

३६३० नवे बाधित : २९२८ संसर्गितांची करोनावर मात
नागपूर,१ एप्रिल : शहर व ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती आता हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. दररोज बाधितांसोबतच आता मृतकांच्या संख्येतही वाढ होत असून, अनेकजण रुग्णालयात बेड अभावीदेखील दगावित असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत परिस्थिती बघता शासन व प्रशासनाकडून करण्यात येत असलेले सर्वतोपरी प्रयत्नांना कुठेतरी अद्यापही यश प्राप्त होताना दिसून येत नाही. त्यामुळेच हा संसर्ग दिवसेनदिवस आणखीनच वाढत असल्याचे वास्तव आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यात कोरोनाचा विषाणू वारंवार म्यूटेट (स्वरुप बदल) होत आहे. त्यामुळे त्याचा पॉझिटिव्हीटी दर अधिक आहे. सुरुवातीच्या काळात त्याचे लक्षणे दिसून येत नाही, मात्र हळूहळू लक्षणे जाणवत असून, याचे गंभीर स्वरुपातही रुपांतर होऊन मृत्यूंची संख्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणने आहे.
त्यामुळेच अनेक गृह विलगीकरणातील रुग्णांना काही दिवसानंतर तीव्र अशी लक्षणे जाणवतात व त्यावेळी ते रुग्णालयाकडे धाव घेतात परिणामी वेळीच योग्य उपचार होत नसल्याने बळींचा आकडा वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणने आहे.
यामुळेच कोरोना असल्याचे निष्पन्न होताच, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरु करण्याचे आवाहन वारंवार डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेली बळींची संख्या ही अनेक ठिकाणी उपचार घेण्यास रुग्णांकडून विलंब झाल्याच्या कारणामुळे होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मार्च पाठोपाठ जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्याच दिवशीही बळींच्या संख्येने आजवरचा दुस-या उच्चांकी मृत्यूसंख्येची नोंद केली आहे. यापूर्वी जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२० रोजी आजवरच्या उच्चांकी ६४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर ९ सप्टेंबर रोजी ५९ व आज गुरुवार (ता.१) रोजी ६० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यामध्ये शहरात ३५, ग्रामीणचे २१ व जिल्ह्याबाहेरील ४ लोकांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ५१५८ वर जाऊन पोहचली आहे. आज दिवसभरात आजवरच्या सर्वाधिक १७ हजार ८७८ इतक्या चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी २०.३१ टक्के म्हणजेच ३६३० जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आलेत. यात शहरातील २४८१, ग्रामीणचे ११४५ व जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे.
यासोबतच एकूण कोरोनाबाधितांची संख्या २.२९ लाख ६६८ वर पोहचली आहे. तर दिवसभरात २९२८ जण ठणठणीत होऊन घरीही परतले असून, जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या १.८४ लाख ५३७ वर पोहचली आहे. तर कालच्या तुलनेत आज गुरुवारला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण किंचीत म्हणजेच ०.०१ टक्क्यांनी वाढले आहे.
७७.८४ टक्के रुग्ण गृहविलगीकरणात-
लक्षणे नसलेल्यांना आता गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. परंतु हेच गृह विलगीकरण कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव पसरविण्यासाठी मारक ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणने आहे. याचे कारण म्हणजे, गृह विलगीकरणासाठी आवश्यक असलेल्या अनेक उपाययोजना बहुतांशी कुटुंबियांकडे नसतात, व यातुनच हा संसर्ग पसरत असल्याचे बोलल्या जात आहे.
७७ टक्के रुग्ण गृहविलगीकरणात-
आजच्या तारखेत जिल्ह्यात ३९ हजार ९७३ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ७७.८४ टक्के म्हणजेच ३१ हजार ११४ जणांना कुठलेही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले ८ हजार ८५९ जण मेयो, मेडिकलसह इतर शासकीय, खासगी रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
