Homeनागपूर न्यूज‘अनावधानाने’ कोराडी मंदिराची जागा भारतीय विद्या भवन्सच्या नावे!

‘अनावधानाने’ कोराडी मंदिराची जागा भारतीय विद्या भवन्सच्या नावे!


शासन दरबारी तलाठी काेराडी यांचे ऐतिहासिक निवेदन!

पत्र परिषदेत ॲड.सतीश उके यांचे धक्कादायक खुलासे

नागपूर,ता. १६ जानेवारी: कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दि. २८ डिसेंबर २०२० च्या मौजा कोराडी येथील फेरफार क्रमांक ५१०७ रद्द करण्याबाबतच्या पत्रात मौजा कोराडी येथील सर्वे क्र. २३८ आराजी १.९४ हेक्टर आर, ही जमीन फेरफारपूर्वी श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थान जाखापूरच्याच नावाने होती परंतु ’फेरफार’घेतांना सदर फेरफार हा ‘भारतीय विद्या भवन संसाकृतिक केंद्र कोराडी’ यांच्या नावे घेण्यात आली. त्यानुसार सध्यास्थितीत ७/१२ ला श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी जाखापूर यांचे नाव कमी करून भारतीय विद्या भवन संसाकृतिक केंद्र कोराडीच्या नावे ७/१२ ला दर्ज करण्यात आला मात्र ही चूक ‘अनावधनाने’ झाली असून भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्र कोराडी, हे नाव भोगवटा सदरी दर्ज झाले परिणामी श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थान जाखापूर यांचे नाव भोगवटा सदरी पूर्ववत नमूद करण्याबाबत तलाठी कोराडी यांनी संदर्भीय प्रतिवेदन सादर केले असल्याचे तहसीलदार यांनी पत्रात नमूद केले.जगाच्या इतिहासातील ही पहीलीच व अंतिम अनावधानाने झालेली ‘शासकीय चूक’ असल्याची घणाघाती टिका ॲड.सतीश उके यांनी आज प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्र-परिषदेत केली .

या संपूर्ण प्रकरणावर दि. २८ नोव्हेंबर २०२० रोजी पोलीस स्टेशन कामठी , नागपूर यांना संपूर्ण कागदोपत्री पुराव्यानिशी महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीचे अहित करणारे आणि सरकारी अभिलेख यांच्यावर बेकायदेशीर कामे ई. अपराधिक षडयंत्र करणारे तत्कालीन उर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे साथीदार तसेच या संपूर्ण गैरव्यवहारात इतर सहभागी व्यक्तींवर भा. द. वी. चे कलम ४६५ , ४६६, ४६७, ४६८, ४७१, १६६, १६७, १२० – ब, ४२०, १९९, २००, १९३ २१९, ३४ अन्वये कारवाई करण्याची तक्रार नोंदविण्यात आली होती मात्र या प्रकरणात देखील नेहमीच्या‘ परंपरेनुसार ’ प्रभावशाली राजकीय व्यक्तीच्या प्रभावखाली येऊन अद्याप पोलिसांतर्फे कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे ॲड.उके यांनी सांगितले.

यापूर्वी उपविभागीय अधिकारी मौदा येथील वंदना सौरंगपते यांनी देखील वरील जमिनीचा महसूल ‘भारतीय विद्या भवन संसाकृतिक केंद्र’ हे नोंदणीकृत दस्त क्र. ५७०६/२०१८ दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी दुय्यम निबंधक कामठी येथे लिहून देऊन या गैरकायदेशीर कृत्यात सहभाग घेतला असल्याचा आरोप ॲड.उके यांनी केला.

नागपूर महानगर विकास प्राधिकरण(एमएमआरडी) यांनी वरील जमीनीवर बांधकाम झाल्या नंतर ही बाब दुर्लक्षित करून अकृषिक परवानगी ‘भारतीय विद्या भवन सांसकृतिक केंद्र कोराडी’ यांना मालक दाखवून मिळवून देण्याची शासकीय कारवाई पार पाडली, यावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या अकृषिक आदेशावर गुपचूप स्वाक्षरी केल्याचा आरोप ॲड.उके यांनी केला. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी असे निर्देश दिले होते,अशी माहिती प्राप्त झाली असल्याचे उके हे म्हणाले.

जर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून निर्देश दिले गेले नसतील तर राज्यपाल यांनी या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.राज्यपाल सध्या विदर्भातील व्याघ्र पहाण्यात व्यस्त आहेत मात्र ते सध्या नागपूरला आलेच आहेत तर त्यांनी त्यांच्या पदाच्या आणि नावाच्या अनुषंगाने झालेल्या किंबहूना जिल्हाधिकारी ठाकरे यांनी अवैध दस्तावेजावर जी स्वाक्ष् री केली ती पाहूण जावी किवा त्याची चौकशी करावी,अशी मागणी ॲड.उके यांनी याप्रसंगी केली.

भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राच्या संचालक अन्नपूर्णा शास्त्री यांनी दि. ४ डिसेंबर २०२० रोजी वरील जमीन ख. क्र. २३८ मौजा कोराडी तहसील कामठी नागपूर याच्या त्याच मालक आहेत असे १००/- च्या स्टँम्प पेपरवर खोटे प्रतिज्ञापत्र लिहून दिले तसेच दि. ३ डिसेंबर २०२० रोजी क्षतीपूर्ती बंधपत्र २००/- रुपयांच्या स्टँम्प पेपरवर सदर जमिनीवर माझा मालकी हक्क दर्शविणाऱ्या कागदपत्रांसह अर्ज सदर केला आहे’असे सुद्धा लिहून दिले.

भारतीय विद्या भवनातर्फे संचालिका अन्नपूर्णा शास्त्री यांनी (महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे) यांच्या समक्ष दि. १३ नोव्हेंर २०२० रोजी स्वाक्षरी केली . या कामात माजी उर्जामंत्री व पालकमंत्री चन्द्रशेखर बावनकुळे हे प्रमुख मार्गदर्शक आणि विश्वस्त असलेले श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे सचिव यांनी दि. ७ ऑक्टोबर २०२० रोजी ना हरकत पत्र दिले!विशेष म्हणजे कोराडी जगदंबा प्रकल्प हा जनहितार्थाचा प्रकल्प होता.याला ७ जुलै २०१७ रोजी शासनाची मान्यता मिळाली होती मात्र चंद्रशेखर बावणकुळे हे नाट्यमयरित्या १० नोव्हेंबर २०१८ रोजी संस्थेचे विश्‍वस्त पदी रुजू झालेत.यानंतर आई जगदंबेच्या लाखमोलाच्या जागेचा व लाखो भक्तांच्या श्रद्धेचे ठिकाण असणारी ही जमीन खासगी संस्थेच्या घशात घालण्याचा डाव रचण्यात आला,असा आरोप त्यांनी केला.
तहसीलदार अरविंद हिंगे कामठी यांनी दि. २७ जुलै २०२० च्या पत्रात ही जमीन भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्र कोराडी यांनी धारण केली आहे,असा अहवाल दिला यानंतर दि. २६ ऑक्टोबर २०२० रोजी तहसीलदार जगदाळे यांनी ’ही जमीन भारतीय विद्या भवन यांना मिळाली आहे’ या स्वरूपाचा अहवाल दिला!

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नागपूर यांनी माहिती अधिकारात पत्र दि. ११ डिसेंबर २०२० रोजी वरील जमीन ख. क्र. २३८ त्यांच्या रेकॉर्डवर तसेच जमीनीच्या हस्तांतरणा बाबतचे प्रकरण त्यांच्या कार्यालयात दाखल झाल्याचे दिसून येत नाही , असे उके यांना कळविले,अशी माहिती ॲड.उके यांनी दिली .माहितीच्या अधिकारात आम्हाला पूर्ण माहिती प्राप्त झाली नाही मात्र महत्वाची माहीती प्राप्त झाली,असे त्यांनी सांगितले.

माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेच विधान आहेत की ही जमीन त्यांना तामिलनाडूचे राज्यपाल बनवारीलाला पुरोहित यांनी राष्ट्रीय स्मारक बनविण्याकरिता मागितली आहे!महामहीम राज्यपाल पुरोहित हे ज्या मूळ गाव मारवाडचे आहेत त्या गावात त्यांनी श्रीरामाचा एक साधा शिलालेखही बसवला नाही मात्र नागपूरात आई जगदंबेच्या अतिशय मोक्याच्या जागेतील भूमी त्यांना श्रीरामाचे राष्ट्रीय स्मारक बनवण्यासाठी हवी असल्याकडे त्यांनी लक्ष् वेधले.त्यातही हे त्यांचे खासगी स्मारक प्रकल्प असणार असून भक्तांवर या ठिकाणी प्रवेशासाठी शुल्क आकारल्या जाणार असल्याचे नमूद केले आहे,त्यातही ९० टक्के शुल्काची रक्कम ही पुरोहित यांची भारतीय विद्या भवन ही संस्था ठेवेल तर फक्त १० टक्के शुल्क हे काेराडी संस्थेला मिळेल,अशी तजवीज म्हणजेआई जगदंबा इतकी गरीब झाली का की तिचीच जमीन आणि तिलाच फक्त १० टक्के वाटा?असा संतप्त सवाल ॲड.उके यांनी केला.

वरील जमीन मौजा – कोराडी ख. क्र. २३८ हि कोराडी देवस्थान यांच्या मालकीची ख. क्र. १६४,१६५,१७०/३,१७१/२,१७१/४,१७२,१८७,२३२ व २३४ या जमिनीच्या बदल्यात शासना सोबत अदलाबदल करून मिळविली,असा आरोप करीत या मूळ जमिनीवर शासकिय अनुदानातून श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थान प्रकल्प मंजूर झाला होता त्यावर व्यावसायिक संकुल A,B,C,D ; पुजारी निवास , भक्ती निवास ; T.R.C. इमारत होणार होती त्याकरिता नगर रचना विभाग यांनी दि. ७ सप्टेंबर २०१७ च्या पत्रान्वये हा प्रकल्प जनहितार्थ असल्याने वरील इमारतीच्या समास अंतरामध्ये शिथिलता मंजूर केली होती मग जनहितार्थ प्रकल्पातील जमीन खासगी संस्थेला देण्याचा घाट कसा घालण्यात आला?कोणी घातला?या मागील मोेठे मासे कोणते?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सर्वात क्लेषकारक बाब म्हणजे वरील प्रकाल्पातील जमीन महामहिम राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केलेल्या मागणीपोटी केवळ ३.५ कोटी रुपयात ९० वर्षां करिता त्यांच्या घश्यात घालण्यात आली, लुबाडण्यात आली व वरील नमूद केल्याप्रमाणे गैरकायदेशीरपणे त्यांच्या खासगी संस्थचेच्या मालकीची दाखविण्यात आली. या गैरव्यवहारासाठी बनावट दस्त तयार करण्यात आले आणि वरील गुन्हेगारी कृत्य करण्यात आले. कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवी आणि तिचे भक्त यांच्या श्रद्धेचे, भक्तीची फसवणूक शासकीय अधिकारी यांना दबावात घेवून करण्यात आल्याचा आरोप याप्रसंगी ॲड.उके यांनी केला.

बावणकुळे यांचा बोलविता धनी इतर कोणी!
माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी जरी सकृतदृष्टया या सर्व जमिनींचा व्यवहार तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यासाठी केला असला तरी त्यांच्यात एवढी तल्लख बुद्धि नाही असे सांगत बावणकुळे यांच्या संपूर्ण जमीन व्यवहारामागे त्यांचा बोलविता धनी कोणी औरच असल्याचे ॲड.उके म्हणाले.एवढेच नव्हे तर ताहयात बावणकुळे हे भारतीय जनता पक्ष् सोडून जाऊ शकत नाही एवढे गैरकृत्य त्यांच्याकडून त्यांच्या बाेलविता धन्याने करवून घेतले आहेत की ते भाजप सोडून जाताच त्यांच्यामागे ईडी,सीबीआय,इन्कम टॅक्सचा ससेमिरा लागेल,अशी पुश्‍ती ही त्यांनी जोडली.

आमच्या तक्रारी वर अद्याप पोलिसांकरवी कोणतीही कारवाई झाली नसल्याने येत्या १५ दिवसात आम्ही न्यायालयाचे दार ठोठावू,असा इशारा त्यांनी दिला.आई जगदंबेची जमीन परत संस्थानाला परत मिळावी,दोषींवर कारवाई करावी,प्रशासनाला आम्ही भरपूर वेळ दिला,आता अंतिम लढा न्यायालयात दिला जाईल,तिथेच आई जगदंबेच्या कृपेने आम्हाला न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Latest बातम्या