Homeनागपूर न्यूजसिनेमापेक्षा नाटक श्रेष्ठ वाटतं:रोहीणी हटंगडी

सिनेमापेक्षा नाटक श्रेष्ठ वाटतं:रोहीणी हटंगडी


‘चार चौघी‘चे नागपूरात चार प्रयोग

तालीमीच्या वेळेसच रोहीणी यांच्यातील मोेठेपणाची जाणीव:मुक्ता बर्वे

तुम्ही जे नाही ते दाखवणं हेच मोठे आव्हान:कादंबरी कदम

विचारप्रवण नाटकांची आजकाल मांदियाळी:आणखी नवी नाटके यावीत

नागपूर,ता.२ जून २०२३: करोना काळात इतर सर्व क्षेत्रासारखेच नाटक देखील कोलमडून पडले होते.कलावंत ही आतून तुटलेले होते पण पुन्हा पूर्ण ताकदीने नाटकाने उभारी घेतली,नाटकाशी नाळ करोना काळातही पूर्णपणे तुटली नव्हतीच,नाटका विषयीची मराठी माणसाची भूक ही फार मोठी आहे,अलीकडे तर अनेक नवीन आणि विचारप्रवण संहिता घेऊन अनेक नवीन नाटके रंगमंचावर आली आहेत असे ज्येष्ठ अभिनेत्री रोहीणी हटंगडी म्हणाल्या.रंगमंच श्रेष्ठ की सिनेमा श्रेष्ठ या विषयी बोलताना,मला रंगमंच श्रेष्ठ वाटतं कारण भूमिकेचा अभ्यास रंगमंच शिकवित असतो.सिनेमा हा कलाविष्कार पूर्णत:वेगळा आहे.कॅम-याशी जुळवून घेणं हे तुमच्या हातात असतं.रंगमंचाबाबत हे शक्य नसतं,त्यामुळे मला रंगमंच जास्त महत्वाचा वाटतो,असे हटंगडी म्हणाल्या.सिद्धीविनायकचे समीर पंडीत यांनी जिगीषा निर्मित, प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘‘चारचौघी‘ नाटकाचे ४ प्रयोग नागपुरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित केले आहे त्या निमित्ताने रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर, आणि मुक्ता बर्वे या कलाकारांनी आज देशपांडे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.

कलावंतांने भूमिकेत शिरावे की एखादी भूमिका कलावंतांमध्ये शिरत असते,या प्रश्‍नावर रोहीणी हटंगडी म्हणाल्या,की प्रत्येक कलावंतांचं भूमिकेशी तादाम्य हे वेगळं असतं.एखादा पेंटर हा जेव्हा चित्रनिर्मिती करतो तेव्हा अनेकदा चार पावले मागे जाऊन आपल्या कलाकृतीचा अदमास घेत असतो,कलावंतांचं पण तसंच असतं,एकदा तंत्र अवगत झालं की कोणतीही भूमिका हाताळणं साेपं जातं.एखाद्या दृष्यात कलावंताला खरोखर रडायला आलं तर पुढची वाक्ये ते बोलूच शकणार नाही,असे त्यांनी सांगितले.

‘चार चौघी‘हे तीन दशकांपूर्वीचे गाजलेले नाटक आहे,यात काळानुरुप बदल केले आहेत का?यावर बोलताना,नाटकात काहीही बदल केले नाहीत.तीस वर्षांपूर्वी मोबाईल नव्हता,त्यावेळी दूरध्वनी हेच एकमेव संवादाचे साधन होते.नाटकात देखील दूरध्वनी हेच संयत्र कायम ठेवण्यात आले असून, या नाटकाने १९९०-२००० मध्ये रंगभूमी गाजवली होती आणि आता २०२२ पासून, ३१ वर्षांनंतर ‘चारचौघी’ पूर्णपणे नवीन कलाकार आणि तंत्रज्ञांसह रंगभूमीवर आले असल्याचे त्यांनी सांगितले.

भूमिकेची निवड कोणत्या निकषावर करतेस?या प्रश्‍नावर बोलताना सुप्रसिद्ध कलावंत मुक्ता बर्वे यांनी सांगितले,की अख्ख्या कलाकृतीतच काय चांगलं आहे हे पाहते.त्या कलाकृतीत मला स्वत:ला प्रेक्षक म्हणून काय पाहयाला आवडेल,याचा विचार करते.‘चार चौघी’चा प्रयोग लंदनमध्ये देखील झाला,तेथील प्रेक्षकांचा प्रतिसाद, याविषयी विचारले असता,लंदनमध्ये जरी प्रयोग झालेत तरी तिथले प्रेक्षक हे मराठीच असतात.पण बरेचदा आम्हाला ‘अ’मराठी प्रेक्षक देखील भेटतात.सिंधी,पंजाबी,गुजराती प्रेक्षकांसोबतच महाराष्ट्रात राहणारे दक्ष्णेतले प्रेक्षक ही हे येऊन भेटतात.‘चार चौघी’हे तर शब्दबंबाळ नाटक असून शब्दांपेक्षा अभिनयातून व कालानुरुप व्यक्त होणारे नाटक असल्याने भाषेचा अडथळा येत नसल्याचे मुक्ता सांगते.त्यामुळे वेगळ्या राज्यातल्या प्रेक्षकांसमोर प्रयोग सादर करण्याचा अनुभव तर वेगळा आहेच,पण महाराष्ट्रातही ‘अ’मराठी प्रेक्षकांसमोर प्रयोग सादर करुन तितक्याच पोटतिडकीने पोहोचतो,हे आम्हाला मोठं यश वाटतं,असे ती म्हणाली.

रोहीणी हटंगडी यांच्यासारख्या मुरलेल्या अभिनेत्रीसोबत अभिनय करताना दडपण आलं का?काय अनुभव होता?यावर बोलताना मुक्ता म्हणाली,की रोहीणी यांचा मोठेपणा सांगायलाच हवा.तालीमीच्या पहील्याच दिवसापासून त्यांनी त्यांचं मोठेपण जाणवू दिलं नाही.त्या जेव्हा एनएसडीमध्ये होत्या तेव्हा त्यांची नाटक नाटके बघायला स्वत: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यायच्या.आमच्यासाठी हे सगळं थक्क करणारं आहे मात्र,कलाकार म्हणून,माणूस म्हणून त्यांचं मोठपण फार मोठं आहे.कलाकार म्हणून तर त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं.‘चार चौघी‘हे तर साढे तीन तासांचं नाटक आहे.अतिशय थकवणारं.एकदा तर म्हणूनच दिलं ,खूप थकायला झालं मात्र त्या तितक्याच सहजतेने म्हणाल्या,आता फक्त एकच तर अंक राहीला आहे!त्यांची एनर्जी पाहून आम्ही अवाक होतो.त्यामुळे त्यांच्यासोबत अभिनय करताना दडपण कधीच जाणवलं नसल्याचं मुक्ता सांगते.

यावर, आजच्या पिढीसोबत राेहीणी यांना कसं वाटतं?असा प्रश्‍न विचारला असता,त्यांच्यासोबत शिकायला आणि पळायला दोन्ही लागतं,असं मिश्‍किलपणे रोहीणी सांगतात.अफाट मोबाईलचं ज्ञान मिळवता-मिळवता किंचित दमछाक होते.५० वर्षां पूर्वींच्या विचारांना ही पिढी सहज छेद देऊन जाते.मी विचारते हा ‘ट्रेंड’आहे का?

या पिढीला संघर्ष जास्त आहे का?या प्रश्‍नावर बोलताना रोहीणी सांगतात की,आमच्या काळात फक्त दूरदर्शन होतं.आता तर वेबसिरीज पासून असंख्य वाहीन्या व मालिकांचे आव्हान या पिढीसमोर आहेत.आमच्या पिढीचं एकच ध्येय होतं मुंबईला जाऊन काम मिळवणे.दूरदर्शन पण नवीनच आला होता.खासगी वाहिन्याही नव्हत्या.व्हेन्यू देखील डॉक्टर,इंजिनिअर,कॉमर्स इतकंच होतं.आता व्हेन्यूज इतके आहेत की या पिढीची क्षमता बघता,मी ‘सल्ले’ देणे बंद केलं आहे,असे प्रामाणिकपणे त्या सांगतात.आजच्या काळात फक्त काम करुन भागत नाही तर ते काम इन्सटाग्रामवरही दिसणे गरजेचे झाले असल्याचे त्या सांगतात.

कादंबरी कदम यांना भूमिकेविषयी विचारले असता,कादंबरी व वैजू या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत मात्र तीच गंमत असते.तुम्ही जे नाहीत,ते दाखवणं तेच मोठं आव्हान असतं.मला या नाटकात ‘वैजू‘साकारताना कठीण गेलं.कोणी काहीही करत नसलेल्या नव-याशी प्रेम कसं काय करु शकतं?या नाटकात मला सतत नव-यावर जाम चिडचिड करायची असते.मुक्ताने मला सांगितलं,एकदम नव-यावर चिडू नकोस,हळूहळू चिड नव-यावर.त्यावेळी मला ते जमलं नाही मात्र हा अनुभव येण्यासाठी मला ८० व्या प्रयोग करावा लागला.आता अनुभवातून शिकले.त्यामुळेच रोहीणी हटंगडी व मुक्ता बर्वेसारख्या अभिनेत्रींसोबत काम करण्याचे फायदे कळतात,असे ती म्हणाली.

नागपूरकर प्रेक्षकांनी ‘चार चौघी‘बघण्यासाठी का यावं?असा प्रश्‍न केला असता,का येऊ नये?असं कादंबरी म्हणाली.हे नाटक स्त्री असो किवा पुरुष प्रत्येकाला कुठे ना कुठे स्वत:शी जुळलेलं असं वाटून जातं,असं ती म्हणाली.

याप्रसंगी बोलताना पर्ण पेठे म्हणाली की,हा फेमिनिस्ट ड्रामा आहे.संदेश देण्याचा प्रयत्न करत नाही मात्र या नाटकातून फक्त स्त्रियांनी बोध घ्यावा असे नाही कदाचित पुरुषांनाही वाटेल आपण बदललो पाहिजे.हे नाटक नातेसंबधांना तडा देणारे नाटक आहे.प्रत्येक स्त्री कुठली तरी चौकट मोडून प्रश्‍न विचारते.आजच्या पिढीने हे नाटक अर्वाजून बघायलाच हवं.हे चांगले किवा वाईट नसून काळानुरुप असलेलं नाटक असल्याचं पर्ण सांगते.घटस्फोट घेण्याचा निर्णय असाे किवा,एखादी स्त्री एकावर नव्हे तर दोन पुरुषांवर तिचं प्रेम असू शकतं,हे ३० वर्षांपूर्वी लिहलेलं नाटक आज ही तितकंच कालातीत असल्याचं ती सांगते.

याप्रसंगी उपस्थित पुरुष कलावंतांना बोलतं केलं असता, विंगेत बसून २५ वेळा मुक्ता हीची तालीम बघितली, प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकायला मिळत होतं.मी गुजराती नाटकांचे प्रयोग खूप केलेत मात्र मराठी नाटकांचे गणित आणि शिस्त ही शिकण्यासारखी असल्याचे तो सांगतो.साढे तीन तासांचा प्रयोग हा खरोखरंच थकवणारा आहे.पण,भूक लागली आहे का?खूप दगदग झाली आहे का?प्रवासाचा क्षीण जाणवतो आहे का?या गोष्टी मराठी रंगमंचावर काहीच मोल ठेवीत नाहीत.याचं श्रेय मराठी रंगमंचावरचे कलावंत,निर्माते आणि प्रेक्षकांना जातं. ते कलावंतांची इन्ससिटी कमी पडू देत नाही.मे महिन्यात या नाटकाचे तब्बल २९ प्रयोग झालेत,हेच याचे उदाहरण म्हणून सांगता येईल.

‘‘चारचौघी‘ मधले निर्णय वैयक्तिक असले तरी ते सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात. हे स्त्री-पुरुष संबंधांवर नवीन प्रकाश टाकत असे मत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केले. यावेळी मुक्ता बर्वे यांनी सांगितले की ‘चारचौघी‘ हा चार महिलांचा प्रवास आहे, ज्यांनी पुरुषप्रधान समाजाची बंधने झटकून टाकली आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या साक्षात्काराच्या वाटेवर वाटचाल केली .

एका प्रश्‍नाच्या उत्तरावर चांगली नाटकं अलीकडे जास्त यायला लागली असल्याचे हटंगडी म्हणाल्या.महत्वाचे म्हणजे चांगली नाटके प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.कृष्ण विला,आमने-सामने,अमर फोटो स्टूडियो,मी स्वरा आणि ते दोघे,संज्या छाया इत्यादी उदाहरणादाखल सांगता येईल,मात्र अशीच आणखी चांगली मराठी नाटके यायला हवी,अशी अपेक्षा ‘चार चौघी‘नाटकाची ही चमू व्यक्त करते.

या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकरआहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे, प्रकाश योजना रवि रसिक यांची, संगीत अशोक पत्की तर निर्माते श्रीपाद पद्माकर यांची आहे.

श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीचे समीर पंडित यांनी या दर्जेदार सादरीकरणाचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले आहे.२, ३ आणि ४ जून रोजी होणाऱ्या प्रयोगांच्या तिकिटांसाठी बुकमायशो वर ऑनलाईन किंवा ८३७८८६९४५७ वर संपर्क साधता येईल.
……………

Latest बातम्या