

आमदार विकास ठाकरे यांचा संताप:विभागीय आयुक्तांना लिहले पत्र
घरोघरी सर्व्हे करा,रुग्णांना औषध पुरवठा करा:विकास ठाकरे यांची मागणी
नागपूर,ता. १ मे: एकिकडे न्यायालये करोना संसर्गाने मृत्यूसंख्या वाढल्यामुळे ‘देश देवाच्या हवाली‘केल्याच्या शब्दात प्रशासनाला धारेवर धरत आहेत त्याच धर्तीवर नागपूरात महानगरपालिकेने घरी उपचार करणा-या रुग्णांना देवाच्याच हवाली केल्याचे दृष्य उमटले आहे.आज जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे वाटप होणारे रेमडिसिव्हिर घरात उपचार घेणा-या गंभीर रुग्णांना का उपलब्ध नाहीत?महापालिकेने घरोघरी उपचार घेणा-या गंभीर व गरजू रुग्णांचा सर्व्हे करुन त्यांना घरपोच रेमडिसिव्हिर औषध पोहोचवण्याची जवाबदारी स्वीकारावी अशी मागणी पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांना लिहलेल्या पत्राद्वारे केली .
एकीकडे हजारो गंभीर रुग्णांना शासकीय तसेच खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाही,त्यांना घरीच उपचार घेण्याशिवाय दूसरा मार्ग नाही,अश्या रुग्णांसाठी कुठेही रेमडिसिव्हिर उपलब्धच नाही.रुग्णांच्या जिवनासाठी अत्यावश्यक असणारे रेमडिसिव्हिर हे फक्त जिल्हाधिकारी कार्यालयातर्फेच रुग्णालयांना मिळतात.अाधी रेमडिसिव्हिर हे फाॅर्मेसी व दूकानांमध्ये ही उपलब्ध होत होते.कोणी सिलेंडर घेऊन गेले तर त्यांना रिफिल करुन मिळायचे.आता मनपाच्या आदेशाने हे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले.जे रुग्णालय जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णांच्या संख्येच्या व गरजेच्या अनुषंगाने डिमांड नोंदवतात त्यांना रेमडिसिव्हिर मिळून जाते.पण ज्या रुग्णांना रुग्णालयात खाटच मिळत नाही असे हजारो गंभीर करोना बाधित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत,याकडे महानगरपालिकेचे सर्रास दूर्लक्ष् आहे,असा आरोप त्यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालय हे रुग्णालयांकडून येणा-या मागणीप्रमाणे जरी रेमडिसिव्हिर उपलब्ध करुन देत असतील तरी ज्या रुग्णांनी घरीच रुग्णालय बनवले व खासगी डॉक्टरकडून घरीच उपचार घेत आहेत त्यांनी त्यांच्या डॉक्टरच्या मागणीप्रमाणे रेमडिसिव्हिर कुठून आणायचं?बाहेर खुल्या बाजारात आता ते कुठेही उपलब्ध नाहीत तर दूसरीकडे रुग्णालयांशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अश्या रुग्णांना डॉक्टरच्या चिठ्ठीनुसार मागणी करण्याचा ही हक्क नाही,अश्या रुग्णांनी आता तडफडून घरीच प्राण त्यागावा का?असा सवाल विकास ठाकरे यांनी उपस्थित केला.
घरीच उपचार घेणा-या रुग्णांची काळजी घेणे ही सर्वस्वी महानगरपालिकेची जवाबदारी आहे.मनपाने आपल्या प्रत्येक झोनमध्ये असे किती रुग्ण घरीच उपचार घेत आहेत,त्यापैकी किती रुग्ण हे गंभीर आहेत,किती रुग्णांना रेमडिसिव्हिर व ऑक्सीजनची आवश्यकता आहे याचा सर्व्हे करावा,ज्यांचा सीटी स्कॅनचा स्कोर १५ च्या वर आलेला आहे,ज्यांची प्राणवायूची पातळी ९५ पेक्षा घटली आहे अश्या लोकांना तातडीने ऑक्सीजन,रेमडिसिव्हिर आणि औषधे पोहोचवण्याची जवाबदारी महानगरपालिकेची नाही का?असा संतप्त सवाल त्यांनी केला.
आमदार म्हणून मला हजारो रुग्णांचे दररोज फोन येतात मात्र अश्या रुग्णांना रेमडिसिव्हिर उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्थे व नियमांसमाेर आम्ही हतबल होतो.मात्र अश्या रुग्णांना घरच्या घरी मृत्यूच्या दारात गेलेले ही बघू शकत नाही त्यामुळे मनपाने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रत्येक झोनमध्ये अश्या गंभीर बाधित रुग्णांचा सर्व्हे करावा,त्यांना तातडीने औषधे व ऑक्सीजन उपलब्ध करुन देण्याची सूचना तातडीने महानगरपालिकेला द्यावी अशी मागणी विभागीय आयुक्तांना आपल्या पत्रात आ.विकास ठाकरे यांनी केली.




आमचे चॅनल subscribe करा
