Homeनागपूर न्यूजपुन्हा निर्बंध लादल्यास तीव्र विरोध करु:व्यापारी वर्गाचा इशारा

पुन्हा निर्बंध लादल्यास तीव्र विरोध करु:व्यापारी वर्गाचा इशारा

Advertisements


दोन्ही लाटेत केले सहकार्य:आता आर्थिक नुकसान सोसू शकत नाही:व्यापा-यांची व्यथा

नागपूर,ता. ८ सप्टेंबर: नुकतेच पालकमंत्री नितीन राऊत यांनी शहरात करोनाचा प्रकोप वाढत असल्याने व बाधितांचा आकडा दुहेरी झाल्याने येत्या ३-४ दिवसात पुन्हा कठोर निर्बंध लादणार असल्याची घोषणा केली,व्यापारी वर्ग त्यांच्या या निर्णयाचा तीव्र विरोध करतो अशी भूमिका विदर्भातील व्यापारी संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष् अश्‍विन मेहाडिया यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र-परिषदेत विशद केली.

गेल्या दीड वर्षांपासून व्यापा-यांना लॉकडाऊनचा तीव्र फटका सहन करावा लागत आहे.अद्याप त्यातून व्यापारी वर्ग सावरलेला नाही.आधीच व्यापारी वर्गाने मोठे आर्थिक नुकसान सोसले आहे,पुन्हा निर्बंध लादल्यास, होणा-या नुकसानीपासून व्यापारी वर्ग सावरुच शकणार नाही,असे ते म्हणाले.ज्याप्रमाणे विदर्भात शेतकरी विरोधी धोरणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत तश्‍याच आत्महत्या आता सरकारला व्यापारी वर्गाच्याही हव्या आहेत का?असा संतप्त सवाल मेहाडिया यांनी सरकारला केला.

लॉकडाऊनचा फटका नुसता व्यापारी वर्गालाच बसतो असे नाही तर या वर्गावर हजारो कर्मचारी निर्भर असून लाखो कुटुंबियांवर याचा परिणाम झाला आहे. आता कुठे परिस्थिती ही पूर्वपदावर येत आहे.त्यातही जिल्ह्यात बाधितांचा आकडा ही मोठा नाही.त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लादण्याचा सरकारचा नेमका हेतू काय?असा प्रश्‍न त्यांनी केला.

या पूर्वीच्या दोन्ही लॉकडाऊनमध्ये व्यापा-यांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले.त्यामुळे आता प्रशासनानेही व्यापा-यांच्या अडचणी समजून घ्याव्यात,अशी अपेक्ष्ा त्यांनी व्यक्त केली.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे याच काळात पुन्हा एकदा कारण नसताना निर्बंध लादले गेले तर व्यापा-यांच्या अडचणींना सीमा राहणार नाही.

प्रशासनाकडून घेण्यात येणा-या निर्णयाला व्यापारी संघटनांनी आतापर्यंत सहकार्य केले आहे.त्यानंतरही व्यापा-यांचा कुठलाही विचार होत नसेल तर व्यापारी वर्गही वेगळी भूमिका घेण्यास मोकळा राहील,असा इशारा याप्रसंगी मेहाडिया यांनी दिला.

पुढील काही दिवसात निर्बंध लागू केल्यास सर्व व्यापारी संंघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा निर्धारित करु,असे त्यांनी सांगितले.गरज भासल्यास व्यापारी रस्त्यावरही येतील,मात्र सरकारची ही तानाशाही व मुस्कटदाबी आता कदापि सहन करणार नाही,असे ते म्हणाले.

व्यापारी संघटनांशी चर्चा करुन मगच निर्बंध लावण्यात येतील,असे पालकमंत्री यांनी जाहीर केले होते.त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आर.विमला यांनी चर्चेसाठी बाेलावले होते.त्यांनी व्यापा-यांच्या अडचणी फार चांगल्यारितीने समजून घेतल्या.व्यापा-यांच्या अडचणींविषयी पालकमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्‍वासन ही त्यांनी दिले आहे त्यामुळे आम्ही यातून योग्य तो तोडगा निघले याबाबत आशादायी आहोत,असे ते म्हणाले.

पत्र परिषदेला नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Latest बातम्या