(रविवार विशेष)

खासदार सांस्कृतिक महोत्सवात महिलांना जागेवरुन उठून मागे बसण्याची सूचना!
केंद्रिय मंत्री यांच्या सुविद्य पत्नी कांचनताई गडकरी यांनी ही पाळली आयोजकांची सूचना!
नागपूरकर अचंभित:महिलांमध्ये तीव्र संताप
महिलांना मागे बसण्यास सांगण्या मागे मठाची पारंपारिक रित कि पुरुषी श्रेष्ठत्वाची भावना?
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२६ नोव्हेंबर २०२३: गेल्याच महिन्यात २४ ऑक्टोबर रोजी जगभराचे लक्ष एका घटनेने वेधले .ती म्हणजे आईसलँडमधील महिलांनी त्या देशाच्या पंतप्रधान काटरीन याकोब्सदोटर यांच्यासह एक दिवसाचा संप पुकारला!कारण काय?तर लिंग असमानता,महिलांना मिळणारे सामाजिक दुय्यम स्थान, निर्णय घेण्याची मुभा नसणे,वेतनातील असमानता,शारीरिक,मानसिक छळ आरोग्य,शिक्षण,हिंसा इत्यादी-इत्यादी.आइसलॅण्डच्या राजधानीतील मुख्य चौकात जवळपास पंचवीस हजार महिला जमल्या तर देशभर ठिकठिकाणी महीलांनी एकत्रित येऊन लिंग असमानतेकडे जगभराचे लक्ष वेधले.
आइसलॅण्ड या देशात १९७५ मध्ये ही याच लिंगभेदी मानसिकतेविरुद्ध संप पुकारला गेला होता,हे विशेष!याचा अर्थ ४८ वर्षांचा प्रदीर्घ काळखंड लोटल्यानंतरही त्या देशातील महिलांना पुन्हा एकदा संप करावा लागला.महत्वाचे म्हणजे गेली १४ वर्ष आइसलॅण्ड हा देश स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम,ग्लोबल जेंडर गॅपच्या अहवालाप्रमाणे जगात प्रथम क्रमांकावर आहे!या देशाची लोकसंख्या फक्त ३ लाख ७५ हजार ३१८ आहे.या तुलनेत भारतासारख्या १ अब्ज ३४ कोटी लोकसंख्या असणा-या देशात महिलांची काय स्थिती असणार?
संयुक्त राष्ट्र संघाचा २०२३ मधील अहवाल सांगतो,दहा पैकी नऊ व्यक्ती महिलांविषयी पूर्वग्रहदुषित दृष्टिकोन जाेपासत असतात,जगातील अर्ध्या लोकसंख्येचे हेच मत आहे.याच मताची आणखी एक प्रचिती नुकतीच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद् घाटनाप्रसंगी नागपूरकरांनी अनुभवली.
स्वामीनारायण मंदिराचे प्रेरक वक्ते ,समाजसुधारक व पूर्वाश्रमीचे मॅकेनिकल अभियंते असणारे डॉ.ज्ञानवत्सल स्वामी यांच्या हस्ते खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद् घाटन पार पडले मात्र,मंचावरील आयोजकांनी वारंवार महोत्सवासाठी उपस्थित महिलांना समोरच्या काही रांगा सोडून मागे बसण्याची सूचना केली!या मागे कोणतेही शास्त्रशुद्ध कारण सांगण्यात आले नाही.महिलांनी पुढील रांगेत बसू नये,मागे जाऊन बसावे,या सूचनेमागे नेमके आयोजकांना काय सूचित करावयाचे होते?महिलांना स्वामी ज्ञानवत्सल यांच्या सावलीपासून ही, किमान ५० फूटांच्या अंतरावर बसविण्या मागे नेमके कारण उठून मागे बसणा-या महिलांनाही उमगले नाही.विशेष म्हणजे खासदार सांस्कृतिक महोत्वाचा मंच हा प्रेक्षक आसनांपासून आधीच शेकडो फूटांच्या अंतरावर आहे!मग अशी सूचना करण्या मागील हेतू काय होता?स्वामीनारायण मंदिराची ही पंरपरा असेल की पुरुष समोर आणि महिला वर्ग मागे बसेल तर त्या नियमांची अंमलबजावणी मंदिरात ठिक आहे,महोत्सवात का करण्यात आली?
पुरोगामी महाराष्ट्राच्या उपराजधानीतील खासदारांनी आयोजित केलेल्या भव्य-दिव्य सांस्कृतिक महोत्सवातच भव्य अश्या मंचावरुन, आयोजकच महिलांना मागे बसण्याची सूचना करने व महिलांना आपापले आसन सोडून सहाव्या सातव्या रांगेत बसणे ही बाब अनेकांना खटकली,यात भरीस भर खासदार नितीन गडकरी जे या भव्य-दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे संकल्पक व संयोजक आहेत त्यांच्याच सुविद्य पत्नी कांचनताई गडकरी यांना देखील आपले नेहमीचे, पती समवेत बसणारे पहीले आसून सोडून मागे जाऊन बसणे भाग पडले,हे सर्व सुज्ञ मनाला कदापि न पटणारेच दृष्य होते.
मूळात महिलांना मागे बसण्याची सूचना म्हणजे,स्वामीजींना महिलांची जणू सावली ही वर्ज्य असणे, या मागे स्वामीनाराण पीठाची कोणती धार्मिक पंरपरा आहे का?या विषयीची कोणतीही माहिती आयोजक मंचावरुन करीत नव्हते, फक्त महिलांना आपापले आसन सोडून मागे बसण्याची सूचना करने हा धडधडीत उपस्थित प्रेक्षक महिलांचा अवमानच होता,यात यत्कींचित ही वाद नाही.
स्वमी ज्ञानवत्सल यांच्या नावातच ‘ज्ञान आणि वात्सल्य’हे शब्द आहेत,अश्या स्वामींचा एखाद्या सोहळ्यातील सार्वजनिक वावर मागास व बुरसटलेल्या परंपरेच्या आधारावर कसा असू शकतो?असा प्रश्न आता विचारल्या जात आहे.स्वामींनी आपल्या भाषणात मात्र जगभरातील तत्ववेते व त्यांचे चिंतन उत्तमरित्या मांडले,भारतीय जीवनपद्धतीची अनुभूती मांडली,भारतीय संस्कृतीतील ज्ञानाची आराधना मांडली,विचारधारेतील सकारात्मकता मांडली,संत तुकाराम महाराजांचा दृष्टांत मांडला,संस्कृती,परंपरा ज्ञानाच्या आधारावर भारत विश्वगुरु होणार असा विश्वास मांडला,जीवनात पवित्रता निर्माण करणारी भारताची संस्कृती मांडली मात्र,त्यांच्या या संपूर्ण विचारधनात भारतीय स्त्री ही कुठेही नव्हती,स्त्रीचे अस्तित्व,तिचे कतृत्व,तिचे ज्ञान,तिचा त्याग,तिची सहनशीलता,तिचा प्रामाणिकपणा,कुठेही अस्पष्ट असा उल्लेखाचा लवलेश ही स्वमी ज्ञानवत्सल यांच्या या ‘ज्ञानामृता’मध्ये आढळला नाही.
ज्या पद्धतीने गडकरी यांच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात अगदी उद् घाटनाच्याच दिवशी महिलांना मागे जाऊन बसण्याची ‘अमानवीय’ व तितकीच ‘असंवैधानिक’अशी सूचना करण्यात आली ते बघता, कदाचित त्यांच्या ज्ञानामृतामध्ये भारतीय संस्कृती,भारतीय पंरपरेत,भारतीय तत्वज्ञानात,भारतीय नीतीमूल्यात स्त्रीचे अस्तित्वच अमान्य असावे,तिची सावलीही अद्यापही स्वामीजींना काही फूटांच्या अंतरावर आजही असणे गरजेचं वाटत असावे, ते बघता हा सरळसरळ संपूर्ण भारतातील स्त्री वर्गाच्या आत्मसन्मानाला धक्का देणाराच प्रकार होता,असेच आता म्हणावे लागेल.
महत्वाचे म्हणजे कोट्यावधीच्या जाहीराती घेणा-या एका ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला,महोत्सवाच्या रंगारंग बातमी सोबत,आयोजकांच्या या कृतीचा निषेध नोंदवणारी अगदी साधी चौकट ही प्रसिद्ध करने गरजेचे वाटले नाही….!स्वामींच्या आज्ञेपेक्षा प्रसार-प्रचार माध्यमांची ही ‘अनास्था‘ त्यामुळेच धक्कादायक आणि तितकीच धोकादायक म्हणावी लागेल.
एकीकडे देशाचे पंतप्रधान ५० टक़्के लोकसंख्या असणा-या महिला वर्गाला स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवी वर्ष लोटल्यानंतरही फक्त ३३ टक्के राजकीय आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन संसदेच्या नव्या भवनात घोषणा करतात,ती देखील असमान लिंगभेदाची मानसिकता दर्शवणारीच एक कृती आहे.१९५२ मध्ये २२ महिला खासदार होत्या तर सध्या त्यांची संख्या फक्त १४.३६ टक्के म्हणजे ७८ एवढी आहे!३३ टक्के आरक्षणासाठी देखील भारतातील महीला वर्गाला तब्बल २७ वर्ष वाट बघावी लागली.
स्त्री- पुरुष श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाची हीच भावना मग, मणिपूरसारख्या याच महान परंपरावादी भारत देशाच्या लहानश्या राज्यात महिलांच्या स्त्री देहाला लज्जास्पद आणि मृत्यूसापेक्ष स्थितीत अलगद पोहोचवताना दिसतात मात्र ,स्वामी ज्ञानवत्सल यांच्यासारखे ज्ञानी, उज्वल व अभिमानास्पद भारतीय पंरपरांची उजळणी, खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या भव्य मंचावर हसतमुखाने करत असताना अश्या घटनांचा उहापोह टाळताना दिसतात कारण, कदाचित त्यांच्या लेखी महिला अद्यापही विदुषी असणा-या गार्गी,मैत्रेयीच्या या देशात पुरुषांपेक्षा मागे बसण्याच्याच पात्रतेच्या आहेत!
मनुस्मृतीत ’ढोल,गवार,पशु,नारी..ये सब ताडन के अधिकारी’अला उल्लेख करण्यात आला आहे,अर्थात ढोल,गवार,पशु आणि स्त्री यांना उठता बसता फक्त लाथा घाला,अशी मानसिकता ज्या देशात बहूसंख्यकांचा धर्मग्रंथच रुजवतो,तिथे अश्या धार्मिक आणि अध्यात्मिक गुरुंकडून दूसरी अपेक्षा ती भारतीय स्त्री काय करणार?दूखद क्षण तोच होता जेव्हा स्वत: खासदार गडकरींच्या पत्नी या देखील कोणताही विरोध न करता,ही सूचना एकून सात आठ रांग सोडून मागे बसल्या……..!
स्वामींनी ज्ञानामृत पाजल्यावर निरोप घेतला,त्यावेळी देखील निवेदक बाळ कुलकर्णी हे स्वामींचे प्रस्थान होईपर्यंत महिलांनी आपापल्या जागेवरच बसावे,यानंतर माता-भगिनींनी पुन्हा समोर येऊन आपले स्थान ग्रहण करण्याची धक्कादायक सूचना करुन मोकळे होतात….!
नागपूरकरांनी खासदार म्हणून ज्या नेत्याला देशाच्या संसदेत पोहोचवले त्यांच्याकडून या शहराच्या विकासासोबतच,आत्मसन्मानाच्या संरक्षणाची देखील अपेक्षा नागपूर शहरातील महिला वर्गाने निश्चितच केली आहे.मात्र,त्यांच्याच महोत्सवात एखादे जगदविख्यात स्वामी हे उद् घाटनासाठी येतात व त्यांच्याच मंचावरुन महिलांना आपापल्या स्थानांवरुन उठवून मागे बसविले जाते तेव्हा खासदार म्हणून,नेता म्हणून या शहरातील अर्धी लोकसंख्या असणा-या महिला वर्गाला ते या कृत्यासाठी,या भेदभावासाठी, या लिंगभेदी मानसिकतेसाठी तितकेच जबाबदार असतात,यात दूमत नाही.
नेहमी स्पष्ट बोलणारे गडकरी आयोजकांच्या या सूचनांचा समाचार घेताना दिसले असते तर त्यांच्या कतृत्वाला आणखी झळाली प्राप्त झाली असती,ते महिलांचा धडधडीत अपमान करणा-या अश्या या कृत्याविषयी अनभिज्ञ होते,असे देखील म्हणता येणार नाही कारण प्रत्येक महोत्सवात,प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या कुटूंबवत्सल पत्नी अगदी बरोबरीने एकाच सोफ्यावर बसलेल्या असतात.स्वामींच्या ज्ञानामृताच्या वेळी त्या अगदी मागे बसल्या होत्या,याचे कारण गडकरी यांना माहिती नव्हते का…..? कुठे गेला गडकरी यांचा स्पष्टवक्तेपणा?का नाही विरोध केला या सूचनेचा त्यांनी?कोणते दडपण होते खासदार यांच्यावर?उपराजधानीतील भव्य महोत्सवातील उद् घाटनपर भाषण आणि महाराष्ट्रातील विविध व्यासपीठांवर चालणारी सध्याची दिशाहीन,विकृत,मतलबी,ढोंगी आणि द्वेषमूलक भाषणे यात मग काय अंतर होते?
जगातील महिला व मुलींची परिस्थिती इतकी वेगाने खालावत आहे की,स्त्री आणि पुरुष यांना समान वागणूक तसेच अधिकार मिळायला आणखी किमान ३०० वर्ष तरी जावे लागतील,असे भाकीत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरस यांनी ही केले होते.त्यांच्या नजरेसमोर निश्चितच भारत हा देश ही असणार,महिलांना ज्याप्रकारे असमानतेची वागणूक खासदार सांस्कृतिक महोत्सवात देण्यात आली ते बघता गुटेरस किती सत्य बोलले,याचीच प्रचिती येते.
भारतासारख्या गौरवशाली इतिहास असणा-या देशात आणखी किती काळ भारतीय स्त्री ही धार्मिक,अध्यात्मिक,वैचारिक झुंडशाहीला व असमान वागणूकीला बळी पडत राहणार?स्त्री ही पुरुषापेक्षा कनिष्ठ असून ‘ताडन’ची अधिकारी असल्याची, आपलेच धार्मिक ग्रंथ पुरुषांवर बिंबवतात तेव्हा ३४ निरपराध विद्यार्थिंनीला शाळेत येऊन संपूर्ण गावकरी येऊन सहज मारहाण करुन जातात व यात त्यांना काहीच वैषम्य वाटत नाही,ही घटना देखील हेच सिद्ध करत नाही का?
बिहारच्या पाटणा येथील एका शाळेत भिंतीवर अश्लील मजकूर लिहून व येता-जात आचरट टोमणे मारुन त्रास देणा-या व प्रसंगी शारीरिक सलगी करु पाहणा-या मवाल्यांना सामूहिकपणे या ३४ विद्यार्थिंनीने खंबीरपणे विरोध करुन पिटाळून लावले,ही बाब पुरुषप्रधान देशात,पुरुषप्रधान मानसिकतेच्या बिहारच्या राजधानीतील गावक-यांना न पटल्याने त्यांनी शाळेत येऊन या विद्यार्थीनींना बेदम मारहाण केल्याची घटना काय सूचित करते?सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज ब्लॉकमधील दारपाखा गावातील त्या शाळेचे नाव होते ‘कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय!’
मेळघाटच्या वनपरिक्षेत्र अधिकारी(आरएफओ) ३५ वर्षीय दिपाली चव्हाण यांना पती राजेश चव्हाण यांना एक भावनिक पत्र लिहून आपली कतृत्ववान जीवनयात्राच संपवावी लागली.‘प्रिय नवरोबा…लिहून लिहून थकले,मला तुझी आठवण येत आहे.तुमच्यासोबत बोलत बोलत मी तुम्हाला हे पत्र लिहत आहे,माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जास्त प्रेम कारण…मी आता जीव देत आहे…!शिवकुमार या आखणी एका ‘ज्ञानी’वरिष्ठाने दिपालीच्या कतृत्वाचा राग धरुन तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले होते,ही मानसिकता कूठून रुजली?
खडकी येथील लष्करी रुग्णालयात काम करणा-या एका विकलांग महिलेवर चार जवानांनी मिळून बलात्कार केला…!ते तर देशाचे प्रहरी होते,पिडीत ही विकलांग होती मात्र या जवानांसाठी ती ‘मादी’होती,भोगवस्तू,त्यांच्यापेक्षा कनिष्ठ श्रेणीतील,ते जवान असले तरी पुरुष होते,जन्मजात श्रेष्ठत्वाचे बालकडू त्यांना या देशाच्या ‘ज्ञानी’माणसांकडूनच मिळाले असावे.३४ वर्षीय पिडीत विकलांग महिलेची ही तक्रार इंदूर येथील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने पुढे आली.हरुन रशीद,महंमद मुथाझिम,रवींद्र सिंह आणि अहिरवाल नावाच्या जवानांसाठी धर्म,पंथ,जात,प्रांत,भाषा पलीकडे एकच गोष्ट समान होती,पुरुषी श्रेष्ठत्व….!
नागपूरातील माफसुच्या एका सहायक प्राध्यपकाने चर्चासत्रासाठी कर्नाटक येथे गेल्यावर पशुवैद्यक विद्यार्थिनीची तिच्या खोलीत जाऊन शरीरसुखाची मागणी केली!तक्रार केल्यावर या प्राध्यापकावर माफसु प्रशासनाने केवळ एक वेतनवाढ रोखून कारवाई केली…!ही घटना काय सूचित करते?
याच देशात उन्नाव घडतं.खासदाराकडून तरुणीवर बलात्कार होतो,न्यायाच्या लढाईत तिच्यावर वकील व कुटूंबियांसहीत ट्रक चढविल्या जातो…!
सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्यावर देखील लैंगिक आरोप हाेतो नंतर तक्रारदार महिला माघार घेते…!शब्दकोषातले शब्दही वेदना व खंत मांडण्यास अपुरे पडतील अश्या असमानतेच्या वर्तवणुकीची व अमानवीय मानसिकतेची ‘ती’ची ही यादी फार-फार लांबलचक आहे…!
संसदेपासून सर्वोच्च न्यायालय,धार्मिक ग्रंथांपासून तत्ववेत्यांच्या मानसिकतेपर्यंत ,स्त्रीचे दुयमत्व ठलकपणे दिसून पडतं तरीही भारत हा विश्वगुरु होण्याची वल्गना जाहीरपणे केली जाते.अर्ध्या लोकसंंख्येला सन्मानाची,समानतेची वागणूक जोपर्यंत मिळणार नाही,भर महोत्सवात जागेवरुन उठवून मागे बसण्यास जोपर्यंत बाध्य केले जात राहील,ज्ञानी उद् घाटकांच्या भाषणात जोपर्यंत ‘ती’च्या अस्तित्वाचा,कतृत्वाचा उल्लेख होणार नाही तोपर्यंत भारत हा विश्वगुरु होण्याची वलग्ना ही फक्त ज्ञानियांच्या बोधवचनापुरतीच सिमित राहील,यात तीळमात्र शंका नाही.
…………………………………………..

आमचे चॅनल subscribe करा