Homeनागपूर न्यूजसार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या विधान सभेतील घोषणा मृत्यू तांडवातच विरल्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या विधान सभेतील घोषणा मृत्यू तांडवातच विरल्या

समृद्धीवर आणखी एक भीषण अपघात

प्रशासनाच्या उपाययोजनांच्या पोकळ घोषणा कागदावरच

प्रवाश्‍यांचा जीव स्वस्त:राजकीय धुरीण मस्त

नागपूर,ता.१५ ऑक्टोबर २०२३:समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबवण्याचं नाव घेत नसून काल मध्यरात्री आणखी एका ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला.यात १२ जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत.

बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन घेऊन नाशिककडे परतत असताना ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला.वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हलस बसने मागाहून जोरात धडक दिली.या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून यात ४ महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश आहे.अपघातात २३ प्रवासी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे.

नाशिक येथील काही भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या दर्गा येथे दर्शनासाठी खासगी बस करुन गेले होते.हे सर्व प्रवासी बुलढाण्याकडून नाशिककडे जात असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर वैजापूर जांबरगाव शिवारात असलेल्या टोलनाक्यावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिका-यांनी ट्रकला तपासणीसाठी थांबवले असता,ट्रक चालक वाहन बाजूला घेत असतानाच पाठीमागणून येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जोरदार आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅव्हल्स बसच्या समोरच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला.यामध्ये १२ जणांचा जागीच मृत्यू

झाला.मृतांमध्ये चार वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे.ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहेत.या बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते.अपघातात तनुश्री लखन सोळसे,वय अवघे ५ वर्ष,रा.समता नगर,नाशिक,अंजाबाई रमेश जगताप,वय वर्ष ३८,रा.राजूनगर नाशिक,रतन जमधडे,वय वर्ष ४५ वर्ष,रा.संत कबीर नगर नाशिक,हौसाबाई आनंदा शिरसाट,वय वर्ष ३०,रा.उजगाव निफाड,नाशिक,झुंबर काशिनाथ गांगुर्डे वय वर्ष ५०,रा.राजूनगर नाशिक,अमोल झुंबर गांगुर्डे,वय वर्ष १८,सारिका झुंबर गांगुर्डे वय वर्ष ४०,मिलिंद पगारे वय वर्ष ५०,कोकणगाव ओझर,निफाड नाशिक,दिपक प्रभाकर केकाणे वय वर्ष ४७ ,रा.बसमत पिपळगाव,नाशिक,अशी मृतकांची नावे आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे या अपघातानंतर देखील शोक व्यक्त केला व मृतकांच्या कुटूंबियांना २ लाख रुपयांच्या तर जमखींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली मात्र,राज्य शासन व मंत्री दादाजी भुसे यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करण्याचे टाळले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्टीटरवर शोक संवेदना मानून संवेदनशीलतेचा परिचय दिला….!रोज मरे त्याल कोण रडे!अशी गत राजकीय नेत्यांची झाली आहे.

गेल्या ४ महिन्यात ३ अतिशय भयंकर अपघात या महामार्गावर झाले असून यात ५४ लाेकांचा हकनाक जीव गेला आहे!सर्वाधिक अपघात रात्रीच्या वेळी घडले आहेत.समृद्धि महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला,यात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता मद्यधुंद ड्रायव्हरच्या चुकीमुळे मध्यरात्री बस मध्यभागाच्या भिंतीवर आदळून त्यात आग लागली होती.

यानंतर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे १ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गाचे पुलाचे काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळून २० कामगारांचा मृत्यू झाला होता.ही दुर्घटना देखील मध्यरात्री घडली होती.रविवार १५ ऑक्टोर रोजी बुलढाण्यावरुन नाशिकला जाणा-या ट्रॅव्हल्सला वैजापूरजवळ जांबरगाव टोलनाक्यावर झालेल्या अपघातात आता १२ जणांचा मृत्यू तर ३५ भाविक जखमी झाले.

या महामार्गावर गेल्या ६ महिन्यात सुमारे १ हजाराच्या वर अपघात घडले असून यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत ३६८ जणांनी आपला जीव गमावला आहे.चालकाला डूलकी लागणे तसेच टायर फूटून झालेल्या अपघातांची संख्या असंख्य आहे.वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे या महामार्गावर आतापर्यंत २०० अपघात झाले असून त्यामध्ये जवळपास ४१ जणांचा बळी गेला आहे.

२ ऑगस्ट २०२३ रोजी समृद्धी महामार्गावरील शहापूर येथे पुलाचे बांधकाम करताना गर्डर कोसळून २० कामगारांचा दूर्दवी मृत्यू झाला होता.याच महामार्गावर जुलै महिन्यात खासगी ट्रॅव्हल्स बसच्या भीषण आगीत होरपळून अनेकांचा हकनाक बळी गेला होता.
हा महामार्ग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातला महामार्ग असला तरी हा महामार्ग या महामार्गावरुन प्रवास करणा-या शेकडो प्रवाश्‍यांना आतापर्यंत यमसदनी पाठवणारा प्रवास ठरला आहे.

या महामार्गावर शीघ्र प्रतिसाद वाहन,ट्रॉमा केअर सेंटर अशा सुविधा नसताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते या महामार्गाच्या उद् घाटनाची घाई शिंदे-फडणवीस सरकारला झाली होती.दरवेळी समृद्धी महामार्गावर अपघातात बळी पडणा-यांच्या कुटूंबियांना २ लाख,५ लाखांची राज्य व केंद्रातर्फे मदत जाहीर करुन कर्तव्याची इतिश्री मानली जाते.

अनेक अपघातांच्या मालिकेनंतर ३ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या वाहनांच्या चालकांची श्‍वास विश्‍लेषक(ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह)चाचणी करण्यात येणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता.या महामार्गावर दररोज किमान १७ ते १८ हजार वाहने प्रवास करीत असतात.भविष्यात या वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे त्यामुळे,सर्व वाहनांना १२० किमी प्रति किलोमीटर प्रति तास इतकी वेगमर्यादा घालण्याची सूचना ही मंत्री दादा भुसे यांनी केली होती.याची अंमलबजावणी न झाल्यानेच कालच्या दूर्घटनेत परिवहन विभागाच्या पथकाने ट्रकला बाजूला होण्यास सांगितले असताच मागाहून भरधाव वेगाने येणा-या ट्रॅव्हल्सची धडक ट्रकला बसली.ट्रॅव्हल्स बसची वेगमर्यादा ठिकठिकाणी तपासण्यात आली असती तर कदाचित बसच्या चालकाला वेळेवर ब्रेक मारता आला असता व अपघात टाळता आला असता.

या महामार्गावर सर्वाधिक अपघात हे वेगाने तसेच चालकांचा मेंदू बधिर झाल्यामुळे डूलकी लागल्याने झाला असल्याचा अहवाल संबंधित प्रशासनाने दिला आहे.

अपघात होऊ नये यासाठी परिवहन विभागातर्फे वाहनचालकांचे वेळोवेळी समुपदेशन केले जात असल्याचा दावा ही करण्यात आला.वेगमर्यादा न पाळणा-या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे राणा भीमदेवी थाटात मंत्री महोदयांनी दादाजी भुसे यांनी घोषणा देखील केली होती.

उलट,या महामार्गावर आवश्‍यक दिशादर्शक चिन्हे,सूचना फलक,माहिती फलक,वेगमर्यादादर्शक फलक लावणे,लेन मार्किंग करणे,अशा उपाययोजना केल्या गेल्या आहेत असे उत्तर दादा भुसे यांनी विधी मंडळात दिले होते.

तरी देखील समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या ही कमी होताना दिसत नाही.यावरुन मायबाप सरकार ही या महामार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाश्‍यांच्या जीवांची किती काळजी करतेय,कालच्या अपघाताने पुन्हा एकदा मुर्दाड नोकरशाही व असंवेदनशील राजकीय नेतेशाहीची पोल खोलणारी ठाली.

पाेलिस विभागातर्फे देखील ट्रॅव्हल्स बसच्या अपघातानंतर या महामार्गावर चालकाला डूलकी लागू नये,मेंदू बधिर होऊ नये यासाठी रंगबिरंगे झेंडे लावण्यात येतील.दर अडीच तासांच्या प्रवासानंतर थांबा देण्यात येईल.त्या ठिकाणी स्वच्छता गृह,भाेजनालयाची व्यवस्था करण्यात येईल,असे उपाय सूचवले होते मात्र,त्याची देखील अंमलबजावणी शून्य असल्यामुळे कालचा ही बघ अपघात हा मनाचा थरकाप उडवणारा ठरला.

ज्यांनी अजून जग ही समजून घेतले नाही अशा ४ महिन्यांच्या व ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू केवळ राजकीय अट्टहासातून ओढवला गेला असल्याची टिका आज समाज माध्यमांवर उमटली आहे.जुलै महिन्यात झालेल्या भीषण अपघातात होरपळून २५ जणांचा मृत्यू झाला त्यात एक चिमुकली मृत्यूनंतर देखील आपल्या आईला बिलगून असल्याचे विदारक चित्र जगाने बघितले होते.त्याच अवस्थेत त्या दोघींचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता.

जवळपास ९०० किलोमीटरचा प्रवास आधी प्रवाशांसाठी सुरक्षीत बनल्यानंतरच हा महामार्ग खुला करने शिंदे-फडणवीस सरकारचे नैतिक व शासकीय कर्तव्य असताना केवळ राजकीय लाभापोटी मृत्यूच्या महामार्गावर त्यांनी राज्यातील जनतेला, होरपळून तसेच चिरडून मरण्यासाठी मोकळे सोडले असल्याची जळजळीत टिका देखील समाज माध्यमावर उमटली.

.मृत्यूची ही श्रृंखला कुठे जाऊन थांबणार आहे?समृद्धी महामार्गाने इतर अनेक प्रकल्पांप्रमाणे किती व कोणकोणत्या राजकीय नेत्यांना किती हेक्टर जमीन अवैधरित्या बळकावून आणखी समृद्ध केले?असा देखील प्रश्‍न समाज माध्यमांवर विचारला जात आहे.
………………..

 

Latest बातम्या