

जलसंपदा विभाग व प्रशासन शेतकरी आत्महत्यांसाठी कारणीभूत!
बँका कर्ज देतात पण व्याज काढून घेतात:सरकारी मदत फक्त कागदोपत्री
चार वेळा अतिवृष्टि मात्र एकाच अतिवृष्टिसाठी एकच मदत जाहीर
नागपूर,ता.१९ सप्टेंबर २०२२: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार असल्याची भीम गर्जना केली होती,यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टिमुळे सर्वाधिक आत्महत्या घडत असताना हाच का मुख्यमंत्र्यांचा शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र?असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सिव्हिल लाईन्स स्थित शिवसेना संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत केला.
ते सध्या विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाच्या दौ-यासाठी विदर्भात आले असून आज त्यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील बारा ते तेरा गावांचा दौरा केला.सायंकाळी नागपूरला परत आल्यावर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.यावेळी बोलताना ते म्हणाले,की विदर्भात शेतकरी आत्महत्या व अतिवृष्टिचा आढावा घेण्यासाठी ते आले असून गेल्या दोन-तीन महिन्यात विदर्भात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे सर्वाधिक आहे,त्यामुळे मुद्दामुन या जिल्ह्याचा दौरा आधी केला.
शेतकरी आत्महत्येबाबत सरकारी आकडे येत असतात मात्र शेतकरी आत्महत्यांकडे फक्त ‘आकडे’म्हणून बघायचे का?याच विषयावर सकाळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक ही झाली.प्रशासन शेतकरी आत्महत्येचे खरे आकडे पुढे आणत नाही,असा आरोप त्यांनी केला.१० ते १६ जुलै दरम्यान विदर्भात सातत्याने मुसळाधार पाऊस कोसळला.या अतिवृष्टिमुळे शेतक-यांनी शेतात पेरलेले सोयाबिन,तूर,कापूस,धानाची पिके नष्ट झाली.
अतिवृष्टिनंतरही शेतक-यांनी शेतात पावसाची उघडीप झाल्यावर शेतातील धान्याला नीट लावण्याचा प्रयत्न केला.काहींनी दुबार पेरणीही केली मात्र पुन्हा पावसाने दगा केला.त्यांच्यासोबत असे दोन ते तीन वेळा निसर्गाची अशी थट्टा घडल्यानंतरही सरकार व प्रशासकीयस्तरावर त्यांची दखलच घेण्यात आली नाही.
मुख्यमंत्र्यांनी मोठ्या दिमाखात,उपकार केल्यासारखे तीन हजार कोटींची मदत शेतक-यांसाठी जाहीर केली मात्र एक रुपयाही अद्याप शेतक-यांना मिळाला नाही.जिल्हाधिकारी व तहसीलदाराकडे फक्त आकडे येऊन पडले.दोन दिवसात हा निधी देण्यात येईल,अशी घोषणा करण्यात आली मात्र तातडीने मदत मिळालीच नाही.शासनाने कमालीचे दुर्लक्ष केले,पुरोगामी महाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्या या दूर्देवी असल्याचे ते म्हणाले.
यवतमात्र जिल्ह्यात अश्ाी ३३ हजार प्रकरणे आहेत.ज्यांना बँकांद्वारे कर्ज पुरवठा करण्यात आला मात्र या बँकानी एक लाखाचे कर्ज देताना ७५ हजार रुपयांचे व्याज कापून घेतले त्यामुळे या कर्ज योजनेचाही शेतक-यांना काहीच लाभ झाला नसल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.आघाडी सरकारने शेतक-यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफी दिली होती मात्र बँकांच्या या धाेरणामुळे शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी शेतक-यांविषयी सरकारचं प्रेम हे पुतनामावशीचं प्रेम असल्याची टिका करीत, अतिवृष्टिमुळे यवतमाळ जिल्ह्यात ज्या शेतक-यांची जनावरे वाहून गेेली त्यांची देखील गणना प्रशासनाने योग्यरित्या केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.मृत जनावरांच्या शवविच्छेदनाचे अहवाल सादर केल्यावरच शासकीय मदत मिळू शकते मात्र ज्या शेतक-यांची जनावरे पुरात वाहून गेली त्यांनी असा अहवाल कुठून आणावा?त्यांना मदत हे सरकार कशी देणार?जनावरांच्या संदर्भात शासकीय मदत देताना परिस्थितीजन्य पुरावे असावेत असा नियम आहे.ग्राम पंचायत दर पाच वर्षांनी जनावरांची माेजदाद म्हणजे पशुगणना करीत असते.जनावरांच्या लशी,निशाणी यामुळे पुरावा मिळत असतो मात्र प्रशासनाकडे याबाबत एक ही रेकॉर्ड उपलब्ध नाही,ही अतिशय निषेधार्ह्य बाब असल्याचा संताप ही त्यांनी व्यक्त केला.
अतिवृष्टिमुळे शेत जमिनी खुरडल्या गेल्या.अतिवृष्टि ज्या गावात झाली नाही त्या गावात देखील शेतकरी आत्महत्या झाल्या.जिल्ह्यात सिंचनासंबंधी अपर वर्धा,लोअर वर्धा व बेंबळा ही तीन प्रकल्पे उभारण्यात आली मात्र जलसंपदा विभागातर्फे पाण्याचा योग्य विसर्ग केला गेला नसल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले.धरणांमधून पाण्याचा प्रचंड विसर्ग जलसंपदा विभागाने केला त्यामुळे ज्या गावात अतिवृष्टि झाली नाही त्या ठिकाणी देखील केवळ या विभागाच्या कारभारामुळे शेतकरी आत्महत्या झाल्या,असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.शेतकरी आत्महत्यांसाठी प्रशासन व जलसंपदा विभाग जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
अतिरिक्त पाणी सोडल्याने शेतकरी उधवस्त झाला.त्यातही प्रशसानाने तांत्रिक मुद्दे काढून अनेक शेतक-यांचे अर्ज नामंजूर केलेत.एका शेतकरी कुटूंबात शेती करणा-या नातवाने आत्महत्या केली मात्र शेती त्याच्या किवा वडीलांच्या नावे नसून आजोबांच्या नावे असल्याची सबब पुढे करुन त्या मृत शेतकरी नातवाच्या मदतीचा अर्ज प्रशासनाने नामंजूर केला.सरकारी मदत फक्त ’कागदोपत्री ’असल्याची टिका यावेळी अंबादास दानवेंनी केली.एका आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या विधवा पत्नीला ज्यांना, दोन लहान अपत्ये व वृद्ध सासू सासरे आहेत शिवसेना जिल्हा संघटनेतर्फे २५ हजार रुपयांचा मदत निधी देण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले.
उद्या भंडारा व गाेंदिया जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी बलात्कार पिडीत जिचा जबरीने गर्भपात करण्यात आला,त्या पिडीतेच्या कुटूंबाची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने नेमके काय करायला हवे?या प्रश्नावर बोलताना, सरकारने योग्य पंचनामे करायला हवे,तातडीची मदत शेतक-यांना द्यायला हवी.आधी या सरकारने दोन हेक्टर मदतीसाठी निश्चित केले यानंतर तीन हेक्टरपर्यंतची नुकसान भरपाई जाहीर केली.शेतक-यांच्या जमीनी पाण्यामुळे खरडून निघाल्या आहेत,त्याचे मोजमाप कसे करणार?शेतक-यांच्या खात्यात शासनाचा मदत निधी जमा झाला असता तर अनेक शेतक-यांनी आत्महत्या न करता तग धरली असती,असे ते म्हणाले.
दरवर्षी हेच घडतं या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का?या प्रश्नावर बोलताना,उद्या यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना शाखेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.याशिवाय नांदेड,संभाजी नगर,परभणी इत्यादी ठिकाणी देखील शिवसेना आक्रमक आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अतिवृष्टिच्या संदर्भात प्रश्न विचारला असता,अतिवृष्टि ही विदर्भात तीन ते चार वेळा झाली मात्र सरकारने फक्त एका अतिवृष्टिसाठी एकदाच मदत जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
एका प्रश्नाच्या उत्तरात नागपूरचा विकास हा फक्त नागपूरपुरतीच मर्यादित दिसत असून विदर्भात हा विकास कुठेही दिसत नसल्याची कोपरखळी त्यांनी मारली.विदर्भ विकासाच्या दृष्टिने मागास असून ‘विकासाचा’भंपकपणा यामुळे समोर आला,असे ते म्हणाले.उद्योग मंत्री शिवसेनेचेच हाते याकडे लक्ष वेधले असता,उद्योग मंत्री जरी शिवसेनेचे असलेत तरी नागपूरात मोठ मोठे मंत्री असून जे विदर्भाचे नेतृत्व करतात,विदर्भात उद्योग आणण्यात त्यांची भूमिका काय?असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
कृषि मंत्री अबदुल सत्तार हे शेतक-यांच्या घरी थांबून त्यांचे प्रश्न समजून घेत असल्याकडे लक्ष वेधले असता,कृषि मंत्री दररोज एका शेतक-याच्या घरी थांबले तरी वर्षातून ३६५ शेतक-यांपर्यंतच ते पोहोचू शकतील त्यापेक्षा तातडीने अतिवृष्टिसाठी शेतक-यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा,असा सल्ला त्यांनी दिला.विशेष म्हणजे एनडीआरएफच्या निकषानुसार तीन हेक्टरसाठी पूर्वी १० हजार कोटींची मदत जाहीर झाली हाेती,हे सरकार फक्त ३ हजार कोटींच्या मदत जाहीर करुन शेतक-यांची बोळवण करीत असल्याचे ते म्हणाले.
एका प्रश्नाच्या उत्तरात ७२ तासात विमा कंपन्यांकडे शेतकरी हे आपले प्रस्ताव सादर करुन ही दोन महिने झालेत विमा कंपन्यांनी स्थळ पाहणी देखील केली नसल्याचे ते म्हणाले.विमा कंपन्यांच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी आम्ही देखील संघटनेच्या पातळीवर आवाज उठवू,असा इशारा त्यांनी दिला.
शिवसेनेचे हिंदूत्व हे मवाळ झाले आहे का?सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील विदर्भ दौ-यावर आहेत,शिवसेना व मनसेच्या नेत्यांचा विदर्भ दौरा हा योगायोग आहे का?या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले व आज फक्त शेतकरी व अतिवृष्टिवरच बोलणार असल्याचे ते म्हणाले.
पत्र परिषदेत किशोर कनहेरे, राजू हरने,नितिन तिवारी ,मुन्ना तिवारी, आशिष हाडगे, शैलेन्द्र अंबिलकर, कार्तिक नितनवरे, तापेश सकूलकर,प्रीतम कापसे, भूपेंद्र काठाने,साबीर खान, अंगद हीरोंदे,नाना झोडे, दीपक पोहनकर,विशाल कोरके, लॉरेंस ग्रेगरी,अंकुश भोवते, मंगला गवरे, अभिषेक धुर्वे, गौरव शाहू, शहजाद शैख तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा