फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअखेर करोनायोद्धा निमजे यांची करोनाशी लढाई अयशस्वी

अखेर करोनायोद्धा निमजे यांची करोनाशी लढाई अयशस्वी

Advertisements

खासगी रुग्णालयातून मेडीकलमध्ये नेण्याचा निर्णय घेताच मृत घोषित!

किंग कोब्रा खेचणार संपूर्ण प्रशासनाला न्यायालयात

नागपूर,ता.२६ मे: करोना महामारीच्या अतिशय खडतर काळात ज्या माणसाने आपलं सर्वस्व पणाला लावलं,घरादारावर तुळशीपत्र ठेऊन विविध दहन घाटांवर शेकडो मृतकांच्या नातेवाईकांना नानाविधप्रकारे मदत केली त्याच महान करोनायोद्धाची ६७ वर्षीय चंदन पांडुरंग निमजे यांची करोनाशी चालत आलेली २० दिवसांची लढाई अखेर अयशस्वी ठरली,आज रामदासपेठमधील रिबाईबल या खासगी रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले,विशेष म्हणजे आज सायंकाळीच निमजे यांच्या कुटुंबियांनी पैश्‍यांमुळे हतबल होऊन निमजे यांना खासगी रुग्णालयातून मेडीकलमध्ये शिफ्ट करीत असल्याचे कळवले होते,यानंतर थोड्याच वेळात डॉ.शेंडे यांच्या या खासगी रुग्णालयातर्फे कुटुंबियांना निमजे यांचे निधन झाल्याचे कळवण्यात आले!

अगदी आज सायंकाळपर्यंत रुग्णालयाकडून उपचारासाठी पैश्‍यांची मागणी कुटुंबियांकडे केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.आतापर्यंत किंग कोब्रा संघटनेतर्फे लाखो रुपयांचा खर्च आपल्या या धाडसी,दिलदार मनाच्या, सच्च्या समाजसेवीचे प्राण वाचावे यासाठी खर्च करण्यात आले मात्र एवढा प्रदीर्घ लढा देऊनही त्यांना एका खासगी रुग्णालयातून जिवंत परत आणने शक्य झाले नसल्याची हतबलता किंग कोब्रा संघटनेचे संस्थापक अरविंदकुमार रतोडी यांनी ‘सत्ताधीश‘कडे व्यक्त केली.

६ मे रोजी त्यांना आपल्या समाजसेवेचे व्रत पूर्ण करताना करोनाचा संसर्ग झाला.यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबियच करोना बाधित झाल्याचे समोर आले.पत्नी,मुलगी,बहीण यांना देखील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.दूर्देवाची बाब म्हणजे निमजे करोनाबाधित झाल्याचे समजताच नागपूर महानगरपालिकेतर्फे त्यांच्या घरावर फलक लावण्यात आला.यामुळे शेजारपाजारची माणसे चांगलीच धास्वातली. सर्वांनी आपापली दारे घट्ट लावून घेतल्यामुळे वेळेवर त्यांना कोणाचीही मदत मिळाली नाही.

६७ वर्षीय करोना योद्धाचा जीव गेल्यास मृतदेह मनपा मुख्यालयात जाळणार!

घरीच ते उपचार घेत असताना त्यांची प्रकृती खालवली. ते करोना बाधित असल्याचे माहिती असतानाही नागपूर महानगरपालिकेतर्फे त्यांच्या उपचारासाठी कोणताही पुढाकार घेण्यात आला नाही.त्यांना ना कोविड सेंटरमध्ये ना कोणत्याही रुग्णालयात जागा मिळाली परिणामी त्यांना खासगी रुग्णालयात भरती करावे लागले ते ही अथक प्रयत्साने एका खासगी रुग्णायात बेड मिळाला!

निमजे यांनी करोना काळातच नव्हे तर गेल्या दशकभरापासूनच ते मध्यरात्रीही कोणाच्याही मदतीसाठी धावत होते.समाजसेवेचे जणू व्रतच त्यांनी स्वीकारले होते.करोनाच्या काळातही शहरातील अनेक दहनघाटांवर स्वत: उपस्थित राहून कोणासाठी डिजेलची व्यवस्था कर कोणाची विद्युत वाहीनीत अंत्यसंस्कारासाठी मदत कर,कोणाच्या तांत्रिक अडचणी सोडवून देत,ते एक कर्मठ सेवाव्रतीच होते.
प्रसार प्रचार माध्यमांनीही त्यांच्या या नि:स्वार्थ कार्याची दखल वेळोवळी घेतली मात्र त्यांची अखेर करोनाविरुद्ध लढतानाच व्हावी,यावर अद्यापही संघटनेतील सदस्यांचा विश्‍वास बसत नाही.

आज सायंकाळी भस्मासूरसारख्या वाढत्या बिलामुळे निमजे यांच्या कुटुंबियांनी त्यांना अखेर मेडीकलमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.रुग्णवाहिका देखील सांगून ठेवली होती.मात्र त्यांना शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ येताच रुग्णालयातूनच त्यांना ते मृत पावले असल्याचा फोन आला!

याचा अर्थ गेले अनेक दिवस तरी ते जिवंत होते का?असा प्रश्‍न कुटुंबियांना पडला आहे.निमजे यांना मेडीकलमध्ये शिफ्ट करण्याची वेळ आणि ते मृत पावले असल्याचे सांगण्याची वेळ या ‘अचूक’ टायमिंग संदर्भात आता त्यांचे कुटुंबिय आणि संघटनेचे सदस्य शंका उपस्थित करीत आहेत.

उद्या गुरुवार दि. २७ मे रोजी सकाळी त्यांचे पार्थिव रुग्णालयातून परस्पर दहन घाटावर घेऊन जाण्यात येईल मात्र त्यावेळी हे खासगी रुग्णालय किती बिल काढतील?त्या बिलाची पावतीसह निमजे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणारे महापौर,मनपा प्रशासन,जिल्हाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे अरविंदकुमार यांनी सांगितले.

यासाठी मला घरदार विकावे लागले तरी चालेल मात्र या महान करोनायोद्धाच्या मृत्यूसाठी जे जे जवाबदार आहेत त्यांना मी न्यायालयात खेचणार असा इशारा त्यांनी दिला.ना महापौर न मनपा प्रशासन ना जिल्हाधिकारी ना त्यांचे कंट्रोल रुम हे मे महिन्याचा पहील्या आठवड्यात निमजे यांच्या मदतीसाठी वेळेवर कामी पडले,असे रतोडी सांगतात.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी फक्त विनंती केल्यानंतर निमजे यांचे घर कर्मचारी पाठवून सेनिटाईज करुन दिले!ते ही सर्व बाधित बरे होऊन घरी परतल्या नंतर!त्या घरात ५ करोनाबाधित असल्याचे समजल्यानंतर तातडीने त्यांचे घर सेनिटाईज करण्याची जवाबदारी कोणाची होती?असा सवाल रतोडी करतात.मनपा रुग्णालयांतून ६९ टक्के बाधित कराेनामुक्त झाल्याची पाठ थोपटणारे महापौर हे मनपा रुग्णालयांतून वेळेवर करोनावरील उपचार व सुविधा न मिळाल्यामुळे शहरात किती बाधितांचा मृत्यू झाला?हा आकडा सांगतिल का?असा सवाल रतोडी करतात.

त्यांच्या घरावर बॅनर नसते लावले तर त्यांना वेळेवर मदत ही मिळू शकली असती मात्र हे घर करोनाबाधिताचे असल्याचे बॅनर लावल्याने निमजे यांनाच मानसिक धक्का बसला होता.एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे या समाजाने या महान समाजव्रतीसोबत व्यवहार केला,असा संताप रतोडी व्यक्त करतात.

ते संघटनेचे अग्रणी सदस्य होते तसेच मला पितृतुल्य असल्याने त्यांच्या मृत्यूसाठी जवाबदार असणारे शासन,प्रशासन,खासगी रुग्णालय या सर्वांना न्यायालयात खेचणार असा इशारा रतोडी यांनी दिला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या