
मिटकरींच्या विरोधात संविधान चौकात पौरोहित्य ब्राम्हणांचे निषेध-आंदोलन
नागपूर,ता. २२ एप्रिल २०२२: शिवव्याख्याते त्या नंतर संभाजी ब्रिगेड व्हाया राष्ट्रवादीचे आमदार झालेले अमोल मिटकरी यांनी नुकतेच इस्लामपूरच्या सभेत हिंदू विवाह प्रथेतील कन्यादान संस्काराची जी शेलक्या शब्दात टर उडवली त्यावर राज्यातील पौराेहित्य करणारा ब्राम्हण वर्ग पराकोटीचा दुखावला गेला.या विरोधात राज्यात ठिकठिकाणी मिटकरींच्या विरोधात आंदोलने,धरणे,निवेदने देऊन निषेध नोंदवला जात आहे.उपराजधानीत देखील संविधान चौकात मिटकरींच्या विरोधात पौरोहित्य करणा-या ब्राम्हण सभेच्या सदस्यांनी आज धरणे आंदोलन केले.
सतत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणा-या राष्ट्रवादीच्या या आमदाराची जीभ ही वैदिक हिंदू विवाह पद्धतीतील कन्यादान संस्कारावर घसरली,या संस्काराची टिंगल करताना कन्यादानप्रसंगी पुरोहिताद्वारे बोलल्या जाणारे मंत्र ‘मम॒ भार्या सर्मपयामी’याचा अर्थ त्यांनी खोचक पद्धतीने उलगडून दाखविल्याने राज्यातील ब्राम्हण वर्ग संतापला.आज संविधान चौकात निषेध नोंदवताना,आमची जी धर्म संस्कृती आहे ती संपूर्ण जगात जगतमान्य असून जगात हिंदू धर्म संस्कृती ही आदर्श संस्कृती म्हणून गणल्या जाते,असे त्यांनी सांगितले.अश्या अादर्शवत धर्म संस्कृतीबाबत मिटकरी यांनी जे कथन केले ते त्यांनी भर सभेत स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठीच कथन केले.अनेक राजकारण्यांना असं वाटतं की मी सभेत असे काही विनोद करु जेणेकरुन लोकं त्यांच्या विधानावर हसतील,दाद देतील,त्यांच्या स्वत:मध्ये मात्र कोणतीही योग्यता नसतेच,योग्यता नसल्यानेच ते अश्लीलतेकडे वळत असतात, सनातन हिंदू धर्मातील १६ संस्कारामधील सर्वात उदात्त समजल्या जाणा-या कन्यादान संस्काराविषयी अशलाध्य विधान या योग्यता नसलेल्या आमदाराने केले.कन्यादान हा विषय स्त्रीच्या सन्मानाशी निगडीत असतो मात्र मिटकरी हे जर स्त्रियांच्या सन्मानाविषयी नाही बोलू शकत तर किमान त्यांनी सनातन हिंदू धर्मिय महिलांविषयी अवमानकारक विधान करायला नको होते.त्यांनी जे शब्द उच्चारले ते तर आम्ही उच्चारु ही शकत नाही कारण आम्ही कन्यादान संस्कार पार पाडताना जे मंत्र उच्चारतो तो एक संकल्प असतो जो संपूर्ण ब्रम्हांडात विरत असतो.मिटकरी यांनी ’भार्या सर्मपणामी’या दोन शब्दांच्या आधी जो शब्द वापरला तो मुखातून उच्चारता देखील येत नाही,हा पती व पत्नीमध्ये पार पाडल्या जाणारा एक पवित्र विधी असतो,मिटकरींनी पती-पत्नी यांच्यातील सत्वाचा भयंकर अपमान केला असल्याचा संताप यावेळी ब्राम्हण सभेच्या सदस्यांकडून व्यक्त झाला.
विशेषत: २००५ पासून ते २०१८ पर्यंत सामाजिक कार्यात काम करणारे अमोल मिटकरी यांची मनातील लालसा ही आमदारकीचीच होती हेच ध्येय मनात ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील व्याख्यानानंतर,मराठा सेवा संघांशी संपर्क, गुरुदेव सेवा मंडळाशी जुळल्यानंतर संभाजी ब्रिगेडची बागडोर मिटकरींनी सांभाळली. विदर्भातील अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ करण्यासाठी पवार यांनी लिहलेले पुस्तक ’लोक माझे सांगती’ हे धावून आले,हे पुस्तक मिटकरी यांनी दोनदा वाचले,चुकीच्या संकल्पना सुधारल्या!बारामतीत जाऊन काम साहेबांचं काम पाहीलं आणि मनाशी गाठ ठरवली राजकारणात प्रवेश करु तेव्हा पवार यांच्याच पक्षात येेणार!हे ते प्रत्येक सभेत सांगत असतात.
मग सभा जिंकण्यासाठी किरीट सोमय्यांची नकल,राज ठाकरेंना ’खाज ठाकरे‘म्हणण्यापर्यंत मजल गाठली,सदावर्तेवरपासून तर भारतीय जनता पक्षावर कडाडून टिका करता करता इस्लामपूरच्या सभेत मिटकरी हे चक्क सनातन हिंदू धर्मातील विवाह पद्धतीतील कन्यादान प्रथेवर घसरले व प्रचंड टाळ्या प्राप्तकर्ते झालेत.यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी स्वत:चा वेळ देखील मिटकरीं यांनाच बोलण्यासाठी दिला.विदर्भात राष्ट्रवादीचा पाया भक्कम करण्यासाठी ब्राम्हणद्वेष्टा कार्यकर्त्यांची तशीही राष्ट्रवादीला गरजच होती.सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे यांनी देखील इस्लामपूरच्या सभेत मिटकरींच्या टाळ्याखाऊ भाषणाचा मनमुराद आनंद लृटला.भाजप विकासावर मते मागत नाही असा आरोप करीत असताना राष्ट्रवादीच्या भाषणात देखील विकासाचे मुद्दे नदारदच असतात,हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे.एखाद्या विचारसरणीचा पुरस्कार करने याचा अर्थ इतर विचारसरणीचा द्वेष करने असा एक नवा रुढार्थ देशपातळीवर व राज्यपातळीवर रुजल्याचा देशातील नागरिक अनुभवतच आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी १९८४ साली लिहलेले ‘राजा शिवछत्रपती’हे पुस्तक (अभ्यासू)मिटकरी प्रत्येक सभेत मिरवतात.यातील उतारे वाचून दाखवतात. पंतांचे(दादोजी कोंडदेव) शिवबावर इतके प्रेम होते की भक्त आणि सेवक हे नातेच नव्हते उरले,इतकं जीव लावायचे पंत शिवबावर की स्वत: शहाजी महाराजांनी इतका जीव लावला नसेल, जिजाऊकडे पाहून पंत म्हणायचे ही बाई काही साधीसुधी नाही,हीची जडणघडण औरच आहे,पंत भारदस्त होते,जबरदस्त होते,मोठा हौशी म्हातारा या वयात हौस करायला मन ही तरुण असावं लागतं ,शिवबाचे व पतांचे गोत्र एकच होते,असे पुस्तकातील उतारे पान क्रमांकासहित मिटकरी भर सभेत वाचून दाखवित असतात. यानंतर अभिमानाने सांगतात लाल महालात शिवबा व जिजाऊंच्या पुतळयांसोबत दादोजी कोंडदेव यांचा जो पुतळा उभा केला होता, तो मोहनसिंह राजपाल पुण्याचे महापौर असताना ,अजित सिंग उपमुख्यमंत्री असताना,आबा(आर.आर.पाटील) गृहमंत्री असताना हा पुतळा कटरने कापून फेकून दिला यानंतर इतिहासाचं शुद्धिकरण झाल्याचे समाधान मिटकरी आपल्या सभांमध्ये व्यक्त करीत असतात.
या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म मानला जातो मात्र देशाच्या स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांच्या काळात या देशात सर्वात जास्त विखारी बोलल्या गेलं असेल तर ते हिंदू धर्म व हिंदू धर्मियांविषयीच बोलल्या गेलं,मिटकरींसारखे आमदार हे संविधानाची शपथ घेऊन विधी मंडळात तर पोहोचलेत मात्र अंध पवारभक्तीतून त्यांचीच ’रि’ओढून शरद पवारांचा मीच खरा अनुयायी असल्याचे सिद्ध करण्यासाठी ब्राम्हण-मराठा वादाला भर सभेत शिगेला पोहोचवण्यासाठी केविलवाणी धडपडत करत असताना दिसून पडतात.भर सभेत ’मी एकच बाबासाहेबांना मानतो’असे म्हणणारे मिटकरी एक इतिहास लेखक बाबासाहेब पुरंदरेंचा भर सभांमध्ये अपमान करतात मात्र असे करताना मिटकरी यांचा देखील इतिहासाचा अभ्यास हा ‘टाळ्याखाऊ ज्ञानापुरताच मर्यादित’ असल्याचा दिसून पडतो.
ब्राम्हणवाद्यांच्या पराकोटीच्या छळापायी हिंदू धर्माचा त्याग करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील बौद्ध धम्म स्वीकार करताना ‘माझा लढा हा ब्राम्हणांशी नसून ब्राम्हणवाद्यांशी आहे‘असे उद् गार काढले होते.धर्मांंतरणाच्या वेळी त्यांच्या सोबतीला अनेक ब्राम्हण उपस्थित होते,हा इतिहास मात्र जगातील कोणातही बौद्ध धर्मिय बदलू इच्छित नाही.वास्तवतेचा स्वीकार करण्याचं धैर्य व धाडस बौद्ध धर्मियांमध्ये आढळतो.
मात्र महाराष्ट्रात आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी मराठा-ब्राम्हणवाद उकरुन काढणारे,जेम्स लेनच्या पुस्तकावरुन राज्य पेटवणारे शरद पवार यांनी कश्याप्रकारे मराठा मतांसाठी दादोजी कोंडदेव-शिवबा यांच्यातील गुरुशिष्यत्वाचे नाते नाकारले व पुणे महानगरपालिकेत सत्तेत असताना मध्यरात्री लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा उचलून नदीपात्रात बुडवला,हे द्वेषमुलक राजकारण अवघ्या महाराष्ट्रानेच बघितला,अनुभवला.इतका पराकोटीचा ब्राम्हणद्वेष की स्वामी समर्थ रामदासस्वामींच्या सच्चनगढावर पाण्याची पाईपलाईन पोहोचविण्यात देखील अनेक दशकांचे राजकारण केले गेले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वेळा त्यांनी शेलक्या शब्दात फडणवीस यांच्या जातीचा उल्लेख केला,हे देखील राज्यातील जनतेने बघितले.कोणी कोणत्या जातीत जन्म घ्यावा हे जरी कोणाच्याही हातात नसले तरी राजकारण्यांना मात्र कोणत्या जातीचा द्वेष करुन भरघोष मते मिळवता येतात आणि सत्ता काबिज करता येते हे चांगल्याने माहिती आहे.पुरोगामी म्हणविणारा महाराष्ट्र जाती धर्माच्या गर्तेतून अद्यापही बाहेर निघण्यास त्यामुळेच तयार नाही,हे मिटकरी यांच्या भाषेवरुन व भाषणांवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले.
त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या रणनीतीतील मराठा-ब्राम्हणवादावर प्रहार करताच मिटकरी यांनी राज ठाकरे यांची देखील ‘खाज ठाकरे’अश्या शेलक्या शब्दात टिका करुन आपली विद्वत्ता सिद्ध केली.
यासोबतच ब्राम्हणवादावर टिका करताना ज्याप्रकारे त्यांनी वैदिक हिंदू धर्मातील विवाह संस्कारावर कुटीलतेने व उपहासाने टिका केली ते ऐकून राज्यातील ब्राम्हण वर्ग हा पेटून उठला आहे यात दुमत नाही.त्याचीच परिणिती आज संविधान चौकात देखील बघण्यास मिळाली.नुकतेच नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी देखील मिटकरी यांना खुले आव्हान देत मिटकरींनी इतर धर्माच्या एखाद्या प्रथेविषयी जाहीर सभेत बोलून दाखवावे असे आव्हान केले होते.

आमचे चॅनल subscribe करा