
ऐतिहासिक वारसा होणार लृप्त: पर्यावरणाचीही अपरिमित हानी
पर्यावरण प्रेरणा विदर्भ शाखेचा दावा:न्यायालयात याचिका सादर
नागपूर,ता. २० फेब्रुवारी:शहराच्या मध्यवर्ती भागात अजनी येथील परिसरात एन.एच.ए.आई व भारतीय रेल्वेतर्फे लवकरच ‘इंटर मॉडल स्टेशन’ विकसित करण्याची घोषणा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.या प्रकल्पासाठी अजनी परिसरात ४९० एकर हरीत भूमी ताब्यात घेण्याचे प्रस्तावित आहे मात्र गडकरींचा हा विकास प्रकल्प शहराचा विकास नसून हरीत भूमीच्या विनाशाचा प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे पर्यावरणाची देखील अपरिमित हानी देखील होणार असल्याचा दावा ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भ शाखेतर्फे’ आज शनिवार दि. २० फेब्रुवारी रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत करण्यात आला.
संस्थेच्या सदस्या अनुसूया काळे म्हणाल्या की, अजनी रेल्वे कॉलनी म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटीशांनी वसवलेली एक अभूतपूर्व वसाहत आहे.भारतीय रेल्वेची सुरवातच अजनीपासून बिलासपूरपर्यंतच्या ब्रिटीशांच्या पहील्या रेल्वे प्रकल्पात झाली.बिलासपूर नंतर त्या पुढील प्रवास हा घोडे,हत्ती इ.द्वारे केला जात असे.यानंतर ब्रिटीशांनी ही कनेक्नटीवीटी पुन्हा बिलासपूरच्या पुढे रेल्वेद्वारे नंतर विकसित केली.

नागपूर शहराच्या अजनी रेल्वेला त्या काळी ‘डायमंड क्रासिंग ऑफ रेल्वे’असे संबोधिले जात होते आज देखील अजनी हे शहरातीलच नव्हे तर देशातील मध्यवर्ती ह्दय आहे कारण याच रेल्वे स्टेशनकडून सर्व दिशांना शहरात अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात जाता येतं.ब्रिटीशांनी हा संपूर्ण परिसर अत्यंत विचारपूर्वक वसवला आहे.एकाच परिसरात शाळा,रुग्णालये,वसाहती,मैदाने वसवलेली असून त्याकाळी कोणत्याही गोष्टीसाठी वसाहती बाहेर पडण्याची नागरिकांना गरजच पडत नसे.
शहरात ब्रिटीशांचे असे नियोजन कुठेही दिसत नाही.असे नियोजन हॅरिटेज म्हणजे शहरातील ऐतिहासिक वारसामध्ये घेण्याची गरज असताना गडकरी यांचा हा प्रकल्प या ऐतिहासिक वारसालाच संपूर्णपणे उधवस्त करण्यास सज्ज झाला असल्याचा आरोप अनुसूया यांनी केला.
हा विकास नसून सत्यानाश असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.एन.एच.ए.आईने या प्रकल्पाचा जो अहवाल तयार केला त्यात या जागेचा विकास करीत असताना ४४ एकर मधील एकूण १९४० झाडे कापण्यात येईल अशी माहिती दिली.हा अहवाल बनवताना शहरातील झाडांच्या संरक्ष् णाची अधिकृत व कायदेशीर जवाबदारी ज्या नागपूर महानगरपालिकडे आहे त्या मनपाला देखील विश्वासात घेतल्या गेले नसल्याचा आरोप अनुसूया काळे यांनी केला.
एन.एच.ए.आईने आपल्या मनाने झाडांची मोजणी केली मात्र आमच्या संस्थेला या अहवालावर विश्वास नसल्याने आम्ही आमच्या सदस्यांकडून मोजणी करवून घेतली यात या ४४ एकरवरील ७ हजारपेक्ष्ा अधिक झाडांची कत्तल होणार असल्याची मोजदाद आम्ही शास्त्रीयरित्या केली.आम्ही मनपाच्या उद्यान विभागाचे उपायुक्त अमोल चोरपगार यांना या ठिकाणी मोजदाद करण्यासाठी घेऊन आलो.त्यांनी देखील आमचा दावा सत्य असल्याचा निर्वाळा दिला.
विशेष म्हणजे हा प्रकल्प अद्याप प्रस्तावित असतानाही या परिसरातील शेकडो शंभर वर्षे पुरातन झाडे ही निर्दयतेने विना परवानगीने जाळण्यात आली.आम्ही या जळलेल्या झाडांची छायाचित्रेही न्यायालयात सादर करणार असल्याचे अनुसूया यांनी सांगितले.
आमच्या संस्थेने कोणत्या अधिकाराने ही शेकडो झाडे जाळण्यात आली अशी विचारणा एन.एच.ए.आईच्या अधिका-यांना केली असता आधीच्या कंत्राटदाराने ही झाडे जाळली असून आम्ही नव्याने रुजू झालो आहोत,याविषयी आम्हाला माहिती नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकले.

विशेष म्हणजे अतिशय घनदाट भाग असलेल्या लोको शेड परिसरातील जवळपास ३०० झाडे कापलेली व जळालेली आम्हाला आढळली!गूगलमध्ये शोध घेतल्यास या झाडांचे वास्तविक छायाचित्रे त्यावर उपलब्ध आहेत. या भागात आतमध्ये जाण्याची परवानगी नाही मात्र निषिद्ध असलेल्या परिसरातील देखील शेकडो झाडे ही या प्रकल्पासाठी परवानगी न घेता कापण्यात आली.ना रेल्वेची,ना महानगरपालिकेची ना रेल्वे डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाची परवानगी ही शेकडो झाडे निर्दयतेने कापताना घेण्यात आली नाही,असा दावा काळे यांनी केला.एन.एच.ए.आईने ’ट्री एक्ट’नुसार गंभीर हा गुन्हा केला असल्याचे त्या म्हणाल्या.याबाबत आम्ही डिसेंबर २०२० मध्य पीआयएल टाकली असून करोनामुळे न्यायालयाच्या पटलावर अद्याप ती सुनावणीसाठी आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पाचे एकूण चार टप्पे असणार आहेत.या मध्ये टप्पा-१ मध्ये ४४ एकर भूमी ही इंटर मॉडल स्टेशनसाठी प्रस्तावित आहे तसेच उरलेली भूमी ही टप्पा २,३ आणि ४ मध्ये प्रस्तावित आहे.या उर्वरित तिन्ही टप्प्यांचा भूमीवर कमर्शियल गतीविधी व व्यवसायिक कारणासाठी वापरली जाणार आहे.फक्त इंटर मॉडल स्टेशनच उभारायचे आहे तर ४९० एकर जागा एन.एच.ए.आईला सिटी बिजनेस डेव्हलमेंट मॉडेलसाठी का हवी आहे?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.फक्त ४४ एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहू शकतो मात्र आजूबाजूचा संपूर्ण हॅरिटेज भाग हा केवळ व्यवसायिक हेतूने हडपला जात असल्याचा घणाघात त्यांनी केला.
यासाठी गडकरी हे त्यांच्या भाषणात दिल्लीच्या जनकपूरी मॉडलचे उदाहरण देतात मात्र दिल्लीची लोकसंख्या किती आहे?नागपूरची किती?दिल्लीत किमान १ ते ३ कोटी लोकसंख्या असून नागपूर मनपाच्या अधिकृत वेबसाईटवर नागपूरची लोकसंख्या ही २९ लाख दर्शवली जाते.मग दिल्लीपेक्ष्ा चार ते पाच गूणांनी कमी लोकसंख्येसाठी ४४ एकर मधला हा प्रकल्प अत्यावश्य आहे का ?कशासाठी आहे?कोणासाठी आहे?असा प्रश्न त्यांनी विचारला.अजनीवरुन शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी नागरिकांना फक्त दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागतो,दिल्लीमध्ये अशी सुविधा नव्हती त्यामुळेच त्या ठिकाणी असा व्यवसायिक उपयोग ठिक होता मात्र नागपूरात दिल्ली सारखा अतिशय अयोग्य पॅटर्न राबविण्याचा केंद्रिय मंत्री यांचा अट्टहास का?

यांचा सीव्हीडी हा कुठल्या कुठे जोडल्या जात आहे.इथे कोणती इंडस्ट्री नाही,इथे आय.टी.हब नाही,जे आय.टी.पार्क आहेत ते फक्त दोन ते तीन कंपन्यांपूरती मर्यादित आहेत,मिहान हे तर जवळपास ठप्पच आहे,बुटीबोरीला जायचं म्हटलं तर अर्धा ते पाऊन तास ही लागत नाही,पारडीला ही जायचं असेल तरी खूप वेळ लागत नाही आणि मेट्रोचा जो फेज काढला आहे त्यात १ लाख चाैरस मिटर च्या वर जागा कमर्शियल बिजनेससाठी आधीच काढण्यात आली आहे.
मूळात नागपूरात एवढे मॉल्स आधीच ठप्प आहेत मग ४२६ एकर जागा ही फक्त कमर्शियलसाठी कसे घेत आहात?शहरातील हॉटेल व्यवसाय हा आधीच घायकूतीला आला आहे.हॉटेल्स रिकामे आणि मॉल्स परत जात आहेत.मेट्रोसाठी १ लाख चौ.मी.जी कमर्शियलसाठी जागा ठेवण्यात आली आहे,तीच अजून बूक ही झाली नाही,शहरातला मेट्रो प्रकल्पच अद्याप पूर्णपणे तयार झाला नाही,सिमेंट रस्त्यांचे तिन्ही टप्पे देखील अद्याप अपूर्णच आहे याचा अर्थ गडकरी यांनी सिटीची फिजिबिलीटी काहीच बघितली नसल्याचा आरोप त्यांनी केला.हा फिजिबिलीटीचा अहवाल देखील चूकीचा आहे.
सर्वात महत्वाचे ‘एन्वायरमेंटल असेसमेंट इम्पॅक्ट’तो पण पूर्णत:चुकीचा असल्याचा दावा काळे यांनी केला.हा चुकीचा अहवाल दिल्लीच्या कंपनीच्या सल्लागाराने तयार केला असून १५० पानांचा हा अहवाल किंबहूना टेंडर तयार करताना एन.एच.ए.आईच्या या सल्लागाराने नागपूर शहरातील स्वयंसेवी संस्थांना,शहरातील नागरिक,लोकसल्ला इ. खूप काही गोष्टी अंर्तभूत न करता तयार केला.नागरिकांना ही माहिती नाही ही ‘सिक्का असोसिएट’अहवाल तयार करण्याकरीता कधी आली नागपूरमध्ये आणि अहवाल तयार करुन कधी गेली, ना माध्यमात त्याची चर्चा झाली!
महत्वाचे म्हणजे या कंपनीचे एमओयू (मेमोरेंडम अंडरस्टॅण्डींग अग्रीमेंट)आधी झालं व टेंडर नंतर निघालं?ही बाब देखील संशयास्पद असून त्याची देखील कागदपत्रे आमच्या संस्थेकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.हा एमआेयू रेल्वे आणि एन.एच.ए.आईमध्ये आहे.रेल्वे आपली जागा देऊ शकत नाही,रेल्वेचे जे नियम आहेत ते फार कडक आहेत.
यासाठी त्यांनी अाणखी एक खेळी केली.एम.एच.ए.आई हा संपूर्ण ४९० एकरचा प्रकल्प पूर्ण करेल आणि रेल्वेसोबत लाभ वाटून घेण्याचा हा घाट घातला गेला आहे.रेल्वेची जागा मिळू शकत नसल्याने रेल्वेलाच उलट या प्रकल्पामुळे फायदा पोहोचणार असल्याचे स्वप्न दाखवण्यात आले आहे.यानंतर पुढी काळात याचे संपूर्ण खासगीकरण करुन टाकतील,जशी मेट्रोची गत झाली तशीच या प्रकल्पाची होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकल्पात भरडल्या जाणार ते या रेल्वे क्वार्टरमधील कर्मचारी.यात रेल्वे मेन्स ही १९३५ साल ची शाळा देखील नामशेष होणार आहे.या शाळेने आजपर्यंत अनेक आयएएस आणि अभियंते या देशाला दिले आहेत अशी शाळा देखील या प्रकल्पात नामशेष करण्याचा घाट घालण्यात आला आहे.या शाळेला नव्या ठिकाणी फक्त आठ खोल्यांची शाळा बांधून देण्याचा घाट घालण्यात आल्याची माहिती असून ही शाळा नेमकी शहरात कुठे बांधून देणार आहे? याबाबत आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे मात्र ती अद्याप आम्हाला मिळाली नसल्याचे काळे यांनी सांगितले.
भू-गर्भातील पाण्याच्या पातळीला ही धोका!
या प्रकल्पामुळे सर्वात जास्त नुकसान हे पर्यावरणाचे होणार असून आपलं ग्रीन कवर हे ३३ टक्के राहीले पाहिजे तेच आज शहरात आधीच २० टक्क्यांवर घसरलं आहे.या विकास प्रकल्पामुळे आणखी हिरवळी क्ष्ेत्र नष्ट होणार आहे.अजनीत शहरातील सर्वाधिक हिरवळी क्ष्ेत्र असून या ठिकाणच्या हिरवळीनेच ग्रीन कवर सांभाळून ठेवले आहे.एवढेच नव्हे तर भू-गर्भातील पाण्याची पातळीही या प्रकल्पामुळे प्रभावित होईल.
आधीच शहराच्या लोकसंख्येत वाढ होत चालली आहे,नैसर्गिक संसाधने ही मर्यादित आहेत,या प्रकल्पामुळे शहरातील भू-गर्भातील पाण्याची पातळी प्रभावित होणार असून पुढील काळात पाण्यासाठी शहरात त्राही-त्राही माजणार असल्याची भीती त्यांनी वर्तवली.
याशिवाय अजनी येथील या हरित क्ष्ेत्रातील प्रत्येक झाडाकडून किती प्राणवायू आज नागरिकांना मिळत आहे याचा शास्त्रशुद्ध अभ्यास संस्थेच्या प्राची माहूरकर व प्रदुम्न सहस्त्रभोजनी यांनी केला.या क्ष्ेत्रात वड,पिंपळ,औदूंबरसारखी अतिशय पुरातन झाडे आहेत ती देखील नष्ट होणार.ही झाडे मूळासकट उखडून इतर ठिकाणी लावली जाईल किवा एका झाडा ऐवजी ५ झाडे शहरात इतर ठिकाणी लावण्यात येईल,कंपनीचे हे दावे किती फोल आहेत हे नागपूरकर जनतेला देखील माहिती आहे.मेट्रोचे उदाहरण यासाठी बोलके आहे.
याशिवाय या हरित् पट्टयात ५० प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास आहे.ते फार लांबून उडून या त्यांच्या हक्काच्या अधिवासात येतात.या ठिकाणी एक जगात अतिशय दुर्मिळ झालेल्या घुबडाचं संपूर्ण कुटुंबच वास्तव्यास आहे.कंपनी त्यांना कुठे शिफ्ट करणार?या पक्ष्यांचा अधिवासांचा सर्व्हे संस्थेच्या चेतन पांडे आणि त्यांच्या चमूने केला असल्याची व त्याची सखोल माहिती कागदोपत्री उपलब्ध असल्याचे काळे यांनी सांगितले.
याशिवाय या परिसरातील घनदाट झाडांवर अनेक ठिकाणी मध उपलब्ध होत आहे.आज मधाची किंमत ३ हजार प्रति किलो आहे.हे देखील उधवस्त होणार मग गडकरी यांचा हा प्रकल्प या शहराचा विकास आहे की विनाश?याचा विचार आता नागपूरकरांनी करावा असे विधान काळे यांनी केले.
हा प्रकल्प अजनीच्या ऐवजी खापरीमध्ये का नाही केला जात?मेट्रो,रेल्वे,बसेस या खापरीमधून ही एकसाथ जोडल्या जाऊ शकतात उलट अजनीमध्ये अत्यंत दाटीवाटीने हा प्रकल्प नागरिकांवर लादण्यापेक्ष्ा खापरीमध्ये शहराच्या बाहेरुनच गोंदिया,अमरावती,गोधनीवरुन येणारा प्रवासी निघून जाऊ शकतो.बाहेर गावाचा प्रवासी हा शहराच्या मधोमध अजनीला का येणार आहे?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आज ज्याप्रमाणे गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणा-या महामेट्रोमध्ये हळदी-कूंकू,वाढदिवसाचे थेर सुरु करुन उत्पन्न मिळवण्याची नामुृष्की ओढवली आहे तीच स्थिती या अजनी इंटर मॉडलची देखील होईल अशी शंका त्यांनी व्यक्त केली.खापरी स्टेशन हे अद्यावत झाले तर तिथे हाय-वे देखील आहे,आऊटर रिंग रोड देखील लागतो,बस अड्डे देखील जोडले जाऊ शकतात मुख्य म्हणजे बसेसला वळण घेण्यासाठी ट्राफिकही जाम करावा लागणार नाही.अजनीच्या प्रकल्पात तर १६३ बस स्थानक प्रस्तावित आहे मात्र रस्ते देतात आहे फक्त १८ मीटरचे!एवढ्या मीटरच्या रस्त्यावरुन वळण घेताना आधीच शहरात बसेस या ट्रेफिक जाम करताना आढळतात,त्यात आणखी या १६३ बस स्थानकांचीही भर पडेल,असा अारोप त्यांनी केला.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या शहराचा लोकसंख्या वाढीचा दर हा १.५४ एवढा आहे.याचा अर्थ शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत नसून आऊटर भागावर उलट ताण पडत आहे.मनीष नगर,बेलतरोडी,बेसा,न्यू नागपूर,शंकरपूर इ.सारख्या आऊटर भागात विकासाची खरी गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादीत केले.
ऐतिहासिक अश्या अजनीला उधवस्त करण्या ऐवजी लोधी स्टेट,सासण यासारखे आर्ट म्यूझियममध्ये रुपांतरीत करण्यात यावे अशी मागणी संस्थेच्यावतीने काळे यांनी याप्रसंगी केली.
प्रकल्पाऐवजी ‘पर्यावरण व पर्यटन’ गडकरी यांनी डेव्हलप करावं असे आवाहन संस्थेने केले.आधीच शहरातील लहान मूलांना या शहरात पर्यटनामध्ये दाखविण्यासारखे काहीच नाही,अजनीला बर्ड वॉचिंग गार्डन बनवा ना?५० प्रकारच्या पक्षी बघण्यासाठी तिकीटे लावा,रेल्वे कॉलनीतील हेरिटेज इमारती बघण्यासाठी शुल्क लावा, हा उपक्रम नागपूरसाठी पर्यटानाचा एक महत्वचा बिंदू ठरु शकतो,ही कॉलनी आज भारताच्या पुष्कळ पुरातन अध्या जागेतून एक आहे.ही जागा पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास अजनी इंटर मॉडल स्टेशनपेक्ष्ा जास्त उत्पन्न मिळवून देऊ शकते असा दावा ही संस्थेच्या वतीने करण्यात आला.
पत्र परिषदेला शरद पालीवाल, संदीप पाथे,जयदीप दास, जोसफ जार्ज, श्रीकांत देशपांडे,सचिन काळे, कूणाल मोर्य, वासूदेव मिश्रा, चैतन्य ठाकरे,रोशन अरासपूरे आदी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा