

शहरातील पर्यावरणतज्ज्ञांचा प्रश्न
नागपूर,ता. १२ फेब्रुवारी: नुकतेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी २ हजार ११७.७१ कोटींच्या निधीची घोषणा केली.नाग नदीला प्रदुषणमुक्त करुन सौंदर्यीकरणाचे कार्य ही टप्प्याटप्प्याने होणार आहे.नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत केंद्र सरकार व जपानची वित्तीय संस्था जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी(जिका) यांच्यात फेब्रुवरी २०२० मध्ये चर्चा झाली होती.नुकतेच फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लीनने यांच्यासह कॉन्सिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई सोनिया बाब्री यांनी नागपूर महानगरपालिकेला भेट देऊन नाग नदीच्या संवर्धनासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली मात्र शहराच्या अनेक पर्यावरणवाद्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे,नदी कुठे आहे?
भारतात गंगा,यमुना,ब्रम्हपुत्रा,कावेरी इ.ज्या काही नद्या आहेत त्यांचा उगम कोणत्या ना कोणत्या डोंगरातून झाला असून अहोरात्र त्या उगमस्त्रोतातून नदी उगम पावत असते,वाहत असते मात्र नागपूरच्या नाग नदीचे उगमस्त्रोत जे पूर्वी दाभ्याला होते ते तर तीन दशकांपूर्वीच अतिक्रमणाच्या विळख्यात आणि मानवाच्या विकासाच्या हावरटपणामुळे लृप्त झाला आहे.आता नाग नदीत(नाल्यात)जो काही प्रवाह वाहतो आहे ते शहरभराचे फक्त ‘सांडपाणीच’ आहे.
नाग नदीत फक्त पावसाळ्याच्या दिवसात अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारका मागील पॉईंटमधून जो ओव्हरफ्लो होतो,तेच एकमेव पाणी नाग नाल्यात वाहते मात्र तरीही त्याला नदीचे पाणी नाही म्हणू शकत कारण ते एका तलावाचे अतिरिक्त झालेले पाणी अाहे.विशेष म्हणजे अंबाझरी तलावाला स्वत:ला उगमाचा कोणताही स्त्रोत नाही तर पावसाळ्यात जे पाणी आभाळातून कोसळतं तीच अंबाझरी आहे असे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात.
मग ज्या नदीचा उगमस्त्रोतच गेल्या तीन दशकात लृप्त पावला आहे त्या नागनदीचे सव्वा दोन हजार कोटी खर्च करुन नेते सांगतात त्याप्रमाणे,पुनरुज्जीवन केले तरीही, नाग नदीत पाणी आणणार कुठून?पाऊस १२ महिने तर कोसळत नाही,फक्त अंबाझरीवरुन वाहत येणारा ओव्हरफ्लो हा देखील जास्तीत जास्त पंधरा दिवस राहतो मग सव्वा दोन हजार कोटींच्या या प्रकल्पात केंद्र सरकार,राज्य सरकार आणि नागपूर महानगरपालिका तिघांच्या संयुक्त प्रयत्नाने,पाणी आणनार कूठून?हा प्रश्न पर्यावरणप्रेमींना चांगलाच छळत आहे.दाभामधून जी धार सतत वाहत होती तीच धार नाग नदीचे उगमस्त्रोत असल्याचा दावा केला जात आहे.
याशिवाय गोरेवाडामधून वाहत येणा-या व अंभोरा येथे संगम होणा-या नदीचे पाणी हे नाग नदीचे उगमस्त्रोत म्हटले जात आहे मात्र त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात.असे जर असते तर नाग नदी ही खळखळणारी दिसली असती.नाग नदीचे पुनरुज्जीवन करायचे असल्यास गडकरी यांना दाभ्यालाच जावे लागेल असे त्यांचे ठाम मत आहे.
नाग नदीत कितीही कोटींचा प्रकल्प राबविला तरी आता सिवरेजच्या घाणेरड्या पाण्यासाठीच हा कोट्यावधींचा खर्च होणार असल्याचे सांगत कृपया मग याला नाग नदीचे ‘पुनरुज्जीवन’म्हणू नये अशी अपेक्ष्ा पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात.
नाग नदीत शहराचे ५३० एमएलडी पाणी सिवेजमध्ये परिवर्तीत होऊन सोडले जात आहे.यापैकी ३५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते.तज्ज्ञ सांगतात महानगरपालिका ही नाग नदीसाठी दोन प्रकल्प राबवित आहेत एक आहे नागनदी प्रदुषणमुक्त करणे व दुसरे आहे नाग रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट,यातच नागनदीकाठचे सौंदर्यीकरणही अंर्तभूत आहे. तरीही नाग नदी ही खळखळून वाहणारी नदीच नाही तर यात बोट चालणारच कशी?एवढी खोलीच या नाल्यात नाही.खोलीकरण करायला गेल्यास नदीकाठचे कठडे कोसळतील.
खळखळून वाहण्यासाठी नाग नदीला कन्हान नदीसोबत जोडावे लागेल.नाही तर नाग नदीच्या मध्ये अनेक ठिकाणी ‘चेक डॅम’ बनवावे लागतील.दोन बाय सातच्या सिमेंट क्रांक्रीटच्या भिंतीत नाल्याचे पाणी थांबवून बोट चालवणे कसे शक्य आहे?अश्या पाण्यात निखळ आनंद तरी मिळणार आहे का?असा प्रश्न उपस्थित करुन शेवटी नाग नदीचे पुनरुज्जीवन म्हणजे काय?पाणी आणनार कूठून?गोरेवाडा कि अंभो-यातून?अंबाझरीचा वर्षातून १५ दिवस वाहणारा ओव्हर फ्लो हा काही नाग नदीचा उगमस्त्रोत नाही,मग नाग नदीचे पुनरुज्जीवन म्हणजे काय?पुन्हा हाच प्रश्न पर्यावरणतज्ज्ञ उपस्थित करीत आहेत.
गडकरी यांनी प्रस्तावित केलेल्या प्रकल्पामध्ये नदीत येणारे सांडपाणी अडविणे किवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे,प्रसाधनगृह इ.कामे प्रकल्पांतर्गत होणार आहे.शहराच्या सौंदर्यांतही कदाचित यामुळे भर पडेल मात्र यामुळे नाग नदीचे ‘पुनरुज्जीवन ’कसे होणार?वाहते पाणी आणणार कूठून?
अंबाझरी तलावातून नदी उगम पावते,हा महापालिकेचा दावा ही सपेशल फसवा असल्याचे सांगून अंबाझरी तलावालाच मूळ उगमस्त्रोत नसून तो पावसाचे पाण्याचा तलाव असल्याचा दावा ते करतात,मग ज्याला स्वत:चा उगमस्त्रोत नाही तो नाग नदीचा उगमस्त्रोत कसा होऊ शकतो?असा प्रश्न ते उपस्थित करतात.
शहरी भागात नाग नदीची लांबी १५.६८ किमी आहे.याशिवाय शहरात पिवळी व पोहरा नदी देखील आहेत.यात देखील संपूर्ण शहराचे सांडपाणी सोडण्यात आले आहे.
शेवटी सव्वा दोन हजार कोटींचा हा प्रकल्प म्हणजे केवळ सांडपाण्याची अत्याधूनिक व्यवस्था निर्माण करणे होय,या प्रकल्पात १०७ मॅनहोल वळण व ४८.७८ इंटरसेप्टर गडरची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापौरांनीच सांगितले.
याचा अर्थ गडकरी असोत किवा महापौर, सव्वा दोन हजार कोटींचा हा प्रकल्प नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी नसून फक्त सांडपाण्यासाठीच असल्याचा दावा शहरातील अनेक पर्यावरणप्रेमींनी केला असून अनेकांनी तर नाग नदीच्या पुनरुज्जीवनावर प्रश्नांकित स्टेट्सच ठेवले आहेत,नाग नदीच्या पुनरुज्जीवनाच्या या तथाकथित प्रकल्पात नाग नदीत ‘पाणी’ आणणार कूठून? पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेला हा ट्रेड मार्क सोशल मिडीयात चांगलाच व्हायरल केला आहे.




आमचे चॅनल subscribe करा
