

१४० दिवसांपासून रजेवर असणारे डॉ.गंटावार यांच्या पगारावरील खर्चाचा नागरिकांना उपयोग काय?
नागपूरकर जनतेचा सवाल:गंटावार यांच्यावर कोणाकोणाचे वरदहस्त?
नागपूर,ता. १८ मार्च: केंद्र शासनाचे करोना महामारीच्या संदर्भात स्पष्ट निर्देश आहेत ज्या ठिकाणी कराेना रुग्णांवर उपचार होतात त्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करु नये मात्र इतरांवर नियमांचा आधार घेत सातत्याने कठोर कारवाई करणा-या नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनालाच शासनाच्या दिशानिर्देशांचे कसे वावडे आहे हे मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय,आयसोलेशन तसेच पाचपावली येथील आरोग्य केंद्रावर सुरु असणा-या लसीकरण उपक्रमातून दिसून पडतंय.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून नागपूरात करोना महामारीचा प्रसार सुरु झाला तेव्हा पासून शहरात आपत्ती व्यवस्थापन व रोग प्रतिबंधक कायदा लागू झाला.या कायद्याखाली महानगरपालिकेतर्फे सातत्याने नागपूरकरांवर कडक कारवाई केली जात आहे.दररोज व्यापारी प्रतिष्ठाने असोत की सर्वसामान्य नागरिक,त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड मनपाच्या भरारी पथकांद्वारे वसूल केला जात आहे.
दूचाकीवर दोन व्यक्तींनी बसू नये,चार चाकीत दोनच व्यक्तिींनी जावे,एकाच घरात राहणारे नवरा-बायको हे मात्र मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या आदेशान्वये एकाच दूचाकीवर बसून अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडू शकत नाही.अश्या या ‘चमत्कारीक’ नियमांचे उल्लंघन केल्याने शेकडो नागरिकांना दंड भरावा लागला.आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली नागपूरकर नागरिकांना वेठीस धरणा-या मनपाचे प्रशासन मात्र स्वत: कसे नियमांचे सर्रास उल्लंघन करते,या विषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
डॉ.बहीरवार तिस-यांदा करोनाबाधित!
मनपाच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेंद्र बहीरवार हे तिस-यांदा करोना बाधित झाल्याची धक्कादायक माहिती आहे.ते करोनाचे कारण सांगून तिस-यांदा प्रदीर्घ सुटीवर आहेत.गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांनी घरीच फाईली मागवून महत्वाच्या फाईलींवर स्वाक्ष् -या केल्या मात्र आपला चार्ज इतर कोणालाही दिला नसल्याने याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती.
यानंतर पुन्हा त्यांनी करोनाचे कारण सांगून सुटी घेतली.आता गेल्याच आठवड्यात ते मुंबईला आरोग्य संबंधी बैठकीला उपस्थित राहीले,तेथून आल्यावर ते परस्पर करोना बाधित झाल्याचे सांगून पुन्हा एकदा रजेवर गेले असल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे त्यांच्यासोबत सहायक अधिक्ष् क गेले होते,विमानात प्रवासाच्या दरम्यान ही ते सोबतच होते,त्यांना करोनाचा संसर्ग नाही झाला!ते अद्याप आरोग्य विभागात कर्तव्यावर हजर आहेत मात्र डॉ.बहीरवार हे तिस-यांदा करोनाचा संसर्ग झाला असल्याच्या सबबीखाली रजेवर आहेत.
लसीकरणानंतरही झाला करोना!
सर्वात महत्वाचे म्हणजे डॉ.बहीरवार यांनी लसीकरणाचे दोन्ही डोज घेतले आहेत.मात्र लसीरकणानंतर २८ दिवस चाचणी केल्यास अहवाल हा पॉझिटीव्ह येईल असे शासनाचीच सूचना असतानाही डॉ.बहीरवार यांनी लसीकरणाच्या दहा दिवसातच त्यांना पुन्हा करोना झाला असल्याचे नमूद केले!
डॉ.बहीरवार हे मुंबईच्या बैठकीतून नागपूरात आल्यावर परस्पर घरी परतले मग त्यांनी चाचणी कधी केली?कुठे केली?अहवाल मॅनेज झाला का?अश्या चर्चेला मनपात आता चांगलाच ऊत आला आहे!
आयसीएमआर यांनी डॉ.बहीरवार यांचेच करावे परिक्ष् ण!
करोना लसीकरणाचे दोन्ही डोज घेतल्यानंतर ही डॉ.बहीरवार यांना तिस-यांदा करोना झाला असल्याने आता इंडियन काऊंसिल ऑफ मेडीकल रिर्सजने (आयसीएमआर)डॉ.बहीरवार यांचेच परिक्ष् ण करावे,असे देखील तेथील कर्मचारी मिश्कीलीने सांगत आहेत.लसीकरणारनंतर ही तिस-यांदा करोना झालेल्या बहीरवारांचे परीक्ष् ण केल्यास अायसीएमआरला अधिक प्रभावी लस शोधण्याची प्रेरणा मिळेल,अशी कोटी कर्मचा-यांमध्ये आपापसात ऐकू आली.
डॉ.गंटावार १४० दिवसांपासून पगारी सुटीवरच!जनतेसाठी उपयोग काय?
मनपातील बहूचर्चित नाव डॉ. प्रवीण गंटावार हे अारोग्य विभागाचे आणखी एक सहायक वैद्यकीय अधिकारी हे गेल्या तब्बल १४० दिवसांपासून रजेवरच आहेत मात्र त्यांचा पगार सुरुच असून शासनाच्या नियमाप्रमाणे एखादा शासकीय वैद्यकीय अधिकारी ९० दिवस सलग रजेवर असल्यास त्यांना मेडीकल बोर्ड पुढे उभं राहवं लागतं,मात्र डॉ .गंटावार हे सलग १४० दिवस रजेवर असताना देखील त्यांच्यासाठी सर्व नियम,अटी हे काही ‘खास‘पदाधिका-यांनी शिथिल करुन ठेवली आहेत ,अशी दबकी चर्चा मनपात ऐकू येतेय.
माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात डॉ.गंटावार हे नाव समस्त नागपूरकरांना चांगलंच माहिती झालं.धंतोली येथील त्यांचे स्वत:चे कोलंबिया रुग्णालय असून त्यांच्या विरोधात गुन्हे शाखाकडे एका पोलिस शिपायानेच पत्नीचे शव पैश्यांसाठी न दिल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल केला आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी २० जून २०२० रोजी भट सभागृहात तब्बल ६ दिवस चालेल्या सभेत याच डॉ.गंटावार यांच्या विरोधात अतिशय गंभीर आरोपांच्या फैरी झाडत सहा दिवस सभागृह डोक्यावर घेतले मात्र आज महापौर होताच जून्या बाबी ’विसरुन’ जायच्या असतात,अशी मखलाशी करताना आढळतात. जनतेमध्येही या बाबीवर देखील चर्चेला पेव फूटले आहे.
इंदिरा गांधी रुग्णालयाचा याच डॉ.गंटावारांनी कसा कुंटणखाना केला,याच्या सुरस कथाच महापौरांनी सभेत मांडल्या होत्या मात्र याच सभेत तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी तात्काळ प्रभावाने डॉ.गंटावारांच्या निलंबनाचे आदेश पारित केले असताही विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांच्या कार्यकाळात त्याची अंमलबजावणी झाली नाही,व अंमलबजावणीची शक्यता ही नसल्यानेच डॉ.गंटावार हे शासनाच्या नियमांच्या विरुद्ध १४० दिवस रजेवर असून देखील त्यांच्या विरोधात मनपातील भाजपचे काही पदाधिकारी हे कोणतीही कारवाई करण्यास धजत नाहीत,याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या मागे फार मोठे ‘अर्थकारण’दडल्याचा आरोप होत असून अश्या आरोग्य अधिका-याच्या पगारावर नागपूरकर जनतेच्या घामाचा पैसा का उधळला जातोय?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
नागपूरकर जनतेवर दंडूकेशाही गाजविणारी,व्यापार,प्रतिष्ठाने यांच्यावर लाखो रुपयांचा दंड आकारणारी,नियमांचे कारण सांगून त्यांची प्रतिष्ठाने बंद पाडणारी मनपा ही स्वत: नियमांचे कश्याप्रकारे सर्रास उल्लंघन करतेय याबाबत चांगलाच संताप आता व्यक्त केला जात आहे.
यासंबंधी ‘सत्ताधीश’ने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,फोन उचलण्यात आला नाही.




आमचे चॅनल subscribe करा
