

महापौर पदग्रहण समारंभात केला सूतोवा
नागपूर,ता. ७ जानेवरी: करोनासारख्या जागतिक महामारीमुळे गेल्या वर्षभर महापालिकेतही जणू जगासोबतच सर्व काही थांबलं.यामुळे गेल्या एका वर्षात कोणतीही विकास कामे होऊ शकली नाही,पुढे देखील फक्त आठच महीने हातात असल्याने गेल्या वर्षीचा बॅकलॉग भरुन काढत दोन वर्षांचे काम एकाच वर्षात पूर्ण करणार,असा सूतोवाच नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला.
मनपा मुख्यालयाच्या परिसरात आयोजित पदग्रहणाच्या भव्य सोहळ्यात ते बोलत होते.याप्रसंगी मावळते महापौर संदीप जोशी यांनी तुळशीचे रोप देऊन त्यांचे स्वागत केले व आपला पदभार सोपवला.याप्रसंगी मंचावर खा.विकास महात्मे,आ.कृष्णा खोपडे, आमदार व भाजप शहराध्यक्ष् प्रवीण दटके, उपमहापाैर मनीषा धावडे, विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे,स्थायी समिती अध्यक्ष् पिंटू झलके,माजी आ. अनिल सोले,माजी आ.सुधाकर देशमुख,माजी आ. सुधाकर कोहळे,मा.आ.डॉ.मिलिंद माने,माजी महापौर नंदा जिचकार,माजी महापौर मायाताई इवनाते,अर्चना डेहनकर,प्रतोद दिव्या धुरडे आदी उपस्थित होते.
आपल्या नेहमीच्या शैलीतील प्रभावी भाषणात पुढे बोलताना नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले,की मनपा आयुक्त राधाकृष्णन यांच्या नावातच ‘कृष्ण आणि राधा’दोन्ही शब्द समाविष्ट आहे.या नावातील राधा हा शब्द सौम्याचे प्रतीक आहे. हे सौम्य राधाकृष्णन यांच्यामध्ये जागृत करुन त्यांच्यासोबत मिळून कार्यभार करु व नागपूर शहर सुंदर बनविण्याचा प्रयत्न करु.माजी आयुक्तांच्या नावातच तुकाराम शब्द होता आणि संत तुकारामांचा हा अभंगच आहे ‘तुका म्हणे उगी राहवे…जे जे होते ते ते पहावे’माजी आयुक्त वर्षभर हे ‘उगीच’ राहीले,ते आता नाहीत त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही टिपण्णी करणार नाही.मात्र त्यांच्या कार्यकाळात शहरातील विकास कामांचा जो काही बॅकलॉग राहीला ते पूर्ण करण्याची जवाबदारी आता माझ्यावर असल्याचे ते म्हणाले.
२०२१ ची सुरवात झाली आहे. २०२० चे पूर्ण वर्ष कराेनात जरी गेले तरी त्याविरोधात फक्त मनपाने लढाई लढली नाही तर समाजातील अनेक स्वयंसेवी संघटनांनी मिळून एका विराट स्वरुपात ही लढाई लढली.मग नागरिकांच्या अारोग्याचा प्रश्न असो,अखंडीत गरीबांच्या भोजनाची व्यवस्था असो,प्रवासी मजूरांचा प्रश्न असो ज्या पद्धतीने या संघटनांनी मनपासोबत जुळून काम केले ते खरंच कौतूकास्पद असून त्यासाठी मी शहरातील त्या समस्त सामाजिक संघटनांचे आभार मानतो.
२०२१ हे अंतिम वर्ष आहे कारण पुढील वर्षी फेब्रुवारीत मनपाच्या निवडणूका आहेत.तत्पूर्वी दोनदा आचार संहिता लागेल.परिणामी दोन वर्षांचे काम मला एकाच वर्षात पूर्ण करायचे आहे,असा निर्धार व्यक्त करीत हे काम एकट्याने होऊ शकत नाही. मनपा आयुक्त हे यासाठी निधी उपलब्ध करुन देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी माजी महापौर संदीप जोशी, आ.कृष्णा खोपडे, भाजप शहराध्यक्ष् प्रवीण दटके,विराेधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांची समयोतिच भाषणे झाली.
महापौरांचा आयुक्तांना गर्भित इशारा-
मनपा अायुक्त दोन वर्षांचा निधी मला एकाच वर्षी उपलब्ध करुन देतील असा विश्वास व्यक्त करतानाच महापौर दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांना अप्रत्यक्ष् पणे गर्भित इशारा देत माझ्या नावातच ‘दया आणि शंकर‘असल्याकडे लक्ष् वेधले. बहूजन वर्ग हा सर्वस्वी शंकराचा भक्त असतो.एकमेव भगवान शंकरांच्या दरबारातच उंदराला खाणारी मांजर,मांजरीला खाणारा श्वान,नंदीला खाणारा वाघ हे गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात.परिणामी जे युद्ध गेले वर्षभर आम्हाला आयुक्तांसोबत बघायला मिळाले ते या पुढे बघायला मिळणार नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोणत्याही नव्या आयुक्तांसाठी मी आधी ‘तिवारीजी’ असतो यानंतर मी ‘दयाशंकरजी’ होतो,शेवटी मी त्यांच्यासाठी ‘भैया‘होत असतो मात्र हा भैया मुंबईचा नव्हे बरं का!अशी मिश्किली देखील त्यांनी केली.ऑक्सफोर्डसाठी नुकतीच करोना लस निर्माण करणारे डॉ.थोरात यांचेच वक्तव्य आहे,करोना ही जगापुढील एकमेव त्रासदी नाही,या पुढे देखील भयावह त्रासदीचा सामाना मनुष्यजातीला करावा लागू शकतो,परिणामी अश्या त्रासदीसाठी आता फक्त संकटकाळातच नव्हे तर वर्षाच्या ३६५ दिनी मनपा ही शहरातील सर्व सामाजिक संघटनांसोबत काम करण्याचा प्रयत्न करेल असे ते म्हणाले.
हे नितीनसुद्धा काम करतील-
मला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात १९९७ पासून काम करण्याचे सौभाग्य मिळाले.या दोघांनीही नागपूर शहराच्या विकासासाठी एक स्वप्न बघितले आहे.त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष्ांना सोबत घेऊन काम करण्याचे प्रयत्न करील.काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफूल्ल गुडधे पाटील हे समाेर बसले आहेत,मी स्थायी समितीचा अध्यक्ष् असताना निधी वाटपात राजकीय भेदाभेद केला नसल्याची ग्वाही तेच देतील.श्याम वर्धने हे शिक्ष् क असून त्यांना ही माझा तांडव माहीती आहे मात्र मनपा प्रशासन हे चांगल्याने काम करेल व मला तांडव करावे लागणार नाही,असा इशारा देखील याप्रसंगी दयाशंकर तिवारी यांनी दिला.
गडकरी हे पालकमंत्री असताना त्यांनी या शहरासाठी खूप काही केले.गडकरी यांच्यासारखेच शहरातील दुसरे ‘नितीन’हे देखील विकासासाठी खूप काही काम करतील असा आशावाद व्यक्त करीत मी यादी जर घेऊन बसलो तर आमच्या ‘नितीन’यांनी सगळे राजकीय भेदाभेद बाजूला ठेऊन विकासासाठी जे केले ते त्यांना सांगता येईल.मीच त्यांच्याकडे निवेदन घेऊन जाणार असल्याचे सांगत पालकमंत्री नितीन राऊत यांना टोला हाणत शहरात चार मंत्री आणि चार आमदार असताना सर्वांच्या प्रयत्नातून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

९९ वर्षीय आईसमोर पदग्रहण: मोदींचे स्मरण
या प्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या ९९ वर्षीय आई त्यांना आशिर्वाद देण्यासाठी समोरच्या रांगेत बसल्या होत्या.माझ्या आईंच्या डोळ्यांदेखत मी पदग्रहण करीत आहे हे मी माझे सौभाग्य समजतो,असे भावपूर्ण उद् गार दयाशंकर तिवारी यांनी काढले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पदग्रहण करताना आपल्या आईला समोरच्या रांगेत बसवून आर्शिवाद घेतले होते.परिणामी दयाशंकर तिवारी यांचा पदग्रहण सोहळा हा देखील ‘प्रति मोदी‘झाल्याचा भास अनेकांना झाला. मी ९ व्या वर्गात शिकत होतो तेव्हापासून तीच माझी संपूर्ण पालक झाली कारण माझ्या वडीलांचा मृत्यू झाला होता.करोना विषाणूने तिला देखील सोडले नाही. तिला करोनाची बाधा झाली,संपूर्ण कुटुंब काळजीत पडले.शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांचा फोन आला.आईंचे वय खूप जास्त असल्यामुळे त्यांना शहरातील नामांकित रुग्णालयात भर्ती करु या मात्र मी यासाठी नकार दिला कारण माझ्या दारावर येणा-या अनेक नागरिकांना मी मेयो,मेडीकल व एम्समध्ये भर्ती होण्याचा सल्ला दिला,माझ्या नागरिकांना मी सरकारी रुग्णालयात भर्ती होण्याचा सल्ला दिला मग मी माझ्या कुटुंबियांना कसा खासगी रुग्णालयात उपचार करणार?माझ्या कुटुंबातील एकूण ६ कुटुंबिय हे करोनाबाधित झालेत मात्र सर्वांनी मेयो रुग्णालयातच उपचार घेतल्याची स्पष्टता त्यांनी केली.माझी आई तब्बल १७ दिवस मेयामध्ये उपचारासाठी भर्ती होती.तिचा ऑक्सीजन लेवल ८४ पर्यंत घसरला असताना तिने करोनाविरुद्ध चिवट लढा दिल्याचे त्यांनी सांगितले.अश्या आई शारदेचा मी पूत्र असून माझ्या आईचे नावच शारदा असल्याचे ते म्हणाले.आज माझ्यासाठी जे काही गौरवउद् गार या मंचावरुन माझ्या जन्मदात्रीसमोर काढण्यात आले त्या मागे मी माझ्या आईचेच आर्शिवाद समजतो.
जवाबदारी आणि..भीतीही!
याप्रसंगी बोलताना महापौर म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून मी महापौर होणार असल्याने सोशल मिडीयावर जे काही वातावरण तयार झाले ते बघून अत्यधिक आंनद तर होतो मात्र जवाबदारी किती मोठी आहे याचं देखील आकलन होतं,जाणीव होते आणि दडपणही येतं.भीती ही वाटते.कारण आशेसोबतच निराशेची देखील संभाव्यता असतेच.माझ्यामुळे माझ्या शहरातील नागरिकांना निराशेचा जर सामना करावा लागला तर ते मी बघू शकणार नाही.परमेश्वर मला अशी कोणतीही निराशा बघू न देण्याची ताकद देवो.शेवटी त्यांनी ‘औरो को बदलते हो तो खुद को बदलना सीखो,शंकर बनना है तो विष का घूट पिना सीखो,उजालो की परिभाषा है तो अंधेरो में भी जलना सीखो,उजाला पाना है तो…खूद दिपक बनकर जलना सीखो’ही शायरी म्हणत ‘आत्मदीप भव’या तत्वानुसार कार्यभार करणार असल्याचे सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
