Homeनागपूर न्यूज.काँग्रेसला संविधानात विश्‍वास नाही:लालसिंग

.काँग्रेसला संविधानात विश्‍वास नाही:लालसिंग

Advertisements

संविधानाचे गोडवे गाणा-या काँग्रेसनेच लादली देशात आणिबाणि

नागपूर,ता. १ डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करताना देशात, २६ नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्याची घोषणा केली.या आधी देशात ५७ वर्षे काँग्रेसची एकछत्री सत्ता होती मात्र त्यांनी असा कोणताही उपक्रम देशात राबवला नाही,देशाच्या स्वातंत्र्याला ७३ वर्षे होत आली,१९५० साली देशाला संविधान लागू झाला मात्र एवढ्या दशकात पहील्यांदा संविधान दिवस हा शासकीयस्तरावर साजरा होत आहे,काँग्रेस पक्ष संविधान फक्त सोयीनुसार वापरते, काँग्रेसला संविधानात विश्‍वास नाही,असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंग यांनी आज पत्रकार भवनात आयोजित पत्र-परिषदेत केला.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की काँग्रेसने देशात संविधान लागू होताच सर्वात आधी संविधानाचेच उल्लंघन केले. त्यांनी संविधानात कुठेही नसलेले जम्मू-काश्‍मीरसाठी ३७० कलम लागू केले.यामुळे या राज्यात नोकरी आणि निवडणूकीतून अनुसूचित जाती-जमातीचे लाेक वंचित झालेत.त्यांना ना रहीवाशी प्रमाणपत्र मिळाले ना निवडणूक लढण्याचा अधिकार मिळाला,फक्त स्वच्छता कर्मचारी बनून राहावे लागले,देशाला संविधान लागू होताच अनूसुचित जाती-जमातींना मिळालेली ही काँग्रेसची सर्वात मोठी देणगी होती,अशी खरमरीत टिका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांनी ३७० कलम रद्द करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व ज्यांनी ’एक निशाण एक संविधान’मागणीसाठी आपले बलिदान दिले अश्‍या श्‍यामप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे ते म्हणाले.आता जम्मू-काश्‍मीरमध्ये अनूसुचित जाती-जमातीचे लोकं हे सन्मानाने जगत आहेत.

१९७५ मध्ये याच काँग्रेसने जून महिन्यात संविधानाचा गळा घोटून केवळ आपली सत्ता वाचवण्यासाठी देशात आणिबाणि लागू केली,लोकतंत्रचा आवाज निष्ठूरतेने दाबला,विरोधकांना तुरुंगात डांबले,काँग्रेसची ही कृती फक्त बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान करणारीच नव्हे तर संविधान रचियते बाबासाहेबांचाही अपमान,अनादर करणारी होणारी होती,अशी टिका त्यांनी केली.

१९५२ असो किंवा १९५४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत याच काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांना अविरोध निवडून लोकसभेत जाऊ दिले नाही,त्यांच्या विराेधात उमेदवार उभे केले.

देशात जेवढे ही राष्ट्रीय स्मारक आहेत,मोठे प्रकल्प आहेत त्यांना कधीही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले नाही या उलट भाजपने बाबासाहेबांचे लंदन येथील घर तसेच ज्या घरात बाबासाहेबांनी अंमित श्‍वास घेतला त्या घराला ही स्मारक म्हणून घोषित केले,त्यांचे जतन केले.

काँग्रेसने पिढी दर पिढी फक्त एकाच घराण्यात ‘भारतरत्न’ची खिराफत वाटली,संविधान देशाला लागू करुन ४७ वर्षांचा काळखंड लोटल्यानंतर भाजपची सत्ता केंद्रात आल्यानंतरच बाबासाहेबांना ‘भारतरत्न’हा सर्वोच्च पुरस्कार बहाल झाला.काँग्रेसने बाबासाहेबांचे तैलचित्र ही कधीच संसदेत लावले नाही,काँग्रेस संविधान विरोधीच नव्हे तर आंबेडकरविरोधी असल्याचा घणाघात लालसिंग यांनी यावेळी केला.

देशात पहिल्यांदा संविधान दिवस साजरा होत असताना मोदी यांनी सर्व पक्षांना आमंत्रित केले मात्र काँग्रेस,कम्यूनिस्ट,सपा,बसपा यांनी या कार्यक्रमावर बहीष्कार घातला.हा डॉ.आंबेडकरांचा अपमानच होता.

काँग्रेसच्या वर्षभर चालणा-या राष्ट्रीय उपक्रमात एक ही बाबासाहेंबाचा आठव करणारा नाही,त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात १४ एपिल, बाबासाहेबांची जयंती देखील समाविष्ट नाही मात्र भाजपच्या ७ राष्ट्रीय कार्यक्रमातील एक दिवस १४ एपिल असल्याचे त्यांनी सांगितले.

संविधानाच्या रक्षणाची गोष्ट करताना त्याच संविधानाच्या विरोधी सार्वजनिक बाबींचे खासगीकरण मोदी सरकार करीत आहे यामुळे आरक्षणावर गदा येत असल्याबाबत विचारले असता,हरियाणामध्ये खासगी उद्योगांमध्येही आरक्षणाचे धोरण लागू असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे त्या राज्यात खासगी उद्योगात आरक्षणाचे धोरण लागू असणार आहे अशी पुश्‍ती ही त्यांनी जोडली.

पत्र परिषदेत प्रदेश अध्यक्ष सुधाकर भालेराव, अनुसूचित जाति मोर्च्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे,शहर अध्यक्ष राजेश हातीबेड,
प्रदेश अनुसूचित जाती मोर्च्याचे सचिव सतीश सिरसवांन,चंदन गोस्वामी आदि उपस्थित होते.

आघाडी सरकारने अनूसुचित जातीची शिष्यवृत्ती थांबवली-
देशात काँग्रेसचे जे धोरण आहेत तेच महाराष्ट्रात काँग्रेस सहभागी असणा-या आघाडी सरकारचेही धोरण असल्याचे लालसिंग म्हणाले.१९९४ पासून अनूसुचित जाती-जमातींसाठी केंद्राने जी ‘पोस्ट मेट्रीक शिष्यवृत्ती ’ जाहीर केली ती राज्यातील आघाडी सरकारने गेल्या दाेन वर्षांपासून थांबवली असल्याची टिका त्यांनी केली.५ वर्षांसाठी मोदी यांनी या योजनेसाठी ६९ हजार कोटींचे प्रावधान करुन ठेवले आहे,यात ६० टक्के केंद्र व ४० टक्के राज्य सरकारचा वाटा अाहे मात्र राज्य सरकारने ही शिष्यवृत्ती थांबवली असल्याने अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे.

याचप्रमाणे महात्मा फूले महामंडळ,संत रविदास महामंडळ,अण्णाभाऊ साठे महामंडळअंतर्गत बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी कर्ज मिळत होते,आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांपासून ही योजना देखील बासनात गुंडाळण्याचे काम केले.

राज्यात अनूसुचित आया-बहीणींवर बलात्कार झालेत.अन्याय,अत्याचार वाढलेत,हत्या झाल्या मात्र त्यांच्या न्याय हक्कासाठी आघाडी सरकारने कोणतीही कृती केली नाही.२० नोव्हेंबर रोजी वाशिम येथील १७ वर्षीय अनूसुचित जातीच्या मुलीवर १७ लोकांनी बलात्कार केला,ही बाब माझ्यापर्यंत पोहोचताच मी मोर्चे- आंदोलन करण्याची सूचना केली,आंदोलनानंतरच आघाडी सरकारने या घटनेची दखल घेतली,यावरुन या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे हे लक्षात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आघाडी सरकारच्या काळात गुन्हेगार हे मोकाट फिरत आहेत. त्यांना सत्तेचं संरक्षण मिळत आहे,जर सरकार आता ही नाही जागणार तर आम्ही त्यांना जागवू,सरकारला जागवण्याचे काम भाजपचा अनूसुचित मोर्चा करेल असा इशारा त्यांनी दिला.

 

(छायाचित्र:नागपूरात आले असता भाजपचे अनूसुचित जातीच्या राष्ट्रीय मोर्च्याचे अध्यक्ष लालसिंग यांनी दीक्षाभूमीला आधी वंदन केले)

(छायाचित्र:नागपूरात आले असता भाजपचे अनूसुचित जातीच्या राष्ट्रीय मोर्च्याचे अध्यक्ष लालसिंग यांनी दीक्षाभूमीला आधी वंदन केले)

Latest बातम्या