

नागपूरकरांचा सोशल मिडीयावर सल्ला
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १५ एप्रिल : नागपूर महानगरपालिकेच्या जनसंपर्क कार्यालयातून महापौर दयाशंकर तिवारी संबंधी एक बातमी येऊन धडकली.महापौरांच्या विनंतीमुळे देशात ३ लाख रेमडिसीवीर उपलब्ध.ही बातमी व्हायरल होताच महापौरांवर अभिनंदनाचा वर्षाव करीत नेटिझन्सनी महापौरांना सोशल मिडीयावर चांगलेच फैलावर घेतले.
केंद्र शासनाने रेमडिसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कोरोनाच्या महासंकटात देशातील रुग्णांसाठी तीन लाख इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी निर्यातबंदीनंतरचा माल भारतीय बाजारात विकण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्राकडे केली होती.केंद्र सरकारने रेमडिसीवीरच्या निर्यातीवर बंदी घातली. मात्र या उत्पादकांना केवळ निर्यातीची अनुमती होती. उत्पादित माल भारतीय बाजारात विकण्याची परवानगी नव्हती.यामुळे निर्यात बंदी नंतर इंजेक्शन उत्पादक कंपनीकडे मोठ्या संख्येत इंजेक्शन असेल आणि त्याला परवानगी मिळाली तर त्याचा उपयोग कोरोना रुग्णांसाठी होऊ शकेल, हे लक्षात घेऊन आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली तसेच केंद्र सरकारलाही पत्र लिहून इंजेक्शनला देशात विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या महापौरांनी गेल्या वर्षी ऐन करोनाच्या काळात २० जून २०२० च्या सभेत जी सुरेश भट सभागृहात पार पडली होती,तब्बल ५ दिवस नागपूरकरांना,समस्त मनपा प्रशासनाला व तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना वेठीस धरले होते,एकाच विषयावर तो म्हणजे गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाचे सर्वेसर्वा व बहूचर्चित नाव डॉ.प्रवीण गंटावार व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शीलू गंटावार यांचा विषय!
हे दोेघेही डॉक्टर पती-पत्नी किती भ्रष्ट आहेत,कामचूकार आहेत,मस्टरवर सही करुन दिवसभर स्वत:चे धंतोली येथील खासगी ‘कोलंबिया’रुग्णालययात सेवारत राहतात,जनतेच्या कष्टाच्या कराच्या पैश्यांमधून अश्या जोडप्याला लाखो रुपयांचा पगार दिला जातो,डॉ.शीलू गंटावार या तर सतत गैरहजर असतात मात्र मस्टरवर त्या उपस्थित असल्याची स्वाक्ष् री एकसाथ कशी करतात,डॉ.शीलू गंटावार या कश्यारितीने मध्यप्रदेशमधील आपल्या काँग्रेस पक्ष्ाच्या कार्यालयात बैठकी घेतात,मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या प्रचार सभांना कश्या उपस्थित राहतात,नागपूरातील गरीब,गरजूंसाठी असणारे इंदिरा गांधी रुग्णालय त्या कश्याप्रकारे वा-यावर सोडून निघून जातात,वगैरे-वगैरे चांगलेच ‘कवित्व’ आपल्या भारदस्त आवाजात त्यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी २० ते २६ जून २०२० दरम्यान चाललेल्या सभेत घसा कोरडज्ञ होईपर्यंत सादर केले.
तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी तात्काळ निर्देश देत डॉ.शीलू गंटावार यांची हजेरी पुस्तिका ताब्यात घेण्याची सूचना करीत डॉ.प्रवीण गंटावार यांच्या तात्काळ निलंबनाचे आदेश पारित ही केले होते मात्र…..!

आज तेच दयाशंकर तिवारी हे मनपाच्या महापौर पदी विराजमान असताना व ज्या डॉ.शीलू गंटावारांच्या विरोधात ज्यांनी तब्बल ५ दिवस एेन करोनाच्या काळात संपूर्ण शहर,नागरिक,मनपा प्रशासन व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना वेठीस धरले होते त्याच डॉ.शीलू गंटावार यांना पुन्हा एकदा ऐन करोनाच्या काळातच त्याच इंदिरा गांधी रुग्णालयात ‘बढती’देऊन रुग्णालयाच्या सर्वेसर्वाचा पदभार दिला!ज्या डॉ.शीलू गंटावार या इंदिरा गांधी रुग्णालयात फक्त साध्या वैद्यकीय अधिकारी पदावर होत्या मात्र तरीही याच महापौरांनी त्यांच्या सततच्या गैरहजेरीच्या कारणावरुन तब्बल ५ दिवस सभेत गंटावार दाम्पत्याविरुद्ध ‘क्रांतिकारी’भाषण केले त्यांच्याच कार्यकाळात त्या डॉक्टर शीलू गंटावार यांना एवढी मोठी जवाबदारी सोपविली जातेय,तसे पत्र निगर्मित केले जाते,नागपूरकरांच्या आरोग्यासाठी त्यांच्यावरच पराकोटीचा भरवसा केला जातोय यासाठी अनेक नागपूरकरांनी महापौरांचे अभिनंदन केले आहे!
एवढंच नव्हे तर रेमडिसिवीर हे नागपूरकरांच्या जीवन मरणाचा यक्ष् प्रश्न बनला असताना धंतोली येथील सर्वात मोठ्या एका रेमडिसिवीरच्या स्टॉकीस्ट कडून तसेच नागरिकांच्या हक्काच्या मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून कश्याप्रकारे डॉ.गंटावार यांच्या धंतोली येथील ‘कोलंबिया’रुग्णायलात रेमडिसिवीर पोहोचवल्या जातात हे सर्वविदीत असताना आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या अधिकृत यादीत देखील कोलंबिया रुग्णालयाचे नाव आता रेमडिसिवीरच्या पुरवठ्यासाठी अधिकृतरित्या समाविष्ट करण्यात आले,यासाठी देखील नागपूरकरांनी महापौरांचेच अभिनंदन केले.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच इंदिरा गांधी रुग्णायलातील आणखी एक वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगला पूरी ज्यांचे स्वत:चे दोन मजली प्रशस्त खासगी रुग्णालय आहे,ज्यांनी गेल्या वर्षी देखील ७० टक्के काम घरी राहूनच ’वर्क फ्रॉम होम’करुन मनपाचा संपूर्ण पगार उचलला व ‘घरुनच’शहरातील करोनाग्रस्तांची सेवा केली,त्यांनाच आता पाचपावली कोविड सेंटरचा इंजार्च करण्याची ‘कामगिरी’ महापौरांच्या काळात घडली,आता नागपूरातील गरीब,गरजू करोनाग्रस्त रुग्णांना मृत्यूच्या दाढेत न जाता,अश्या या डॉ.शीलू गंटावार,डॉ.मंगला पूरी यासारख्या अतिशय ‘कर्तबगार’वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन दिल्याबाबत सोशल मिडीयावर महापौरांचे अभिनंदन करण्यात आले.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे याच महापौरांना इंदिरा गांधी रुग्णालयातील कोविड केअर सेंटरचा कार्यभार सांभाळण्यासाठी मेडिसीन विभागातील जवाबदार अधिकारी न सापडल्यामुळे जनरल सर्जन असणारे डॉ.हरदास यांच्यावर गेल्या वर्षीपासूनच या सेंटरची संपूर्ण धुरा टाकण्यात आली,अर्थात कोविड-१९ च्या संसर्गामध्ये कोणत्या शस्त्रक्रियेची गरज पडते?असा प्रश्न आता नागपूरकरांना पडला आहे.महापौरांना इंटेसिव्ह किवा क्रिटिकल केअर विभागातील एक ही तज्ज्ञ,शहरातील गरीब,गरजू नागरिकांच्या उपचारासाठी मिळू नये?यासाठी महापौरांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
महापौरांच्या विनंतीमुळे देशात ३ लाख रेमडिसीवीर उपलब्ध झाले त्या धर्तीवर आता महापौरांनी फेसबूक लाईव्हद्वारे आता नागपूरकर जनतेच्या करोना संबधित सूचना ऑन लाईन मागवाव्या,जेणेकरुन त्यांना केंद्राकडे आणखी पत्रे पाठवता येईल,एवढंच नव्हे तर आता महापौरांनी नागपूरातून सरळ लोकसभेचीच निवडणूक लढवावी आणि पंतप्रधान पदावर दावा करावा,अश्या सूचना देखील महापौरांना करण्यात आल्या आहेत.
जे महापौर हे मुंढे गेल्या नंतर व राधाकृष्णन बी.हे आयुक्त पदी रुजू झाल्यानंतर सातत्याने प्रशासनासोबत ‘समन्वयाची’भूमिका आपल्या लाघवी शब्दात मांडत असतात,त्यांनी प्रशासनाने केलेल्या या नियुकत्यासंबधी अभिनंदनाचे पत्र ही केंद्राला पाठवावे,असे मत नेटिझन्स व्यक्त करीत आहेत.
करोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाचा धसका घेऊन ज्या मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी मनपा मुख्यालयाचे मुख्यद्वारच सामान्य जनतेसाठी सर्वात आधी बंद करुन ठेवले आहे,मुंढे यांच्या बदलीमुळे आता या शहराचे काय होईल?अश्या भीतीत जगणा-या नागपूरकरांना दिलासा देत ज्या राधाकृष्णन बी.यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रुजू होताच ‘धडाडीचे’निर्णय घेत दोन अधिकारी कोरोनाचे डेथ ऑडिट तर उर्वरित चार अधिकारी हे झोनमध्ये कॉन्टॅक ट्रेसिंग करणार असल्याचा सूतोवाच केला होता,एवढंच नव्हे तर ३ हजार बेड,६५ रुग्णवाहिका,तज्ज्ञ मनुष्यबळ,५० चाचणी केंद्रे इत्यादीची राणा भीमदेवी थाटात घोषणा केली होती,खासगी रुग्णालयात ३ हजार ऑक्सीजन बेड तर ८०० आयसीयू बेड नागरिकांना उपलब्ध होतील अशी घोषणा करीत कॉल सेंटरचा ०७१२-२५६७०२१ हा संपर्क क्रमांक उपलब्ध करुन दिला होता,याशिवाय डॅशबोर्ड तयार करुन जनतेला त्यांच्या मोबाईलवरच कुठल्या रुग्णालयात किती बेड रिकामे आहेत याची माहिती मिळणार होती,अश्या उपाययोजना योजून करोना चाचणीचा अहवाल २४ तासात(जो आजही ७२ तासात उपलब्ध होत आहे)उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली होती,ज्या आयुक्तांच्या संपूर्ण घोषणा या आजही त्यांना पदावर रुजू होऊन ९ महिन्यांचा काळ उलटत आला असला तरी कागदावरच राहील्या व आज नागपूर शहरातील सर्वच वर्गातील रुग्ण हे अक्ष रश: आपापल्या घरी व रुग्णवाहीकेत उपचाराअभावी दम तोडत असताना,अश्या आयुक्तांसोबत ‘समन्वयाने’कारभार करणारे महापौर दयाशंकर तिवारी यांचे यासाठी देखील नागपूरकरांनी समाज माध्यमांवर खास अभिनंदन केले आहे,हे विशेष!




आमचे चॅनल subscribe करा
