Advertisements

केंद्रीय मंत्री गडकरी यांची सूचना!
९०० कोटींचे ८९ किमी चे १३५ सिमेंट रस्ते टप्पा-५ मध्ये प्रस्तावित
पर्यावरणवाद्यांचा सिमेंट रस्त्यांना विरोध
नागपूर,ता.२७ जून २०२६: ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद‘अंतर्गत नागपूर शहरात सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प विविध टप्प्यात राबविण्यात येत आहे.मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आता शहर सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-५ राबविणार असून, यासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात ९०० कोटींचा निधी प्रस्तावित असून,या कामात शासनाकडून निधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष शिवाणी दाणी-वखरे यांनी सांगितले.आज रेशिम बाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात त्यांनी महानगरपालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला.
शहर सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-४ अंतर्गत एकूण २३.४५ किलोमीटरचे ३३ रसत्यांचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले असून,त्यापैकी २७ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असल्याची तसेच १०.२५ कि.मी लांबीच्या १८ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती दाणी यांनी दिली.यासाठी १७०.२० कोटी रुपये खर्च झाले.
शहर सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-४ अंतर्गत प्रस्तावित रस्त्यांमध्ये जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी,‘Recharge Pit ’ही संकल्पना अंतर्भूत करण्यात आली असून,त्यामध्ये १९६ ठिकाणी ‘Recharge Pit करण्यात येणार आहे.त्यापैकी ७० ‘Recharge Pit ची कामे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी अर्थसंकल्प वाचनात सांगितले.
नागपूर शहरातील सिमेंट रस्ते प्रकल्प १,२,३, ४ ची कामे पूर्ण झाली असून, आता प्रस्तावित सिमेंट रस्ते प्रकल्प टप्पा -५ करीता शहरातील ९ झोनमध्ये ८९ किं.मी.चे १३५ रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचित केल्यानुसार,नागपूर शहर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे,या शहरात सिमेंट रस्ते करण्याकरीता विशेष अनुदान महाराष्ट्र शासनाकडून मिळणे अपेक्षीत आहे.सिमेंट रस्ते तयार करण्याकरीता प्री कास्ट ड्रेनेज सिस्टीम दर्जेदार गुणवत्तेचे डक्ट तयार करण्याकरिता ‘सल्लागार’नियुक्त करावा.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचित केले की,प्रस्तावित सिमेंट रस्ते प्रकल्प टप्पा-५ मध्ये गल्लीतील रस्त्यांचे काम हाती न घेता, शहरातील मोठ्या रस्त्यांचे निर्माण कार्य करीत असतांना जे मोठे व खराब रस्ते आहेत,त्यांचे सर्वप्रथम काम हाती घेण्यात यावे.
यासाठी ७० टक्के निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात येईल व ३० टक्के निधी महानगरपालिकेचा राहील. आता टप्पा-५ मधील रस्ते निर्माण करताना, युटिलिटी व भुमीगत युटिलिटी ट्रेंच बनविणे ‘अनिवार्य’ असेल.याकरिता अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद करण्यात आली असल्याचे दाणी यांनी सांगितले.
मात्र,शहरातील अनेक भागात नागपूरकरांनी सिमेंट रस्त्यांचा विरोध केला आहे.तसेच मनपाचे अधिकारी हे कोणत्याही प्रकल्पासाठी ‘सल्ला‘देण्यास पात्र नाहीत का?असा सवाल ते करतात.मूळात हे सल्लागार नेमके कोणाचे हितसंबंधी असतात?नागपूरकरांचा कष्टाचा कोट्यावधी पैसा त्यांच्या सल्ल्यासाठी का खर्च करावा?सिमेंट रस्ता पहील्या टप्प्यातच पावसाच्या पाण्याच्या पुर्नभरणाची सोय का करण्यात आली नाही?इतकी वर्षे नागरिकांच्या घरात पावसाच्या पाण्याने थैमान घातले,मनपाचे अभियंते अडाणी होते की कंत्राटदार?आता चार टप्प्यांचे हजारो किलोमीटरच्या रस्त्यांचे बांधकाम झाल्यानंतर टप्पा-५ मध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा व भूमिगत ड्रेनेज लाईनची योग्य व्यवस्था याची मनपा पदाधिकारी व अधिका-यांना जाग आली आहे का?असा सवाल ते करतात.
आधीच्या सर्व टप्प्यांमध्ये रस्त्यांच्या बाजूला सिमेंट भरुन -भरुन गट्टू टाकले जेणेकरुन पावसाचा एक थेंब ही जमिनीत झिरपणार नाही!निदान गट्टूच्या खाली तरी सिमेंटचे परत टाकायची नव्हती.कहर तर तेव्हा झाला आता सर्व दूर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्या,त्यावर आता डांबर टाकले जात आहे!सिमेंट रस्ते निर्माण करताना इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शिकेचे पालनच करण्यात आले नाही.आता स्थायी समिती अध्यक्ष शिवाणी दाणी-वखरे सभागृहात सांगतात की,हा अर्थसंकल्प नागपूरकर जनतेच्या सूचनांना समाविष्ट करुन तयार करण्यात आला अाहे!
मूळात नागपूर शहरात तज्ज्ञांच्या अहवालानुसार काळी सुपीक जमीन (ब्लॅक कॉटन साॅईल)आहे.शेती आणि भूगोलाच्या भाषेत या मातीला ‘कापसाची काळी जमीन किंवा ‘काळी कसदार मृदा’संबोधले जाते.त्यावरच संपूर्ण सिमेंट काँक्रीटचे परत चढवण्यात आले.महत्वाचे म्हणजे,अश्या मातीवरील सिमेंट हे पुन्हा दुरुस्त होऊ शकत नाही.पुन्हा डांबरच टाकावं लागतं.करदात्यांच्या हजारो कोटींचा चुराडा केला तेव्हा करदात्याला विचारले होते का?असा खोचक सवाल देखील पर्यावरणवादी करतात.
नागपूरकरांच्या सूचनांचा अवलंब करुन अर्थसंकल्प तयार करण्यात आला,अशी वल्गना करु नये,कारण नागपूरकरांनी कुठेही सिमेंट काँक्रीटचे रस्ते शहरातील नेत्यांना,मनपा पदाधिका-यांना आणि अधिका-यांना मागितले नाही. अर्थसंकल्पासाठी अश्या सूचना जर दाणी यांना मिळाल्या असतील तर त्या त्यांनी सार्वजनिक कराव्या,अर्थात त्या भाजप कार्यकर्त्यांच्या नसाव्या,असा टोला देखील हाणण्यात आला.
आता तर राज्याचे मुख्यमंत्रीच सांगत आहे टप्पा-५ मध्ये गल्ल्यांमध्ये सिमेंट रस्ते नको,जुने मोठे रस्ते आधी दुरुस्त करा.मग टप्पा १,२,३,४ मध्ये शहरातील गल्ली बोळ्यात कशाला इतके सिमेंट भरले?कोणाच्या फायद्यासाठी? सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे पाणी जमीनीच्या आत झिरपत तर नाहीच पण जी झाडे आपल्या मूळांमध्ये पाणी घट्ट मूरवतात,त्या लाखो झाडांचा बळी सिमेंटच्या रस्त्यांनी आणि झाडांच्या बुंध्यापर्यंत त्यांचा श्वास अडकवणा-या गट्टूंनी घेतला आहे.
याशिवाय सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमधील मोठमोठ्या भेगांमध्ये घसरुन शेकडो दूचाकीचालकांचा जीव गेला आहे.सातत्याने अपघात घडत आहेत.याचे कोणतेही वैषम्य शहरातील नेते,मनपा पदाधिकारी व अधिका-यांना नाही कारण मरणारे त्यांचे कोणीही नसतात.
नागपूर शहरात हजारो किमीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे निर्माण करुन शहराच्या हवामानाची पुरती वाट लावली.प्रकृतीचे चक्रच शहरात बिघडवून टाकले.निदान पर्यावरण तज्ज्ञ दृष्यमानतेचा अहवाल जो देतात,तो तरी वाचण्याचे सौजन्य मनपा पदाधिकारी व अधिका-यांनी दाखवायचे होते.शहराला उष्णतेची भट्टी बनवल्यानंतर आता मनपा पदाधिका-यांना आणि अधिका-यांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ राबवण्याची संकल्पना सूचतेय.पूर्वीचे चार-चार टप्पे शहरभर सिमेंट काँक्रीटचे रस्ते गल्लोगल्ली बनवताना कोणत्याही शहरासाठी सर्वाधिक गरजेचे असणारे पावसाचे पाण्याचे नियोजन हे राज्याच्या उपराजधानीतच शून्य असावे,ही मुख्यमंत्र्यांसाठी तरी भूषणावह बाब आहे का?असा खडा सवाल पर्यावरणप्रेमी समाज माध्यमांवर व्यक्त करतात.
नागपूर शहर हिरवळीमध्ये देशात दुस-या क्रमाकांचे शहर होते,आज ते राज्यात देखील दुसरे राहीले नाही,इतकी लाखो झाडे विविध प्रकल्पांच्या आणि सर्वाधिक सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची भेट चढली आहे.देशात मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्र दुसरे असे राज्य आहे ज्यात सर्वाधिक हिरवळ नष्ट झाली आहे.
पर्यावरण संरक्षण आणि प्रदुषण मुक्तीसाठी दाणी यांनी अर्थसंकल्पात किती निधी ठेवला आहे?नागपूरकरांच्या सहभागातून पाच लाख झाडे लावण्याची ओळ अर्थसंकल्पात टाकून, पर्यावरण रक्षण होत नसतं.एकदाची झाडे नाही लावली तरी चालेल, आहे ती झाडे तरी नागपूरच्या जमीनीवर राहू द्या,असे आवाहन पर्यावरणप्रेमी करतात.
……………………………..
तळटीप-
उद्या रविवार दिनांक २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सीताबर्डी झीरो माईल टी.पॉईंट चौकात ,शहरातील पर्यावरणवादी हे मानस चौक ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ दरम्यान होणा-या भुयारी मार्गाचा विरोध करणार असून,‘काय गरज आहे? ० मैल अंडरपासची…’ही चळवळ राबविणार आहे.या,नागपूरला सांगू की ह्या भुयारी मार्गाची नागपूरकरांना काेणतीही गरज नाही,कृपणा ० मैल पार्कमधील खुला रंगमंच आणि पार्क नागपूरकरांना परत द्या…’ही चळवळ उभारणार असल्याने या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विविध पर्यावरणवादी संस्थांनी नागपूरकरांना केले आहे.
………………………………