

मुद्दे योग्य, पद्धत चुकीचीच: आंबेडकरी बुद्धिजीवींचे मत
नागपूर,ता. १४ ऑक्टोबर २०२१: १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस प्रत्येक बौद्धधर्मीय बांधवाच्या जीवनात अतिशय अभिमानाचा असतो,एक क्रांतीकारक व आमुलाग्र परिवर्तनाचा ताे दिवस, जगातील प्रत्येक बौद्ध बांधव आपापल्या परिने अतिशय उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतो.ज्या पवित्र भूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माचा स्वीकार केला,त्या दिवसाची आठवण म्हणून प्रत्येक बौद्ध धर्मियाला त्या पवित्र ठिकाणची माती आपल्या मस्तकाला लावण्याची आतुरता स्वाभाविक ठरते.
मात्र जग हे परिवर्तनशील आहे,निसर्ग आणि विज्ञानाचे नियम जगावर लागू होतात,धर्माचे नाही.जगात राहणा-या ‘नश्वर’ मानवजातीवर निसर्गाचा परिणाम होत असतो.‘करोना‘हा असाच गेल्या शंभर वर्षानंतर पुन्हा एकदा महामारीच्या रुपात आलेला व अखिल मानवजातीलाच संकटात टाकणारा ‘विषाणू‘या धरणीवर ‘मानवाच्या तुच्छ लालसेपोटी’प्रयोगशाळेतून अवतरला व बघता-बघता या विषाणूने अख्ख्या जगालाच आपल्या कवेत घेतले आणि महाभयंकर परिवर्तन घडले.
त्याने ना जात बघितली,ना धर्म बघितला,ना राजकीय पक्ष बघितला,ना भाषा,प्रांत,देशाच्या सीमा बघितल्या.जो-जो त्याच्या तडाख्यात सापडला त्याला -त्याला त्याने गिळंकृत केले,नामशेष केले.कराेना महामारीच्या दोन लाटेने हे विदारक सत्य जगासमोर मांडून देखील अद्याप आम्ही त्या विषाणूला जर खूप हलक्यात घेत असू तर ‘अपरिपक्व’माणूस म्हणून ही आमची चूक आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद(आयसीएमआर)ने कराेनाच्या दोन लाटेनंतर केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासानंतर हाच निष्कर्ष काढला ‘कोविड-१९’हा विषाणू, गर्दीमुळे स्वत:मध्ये जनुकीय (स्ट्रेन) बदल घडवून आणतो.गर्दीमुळे त्याला सहज शिरायला अनेक शरीर मिळतात,या काळात स्वत:च्या व्हेरियंटमध्ये बदल घडवून आणने त्याला सहज सुलभ होत असल्याने तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.
यामुळेच देशाची सरकार असाे किवा राज्याची त्यांनी गर्दी टाळण्यासाठी मानवी व्यवहारांवर काही निर्बंध घातले आहे.धार्मिक स्थळे ही गर्दी होणारी हमखास स्थळे असल्याकारणाने गेल्या दीड वर्षांपासून धार्मिक स्थळे ही देखील पूर्णपणे बंद होती.नुकतेच २४ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने सर्वच धार्मिकस्थळे ही काही कठोर निर्बंधे घालून खुली केली.
सरकारचे काम आहे नियम बनवणे.नागरिकांचं कर्तव्य आहे त्या नियमांचं पालन करने.मात्र आज दुपारी १ वाजता पवित्र दीक्षाभूमीवर जे घडलं ते योग्य होतं की अयोग्य या तपशीलात न जाता,ते नियम सर्वसामान्य जिवितांच्या हितार्थच होते,हे जगातील कोणताही बुद्धीजीव ठामपणे मात्र सांगू शकेल.
भीम पँथरचे संस्थापक दीपक केदार यांनी दूपारी १ वाजता दीक्षाभूमीवर आपल्या भीम सैनिकांसोबत ज्याप्रकारे ‘एंट्री’घेतली, ते एंग्री यंग मॅन अमिताभ बच्चनच्या एखाद्या चित्रपटात साजेसेच दृष्य होते.जुलमी व्यवस्था उखडून फेकण्यासाठी जीवाची बाजी लावणारे दीपक केदार हे त्यामुळेच बाबासाहेबांच्या ‘अभिवादानासाठी’दीक्षाभूमीवर आले होते की आपल्या ‘आंदोलनाची’चमक दाखवण्यासाठी,असा प्रश्न बुद्धिजीवींना पडला.
त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे अगदी योग्य होते.जर तुळजापूरमध्ये नवरात्रीनिमित्त जत्रा भरत असेल,त्या ठिकाणी जर गर्दी होत असेल,मोदींच्या गुजरातमध्ये जर गरबा खेळणा-यांची गर्दी होत असेल,उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे,त्या ठिकाणी जर दोन लसीकरण घेतलेले प्रमाणपत्र न दाखवता शिवसैनिकांना प्रवेश मिळत असेल तर एवढ्या लांबून बाबासाहेबांच्या पवित्र भूमीला अभिवादन करण्यासाठी येणा-या अनुयायांवरच का सरकारच्या जाचक अटी असाव्यात?
मुद्दा जरी बरोबर असला तरीही हेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे ‘ बौद्ध विरोधी ’षडयंत्र असू शकत नाही.सरकारने नियम सर्वच धार्मिक स्थळांसाठी सारखेच लागू केले आहेत,ते पाळणे किवा न पाळणे हे लाेकांच्या व व्यवस्थेच्या सारसार विवेकबुद्धीवर सोडून देण्यात आले आहेत.उद्या करोनाची तिसरी लाट आलीच, त्यात लहान मुले ही दूस-या लाटेत ज्याप्रकारे लोकांचे प्राण गेले,त्यारितीने पटापट मृत्यूमुखी पडू लागली तर या जिवितांच्या हानिला जवाबदार कोण असणार?दीपक केदार?उद्धव ठाकरे? गरबाचे आयोजनकर्ते?की तुळापूरची जत्रा भरवणारे?कोण जवाबदारी घेणार?
आपण कोणाचा जीव धोक्यात घालताेय याची जाणीव जर आम्ही संविधाननिर्मात्याच्याच भूमीत असताना ठेवत नसू तर जगाच्या पाठीवर कुठेही ते राखले जाणार नाही.मरण आलं तरी बेहत्तर,एकाही अनूयायाचे लसीकरण प्रमाणपत्र तपासले जाणार नाही,केदार यांचा हा पवित्रा म्हणजे स्वत:सोबत त्या अजाण बांधवांचाही जीव धोक्यात घालणाराच होता.
अद्यापही नागपूरच्या काही जिल्ह्यातून करोना हद्दपार झाला नाही,अश्या जिल्ह्यातून येणारे अनुयायांचे लसीकरण प्रमाणपत्रांची तपासणी हा काही ‘धम्मावर’आक्रमण ठरत नाही तर ते त्यांच्याच जिवितांच्या हिताचं असणार होतं.
महामानवाचे अभिवादन करतानाच ‘दिपक केदार आगे बढो हम तुम्हारे साथ है’हे नारे काय दर्शवतात?ज्या महामानवाने देशात कायदा व सुव्यवस्था राखणारे संविधान देशाला दिले,त्याच महामानवाच्या पवित्र भूमीत आज संविधानाचीच पायमल्ली झाल्याची नाराजी त्यामुळेच अनेक सुज्ज्ञ आंबेडकर बुद्धिजीवींनी बोलून दाखवली.
दीपक केदार यांचे मुद्दे योग्य होते मात्र पद्धत मात्र फार चुकीची असल्याचे ते सांगतात.ज्याप्रमाणे त्यांनी दीक्षाभूमीच्या मुख्य दरवाज्याच्यावरुन आतमध्ये उड्या घेतल्या.कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण केला,ते बघता पोलिसांनी जर कठोर भूमिका घेतली असती तर तितकाच गंभीर प्रश्न कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झाला असता आणि एवढ्या पवित्र दिनी,एवढ्या पवित्र जागी एवढ्या पवित्र सोहळ्यालाही गालबोट लागले असते.
मात्र पोलिसांनी अतिशय समंजस भूमिका घेतली.डीसीपी नरुल हसन,नवीनचंद्र रेड्डी स्वत: त्या ठिकाणी उपस्थित होते,त्यांनी भीम पँथरच्या सर्व भीम सैनिकांना सरळ आतमध्ये सोडले.हा भीम पँथरच्या भीम सैनिकांना जर स्वत:चा ‘विजय’ वाटत असेल तर बाबासाहेबांच्या भूमीवरील ही फार मोठी ‘शोकांतिका’ठरेल कारण पोलिस आपले कर्तव्य बजावत हाेते,कायदा आम्ही मोडला आहे…..!शिस्त आम्ही मोडली.
पँथरच्या एकाही भीम सैनिकाने तोंडाला मास्क लावला नव्हता.त्या विषाणूला मानवी शरिरात घूसायला फक्त श्वासातला एक कण ही पुरेसा असतो.स्मारक समितीच्या नावाने बोंब मारणा-या या ‘अतिज्ञानी’ पँथरच्या सैनिकांना समितीने घालून दिलेल्या निमयांमागील ‘कारणे’ माहिती नव्हती का?की ती समजून घ्यायची नव्हती?
‘मनुवादी षडयंत्र’हे शब्दछल ऐकायला फार चांगले वाटतात पण?कराेना विषाणूच्या षडयंत्राला बळी पडण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा शासकीयच नव्हे तर खासगी हॉस्पीटल्समधील बेड्स ही माणसाला जिवंत राहण्यासाठी वेळेवर मिळत नाहीत!एकेका श्वासाठी तडफडून तो नश्वर जीव रुग्णालयांच्या बंद दारांसमोरच तडफडून प्राण सोडताना दिसतो.मृत्यूनंतरही तो दहनघाटांच्या बाहेर रांगेतच दिसतो तेव्हा ते नियतीचं कोणतं षडयंत्र असतं?
नका मानू स्मारक समितीला,नका मानू देशाला,निदान संविधानाला तरी मानता का?मग हे कृत्य घडलेच कसे?त्याच संविधानाने पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना तिथे उभे केले होते.ते राज्य सरकारचे पोपटपंची करणारे बुजगावणे नव्हते.
मात्र जेव्हा नवीनचंद्र रेड्डीसारखे जवाबादर पोलिस अधिकारी ‘आजचा दिवस हा पोलिस कारवाई करण्याचा नाही,त्यांची भावना होती विना तपासणी आतमध्ये सर्वांना एकसाथ जाऊ देण्याची,ती भावना समजून घेऊन ,त्यांना जाऊ दिले’ एक पोलिस अधिकारी जेव्हा अशी समंजसपणाची भूमिका वठवतो तेव्हा ते खरे संविधानाच्या रक्षणकर्त्यांच्या भूमिकेचे पाईक ठरतात.त्यांनी पँथरच्या भीम सैनिकांवर अधिकार असतानाही, कायद्याचा बडगा उगारला असता तर तिथूनही समाजमन त्यांच्याच विरोधात ‘पेटून’उठलं असतं,हेच दीपक केदार यांना हवं होतं का?
आज दूर्देवाने काश्मीरमध्ये पुन्हा एकदा देशाचे तीन शूरवीर शिपाही शहीद झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे खरे देशभक्त होते.देशाप्रति त्यांची निष्ठा अतुट होती.धर्म नंतर आधी देश याच निष्ठेवर ते ताहयात जगले.भीम पँथरचा आजचा जोश बघून, सीमेवरील त्या शूरवीर शिपायांच्या शौर्याची आठवण जागृत झाली.ही उर्मी,ही उर्जा देशाच्या कामी खर्ची पडणे हेच त्या महामानवाला खरे अभिवादन ठरेल.

आमचे चॅनल subscribe करा