फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे गुन्हेगारांसोबत ‘साटेलोटे’

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे गुन्हेगारांसोबत ‘साटेलोटे’

Advertisements


ॲड.सतीश उके यांचा धक्कादायक आरोप:तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात परमबिरसिंह व अमितेशकुमार यांची भूमिका संशयास्पद

अनिल देशमुख बळीचा बकरा: नागपूर शहरात पोलिसी आणिबाणि!

पोलिस खात्याचा राजकीय व आर्थिक लाभासाठी उपयोग करणा-या परमबिर सिंह व नागपूर पोलिस आयुक्तांवर मोक्का लावावा

गुन्हेगारांऐवजी अमितेशकुमार यांच्या खाकी वर्दीचा बलात्कारित पिडीता व गंगा जमुनातील वारांगणावर जोर!

पत्रकार ही विकल्या गेला!लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात

नागपूर,ता. १५ नोव्हेंबर २०२१: पोलिस आयुक्त अमितेशकुमार हे २००६ साली नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त असताना महाराष्ट्रात अब्दूल करीम तेलगीचा स्टॅम्प पेपर घोटाळा गाजत होता,नागपूरात देखील धंतोली व सीताबर्डी पोलिस ठाण्यात बनावट स्टॅम्प पेपरबाबत गुन्हे दाखल झाले होते.या दोन्ही गुन्ह्यात जप्त स्टॅम्प पेपर कोणी तयार केले याबाबत तपास करण्यात आला नाही,महत्वाचे म्हणजे घोटाळ्यातील आरोपी भरत शहा,राहणार मुंबई,बोरीवली याला देखील अटक करण्यात आली नाही,उलट तपास एएसआय,एपीआय यांच्याकडून करुन घेण्यात आला,याचा मुख्य सूत्रधार माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित असून या घोटाळ्यात मुंबईचे पोलिस आयुक्त परमबिर सिंह तसेच नागपूरचे विद्यमान आयुक्त अमितेश कुमार या दोघांचाही ख-या आरोपींना वाचवण्यात सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप करुन, या दोघांवरही मोक्का लावण्यात यावा अशी मागणी महाविकासआघाडी सरकारकडे करणार असल्याचे ॲड.सतीश उके यांनी आज गुरुवार दि.२५ नोव्हेंबर रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र-परिषदेत केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले,की महाराष्ट्रात तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा सुरु असताना परमबिर सिंह हे ठाणे येथे कार्यरत होते.ठाणे येथे अब्दूल करीम तेलगीचा बनावट स्टॅम्प पेपर,बनावट शेअर प्रमाणपत्रे स्टॅम्प तिकीटे,बनावट कोर्ट फी छापणारी प्रिंटींग मशीन प्रेस ,कनिष्ठ पोलिस अधिका-यांना सापडला होता.कनिष्ठ पोलिस अधिका-यांनी वारंवार परवानगी मागूनसुद्धा तो कारखाना सील करुन जब्त करण्याची परवानगी परमबिर सिंह यांनी दिली नाही त्यामुळे तेलगीची टोळी तो कारखाना पळविण्यात यशस्वी झाली.

याचप्रमाणे ठाणे व मुंबई परिसरात अनेक लोकांकडून परमबिर सिंह यांनी कोट्यावधीची खंडणी वसूल केली.परमबिर सिंह यांच्या वसूली टोळीकडून खंडणी वसूल करने व विध्वसंक कृत्य घडवून आणण्याच्या कृत्याबाबत राज्य सरकारला देखील माहिती आहे.परमबिर सिंह यांनी आपल्या काळ्या कृत्यातून कमावलेला पैसा व कमावलेली संपंत्ती महाराष्ट्र संगठीत गुन्हेगारी अधिनियमाच्या तरतुदीनुसार राज्य सरकारला जप्त करने शक्य असताना देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धार्जिणे पोलिस अधिकारी राज्य सरकारकडे माहिती पोहोचवत नसल्याचा आरोप ॲड.उके यांनी याप्रसंगी केला.

नागपूरात देखील हेच घडले.२००६-२००७ साली मी आर्किटेक व बिल्डर म्हणून काम करीत असताना नागपूरात बनावट स्टॅम्प पेपरचे पुरावे सापडले होते.त्याची तक्रार परिमंडळ क्रमांक-२ चे तत्कालीन पोलीस उपायुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली होती मात्र त्यांनी ७ महिने या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही.यावर माहितीच्या अधिकारात माहिती मागवताच त्यांनी मुख्य सूत्रधारासोबत षडयंत्र रचून माझी तक्रार दडपण्याकरिता माझ्यावर दिवाणी न्यायालयात प्रलंबित ६ गुन्हे खोट्या तक्रारीच्या आधारावर फौजदारी प्रकरणात परिवर्तित केले.यामगे उद्देश्‍य मला कारागृहात डांबून स्टॅम्प पेपर घोटाळा दडपून टाकावा हा असल्याचे ॲड.उके म्हणाले.विशेष

म्हणजे पहिला गुन्हा दाखल होताच अमितेश कुमार यांनी कोराडी पोलिस ठाण्यातील अधिका-यांना माझ्या विरोधात मोक्कासारखे गंभीर कलम लावण्याची सूचना केली.

२००७ मध्ये बनावट स्टॅम्प पेपर विक्री करणा-या टोळीने सदर पोलिस ठाण्यात ‘ते खुलेआम स्टॅम्प पेपर विक्री करीत असल्याचे’ लेखी बयाण देत माझ्याच विरुद्ध खंडणीचा गुन्हा खोटी तक्रार देत दाखल केला.त्यांचे बयाण न्यायाधीशांसमोर झाले होते हे विशेष!न्यायाधीशांसमोर दिलेले बयाण नंतर कोणत्याही परिस्थितीत बदलता येत नाही. २०२१ मध्ये अमितेश कुमार पुन्हा नागपूरात पोलिस आयुक्त पदी रुजू झाले.५ ऑक्टोबर २०२१ रोजी न्यायालयाने या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याच्या प्रकरणाबाबत पुढील तपास करण्याचे आदेश अमितेशकुमार यांना दिले.तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत:अमितेश कुमार यांना तलब करीत न्यायालयाच्या आदेशाचे बारकाईने तपास करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र या प्रकरणात अमितेश कुमार यांनी बनावट स्टॅम्प पेपर जब्त न करता व न्यायाधिशांसमोर त्या टोळीने बयाण दिले नसल्याचा खोटा अहवाल न्यायालयात सादर करुन न्यायालयाची दिशाभूल केली व बनावट स्टॅम्प पेपर टोळीला अमितेशकुमार यांनी वाचवण्याचे कृत्य केले,असा आरोप ॲड.उके यांनी केला.

अजनी पोलिस ठाण्यात माझ्या तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशाने बनावट स्टॅम्प पेपरचा गुन्हा दाखल झाला मात्र यात देखील बनावट स्टॅम्प पेपर २० मार्च २०२१ रोजी जब्त करण्यात येऊन देखील पोलिसांनी हा स्टॅम्प पेपर कोणी,कुठे तयार केला याचा तपास, आरोपीला अटक करुन केला नाही.उलट फडणवीस यांच्याशी संबंधित त्या आरोपीने देखील माझ्याच विरुद्ध खोटी तक्रार केली व माझ्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला.अमितेश कुमार यांच्या छत्रछायेखाली खरे आरोपी हे एवढ्या गंभीर गुन्ह्यात देखील सुरक्ष्ति राहीले,असा आरोप ॲड.उके यांनी केला.

एवढंच नव्हे तर फडणवीस व माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या विरोधात शेकडो कोट्यावधीच्या शासकीय भूखंडाचे गबन व जमीन घोटाळे,आर्थिक अनियमिततेच्या अनेक तक्रारी पुराव्यानिशी गेल्या ६ महिन्यांपूर्वीच दिल्या असताना देखील अमितेश कुमार, फडणवीस व बावणकुळे यांना ईडीच्या कारवाईपासून वाचवण्याकरिता, माझ्या तक्रारींवर कारवाई करीत नसल्याचा आरोप ॲड.उके यांनी केला.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमितेश कुमार यांना कारवाईचे आदेश देऊनसुद्धा एवढ्या गंभीर आरोपांवर कोणतीच कारवाई पोलिस आयुकतांनी केली नाही.

मुन्ना यादव फडणवीस यांचीच पिलावळ!
याप्रसंगी मुन्ना यादव याच्यावर शरसंधान करताना ॲड.सतीश उके म्हणाले,की मुन्ना यादव, जो फडणवीस यांचा डावा हात आहे त्याने एका मूळ जिवंत मालकाला मृत दाखवून त्याची वर्धा रोड येथील कोकाकोला फॅक्टरी जवळील मोक्याची जागा बळकावली.२० ऑक्टोबर २००३ रोजी त्याने नगरसेवक,नागपूर मनपाच्या लेटर हॅडवर हे लिहून दिले होते.त्या जिवंत व जमिनीची मूळ मालक असणा-या महिलेने या विरोधात सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.याच कारवाईत सोनेगाव पोलिसांनी मुन्ना यादव याचे ते नगरसेवक असल्याचे पत्र जप्त केले होते.या प्रकरणात मुन्ना यादवला आरोपी बनवण्यात मात्र अमितेश कुमार यांनी खोडा घातला.मुन्ना यादव याच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात तलवारीने हल्ला करने,जखमी करने,भूखंड हडपने,विनय भंगसारखे अनेक गुन्हे दाखल असून, न्यायालयात त्याच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल आहेत मात्र त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यास अमितेश कुमार धजत नाहीत कारण मुन्ना यादव हा इतर कोणी सामान्य गुन्हेगार नसून, फडणवीस याचीच पिलावळ असल्याचा घणाघाती आरोप ॲड.उके यांनी केला.

फडणवीस यांच्या गुंडांनी, फडणवीस यांच्याविरुद्ध मी केलेल्या फौजदारी तक्रारीमुळे, डिसेंबर २०२० मध्ये माझ्या कार्यालयावर हल्ला केल्याचा धक्कादायक आरोप ॲड.उके यांनी केला.माझ्या कुटुंबियांना जखमी केले,दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र अजनी पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी, अमितेश कुमार यांच्या आदेशावरुन कलम ३०७ एेवजी जामीनपात्र गुन्हा दाखल केला.त्या हल्लावर गुंडांचा जामीन ही फडणवीस यांच्याच वकीलांनी घेतला!

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला पोलिस सुरक्षा प्रदान करण्याचा सूचना अमितेश कुमार यांना दिल्या होत्या मात्र विशेष शाखेचा अहवाल बाहेर देता येत नाही याचा फायदा घेत अमितेश कुमार यांनी खोटे अहवाल निर्देशित करुन मला पोलिस सुरक्षा नाकारली,याचा फायदा गुन्हेगारांना झाला,असे उके यांनी सांगितले.

विशेष शाखेकडून मंत्रालयापासून गुप्त माहिती दडवली जाते-
याप्रसंगी बोलताना ॲड.उके म्हणाले,की नागपूरातील विशेष शाखेकडून तसेच फडणवीस यांच्या फेवरमधील पोलिस अधिकारी हे मंत्रालयापासून संपूर्ण गुप्त अहवाल दडवून ठेवतात.एवढंच नव्हे तर नागपूरातील सह धर्मादाय आयुक्त ज्या फडणवीस यांच्या वर्गमैत्रीण आहेत तसेच ज्यांचे फडणवीस यांच्यासोबत कौटूंबिक संबंध आहेत त्या सह धर्मदाय आयुक्तांनी,फडणवीस यांच्या अनेक खास माणसांचे नाव शेकडो कोटींच्या ट्रस्टमध्ये घातले!

एवढंच नव्हे तर फडणवीस यांची ट्रस्ट असणा-या जामठा येथील नॅशनल कँसर हॉस्पीटल यात शेकडो कोटींचा घोटाळा झाला,१५०० कोटींची जमीन या रुग्णालयासाठी बळकावण्यात आली.टाटा ट्रस्ट,येस बँक,विप्रो कंपनीने प्रत्येकी १०० कोटी रुपये या रुग्णालयासाठी दान दिलेत,ओएनजीसी कंपनी जी सामान्य ग्राहकांना महागात सिलेंडर विकते मात्र या कपंनीने देखील १०० कोटींची खैरात फडणवीस यांच्या या रुग्णलयात दिली.याशिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देखील पैसा फडणवीस यांनी त्यांच्या या रुग्णालयात वळता केला.या संपूर्ण गौडबंगाल व अनियमिततेची तक्रार करुन ९ महिने उलटले मात्र अमितेशकुमार यांनी अद्याप माझ्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही.

या कँसल रुग्णालयाचे कोणतेही लेखापरिक्षण देखील झाले नाही,ना विशेष शाखेने मंत्रालयात किंवा शासनास ही माहिती पाठवली.नागपूरातून कोणतीही माहिती फडणवीस यांच्या विरोधात मुंबईपर्यंत जाऊ दिली जात नसून याची विशेष खबरदारी घेतली जात असल्याचा धक्कादायक आरोप ॲड.उके यांनी याप्रसंगी केला.

फडणवीस यांच्या या भव्य कँसर रुग्णालयातील जे रुग्ण व पिडीत तक्रार करतात त्यांनाच पोलिसांकरवी खोट्या गुन्ह्यात अडकवू म्हणून धमकाविल्या जाते.याचे व्हिडीयो देखील उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस यांच्या संपूर्ण काळ्या कारोबाराला शासकीय संरक्षण देण्यासाठीच सह धर्मादाय आयुक्तांची बदली गेल्या ८ वर्षांपासून झाली नसल्याचे ते म्हणाले.चंद्रशेखर बावणकुळे यांनी देखील कोराडी मंदिराची जमीन इतरांना दिली,विना विक्रीपत्र करता सात-बारा चा उता-यावरील मालकी हक्क बदलला,एनएमआरडीएने बावणकुळे यांच्या त्या नवीन नावांचा ‘एनए’ करुन दिला,यावर देखील धर्मादाय आयुक्तांनी कोणतीच कारवाई केली नाही.

फडणवीस यांचे गुपितांचे स्त्रोत सरकारी वकील!
नागपूरातील अनेक ‘सरकारी’वकील हे फडणवीस यांच्या कार्याकाळातील व निकटवर्तीय आहेत,यामुळेच शासनाची अनेक गुपिते फडणवीस यांच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतात असा धक्कादायक आरोप यावेळी ॲड.उके यांनी केला.आघाडी सरकारमधील अनेक मंत्री व शासकीय अधिकारी यामुळेच अडचणीत आले.ही बाब नागपूर पोलिसांना देखील त्या वकीलांच्या नावानिशी माहिती आहे मात्र नागपूर पोलिस त्या वकीलांचे हे काळे कारनामे आघाडी सरकारला कळवत नाहीत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात विशेष शाखा ही माहिती गृह खाते,विधी व न्याय खाते,मुख्यमंत्र्यांना कळवित नाही.

पत्रकार ही सहभागी-
सध्याचे माहिती आयुक्त हे फडणवीस यांच्या खास विश्‍वासातले असून त्यांची फडणवीस यांच्या विरोधात मुंबईतील एका फौजदारी प्रकरणात त्यांच्यावतीने साक्षीदार म्हणून नोंद आहे. हा माहिती आयुक्त कधीही,कोणतीही माहिती फडणवीस यांना देऊ शकतो आणि सरकारी विभागाला अडचणीत आणू शकतो मात्र या माहिती आयुक्ताविषयी देखील पोलिसांच्या विशेष शाखेकडून कोणतीही माहिती मंत्रालयास सादर करण्यात आली नसल्याचा आरोप ॲड.उके यांनी केला.

आधी हे माहिती आयुक्त एका इंग्रजी दैनिकात पत्रकार म्हणून कार्यरत होते.पत्रकार असून देखील त्यांनी खास फडणवीसांची मर्जी असल्याने माहिती आयुक्त म्हणून मंत्रालयात घूसखोरी केली.सेकेण्ड अपीलमध्ये त्यांच्याकडे आलेली कोणतीही माहिती त्यांना कोणालाही देण्याचा अधिकार प्राप्त आहे.या माहितीचा दुरुपयोग ते माहिती अधिकारी, सरकारच्या विरोधात, फडणवीस यांना मदत करण्यासाठी करु शकतात,असा आरोप उके यांनी केला.

अमितेशकुमार यांचा संपूर्ण जोर गंगाजमुनाच्या दूर्बल वारांगणांवर-
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचा संपूर्ण जोर हा शहरातील गुंड,मवाली,खंडणीखाेर व सराईत गुन्हेगारांना सोडून एका बलात्कारित आदिवासी जमातीची पिडीता व गंगा जमुनातील दुर्बल वारांगणांवर निघताना दिसून पडतो,असा घणाघाती आरोप ॲड.उके यांनी केला.अमितेश कुमार यांनी नागपूर शहराचा लॉ आणि ऑर्डरचा संपूर्ण मॅकेनिझम ढासळून ठेवला असल्याचा आरोप त्यांनी केला.गोर गरीबांच्या विरोधात तत्परतेने गुन्हे दाखल करणा-या आयुक्तांचा शहरातील गुन्हेगारांना मात्र अभय आहे.

आदिवासी जमातीची एक बलात्कारी पिडीता हिच्याच विरोधात ५० लाखांच्या खंडणीचा आरोप करित अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.करोनानंतर आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी या पिडीतेने शहरातील मशहूर सट्टेबाज ‘अजय बागडी’ याच्या आयटी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून नोकरी स्वीकारली.मात्र आयटी कपंनीच्या आड अजय बागडीच्या नागपूरातील सर्व ५ आलिशान कार्यालयात सट्टा लावला जात होता.महाराष्ट्र,छत्तीसगड,तेलंगणा,उत्तरप्रदेश,दुबईमध्ये या कार्यालयांतून सट्टेबाजी होते.एवढंच नव्हे तर आपल्या ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी याच कार्यालयांतून वेश्‍या व्यवसायासाठी मुली देखील पुरवल्या जात होत्या. .

अजय बागडीचे सर्व गैर कानूनी कारनामे माहिती असणा-या शहरातील एका ‘मानबिंदू‘असणा-या दैनिकाचा पत्रकार हा बघता-बघता कोट्याधीश झाला असल्याचा धक्कादायक आरोप याप्रसंगी ॲड.उके यांनी केला.या पत्रकारचे वडील हे चहा विकण्याचा धंदा करीत होते,आज याच पत्रकाराचे उत्तराखंडात मोठे पंचतारांकित हॉटेल आहे.नागपूर ते उत्तराखंडच्या त्या हॉटेलपर्यंत पांढरपेशा वेश्‍या व्यवसायत चालविला जात असल्याचा आरोप उके यांनी केला.

माजी पोलिस आयुक्त उपाध्याय यांना अजय बागडी याच्या सट्टेबाजीची माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शाखेला निर्देश देऊन बागडी याच्या कार्यालयांवर छापा टाकला.यात १०० च्या वर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सीम कार्ड पोलिसांना गवसले.या गुन्ह्यात अजय बागडी हा आरोपी क्रमांक १० आहे.त्याच्या विरोधात चार्जशीट देखील दाखल झाली आहे.

याच सट्टेबाजच्या कार्यालयात या गरीब,गरजू आदिवासी महिलेवर त्याच्या मॅनेजरने बलात्कार केला मात्र या पिडीताची कोणतीही तक्रार सीताबर्डी पोलिसांनी दाखल करुन घेतली नाही उलट तिच्यावरच ५० लाख रुपयांच्या खंडणीचा गुन्हा नोंदवून तिची रवानगी कारागृहात केली!

या विरोधात न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानंतर तिची तक्रार प्रताप नगर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली मात्र या तक्रारीत बागडी याच्या विरोधातील सर्व सट्टेबाजी व वेश्‍या व्यवसायाचे आरोप अमितेश कुमार यांच्या आदेशाने काढून टाकण्यात आले व फक्त बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला!

या पिडीतेला विना मूल्य मदत करणा-या ॲड.परमार यांनाच पोलिसांनी नोटीस पाठवून तुमच्या पक्षकाराला हजर करा असे आदेश दिले.हे काम वकीलाचे आहे का?असा संताप व्यक्त करीत ॲड.उके यांनी अमितेश कुमार यांनी गरीब पिडीतेवर गंभीर गुन्हे दाखल केले मात्र दूसरीकडे शहरातील सट्टेबाजांना अभय देणा-या अश्‍या पोलिस आयुक्तांवर मोक्का लावण्यात यावा असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री,,गृहमंत्री,गृह विभागाचे अति.मुख्य सचिव तसेच पोलीस महासंचालकांना दिले असल्याची माहिती दिली.

पत्र परिषदेत राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा तसेच अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे उपस्थित होत्या.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या