
खासगी रुग्णालयांविरुद्ध नातेवाईकांचा जागोजागी संताप
तोडफोड…संताप आणि अश्लील शिवीगाळ
नागपूर,ता. १४ एप्रिल: शहरात दररोज करोना संसर्गितांचा मृत्यू नातेवाईकांसाठी मानसिक धक्का देणारा ठरत असून अथक प्रयत्न करुनही आपलं माणूस गमावल्याच्या दू:खात शहरातील अनेक खासगी रुग्णलयांच्या विरोधात नातेवाईकांचा तीव्र संताप व्यक्त होत आहे.अनेक रुग्णालयात तोडफोड,शिवीगाळचे व्हिडीयो समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.यात रुग्णालयांप्रति पराकोटीचा संताप,दू:ख,चीड आणि तेवढाच अविश्वास व्यक्त होत आहे.
सध्या नागपूरच नव्हे तर आजूबाजूच्या शहरांमध्ये देखील खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णांना बेड मिळत नाही,आपल्या माण्साला घेऊन कितीतरी किलोमीटरची होरपळ अगदी प्रत्येकाच्याच वाट्याला येत आहे.अश्या वेळी खासगी असो किवा सरकारी रुग्णालयांचा व्यवहार हा भयंकर ‘अमानवीय’झाल्याचे दृष्य उमटले आहे.
नुसते बेडच नाही तर रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा प्रचंड काळाबाजार झाल्यामुळे एकेका इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाईकाची कित्येक किलोमीटर शहरभर इथून तिथे भटंकती याचेही विदानक चित्र सर्वदूर दिसत आहे.एवढा जिवाच्या आकांताने आपल्या माणसाला मरणाच्या दारातून परत अाणण्यासाठी प्रचंड आटापिटा करुन देखील आपला माणूस करोनामुळे असा हकनाक जेव्हा दगावतो किंबहूना नातेवाईकांना रुग्णालयातर्फे तसे सांगितले जाते तेव्हा मात्र त्या आप्तस्वकीयाची प्रचंड फसवणूक झाल्याची भावना बळावते आणि संपूर्ण रोष हा खासगी रुग्णालयांवर,तेथील डॉक्टर्सवर निघताना दिसतोय.
रुग्णाकडून अनामत रक्कम न मागता त्यांच्यी प्रकृती स्थिर होईपर्यंत उपचार करणे बंधनकारक आहे तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल रुग्णाला मोफत किंवा सवलतीच्या दरात चांगली वैद्यकीय सेवा देणेही आवश्यक असल्याचे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट एक्ट १९५० मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.मात्र हा कायदा गेल्या ७० वर्षांपासून फक्त कागदावरच दिसून पडतोय.अगदी कराेनासारख्या आणिबाणिच्या काळात ही रुग्ण हक्क हे सर्रास तुडवले जात आहे. एका डॉक्टरने तर एका रेमडिसिव्हिरसाठी २५ हजार रुपयांची मागणी केल्याविरोधात नुकतीच पोलिसात तक्रार ही दाखल झाली.
शहरातील अनेक खासगी रुग्णालये उपचारासाठी कॅशलेस विमा स्वीकारण्यास तयार नाहीत.त्यामुळे रुग्णांना उपचारापूर्वीच लाखो रुपये रुग्णालयांत भरावे लागत असल्याचे वास्तव आहे.खासगी रुग्णालयांची मानवी संवेदशनशीलता हरवली का?असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडत आहे.
कालच एलेक्सिस रुग्णालयात नातेवाईकाच्या मृतदेहासाठी रुग्णालयात तोडफोड करण्यात आली तर कोविड रुग्ण नसलेल्या युवकाच्या छातीत दूखत असल्याने त्याला मेडीकलमध्ये दाखल केले असता अश्या नॉन कोविड रुग्णाला ठेवायचेच कुठे असा प्रश्न रुग्णालयात पडला यातच त्याच मृत्यू झाला.वेळेवर उपचार न मिळाल्यामुळेच युवकाचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवित नातेवाईक हे संतप्त झाले.
१२ एप्रिल रोजी छावणीच्या व्हिनस रुग्णालयात संतप्त नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ करुन तोडफोड केली.रविवारी दूपारी ४ वाजता ही घटना घडली.समुद्रे नावाच्या महिलेला करोनाचा संसर्ग झाल्यामुळे ६ एप्रिल रोजी या रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते मात्र रविवारी दूपारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.डॉक्टरांच्या हलगर्जीपणमुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला.
यापूर्वी पाचपावलीतील होप रुग्णालयामध्येही ३ एप्रिल रोजी एका महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी अशाच प्रकारे तोडफोड केली.संतप्त नातेवाईकांनी दोन डॉक्टरांना मारहाण करुन काऊंटरला आग लावली.
वाडीतील वेलट्रीट रुग्णालयातील अग्निकांडात चार जीव होरपळून मृत्यू पावले.प्रशासनाच्या डोळ्यात धुळ टाकीत नियमबाह्यरित्या या अनाधिकृत रुग्णालयात कोविडवर उपचार केल्या जात होते.पैसा कमविण्याचा अट्टहास या खासगी रुग्णालयाला चांगलाच नडला.
एवढंच नव्हे ‘देव तारी त्याला रुग्णालय मारी’या उक्तीप्रमाणे काशीनगर येथील रहीवासी आशाबाई चंद्रभान मून या ६३ वर्षीय महिलेला ती जिवंत असताना वर्धा मार्गावरील जामठा येथील आय.जी.पी.ए हॉस्पीटल व रिसर्च सेंटरने चक्क मृत घोषित करीत नातेवाईकांना मृतदेह घेऊन जाण्यास कळवले!जिवंत रुग्णास मृत दाखविण्याचा प्रकाराने चांगलेच दू:खावलेल्या नातेवाईकांनी हिंगणा पोलीस ठाण्यात रुग्णालयाच्या बेपवाईविरोधात तक्रार ही नोंदवली.
सध्या फक्त नागपूर शहर किवा नागपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मध्यप्रदेश,छत्तीसगढ येथून देखील करोनाबाधित रुग्णांचा भार मेडीकल,मेयो या शासकीय रुग्णालयांवर येऊन पडलेला आहे.त्यामुळे स्थानिक रुग्णांनाच बेड मिळत नसल्याचे विदारक दृष्य या रुग्णालयांमध्ये उमटले असून या दोन्ही रुग्णालयाच्या परिसरातच गंभीर करोनाबाधित रुग्ण हे पटापट मृत्यूच्या दाढेत जाताना बघताना नातेवाईकांच्या नशीबी आले आहे मात्र शेजारची राज्ये ही त्यांच्या करोनाबाधितांसाठी काय उपाययोजना करतेय हे नागपूरात दररोज शेकडोच्या संख्येत येणा-या रुग्णांच्या संख्येवरुन सहज लक्ष्ात येतं.
मेयोसारख्या शासकीय रुग्णालयात एकेका रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील काही अटेंडट हे १५०० रुपये उकळत असल्याचे धक्कादायय वास्तव समारे आले आहे.या बदल्यात त्यांच्या रुग्णाला तातडीने ऑक्सीजन लावण्यात येतं,चांगला बेड देण्यात येतो अश्या सबबी सांगितल्या जात आहे!सर्वात महत्वाचे म्हणजे एका रुग्णाकडून १५०० रुपये म्हणजे दिवसभरात शेकडो रुग्ण रुग्णालयात येतात,ज्यांना मेयोचे अधिष्ठाता परवागनी देतात भर्ती करण्यास, अश्या किती रुग्णांकडून किती हजारांची हे मधले अटेंडेट दलाली उकळत असावेत? रुग्णायातील घसघशीत वेतन,भत्ते याशिवाय करोना योद्धा म्हणून शासनदरबारी मिळणारा सन्मान हे सर्व माणूसकीच्या शवपेटीत गुंडाळून सध्या करोना महामारीच्या काळात मृताच्या टाळूवरील लोणी ओरबडण्याचे काम खासगी व शासकीय रुग्णालये करीत असल्याचे दिसून पडत आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे नुकतेच न्यायालयाने खासगी रुग्णालयांना संरक्ष् ण प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत याशिवाय माध्यमांना देखील करोना संदर्भात संयमित बातम्या देण्याच्या सूचना केल्या आहेत मात्र सध्या करोनाच्या भयाण,भेसूर आणि भितीदायक वातावरणात जे काही माध्यमांच्या नजरेस पडतंय तेच जनते पुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रसार व प्रचार माध्यमे करीत असल्याचे वास्तव आहे.
बुटीबोरी येथील माया हॉस्पीटलने कश्याप्रकारे महामारीच्या काळात एका शेतक-याकडून पैसा उकळण्याची संधी शोधली आणि त्याचा संताप अनावर झाला हा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला असून खासगी रुग्णालयांची ही लृट दृष्टिआड करता येत नाही.शेतकरी कुटुंबातील एका करोनाबाधित महिलेला उपचाराच्या नावावर आवाजवी औषधे देऊन लृट करण्यात आली.या विषयीचा जाब महिला रुग्णाच्या मुलाने विचारल्यानंतर डॉक्टरांकडूनच त्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला!त्यामुळे रुग्णालयाप्रति संतापाचे वातावरण निर्माण झाले.
४ एप्रिल रोजी निर्मला बेहरखेडे वय वर्षे ६० रा.भानसुली(लोधी) ही शेतकरी महिला करोनाच्या संसर्गामुळे या रुग्णालयात भर्ती झाली.त्यांच्या मुलाने मनोज मधुकर बेहरखेडे याने डॉक्टरांनी उपचाराकरीता लागलेली सर्व औषधी तेथील औषधालयातून रोख रकमेने घेतली.यानंतर निर्मलाबाई या ब-या झाल्याचे सांगत चक्क १२ एिप्रलच्या मध्यरात्री त्यांना सुटी देण्यात आली!उपचाराची संपूर्ण रक्कम मुलाकडून आधी मोजून घेतली.तो आईला घेण्यास रुग्णालयाच्या खोलीत गेला असता त्याने खरेदी केलेली खूप सारी औषधे तेथील परिचारिकेने बेडखाली लपवून ठेवल्याचे आईने सांगितले.बेडखालील डबा उघडल्यावर मुलाला धक्काच बसला!यानंतर त्याने रुग्णालयाल चांगलेच धारेवर धरले.
यावर प्रतिक्रिया देताना रुग्णासाठी मागविण्यात आलेली औषधी वापरण्यात न अाल्याने त्याची रक्कम आम्ही बिलात कपात करुन देणार होतो मात्र मनोज यांनी आधी कर्मचा-यांना विनाकारण शिवीगाळ केल्याचा खुलासा माया रुग्णालयाकडून करण्यात आला.आता प्रत्यक्ष् देव जरी धरणीवर अवतरला तरी माया रुग्णालयाच्या या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवेल का?हा गहन प्रश्न आहे.
या रुग्णालयाकडून मनोज यांना मारहाण झाली नसून फक्त त्यांना रुग्णालयातून बाहेर काढले असेही स्पष्टीकरण रुग्णालयाने दिले असले तरी रुग्णालयाचे नावच ‘माया’असल्यामुळे कोण त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे,हा भाग अलहदा!
यामुळे मायबाप सरकारने आता १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे अश्यावेळी घरात उपाशी मरणे बरे मात्र बाहेर पडून घरदार,दागदागिणे आणि स्वत:ची इभ्रत विकणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही.शासकीय रुग्णालयाच्या दारातच बेड न मिळाल्यामुळे पटापट होणारे असहाय मृत्यू,दिवसभर रसत्यावर सायरनच्या आवाज करीत फिरणा-या रुग्णवाहिकांचा भेसूर आवाज,श्मशान घाटांवर मृतदेहांचा पडलेला खच,नातेवाईकांची अगतिकता,अश्रू,भावनांचा कोंडमारा आणि रुग्णालयांची असंवेदशनशीलता हे सर्व जर टाळायचे असेल तर ‘सत्ताधीश’चे एकच आवाहन आहे,घराबाहेर पडू नका,संसर्गाची साखळी तोडण्यास सरकारला मदत करा आणि लसीकरण करवून घ्या.




आमचे चॅनल subscribe करा
