Homeनागपूर न्यूजनागपूर महाराष्ट्रात नाही!भूजल विभागाचे पर्यावरण संघटनेला पत्र

नागपूर महाराष्ट्रात नाही!भूजल विभागाचे पर्यावरण संघटनेला पत्र

फूटालातील लेझर शो नागपूरकरांना नडणार

नागपूर,ता. ३० मार्च: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा महामेट्रो,नागनदी,अजनी रेल्वे स्थानक यानंतरचा आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे फूटाला तलावातील लेझर शो प्रकल्प.मात्र या प्रकल्पासाठी सध्या तलावाच्या बंधा-यावर खोदकाम आणि बांधकाम सुरु अाहे.याचा परिणाम तलावातील पाण्यावर होत असून एका महिन्यातच जवळपास तीन फूट पाणी कमी झाले,बांधकामामुळेच ते कुठेतरी वाहून जात असल्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमींनी राज्य सरकारच्या भू-जल व पाणी पुरवठा विभागाला याबाबत मेल पाठवला,त्यावर हे क्ष्ेत्र त्यांच्या अखत्यारीत येत नसून नागपूर महानगरपालिकेच्या क्ष्ेत्रात येत असल्याचे ‘चमत्कारीक’उत्तर या संघटनांना मिळाले!राज्याची उपराजधानीच मायबाप सरकारच्या लेखी महाराष्ट्रात नाही का?असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

‘स्वच्छ असोसिएशन’ तसेच ‘पर्यावरण प्रेरणा’या दोन संघटनांनी याबाबत एका महिन्यांपूर्वीच राज्याच्या भूजल व पाणी पुरवठा विभागाला सविस्तर मेल केला.पर्यावरण प्रेरणाचे अध्यक्ष् शरद पालीवाल तसेच स्वच्छ असोसिएशनच्या अध्यक्ष् अनुसूया काळे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत विविध केंद्रीय विभागांना मेल करण्यात येईल,तिथे ही दाद मिळाली नाही तर नागपूरची ऐतिहासिक धरोधर असणारा फूटाला तलाव वाचविण्यासाठी न्यायालयात जाऊ,असे म्हटले आहे.

राज्य सरकारचा हा विभाग म्हणजे आम जनतेसाठी ’पांढरा हत्ती’पोसण्यासारखाच असल्याची जळजळीत टिका पालीवाल यांनी केली.आमच्या क्ष्ेत्रात येत नाही असे उत्तर राज्य शासनाचा एखादा विभाग कसे देऊ शकतो?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.नागपूर हे महाराष्ट्राच्या बाहेर आहे का?

सध्या फूटालाच्या बंधा-यावर ‘व्यूवर्स गॅलरी’चे बांधकाम सुरु आहे त्यासोबतच ७ मजली पार्किंग पॅलेसचे निर्माणकार्य सुरु आहे,परिणामी बंधा-यावरच खोदकाम सुरु असल्याने तलावाचे पाणी तिथूनच वाहून जात असल्याचे पालीवाल यांनी सांगितले.

या तलावाच्या पाण्यामुळेच सीताबर्डीपर्यंत पाण्याची पातळी ही उंच आहे.फूटालामध्येच पाणी नाही राहणार तर जमीनीत ही पाणी मुरणार नाही.रामनगर,सिव्हिल लाईन्स इ.भागात नागरिकांच्या विहीरींना या तलावामुळेच लवकर पाणी लागतं.या पाण्याचा वापर नागरिक हे पिण्याचे पाणी सोडून इतर अनेक कामासाठी करीत असतात.फूटालातील पाणी गायब झाले तर या संपूर्ण भागात पाण्याचे दूर्भिक्ष् निर्माण होईल,परिणामी या भागातील नागरिक हे मनपाच्या नळाच्या पाण्याचा उपयोग इतर बाबींसाठी करतील त्यामुळे पुन्हा नागपूर शहरात पाण्याचा प्रश्‍न हा गंभीर होईल.

निसर्ग हे संतुलन साधत असतं मात्र माणसाच्या विकासाची हाव हे संतुलन नष्ट करते तेव्हा याचे परिणाम कोण्या मंत्री-संत्रीवर होत नसून अति सामान्य लोकांवरच होत असल्याचे ते म्हणाले.तसे ही सिमेंट रस्त्यांमुळे नागपूर शहराचे तापमान हे वाढले आहे,त्यात शहरातील हजारो झाडांची विकास प्रकल्पांसाठी कत्तल सुरु असून वाढलेल्या गर्मीने नागपूरकर आताच तर भाजून निघत आहे,पुढे या पेक्ष्ा ही जास्त भीषण गर्मीचा सामना नागपूरकरांना करावा लागणार असल्याचा सावध इशारा पालीवाल हे देतात.

फूटाला तलावाला बांधून ठेवणा-या बंधा-यावरील आताच तर २८० मोठमोठी व जुनी झाडे कापण्यात आली.याला लागूनच भरतवनचा प्रकल्प उभारला जाणार होता त्याला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवताच हा प्रकल्प मागे घेण्यात आला.एवढंच नव्हे तर न्यायालयाने देखील याचे सज्ञान घेतले होते.

नीरी‘ने त्याचवेळी सूचना केली होती भरतवनसोबतच हा बंधारा देखील जोपासणे गरजेचे आहे.लेझर शो आणि म्यूझिकल फाऊंटेशनपेक्ष्ा नागपूरकर नागरिकांना पर्यावरणाचे सानिध्य हे जास्त गरजेचे असल्याचे अनुसूया काळे यांनी सांगितले.

नागपूरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्या यांनी तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हातात या प्रकल्पामुळे होणारी नासाडी याबाबतचा सविस्तर अहवाल ठेवला होता मात्र ‘कारशेड’साठी टाहो फोडणारे युवा पर्यावरण मंत्री यांनी हा अहवाल उघडून देखील बघितला नाही,ना यावर कोणती कारवाई केली.निदान मुख्यमंत्री कार्यालयातून तरी संघटनेला उत्तर मिळाले,तुमचा मेल पर्यावरण खात्याकडे वर्ग केला असून ते तुमच्यासोबत संपर्क साधतील.

विशेष म्हणजे नागपूरातील हेरिटेज समिती यांनीच निर्देश दिले आहे,फूटाला,अंबाझरी हे शहराचे ‘अ’दर्जाचे ऐतिहासिक वारसा आहेत,मात्र अंबाझरीच्या बंधा-यालगत महामेट्रोने आधीच बांधकाम करुन टिसूळ केलेला पायवावर आता एमटीडीसीने मोठे हॉटेल बांधायला घेतले आहे.यासाठी त्यांनी तिथली नर्सरीच हलवली.‘अ’दर्जाच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये कोणत्याही स्वरुपाच्या बांधकामांना कायद्यानुसार परवानगी नाही, तरी देखील या दोन्ही तलावांचे नैसर्गिक सौंदर्यच प्रकल्पांच्या नावाखाली नष्ट केले जात असतान हेरिटेज समिती गप्प का?कोणत्या मंत्र्यांचा त्यांच्यावर दवाब आहे?असा सवाल अनुसूया काळे करतात.

हा मंत्री पदाचा दूरुपयोग असून पुढील काळात नागपूरकरांना प्राणवायूसाठी फार मोठा लढा द्यावा लागणार आहे,मंत्र्यांची नातवंडे तर शहराला ‘टाटा बाय बाय’करीत अमेरिकेला निघून जातील किवा प्राणवायूचे सिलेंडर गळ्यात घालून फिरतील मात्र सामान्य नागपूकरांनी काय करावं?दरवर्षीची वाढत जाणारी जीवघेणी गर्मी सहन करावी की प्राणवायुसाठी तडफडून मरावं?येणारी पिढी आम्हाला कधीही माफ करणार नसल्याचा इशारा अनुसूया देतात.

एका मंत्र्यांच्या अट्टहासापायी शहर उधवस्त होत असून या ऐतिहासिक तलावांमध्ये पाणीच राहणार नाही तर आनंद कशाचा घेणार?असा सवाल त्या करतात.जिथे हेरिटेज समितीच मंत्र्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वासमोर गप्पगार झाली आहे तिथे महानगरपालिका तरी तलावाच्या रक्ष् णासाठी पाऊल उचलेल का?याचे उत्तर नागपूरकर नागरिकांना चांगल्याने माहिती असल्याची उद्विग्नता अनुसूया या खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त करतात.

Latest बातम्या