

(रविवार-विशेष)
कलियुगी महिमा:पत्रकार,गुन्हेगार एकाच रांगेत
२१ साव्या शतकातील पत्रकार आणि मुल्यांचा -हास
नागपूर,ता. २६ सप्टेंबर २०२१: शुक्रवार दि. २४ सप्टेंबर रोजी नागपूरातील पत्रकार वर्तुळात एका बातमीची जोरदार चर्चा होती,ती म्हणजे एका नामांकित वृत्तपत्रातील एका विशिष्ठ बीटच्या पत्रकाराने पोलीसांकडूनच पाच लाखांची खंडणी मागितली! परिणामी हे प्रकरण त्याच्याच चांगलेच अंगलगट आले व पोलिसांनी या वृत्तपत्राच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातच पुराव्यानिशी त्या वृत्तपत्रातील दोन पत्रकारांची तक्रार केल्यानंतर, नागपूर कार्यालयातील या दोन्ही खंडणीखोर पत्रकारांना(खरं तर यांना पत्रकारही म्हणावं का?हा प्रश्न पडतो) दोन महिन्याचा नोटीस कालावधी देऊन त्यांची गच्छंती करा म्हणून आदेश पाठवला…..!
या बातमीमुळे नागपूरातील वृत्तपत्रीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच ढवळून निघाले.गेल्या वर्षी ऐन करोनाच्या काळात अश्याच काही खंडणीखोर,चारित्र्यहीन,स्त्रीलंपट,लिंगपिसाट,हप्तेखोर,नफेखोर,मंत्र्या-संत्र्यांसोबत ‘डील’करणारे संपादक यांची याच कारणामुळे गच्छंती झाली होती.पदावर असताना एवढी ‘माया’त्यांनी कमावली की त्यांचे ‘कारनामे’उघडकीस आल्यावर मालकांचे डोळे पांढरे झाले होते.
मूळात वृत्तपत्रीय माध्यम असो किवा वाहिन्यांचे माध्यम.यात पोलिस,पोलिटीकल व मनपा बिट या तिन्ही बिट्स बक्कळ पैसा,मानमरतोब,प्रतिष्ठा व प्रसिद्धीशी निगडीत बिट्स समजल्या जातात.अर्थात वृत्तपत्रीय इतिहासात अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी हे बिट्स सांभाळले आणि नाव ही कमावले.एकीकडे कंपनीची प्रतिष्ठा ही सांभाळली व दूसरीकडे स्वत:च्या इभ्रतीला धक्का देखील लागू दिला नाही. म्हणूनच आज देखील समाजात त्यांचा सन्मान पत्रकार म्हणून जपला जातो.पूर्वीचा काळ आणि त्या काळातील पत्रकारिता ही सर्वस्वी ‘मुल्याधिष्ठित’होती,आज मात्र २१ सा वं शतक सुरु आहे,आज पत्रकारिता म्हणजे कंपनीसोबत इमान राखण्याचा व कमी पगारात ही समाधान मानून घेण्याचा काळ नाही,ही कलियुगाची महिमाच म्हणावी लागेल,तरी देखील माणसाच्या ‘लोभाला’ एक मर्यादा असणे गरजचेच आहे अन्यथा शुक्रवारी नागपूरच्या वृत्तपत्रीय वर्तुळात जी अवांछीत वावटळ उठली,ती टाळता आली असती.
पोलिसांनाच पाच लाखांची खंडणी मागणे व त्यात अडकणे हा प्रकार वाटतो एवढा साधासोपा नाही.शिवाय संपादकाच्या मर्जीशिवाय कोणताही पत्रकार अशी हिंमत करणार ही नाही,अशी देखील चर्चा चांगलीच चघळ्या गेली.मात्र जगाची रितच आहे ‘जो अडकला तोच चोर,इतर तोपर्यंत सन्याशीच’असतात.
२०१२ मध्ये एका साधारण वृत्तपत्रात साधारण श्रेणीत असणारा हा युवा पत्रकार बघता-बघता या नामांकित वृत्तपत्रात रुजू होतो काय,संपादकाच्या ‘खास’मर्जीतला होतो काय,त्याला अति महत्वाच्या एक नव्हे तर दोन-दोन बिट्सचा कारभार मिळतो काय,हे सर्वच अनाकलनीय आहे.फक्त ९ वर्षाच्या कालावधीत कोट्यावधीचा बंगला त्याचा उपराजधानीत होतो काय,बूडाखाली आलीशान अशी चारचाकी येते काय,हे सर्वच एखाद्या परिकथेत शोभावं अशी कल्पना वाटते मात्र पत्र परिषदांना हा अतिशय साधारण ‘वकूब ‘ असणारा पत्रकार जेव्हा आपल्या आलिशान कारने हजेरी लावत होता तेव्हा अनेकांच्या भूवया तश्याही उंचवायच्याच….!
पत्रकारितेतील पगारातून आलिशान घर,बंगला,चारचाकी ही शानशौकत किती ही जन्म पत्रकारितेत रखडले तरी असे ऐश्वर्य मिळवणे अशक्यप्राय आहे मग या युवा पत्रकाराने ही किमया फक्त १० वर्षात कशी काय साधली?कोणाच्या आर्शिवादाने?हा प्रश्न अनुत्तरीत राहतोच,याचे उत्तर शोधायचे झाल्यास ‘ स्वत:च्या स्वार्थासाठी पत्रकरितेचे मुल्य वेश्येच्या बाजारात नेऊन बसवले..!’असेच आता म्हणावे लागेल.
बाजारातील वेश्या या तरी पावित्र्याचा आव आणून धंदा करीत नाही मात्र पत्रकारितेचा जो आज स्तर झाला आहे तो या वेश्येला ही लाजवणारा ठरतोय.एकीकडे आपल्याच पवित्र पेश्याशी गद्दारी करायची,खंडणी मागायची,भ्रष्टाचारातून अमाप पैसा कमवायचा आणि दूसरीकडे ‘पत्रकार‘ म्हणून यांना समाजात मानमोतरब ही हवा असतो!
ग्राहक हा जसा वेश्येला मान देत नाही फक्त गरज भागवून घेतो तोच भाव स्वत:ला बाजारात विकणा-या अश्या काही भ्रष्ट पत्रकारांचे तोंड पैश्यांनी बंद करणा-या ग्राहकांच्या मनात त्यांच्यासाठी असतो आणि याला कारणीभूत त्यांच्यात झालेली मुल्यांची घसरण आणि अति लोभ हेच असतं.त्यांना झटपट श्रीमंत बनायचं असतं,पण कोणत्या मूल्यावर?‘एक मछली पूरे तालाब को गंदा कर देती है’हीच उक्ती त्यांच्यासारख्यांमुळे इतरांवर चपखल बसवली जाते.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवण्याचा काही एक अधिकार अश्या, स्वत:ला पैश्यांचा बाजारात विकणा-या पत्रकारांना नसतोच मुळी मात्र मोठ्या,नामांकित वृत्तपत्रीय कंपनीचा ‘मिजाज,नशा आणि संरक्षण’हेच त्यांना असे धाडसी अकृत्ये करण्यास प्रोत्साहित करतं.अनेक वेळा त्यांच्या या ‘कारनाम्यात आणि करारनाम्यात’संपादक किवा मालक ही सहभागी असतात,असेही आता सर्रास बोलल्या जात अाहे.
शेवटी हे सर्व गणित ‘पैसा’या कलियुगी देवाच्या भोवतीच फिरणारं असतं,त्यामुळे काही संपादक किवा काही मालक या भ्रष्ट कारभारात पत्रकारांच्यासोबतीने अश्या अकृत्यात लिप्त असतात,एवढंच की ‘सापडला तो चोर’‘हमाम मे मात्र सर्वच नंगे असतात’.
ही ‘कीड’फक्त वृत्तपत्रीय जगातच आहे असे नाही तर काही मराठी वाहिन्यांचे प्रतिनिधी हे देखील ‘सोहळं ‘पाळणारे असतातच असं नाही.त्यांच्याहीकडे पैशांची पाकिटे बरोबर पोहचत असतातच,७०-८० हजार पगार कंपनीचा घेऊन देखील या ‘पाकिटांचा मोह’ त्यांनाही सुटत नाही,यात मग महिला-पुरुष पत्रकार असा भेद केला जात नाही.जिथं ‘मूल्यच’ नाही तिथे लिंगभेद कसा राहणार?एवढंच की वेळप्रसंगी औचित्याचा मुद्दा बघून पैशांचे जाडजूड पाकिटे देणारी हीच मंडळी त्यांच्या मागे मग त्यांचा ‘उद्धार’ज्या शब्दात करतात ते ऐकून त्यांनी पत्रकारिताच नव्हे तर जगच सोडून देणे बेहत्तर ठरावं….!इतकं वाईट बोलल्या जातं….!
एका वाहिन्याच्या प्रतिनिधीने तर एका भूतकाळातील एका ‘उर्जावान’मंत्र्याकडे शब्द टाकून आपल्या पत्नीलाच… खात्यात नोकरी लाऊन घेतली.‘गरज’ही सर्व संशोधनाची जननी असते हेच खरं,प्रपंच भागवायला आपल्या घरातील एखाद्या सदस्याला एखाद्या मंत्र्याकडे शब्द टाकून नोकरी मिळत ही असेल तर यात काहीच वावगं नाही मात्र एक वेळा आपला आत्मसन्मान त्या नेत्याच्या चरणांवर वाहील्यास मग काय घडतं?
अर्थात अलीकडे तो नेताच ठरवतो की त्या वृत्त वाहीन्याच्या प्रतिनिधीने कोणत्या प्रश्नावर त्याची बाईट घ्यावी…!प्रश्न ते तयार करतात आणि बूम याच्या हातात असला तरी ‘बाईट’ ही त्या नेत्याच्या मनमर्जीप्रमाणेच होत असते आणि तीच त्या वाहिनीवर प्रक्षेपीत ही होते……!हा स्तर गाठला आहे २१ साव्या शतकातल्या काही पत्रकारांनी आणि तरी देखील पत्रकार वर्तृळात कंपनीचा मिजाज दाखवून ते ‘मानाची’ अपेक्षा करतात!फक्त ब्रॅण्डेड कंपनी किवा वाहीनीचे त्यांच्याकडे ‘ओळख-पत्र’ आहे याचा फूकाचा अभिमान मिरवण्यात मात्र काहीही अर्थ नसतो.
करोना काळातीलच एक घटना आहे. नागपूर शहरातील असेच काही ‘ब्रॅण्डेड‘वृत्तपत्राचे काही पत्रकार मध्यरात्री मेयो हॉस्पीटल चौकातील एका हॉटेलमध्ये जेवणाचा लुफ्त घेत असताना एका कामगार संघटनेच्या नेत्याला दोन लाखांच्या रोख रकमेसह पोलिसांनी पकडले,त्याने सरळ सांगितले ही रक्कम तो त्या ‘पत्रकारांच्या खातिरदारीसाठी नेत आहे!‘पोलिसांनी त्या ब्रॅण्डेड वृत्तपत्राच्या ब्रॅण्डेड पत्रकारांना याची विचारणा केली,शेवटी नाही म्हटले तरी पत्रकार आणि पोलिस यांचा ‘चोली-दामन’चा साथ असतो,हे प्रकरणच नंतर ‘रफादफा’झाल्याची देखील चर्चा बरेच दिवस पत्रकार वर्तृळात चघळली गेली,हे विशेष!
पत्रकरितेच्या नोकरीतून उपराजधानीत एका फ्लॅटचेच हप्ते जिथं आयुष्यभर फेडता येत नाही तिथे अल्पावधीतच एखादा पत्रकार तीन-तीन फ्लॅट्सचा मालक कसा होत असतो?हा प्रश्न प्रामाणिक पत्रकारांनाही पडतो मात्र ही त्यांच्यावरील ‘श्रीं’ची कृपा समजून हा भाबडा पत्रकार गप्प बसतो,श्रींच्या दर्शनाला समाजातील मोठेमोठी विभूती देखील त्यांच्या घरी येत असते मात्र….ज्या दिवशी मालकाची ‘अवकृपा’ होऊन हे पत्रकार घरी बसतात तेव्हा…हीच समाजातील मोठमोठी विभूती त्यांच्याकडे ढूंकूणसुद्धा पाहत नाही……!कदाचित म्हणूनच पदावर आहोत तोपर्यंत सगळी मूल्ये, स्वार्थ आणि लोभाच्या टांगणीला टांगून दोन्ही हातांनी जेवढे आेरबडता येईल तेवढे ओरबडून घेण्याची जणू स्पर्धाच अलीकडे लागली आहे,असे आता जुने-जाणकारांकडून म्हटले जात आहे.
नुकतेच गुजरातमधील धवल पटेल या पत्रकाराने माजी मुख्यमंत्री रुपाणी हे पदावर असतानाच त्यांची पदावरुन लवकरच गच्छंती होणार असल्याचे वृत्त छापले,ताबडतोब त्या पत्रकाराला पोलिसांकरवी अटक करण्यात आली मात्र त्याने छापलेले भाकीतच खरे ठरले,एका प्रामाणिक पत्रकाराला अशी किंमत चुकवावी लागत असते,नाही तर नागपूरातील खंडणीखोर पत्रकारांना बघा,त्यांचं सगळंच आलबेल असतं.
पत्रकार वरुन ‘पुरुषी अहंकार’सुद्धा-
उपराजधानीत चर्चिल्या जाणा-या या खंडणीखोर युवा पत्रकाराविषयी आणखी एक विषय चांगलाच चघळ्या जात आहे ताे म्हणजे त्याला ‘पुरुष’असण्याचा सार्थ दूराभिमान देखील आहे.संपादकाच्या खास मर्जीतला हा पत्रकार कर्तृत्वाच्या बाबतीत सुमार दर्जाचा तर आहेच मात्र माणूसकीचा लवलेश देखील त्याच्या वर्तनात दिसून पडत नाही.
२०१८ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या बार असोशिएशनतर्फे एक अतिशय स्तुत्य असा ‘न्यायदूत आपल्या दारी’हा उपक्रम गडचिरोलीच्या दूर्गम भागात राबवल्या गेल्या.या उपक्रमाचे उद् घाटन नामांकित न्यायधीशांच्या हस्ते अश्याच एका दूर्गम गावात झाले.या बातमीचे वार्तांकन करण्यासाठी हायकोर्टाच्या परिसरातून पहाटेच वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.एका महिला पत्रकाराला देखील ती असाईंमेंट करण्यासाठी मिळाली.कुटुंबातील कर्तव्यं पार पाडून ती महिला पत्रकार पहाटेच हायकोर्ट परिसरात उपस्थित झाली,पत्रकारांसाठी असणा-या चारचाकी वाहनात जाऊन बसली पण?
विविध वृत्तपत्रातील सर्वच युवा व ‘पुरुष‘पत्रकारांनी युती केली व या महिला पत्रकाराला वाहनातून उतरायला सांगितले!तिला महिला वकीलांच्या गाडीत जाऊन बसण्यास या खंडणीखोर पुरुष पत्रकाराने फर्मान सोडले,यावर त्या महिला पत्रकाराने सरळ नकार देत वाहनातून खाली उतरणार नसल्याचा बाणा दाखवला.यावर त्या सर्वच नामांकित वृत्तपत्रातील ‘पुरुष‘पत्रकारांनी वाहनात चढण्यास नकार दिला….!
अखेर आयोजकांनी मार्ग काढत महिला वकीलांना महिला पत्रकाराच्या वाहनात बसवले व या मुजोर,स्त्री-पुरुष भेद पाळणा-या, बुरसटलेल्या विचारांच्या ‘महान’पत्रकारांना महिला वकीलांचे वाहन रिकामे करुन दिले….!
आपल्यासोबत या शहरातील एकमेव महिला सहकारी प्रवास करीत आहे,तिचा प्रवास सोयीस्कर,सुविधाजनक व्हावा म्हणून सौजन्याची वर्तवणूक न देता उपराजधानीतील सर्वच नामांकित वृत्तपत्रातील त्या ‘पुरुष’पत्रकारांनी युती करुन त्या महिला पत्रकाराच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्याची कृती केली.
एवढंच नव्हे तर अनोळखी गावात ती महिला पत्रकार वार्तांकन करण्यात लीन असताना मान्यवरांची भाषणे संपताच तिला तिथेच सोडून वाहन घेऊन पलायन केले….!बातमी मागील बातमी घेतल्यानंतर महिला पत्रकार पॅंडोलच्या बाहेर येताच…त्या ठिकाणी एक ही वाहन नव्हते….!संपादकांना फोन लावला असता संपादकांनी त्वरित आयोजकांना याबाबत कळवले,आयोजकांनी वाहन परत फिरवत असल्याचे महिलेला सांगून तोपर्यंत गावातल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसून राहण्यास सांगितले…..!
अनोळखी गाव,अनोळखी माणसे,त्यांच्या जळजळीत नजरा आणि आपल्याच शहरातील काही ‘पुरुष पत्रकारांची ही अतिशय नीच कृती यामुळे त्या महिला पत्रकाराचे मन चांगलेच घायाळ झाले…..!
देशाची अर्धी लोकसंख्या ही महीलांची असताना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने त्यांना बरोबरीचा सन्मान आणि संधी बहाल केली असताना उपराजधानीतील त्या काही ‘पुरुष’पत्रकारांची वृत्ती मात्र पत्रकारिता व माणूसकी या दोन्ही मूल्यांना न शोभणारीच ठरली…..!
नीच मनोवृत्तीच्या पुरुष पत्रकारांचे नेतृत्व करणा-या या खंडणीखाेर पत्रकाराऐवजी माणूसकी जपणारे पत्रकार त्या असाईमेंटला सोबत असते तर… त्यांनी नक्कीच आधी त्या महिला सहकारीची योग्य ती काळजी घेतलीच असती एवढंच नव्हे तर स्त्री-पुरुष भेद न करता तिच्या आत्मसन्मालाही धक्का ही लागू दिला नसता…..!माणूसकी नसणा-या त्या डझनभर पुरुष पत्रकारांनी डझनभर बांगड्या हातात घालून वार्तांकन करावे अशीच ईच्छा ती महिला पत्रकार आजही अनेकांजवळ व्यक्त करते.
विद्यापीठ बिटचा तो ‘पुरुष’पत्रकार-
पत्रकार हा कोणत्याही बिटचा असू देत मूळात तो आपल्या स्वत:शी प्रामाणिक नसल्यास तो कंपनीसोबत देखील अप्रामाणिकच राहत असतो.असाच एक अनुभव विद्यापीठ बिट सांभाळणा-या आणखी एका पुरुष पत्रकाराबाबत त्या महिला पत्रकाराला २०१६ साली आला.ती दोघेही महाराष्ट्राच्या ब्रॅण्ड समजल्या जाणा-या वृत्तपत्रात नोकरीवर होती,कंपनीने एका उपक्रमासाठी नागपूरातील महाविद्यालयीन तरुणाईला मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये उपक्रमाच्या उद् घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केले.
नियमानुसार कार्यालयातील वरिष्ठ किवा अनुभवी महिला पत्रकाराला त्यांच्यासोबत पाठवण्याचे फरमान असताना संपादकाच्या खास मर्जीतील त्या दोघी महिला कर्मचा-यांनी मुंबईला जाण्यास व महाविद्यालीयन विद्यार्थिनींची जवाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.त्यांना ३ दिवस माननीय संपादकांपासूनचा ‘विरह‘कदाचित सहन झाला नसता.परिणामी अतिशय कनिष्ठ पदावर काम करणा-या एका महिला पत्रकाराला संपादकांनी मुंबईला जाण्याचे आदेश दिले.
आपल्या कामाप्रति अतिशय प्रामाणिक असणा-या त्या महिला पत्रकाराने होकार दिला.पालकांची बैठक झाली.एका तरुण विद्यार्थिनीच्या वडीलांनी त्या महिला पत्रकाराला त्यांची तरुण मुलगी तुमच्या जवाबदारीवर पाठवित असल्याचा विश्वास व्यक्त केला.त्या महिला पत्रकाराने त्या जन्मदात्या पित्याला त्यांची तरुण मुलगी ही जवाबदारीनेेे परत घेऊन येईल,असे आश्वासित केले.
मात्र रेल्वेच्या संपूर्ण प्रवासात त्या ‘पुरुष‘पत्रकाराने निसरड्या वयातील त्या तरुणीसोबत चांगलीच लगट केली.अनेकदा हटकून देखील ती तरुण विद्यार्थिनी त्या पुरुष पत्रकाराच्या सहवासातून दूर होण्यास तयार झाली नाही.अख्खी रात्र एकाच बर्थवर ते दोघे होते.इतर सर्व विद्यार्थिनी त्या महिला पत्रकारासोबत आपल्या बोगीमध्ये शिस्तीने राहीली.
दूस-या दिवशी मुंबईतील त्या नामांकित हॉटेलमध्ये पार पडणा-या संपूर्ण सोहळ्यात देखील ती तरुणी व तो पुरुष पत्रकार सोबतीनेच राहीली,एकाच प्लेटमध्ये एकमेकांना भरवत जेवण केले.परतीच्या प्रवासाला त्या पुरुष पत्रकाराची नीयत बिघडली.आता येथून जीएसटी स्टेशनवर जाऊन नागपूरची गाडी पकडणे दुरापस्तच असल्याने आज रात्री येथेच मुक्कामी राहू असे तो त्या महिला पत्रकाराला म्हणाला.
असं म्हणतात परमेश्वराने स्त्रियांना पुरुषांच्या मनातील कपट ओळखण्याची वेगळीच शक्ती दिली असते आणि हेच सत्य आहे.त्या महिला पत्रकाराने जोरदार विरोध करुन त्या पुरुष पत्रकाराला सज्जड दम दिला,आताच्या आता सीएसटी स्टेशन गाठा,मला उद्या सकाळी या मुलींना स्टेशनवर येणा-या त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करायचं आहे अन्यथा संपादकांना फोन लावील……!
आपला पुरुषी हेतू साध्य झाला नसल्याने तो पुरुष पत्रकार चांगलाच चरफडला मात्र संपादकांपर्यंत तक्रार जाईल याचे दडपण घेऊन सीएसटी स्टेशनपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था त्याने केली.परतीच्या प्रवासात देखील संपूर्ण प्रवासात तो त्या तरुणीला बिलगूनच बसला होता.एकाच बर्थवर त्यांनी परतीचा देखील प्रवास केला.नागपूर स्टेशनवर त्या तरुणीच्या पित्याने त्या महिला पत्रकाराचे आभार मानताच महिला पत्रकाराने सत्य परिस्थितीशी त्या पित्याला अवगत केले.इतर सर्व विद्यार्थिनी या शिस्तीत व आज्ञेत असताना फक्त तुमच्या मुलीने शिस्तभंगाचे वर्तन केले.या पुढे कृपया तिला कोणत्याही उपक्रमासाठी पाठवू नये,असा काळजीवजा सल्ला ही दिला.
संतापून तिथेच वडीलांनी तिच्या मुस्काटीत मारली.यानंतर १२ वा.ची वृत्तपत्रीय कार्यालयीन वेळ असताना त्या पुरुष पत्रकाराने ११.३० वाजताच संपादकाचे केबिन गाठले…!त्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला,महिला पत्रकारामुळे कंपनीवर फार मोठे बालंट आले असते,मी त्या तरुणीला समजावले म्हणून बरे झाले…..!
म्हणतात ना…सत्य को पहोचने मे बहोत देर लगती है तब तक झूठ सब जगह घूमकर भी आ जाता है….!संपादकांनी त्या महिला पत्रकाराची बाजूच ऐकून न घेता तिच्यावर चांगलीच फायरिंग केली…एवढंच नव्हे तर दूर नगरस्थ मालकांना देखील ताबडतोब कळवण्याचे कर्तव्य ही पार पाडले……!
ती महिला पत्रकार स्तंभित झाली...तिचा एक पत्रकार म्हणून…एक महिला म्हणून..एक आई म्हणून दोष काय?या विचाराने वेडी झाली.तरुण मुलीच्या काळजीने पोखरणा-या वडीलांना जगातील पुरुषी मनोविकृतीपासून सावध करणे…हाच तिचा गुन्हा ठरला..फार मोठा गुन्हा…अखेर त्या महिला पत्रकाराची त्या वृत्तपत्रातून गच्छंती झाली…आपल्या प्रामाणिकपणाचा व तत्वांशी तडतोड न करण्याचा स्वभाव तिला चांगलाच नडला….!
नोकरी गेली मात्र….आपण कुठेही चूकलो नसल्याचे पारलौकिक समाधान घेऊन ती महीला पत्रकार गाढ झोपी ही गेली…!
म्हूणनच अलीकडे उपराजधानीतील गुन्हेगारांच्या श्रेणीत काही खंडणीखोर पत्रकारांनी जी जागा पटकावली आहे,यामुळे तडा जातो,वाचकांच्या विश्वासाला…. स्त्री-पुरुष श्रेष्ठ-कनिष्ठत्वामुळे तडा जातो पत्रकारितेच्या मूल्यांना,पत्रकार हा शेवटी माणूसच असतो,गुण-दोषांनीयुक्त..तो एक्सट्रीम कोणी देवदूत नसतो त्यामुळेच ‘सोनारानेच कान टोचणे योग्य’ म्हणीप्रमाणे पत्रकारांविषयी पत्रकारांनीच सत्य व परखड लिहलेले उत्तम…..!

आमचे चॅनल subscribe करा