

नागपूर,ता. २१ ऑक्टोबर: पुलाचा एक छोटासा पार्ट बसवता बसवता निसटून पडला म्हणून काही राजकीय पक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. हा प्रकार हस्यास्पद आहे. काही तांत्रिक लोकांच्या चुकीने घडलेल्या घटनेला गडकरींना जबाबदार धरणे हा कुठला न्याय झाला ,असा संताप भाजप शहराध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांनी व्यक्त केला.
हाच न्याय लावायचा म्हटला तर, काही दिवसांपूर्वी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता, त्यात काहींचा मृत्यू झाला होता. कोणत्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला? काही दिवसांपूर्वी एका चालकाच्या चुकीमुळे एक बस पुरात वाहून गेली त्यावेळी कोणत्या परिवहन मंत्र्यांनी राजीनामा दिला?
अधिकारी किंवा तांत्रिक लोकांच्या चुकीमुळे घडलेल्या घटनेमुळे मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा असता तर, महाविकास आघाडीचे अर्धे मंत्रिमंडळ घरी गेले असते. या घटनांकडे न पाहता केवळ राजकारणासाठी मोर्चे काढणाऱ्यांनी आपल्याला गडकरींचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? याचा विचार करावा.अश्या शब्दात विरोधकांना खडे बोल सुनावले.
आ.कृष्णा खोपडे यांनी देखील अधिकारी,कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे घडलेली घटना अतिशय दूर्देवी असल्याचे सांगितले.तथापि,विकासकामात नापास झालेल्या काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी खालच्या दर्जाचे राजकारण करु नये,या नेत्यांचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची जळजळीत टिका केली.
कळमना परिसरातील पुलाचा गर्डर मंगळवारी रात्री पडल्यानंतर अवघ्या काही वेळात राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी त्या ठिकाणी नारे,निर्दशने केली तर बुधवारी देखील हा आक्रोश कायम होता.यानंतर त्यात शिवसेना,आम आदमी पक्ष,पीपल्स रिपब्लिकन पार्टी,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रिय मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत ठिकठिकाणी निर्देशने केली.यावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.
मात्र आज भाजप शहराध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांनी प्रतिक्रिया देत गडकरी यांचा राजीनामा मागण्याचे नैतिक बळ विरोधकांकडे आहे का?अश्या शब्दात विरोधकांना खडे बोल ऐकवले.
थोडक्यात उड्डाणपुलावरुन नागपूरात आता चांगलेच रण पेटले असून मंगळवारी घडलेल्या दूर्घटनेत मात्र सुदैवाने जिवित हानी झाली नाही.तरी देखील नागरिकांचा रोष हा गडकरी यांच्याप्रति चांगलाच दिसून पडला.विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून पारडीच्या पुलाच्या रखडलेल्या बांधकामामुळे येथील रहीवाशी यांचाही संयमाचा बांध हा आता फूटला आहे.
विरोकांना त्यामुळे आयतेच हातात कोलीत मिळाले असून एनएचएआयने देखील आता या पुलाचे गर्डर कोसळण्याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा केली व अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.

आमचे चॅनल subscribe करा