फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजलॉक डाऊन काळात मनपा प्रशासनाने केला ७७ लाखांचा भ्रष्टाचार:आभा पांडे यांचा आरोप

लॉक डाऊन काळात मनपा प्रशासनाने केला ७७ लाखांचा भ्रष्टाचार:आभा पांडे यांचा आरोप

Advertisements


तीन स्वयंसेवी संस्थांना पोहोचवला आर्थिक लाभ

चहा नाश्‍त्यावर खर्च केले ३६ लाख रुपये!

जनतेच्या पैश्‍यांची उधळपट्टी:केंद्र व राज्याच्या पैश्‍यांचाही चुराडा

नागपूर,ता. १२ मार्च: लॉक डाऊनच्या काळात २२ लाख लोकांना नि:शुल्क अन्नदान पुरविणा-या नागपूर महानगरपालिकेने फक्त ३२०० लोकांच्या भोजनासाठी ३ स्वयंसेवी संस्थांना ७७ लाख रुपयांचा आर्थिक लाभ पोहोचविल्याचा सनसनाटी आरोप ज्येष्ठ अपक्ष् नगरसेविका व राष्ट्रावादी नेत्या आभा पांडे यांनी लावला.

करोना लॉक डाऊनच्या काळात मनपाच्या समाज कल्याण विभागाने २४ निवारा केंद्र चालवले.यातील १३ निवारा केंद्रात भाेजनाची व्यवस्था करण्याचे काम ३ स्वयंसेवी संस्थांना स:शुल्क देण्यात आले आणि येथेच भ्रष्टाचाराचे फार मोठे गौडबंगाल दडले असल्याचे त्या म्हणाल्या.

आभा पांडे म्हणाल्या की,जेव्हा १३ निवारा केंद्रात संपूर्णत: नि:शुल्क सेवा स्वयंसेवी संस्थांनी पुरविल्या तर ९ निवारा केंद्रात स:शुल्क सेवा कशासाठी पुरविण्यात आल्या?या ९ निवारा केंद्रात देखील शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था या भोजन व इतर संपूर्ण व्यवस्था नि:शुल्क पुरविण्यातसाठी तयार होत्या मात्र त्यांची सेवा नाकारुन मनपाच्या समाज कल्याण विभागातर्फे तीन संस्थांना आर्थिक लाभ पोहोचविण्यासाठी भ्रष्ट कारभार केला गेला.

या तीन संस्थांना स:शुल्क काम देण्यात आले ज्यात जवळपास ७६ लाख ४९ हजार रुपयांचा चुराडा झाला.यासोबतच राधा स्वामी सत्संग मंडळातर्फे विलगीकरण केंद्रात नाश्‍ता,दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण पुरविल्या जात होते मात्र तरीही या ९ केंद्रात दोन वेळा चहा,दुध,बिस्किट,पिण्याचे पाणी व परिवहन व्यवस्था हॉटेल हेरिटेजतर्फे पुरविण्यात आली ज्याचा खर्च ३६ लाख ७६ हजार २२० रुपये आला.
विशेष म्हणजे जेव्हा शहरातील २२ लाख लोकांना मनपाने नि:शुल्क भोजन उपलब्ध करुन दिले तर या ९ निवारा केंद्रात असे काय वेगळे होेते ज्यात समाज कल्याण विभागातर्फे स:शुल्क सेवा पुरविण्यात आली?प्रशासनाने या तिन्ही स्वयंसेवी संस्थांना फायदा पोहोचविण्यासाठीच या केंद्रात स:शुल्क सेवा उपलब्ध करुन केंद्र, राज्य आणि जनतेच्या पैश्‍यांचा चुराडा केला असल्याचा आरोप आभा पांडे यांनी केला.

लॉक डाऊनच्या काळात राधा स्वामी सत्संग मंडळातर्फे नि:शुल्क भाेजनाची व्यवस्था करण्यात आली होती तरी देखील फक्त चहा आणि नाश्‍त्यासाठी हॉटेल हेरिटेजला ३६ लाख ७३ हजार २२० रुपयांचा निधी कसा काय देण्यात आला?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
माहितीच्या अधिकारात मी मनपा प्रशासनाला गेल्या अनेक महिन्यांपासून लॉक डाऊनच्या काळातील खर्चाचा हिशेब मागत आहे मात्र निगरगट्ट प्रशासनातर्फे सातत्याने मला वारंवार अर्धवट तसेच खोडतोड करुन माहिती प्रदान केल्या जात होती.महिनोनं महिने माझ्या अर्जावर माहिती गोळा करणे सुरु आहे असेच उत्तर मला प्रशासनातर्फे मिळत होते,असे त्यांनी सांगितले.

आभा पांडे यांनी सांगितले की मला प्रशासनाने जी काही त्रोटक माहिती उपलब्ध करुन दिली ती केवळ हिमनगाचे एक टोक आहे.अनेक ठिकणी खोडतोड करुन आकड्यांची हेराफेरी करण्यात आली आहे.अनेक बाबींमध्ये लाखोंचा खर्च दाखवण्यात आल्या मात्र तो नेमका कशावर खर्च झाला याचे कोणतेही तपशील उपलब्ध करुन देण्यात आले नाही.

यामुळेच माझा स्पष्ट आरोप आहे कोविड-१९ महामारीच्या काळात एकीकडे नागपूरकर जनता जेव्हा करोना महामारीमुळे हवालदिल झाली होती,विलगीकरण केंद्रात भरडली जात होती तेव्हा मनपाच्या समाज कल्याण विभागाने या संधीचा पुरेपूर लाभ केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी उठवला.केंद्र,राज्य व मनपाच्या निधीचा लाभ सामान्य लोकांना न पोहोचविता तीन विशिष्ट स्वयंसेवी संस्थांना पोहोचविण्यात आला.

या कृतीची मी घोर निंदा करते व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.तसेच महापौर दयाशंकर तिवारी यांना या संपूर्ण खर्चाची निष्पक्ष् चौकशी करण्यात यावी,अशी मागणी करते तसेच जोपर्यंत या संपूर्ण जमाखर्चाच्या टाळेबंदीचा हिशेब होत नाही तोपर्यंत या विभागातील अधिका-यांच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लावण्यात यावे,अशी मागणी आभा पांडे यांनी केली .

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या