Homeराजकारणपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

अधिवशेनापूर्वी शिवसेनेचा सावध पवित्रा!

मुंबई,दि.२८ फेब्रुवरी: पुण्यात झालेल्या २२ वर्षीय पूजा चव्हाण हिचा मृत्यू आणि वनपमंत्री संजय राठोड .यांच्यावर पसरलेले संशयाचे धूके यावरुन भारतीय जनता पक्ष्ाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, खासकरून शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली. उद्या सोमवार पासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाल सुरवात होत असल्याने शिवसेनेने सावध पवित्रा घेत आज अखेर रविवार,दि. २८ फेब्रुवारी रोजी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला मात्र यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सुनावत पलटवार ही केला. संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे तसेच या प्रकरणात निःपक्षाती चौकशीचे आदेश देण्यात आले असून पोलिसांना लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राठोड यांनी दुपारी आपला राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारची संध्याकाळी साडेसहा वाजता पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला असून या घटनेची निःपक्षपाती चौकशी केली जाईल,सत्य बाहेर येईलच. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. जो कोणी दोषी असेल त्याला क्षमा केली जाणार नाही. पण हे सगळं होत असताना नुसती आदळआपट करून तपासाची दिशा भरकटवायची हा जो काही प्रघात घातला जातोय हा फार गंभीर असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केला असल्याचा आरोप ही त्यांनी केला. केवळ सत्ता नाही म्हणून आरोप करणं चुकीचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राठोड प्रकरणात तपास होईलच आणि दोषींवर कारवाई देखील होणारच. राठोड प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही. तपासाची दिशा भरकटवण्याचं काम केलं जातंय. राजीनामा घेणं आणि गुन्हा दाखल करून मोकळं म्हणजे न्याय नाही. पूजाचे आईवडील आपल्याला भेटले. कुटुंबाची बदनामी होत असल्याचं ते म्हणाले. ही बदनामी थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं. या घटनेचा तपास वेगाने व्हावा आणि दोषींना शिक्षा कराल याबाबत आम्हाला खात्री आहे. या प्रकरणात पूजा चव्हाण हिच्या आईवडिलांची कोणतीही तक्रार नाही, असं पूजा चव्हाणचे आईवडिलांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

राठोड यांच्यावरील प्रेमापोटी पोहरादेवी येथे लोकांनी गर्दी केली. त्यांनी नागरिकांना बोलावले नव्हते. या प्रकरणी तपास सुरू आहे. अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. एखाद्याला आयुष्यातून उठवायचं म्हणून तसा तपास होता कामा नये. आदळआपट करून तपासाची दिशा भरकटून टाकायचं काम करू नये.आधी तपास होऊ द्या.आता जे पोलिस आणि जी यंत्रणा आहे तीच तुमच्या काळातही होती. पण त्यांच्यावरच अविश्वास दाखवणार असाल तर पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

प्रत्येक पाऊल टाकताना खूप समजूतदारपणाने आणि गांभीर्याने टाकावं लागतं. त्यात उथळपणा चालणार नाही. कुणाचाही जीव महत्त्वाचा असतो. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेचा तपास होईल आणि दोषींवर कारवाई होईलच. यामुळे इतरांनाही कुठलीही शंका असण्याचं कारण नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

सत्तेत कुणी किती लाचारी स्वीकारली ती इतिहासात लिहिली जाते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. एकतर खोटं बोलून सत्ता आणली आणि सत्ता आल्यानंतर खोट्याचे इमले रचले. देश विकायला काढणारे म्हणून तुमच्याही सरकारची इतिहासात नोंद होईल. आरोप करताना जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे. समजू शकतो, समोर आलेलं चांगलं चित्र स्वतःच्या कर्माने त्यांनी भंग केलं आणि सरकार पडेल, सरकार पडेल असं म्हणत विरोधकांचं एक वर्ष झालं. हा भ्रम दूर झाला आहे. आता आम्ही मजबूतीने काम करत आहोत. तुमच्या मनताली खदखद जरूर काढा. सरकार चुकत असेल तर नक्की सांगा. पण केवळ आपली सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची आणि सरकारची बदनामी करू नका. कारण स्वतःच्याच घरचा ‘काळ’ अशी सुद्धा इतिहासात आपली नोंद होऊ देऊ नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया…
मी माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आताच दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बंजारा समाजाची तरूणी पूजा चव्हाण हिच्या दुदैवी मुत्यूवरून विरोधी पक्षांकडून घाणेरडे राजकारण केले गेले. माझ्या समाजाची बदनामी केली गेली. म्हणूनच यातील खरे सत्य बाहेर यावे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशीच माझी भूमिका आहे. म्हणूनच मी मंत्रिपदापासून बाजूला झालेलो आहे. आता या प्रकरणी योग्य चौकशी होऊन खरे सत्य बाहेर पडावे अशीच आपली भूमिका असल्याचे संजय राठोड म्हणाले.

फक्त राजीनामा नको,राठोड यांना अटक करा-भाजपची मागणी-
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी आज आपल्या वनमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला. विरोधक मात्र आक्रमक आहेत. भाजपने संजय राठोड यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राठोडांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. तर खासदार नारायण राणे आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राठोड यांना अटक करण्याची मागणी केली.

अकार्यक्षम पोलिसांना निलंबित करा-
या प्रकरणात सुरवातीपासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. एका मुलीची हत्या होऊन ही पोलिस संवेदनशील नाहीत. अशा पोलिसांवर कारवाई केली पाहिजे. अकार्यक्षम पोलिसांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, तर पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. राजीनाम्याने प्रश्न सुटलेले नाहीत. ते तसेच आहेत. यामुळे सरकारने चौकशी करावी. हा प्रश्न काही पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचा नाही. तर महाष्ट्रातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. यामुळे या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असं अशी मागणी वाघ यांनी केली.

Latest बातम्या