Homeनागपूर न्यूजनागपूरात लॉकडाऊन...गृहमंत्री अनभिज्ञ!

नागपूरात लॉकडाऊन…गृहमंत्री अनभिज्ञ!


निर्णयाशी सहमत कि कोडींत पकडणे:चर्चेला उधाण

सोशल मिडीयावर गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचे मिम्स व्हायरल

नागपूर,ता. १५ मार्च:पालकमंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी अचानक बैठकीनंतर नागपूर शहरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत कडक लॉक डाऊनची घोषणा केली आणि आज सोमवारपासून शहरात त्याची अंमलबजावणी ही सुरु झाली.हा निर्णय पालकमंत्री यांनी शहरातील खासदार तसेच कोणत्याही पक्ष्ाच्या आमदारांना विश्‍वासात न घेता परस्पर जनतेवर लादला,एवढंच नव्हे तर शहरातील प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी यांना देखील बैठकीचे निमंत्रण नव्हते,याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री हे देखील याच शहराचे आहेत,राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष् मिळून राज्य कारभार चालवतात आहे,अश्‍या वेळी एकाच शहरात आणि एकाच सरकारमध्ये असणारे, मंत्री यांना दुस-या मंत्र्यांनी आपल्याच शहराविषयी कोणता निर्णय घेतला?हे माहिती नसणे,या विषयी अनभिज्ञता दर्शवणे,सोशल मिडीयावर उधाण आणणारे ठरले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे हे ‘मोघम’ वक्तव्य हे पालकमंत्री यांच्या शहरावर लादलेल्या लॉक डाऊनच्या निर्णयाचे समर्थन करणारे आहेत की आपल्याच सरकारमधील दुस-या पक्ष्ाच्या मंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी असे विधान केले?यावर आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे अनिल देशमुख हे पोलिसांशी संबंधित विभागाचेच प्रमुख आहेत.नागपूर हा त्यांचा स्वत:चा जिल्हा आहे,त्यामुळे त्यांच्याच शहराबाबत एक मंत्री त्यांनाच विश्‍वासात न घेता सरसकट लॉक डाऊनचा निर्णय त्यांच्याच पोलीस विभागाच्या सहाय्याने रेटतात,याबाबत ही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.गृहमंत्री देशमुख यांची राजकीय सहमती पालकमंत्र्यांच्या निर्णयाला नसावी त्यामुळेच त्यांनी वेळ मारुन नेली,असे देखील म्हटले जात आहे.

सोशल मिडीयावर मात्र गृहमंत्र्यांच्या या विधानाचे मिम्स हे चांगलेच व्हायल झाले.सरकार कोणतीही असो जनतेच्या भलाईसाठी काम करणार नाही,श्रीमंतांना आणखी श्रीमंत तर गरीबांना आणखी गरीब करण्यासाठीच काम करते,असे सूचक मिम्स सोशल मिडीयावर व्हायरल झाले. आपल्याच शहरातील एवढ्या महत्वाची खाती सांभाळणारे गृहमंत्री यांनाच शहरातील लॉक डाऊन विषयी माहिती नाही तर इतरांची काय बिसात?असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

पालकमंत्री नितीन राऊत यांना शहरातील प्रथम नागरिक असणा-या महापौरांना विश्‍वासात का नाही घेतले?असे माध्यमकर्मींनी विचारले होते यावर उत्तर देताना, त्यांनी खोडा घातला असता,अर्थात लॉक डाऊनला नकारच दिला असता,असे उत्तर मिळाले.यावरुन नागपूर शहरातील तीस लाख जनतेवर लॉक डाऊन लादण्याचा निर्णय हा पालकमंत्री नितीन राऊत यांना काहीही करुन अमलात आणायचाच होता,हे स्पष्ट होते.

भाजपचे आंदोलन कुठे गेले?
पालकमंत्र्यांच्या लॉक डाऊनच्या निर्णयाला शहरातील भाजपच्या झाडून पूसून सर्व आजी-माजी आमदारांनी माध्यमांना बाईट देऊन विरोध दर्शवला मात्र पालकमंत्र्यांच्या या निर्णयाच्या विरोधात भाजपचा कोणताही आमदार किवा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला नाही.एकीकडे याच पालकमंत्र्यांच्या विज दर वाढी व पठाणी वसूलीच्या विरोधात ऐन करोनाच्या काळात आंदोलनाच्या माध्यमातून रान माजवणारे भाजप अामदार मात्र लॉक डाऊनमध्ये शहरातील गरीब जनता भरडली जात आहे हे दिसत असून सुद्धा गपगुमान घरी बसून आहे.या मागे फक्त ‘राजकीय पोळी शेकणे’ एवढाच त्यांचा हेतू असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.सर्वसामान्य जनता ही ठाकरे सरकारच्या निर्णयांनी जेवढी जास्त भरडली जाईल तेवढा जास्त लाभ भाजपला मिळेल,अशी चर्चा रंगली आहे.याच उद्देशाने शहरातील खासदार हे देखील कोणताच पुढाकार घेत नाही,अशी निराशा देखील व्यक्त केली जात आहे.

माजी महापौर संदीप जोशी यांच्या कार्यकाळात लॉक डाऊन लादला गेला असताना ते स्वत: माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासमवेत नागपूरकर जनतेला लॉक डाऊनचे नियम पाळण्याची चौका चौकात अपील करीत फिरत होते,यंदा मात्र चौका चौकात ’मी डॉ.नितीन राऊत बोलत आहे,करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने करोनाचे नियम पाळावे,सहकार्य करवे’इ.ची कॅसेट कानी पडत आहे,जनतेला पालकमंत्री यांचा आवाज चांगलीच चिड आणत आहे.’गेल्या वर्षी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या लहरी कारभारामुळे संपूर्ण शहरालाच वेठीस धरले होते, शहराच्या मध्यवर्ती चौकात ते स्वत: उभे राहून ठाणेदारी करीत नागरिकांना शिक्ष्ा देत होते,‘मुंढे गेले अन्‌ …..पालकमंत्री आले’असे मिम्स सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

दूसरीकडे पोलिसांची दंडूकशाहीही शहरातील आम जनतेवर पडत आहे.’मुकी बिचारी कोणीही हाका’याच न्यायाने नागपूरकर जनता ही सर्वप्रकारे भरडली जात आहे.आज तब्बल ५७६ वाहन चालकंावर कारवाई करण्यात आली तर ८४१ नागरिकांवर विना मास्क असल्याने दंड ठोठावण्यात आला,तिसरीकडे नागपूर मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे ऐन करोनाच्या काळात आधीच रोजी रोटी बुडालेली असताना अतिक्रमण विरोधात सातत्याने कारवाई सुरुच आहे,यात गरीबांचे हातठेले,साहित्य जप्त केले जात असून डोळ्यात अश्रू आणून हतबल हॉकर्स ही कारवाई बघत आहेत.

मायबाप सरकार,नागपूर महानगरपालिका आणि सर्वच राजकीय पक्ष् हे कश्‍याप्रकारे करोनाचे कारण पुढे करुन सर्वसामान्य जनतेला नैराश्‍याच्या आणि मरणाच्या दारात ढकलत आहेत,याचा चांगलाच संताप सध्या सोशल मिडीयावर उमटत आहे.
यापूर्वी दोन दिवस शनिवार आणि रविवार महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या आदेशानव्ये आधीच बाजारपेठा बंद आहेत.हा सलग दूसरा शनिवार आणि रविवार होता जेव्हा नागपूरच्या व्यापारी वर्गाने हजारो काेटींचे आर्थिक नुकसान सोसले,त्यात लगेच सोमवारपासून लॉक डाऊनही लागले,शुक्रवारी त्यामुळेच शहरातील सर्वच बाजारपेठेत हाऊसफूल गर्दी पहायला मिळाली.लोकांना आपल्या बालबच्च्यांसाठी आठ दिवसांची सोय करणे भाग पडले.

पाेलिस विभागाचा आणखी एक निर्णय म्हणजे दूचाकीवर फक्त एक आणि चारचाकीत फक्त दोनच लोकं जाऊ शकतील,यावर देखील चांगलाच संताप व्यक्त केला जातोय.दूचाकी ही सर्वसाधारण आणि गोरगरीब जनतेचे वाहन आहे,आपल्या बायको,मूलांसोबत दूचाकीवर जाणे वाहनधारकाला भाग आहे,मात्र एकच व्यक्ति दूचाकीवर असावा,हा चमत्कारीक नियम ही नागरिकांना आज चांगलाच नडला.पोलिस विभागाचे काय म्हणने आहे?आम्ही बायका-पाेरांना बस किवा ऑटाने पाठवून करोनाला निमंत्रण द्यावं का?असा संताप व्यक्त केला जात आहे.चार चाकीत ज्येष्ठ आई वडीलांना एकसाथ करोना लससाठी घेऊन जाणे ही आज अनेकांना या नियमांमुळे दुरापस्त झाले.

सर्वच वर्गातील सर्वसामान्य शहरवासीयांच्या वेदना लॉक डाऊनमुळे शब्दांमध्येही बंदिस्त करता येणार नाही,दूसरीकडे मात्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे शहरात परत येताच चमत्कारिक वक्तव्य करतात,याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सर्वच राजकीय पक्ष्ाकडून अपेक्ष्ा भंग झालेल्या जनतेने मात्र पालकमंत्र्यांचा लॉक डाऊन यशस्वी होऊ दिले नसल्याचेच चित्र आज शहरात उमटले होते.बसेस,मेट्रो सुरु होत्या.अत्यावश्‍यक दूकाने सुरु असल्यामुळे ही नागरिक हे बाहेर पडलेच.मेयोजवळील चौकात पोलिसांनी दंडूकशाही गाजवली तर दूसरीकडे अनेक चौकात फक्त औपचारिक विचारणा झाली.

गेल्या मार्च महिन्यात ज्याप्रमाणे लॉक डाऊन दरम्यान रस्त्यावर एक चिटपाखरु ही दिसत नव्हतं,त्या मानाने आज अनेक मुख्य रस्त्यांवर नागरिकांची २५ टक्के का असेेना वर्दळ दिसली.

Latest बातम्या