
मनपा आयुक्त उद्या करणार आदेश जारी
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम
उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट
नागपूर,ता. २ ऑगस्ट: राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ‘ब्रेक दि चेन ’अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून २२ जिल्ह्यात मात्र निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात देखील निर्बंधात काही प्रमाणात सूट देण्यात आली असून दूकाने आता रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.शनिवारी दूपारी ३ पर्यंत तर रविवारी पूर्णपणे दूकाने बंद असणार आहे.याबाबत उद्या मंगळवार दि.३ ऑगस्ट रोजी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी.आदेश काढणार आहेत.
आज दूपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्र-परिषदेनंतरच निर्बंधाबाबत परिपत्रक निघणार असल्याचे सांगण्यात येत होते.मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. अशा रीतीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे .
आज सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ‘ब्रेक दि चेनचे’ आदेश जारी केले आहेत. ते उद्यापासून लागू होणार असून
काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
ज्या ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध लागू राहतील ते पुढीलप्रमाणे आहेत : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्ण संख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील.
मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरवतील.
उर्वरित जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये खालीलप्रमाणे सूट राहील-
सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील.
सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे , सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत.
सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवणार. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सुचना देत
जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सुचना देण्यात आली आहे.
सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सुट नाही.
राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे बंदच राहतील.
शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल.
सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल.
रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही.
गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल,असे परिपत्रकात नमूद आहे.
नागपूरकरांना निर्बंध नको तर नियम पाळावे-
ब्रेक द चेन अंतर्गत १४ जिल्हे सोडून नागपूर जिल्ह्याला जरी निर्बंधामध्ये शिथिलता मिळाली असली तरी नागपूरकरांची एकंदरित ‘बेफिकिरी’ बघता करोना बाधितांची टक्केवारी ही १० टक्के ओलांडताच पुन्हा नागपूरात निर्बंध लादले जाणार आहेत त्यामुळे अनावश्यक गर्दी,अनावश्यक भटकंती,अनावश्यक खरेदीसाठी घराबाहेर पडणा-या नागरिकांनी स्वत:ला शिस्त लाऊन घेतानाच ज्या व्यापारी वर्गाने निर्बंध शिथिल व्हावे यासाठी दोन दिवस सलग रस्त्यावर उतरुन आंदोलन केले त्यांना देखील जवाबदारीचे भान ठेऊन दूकानात सातत्याने होणा-या ग्राहकांच्या गर्दीवर नियत्रंण ठेवावे लागणार आहे.
आता पर्यंत लॉक डाऊनमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी व येणा-या संभाव्य तिस-या लाटेच्या भीतीमुळे व पुन्हा लॉकडाऊनची शक्यता असल्याने लवकरात लवकर जास्त व्यवसाय करण्याच्या हेतूने अनेक दूकानात गर्दी ओसंडून वाहत असतानाचे चित्र आतापर्यंत उमटले आहे,करोनाचे कोणतेही नियम फक्त ‘खानापूर्ती’करण्यासाठीच पाळताना दिसत होते,हीच स्थिती आणि हीच मानसिकता कायम राहील्यास व करोनाला आता ही गांर्भीयाने न घेतल्यास काय ग्राहक,काय व्यापारी,सामान्यपासून तर श्रीमंतापर्यंत,लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळेच पुन्हा भरडले जाणार आहेत,त्यामुळे निर्बंधामध्ये मिळालेली शिथिलता म्हणजे ‘संधी’नसून ‘जवाबदारी वाढली असल्याचे’निर्देशांक आहे ही ‘सत्ताधीश’ची भूमिका आहे.

आमचे चॅनल subscribe करा