी त्यांनी केली.

निवृत्तीधारकांच्या निवृत्ती वेतनाचा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला.नुकतेच भुुुुुुुजबल समितीचा अहवाल मंत्रीमंडळाकडे सुपुर्द करण्यात आला त्या अहवालाचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती आभा पांडे यांनी केली.

आज आपल्या सर्वाधिक व्यस्तम कार्यक्रमांतून वेळ काढत माझ्या प्रभागात त्यांनीच दिलेल्या निधीतून केलेल्या विकास कामांचे लोकापर्ण करण्यासाठी उपस्थित राहील्याने माझा सन्मान वाढवला, यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.मात्र नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिका-यांनी जो वेळकाढूपणा दाखवला त्यावर आभा पांडे यांनी चांगलाच संताप व्यक्त करीत,नासुप्रच्या प्रेमनगर येथील उद्यानात लहान मुलांची खेळणी लावण्यासाठी कमालीचा विलंब करण्यात आल्याची तक्रार आभा पांडे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे उघडपणे केली.

नासुप्रचे सभापती, अधिकारी व कर्मचा-यांनी या उद्यानात खेळणी लावण्यासाठी निविदा काढण्या पलीकडे काहीच केले नाही.आज लोकापर्ण होणार आहे हे त्यांना माहिती असतानासुद्धा त्यांनी काहीच हालचाल केली नाही परिणामी काल १२ वाजून ३५ मिनिटांवर देखील मी याबाबत विचारणा केली,यानंतर मीच पुढाकार घेऊन आज सकाळी ७ वाजता नागपूर सुधार प्रन्यासच्या या प्रेमनगरच्या उद्यानात लहान मुलांसाठी विविध खेळणी बसवल्या व नासुप्रला कळवले तुमच्या निविदा व वर्क ऑर्डर आता रद्द करा,मला त्याची गरज नाही!आज उपमुख्यमंत्र्यांनी प्रेमनगर उद्यानातील ज्या नामफलकाचे अनावरण केले ते देखील नासुप्रने नव्हे तर उपमुख्यमंत्री यांनीच दिलेल्या निधीतूनच बसवण्यात आल्याची टिका आभा पांडे यांनी केली.जनतेला मी जो शब्द देते तो पाळण्यावर माझा भर असतो.२ कोटी ३० लाखांचा निधी मला उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रभागात विकास कामांसाठी दिला त्यातील देखील ७७ लक्ष रुपये शिल्लक असून लवकरच त्या निधीतून माझ्या प्रभागात विकास साधल्या जाईल,असा शब्द यावेळी आभा पांडे यांनी दिला.

मदत अवाम की जो सुबह शाम करते है,उसे हे जनता सलाम करती है’या शायरीतून त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.

पेठे यांच्या प्रभागात ‘काेरडवाहू’ निधी!
आभा पांडे यांनी गेल्याच वर्षी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला तरी देखील त्यांनी आपल्या प्रभागात २ कोटी ३० लाखांचा निधी खेचून आणला,शहरात राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांना मात्र अजित पवार यांच्याकडून ‘काेरडवाहू’ निधी मिळाल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली.पेठे हे शहरातील राष्ट्रवादीचा एकमेव चेहरा आहेत,ते मनपात पक्षाचे गटनेते देखील होते,विद्यमान शहराध्यक्ष असून देखील त्यांना अापलं ‘वजन‘वापरुन निधी खेचून आणता आला नाही हे विशेष! मंचावर ते अजित पवार यांच्या बाजूलाच बसले होते व सातत्याने त्यांच्या कानाशी काहीतरी बोलत होते,ते बघून गर्दीमध्ये ब-याच चर्चेला उधाण आले.पांडे यांना पक्षाने विकासकामांसाठी एवढा निधी पुरवला मात्र पेठे हे त्याच पक्षाचे ’मूळ’असताना त्यांच्या प्रभागात ‘ठणाठणाट’असल्यावर बरीच बोचरी टिका याप्रसंगी कानावर पडत होती.

Latest बातम्या