आभा पांडे यांचे विधान:मंगळवारी सादर होणार स्थायी समितीचा अर्थसंकल्प
काटकसरीचे पंतप्रधानांच्या आवाहनामुळे झोन सभापतींना इलेक्ट्रीक वाहने देण्यात यावी:आभा पांडे यांची मागणी
सरकारी वाहनांचा दुरुपयोग करणा-यांवर ठेवणार लक्ष:प्रशांत पवार यांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका
नागपूर,ता.१६ मे २०२६: शिवाणी दाणी-वखरे यांना अर्थसंकल्पाची सखोल जाण आहे,आज पर्यंत मनपात स्थायी समिती अध्यक्ष म्हणून अनेक लोकांनी हे अतिशय जबाबदारीचे पद भूषवले आहे,त्यांनी नागपूर शहराच्या विकास कामांना गती देण्याकरीता आपापल्या परीने प्रयत्न केले.काहींना यात यश मिळाले तर काहींचे कार्य साधारण श्रेणीत मोडणारे ठरले,परंतू शिवाणी यांना अर्थसंकल्पाचे सखोल ज्ञान आहे.मनपा प्रशासनात जरी त्या नवख्या असल्या तरी अर्थसंकल्प त्यांना अजिबात समजत नाही,असे शिवाणी यांचे नाही.त्यामुळेच शिवाणी यांच्याकडून आम्हाला खूप काही अपेक्षा आहेत,आतापर्यंत सत्ताधारी भाजपचे जितके स्थायी समिती अध्यक्ष होते त्या सगळ्यांपेक्षा शिवाणी दाणी यांचा अर्थसंकल्प खूप चांगला असेल कारण त्या आपल्या नागपूरच्या निर्मला सीतारमण आहेत,त्यांच्याकडून आम्हाला असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील,येत्या १९ तारखेला हे कळेलच,असे विधान मनपातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सत्ता पक्ष नेते आभा पांडे यांनी केले.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडून तब्बल चार वर्षांनतर येत्या मंगळवारी (दि.१९)अर्थसंकल्प रेशीम बाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सादर होणार आहे.स्थायी समिती अध्यक्ष शिवाणी दाणी-वखरे हा अर्थसंकल्प सादर करणार आहे.या पार्श्वभूमीवर आभा पांडे यांना प्रश्न विचारला असता,त्यांनी वरील विधान केले.बजाज नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत आवाहनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना,त्यांनी मनपाच्या प्रशासकीय व सत्ताधा-यांच्या खर्चावर देखील चांगलेच तोंडसुख घेतले.
जनतेचा विरोध डावलून झोन सभापतींना भाड्याने घेऊन चार चाकी वाहन पुरविण्यात आले.याचे कारण सभापतींना प्रभागात फिरावे लागते असे देण्यात आले.हे जरी खरे असले तरी नियमबाह्य रितीने व मनपा तिजोरीवर पडणारा भार याकडे दूर्लक्ष करत त्यांना चारचाकी वाहने पुरविण्यात आली ,जनतेच्या पैशांची बचत त्यांना इलेक्ट्रीक वाहने देऊन होऊ शकली असती.यामुळे दहा झोन सभापतींच्या चारचाकी वाहनांसाठी जो लाखो रुपयांचा वार्षिक खर्च होतो,त्याची बचत झाली असती.त्यामुुळेच पंतप्रधानांच्या आर्थिक बचतीच्या अावाहनाला प्रतिसाद देत,निदान झोन सभापतींची पेट्रोल-डिजेलची वाहने काढून घेण्यात यावी व त्यांना इलेक्ट्रीक वाहने देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली.
केवळ मनपाच नव्हे तर आज जितकी पण प्रशासकीय कार्यालये आहेत,त्या सरकारी कार्यालयात प्रचंड गर्दी असते.एक वेळा आलेला व्यक्ति वारंवार त्याच-त्याच कामांसाठी सरकारी कार्यालयात चकरा मारत असतो.यात त्याचा मानसिक छळ ही होतो,त्याच्यावर पेट्रोल-डिजेलचा आर्थिक भुर्दंड ही बसतो.त्यामुळेच प्रशासकीय अधिका-यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत,जनतेसाठी एक निश्चित वेळ निर्धारित करावी,जेणेकरुन जनतेचे हेलपाटे वाचतील व पेट्रोल-डिजेलची बचत होईल,असे त्या म्हणाल्या.
विविध प्रशासकीय नोकरशाहीने आता तरी आपल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करावी.जर एखादा नागरिकाला त्याच्या प्रशासकीय कामासाठी दुस-यांदा बोलवण्याची गरज पडली तर एक निश्चित वेळ त्याला द्या व त्या वेळेत त्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी अधिकारी हजर राहील,हे बघावे.पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर तरी सरकारी नोकरशाहीने नागरिकांची कामे अधिकाधिक डिजिटल पद्धतीने करावी,अशी मागणी त्यांनी केली.
आपली बस सेवा खंडित झाली होती,यावर प्रश्न केला असता, ही अत्यंत चुकीची बाब असून,आपण जर सेवा देत आहोत तर ती चोवीस तास अखंडित राहायला हवी,त्यात वारंवार तांत्रिक खराबी येणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या.मनपा परिवहन विभागाची ही कृती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला छेद देणारी असल्याची टिका त्यांनी केली.
याप्रसंगी बोलताना पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्ते प्रशांत पवार म्हणाले की,एकीकडे पंतप्रधान व दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंधन बचतीसाठी नागरिकांना आवाहन करीत आहेत मात्र,प्रशासनाचे विविध विभागच नागरिकांच्या कामांसाठी सातत्याने विलंब करीत असतात.इंधन अपव्यवयाची नैतिक जबाबदारी सरकारी प्रशासन स्वीकारेल का?असा मोलाचा प्रश्न त्यांनी केला.कामात दिरंगाई ही नोकरशाहीच्या अंगवळणी पडली आहे.नागरिकांना लहान-लहान कामांसाठी देखील अनेक चकरा ते मारायला लावतात.
आजही नागरिकांना त्यांची फाईल कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी,संबंधित अधिका-यांची सही मिळवण्यासाठी,आक्षेप काय आहे हे समजण्यासाठी,विभागांतील पत्रव्यवहार पूर्ण झाला का हे तपासण्यासाठी किंवा एखादा कर्मचारी कार्यालयात उपस्थित आहे का हे पाहण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या सतत चकरा माराव्या लागतात.हीच कामे डिजिटल झाली पाहिजे.आजच्या डिजिटल युगात सरकारी नोकरशाहीची दिरंगाईची मानसिकता ,देशाच्या अर्थकारणासाठीही योग्य नसल्याचे प्रशांत पवार म्हणाले.जिल्हाधिकारी कार्यालय,महसूल विभाग,टाऊन प्लॅनिंग विभाग,सिटी सर्व्हे कार्यालय,तलाठी कार्यालय,तहसील कार्यालय,उपनिबंधक कार्यालय,नागपूर सुधार प्रन्यास,नागपूर महानगरपालिका,एनएमआरडीए तसेच दिवाणी न्यायालय प्रशासनाने पंतप्रधानांच्या आवाहनानंतर तरी आपल्या कामात आणि कर्तव्यात सुधारणा करावी,असे आवाहन त्यांनी केले.
सरकारी नोकरशाहीच्या प्रत्येक कामात दिरंगाईच्या मानसिकतेमुळे,सामान्य नागरिकांचे हजारो लीटर पेट्रोल-डिजेलचा अपव्यय होतो.वाहतूक कोंडी होते.नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होतो,त्यांचे व्यवसायिक नुकसान होते.अनेकांना सरकारी कामांच्या दिरंगाईमुळे रोजंदारीला मुकावे लागते.मानसिक तनाव,पर्यावरणीय प्रदुषण,भ्रष्टाचाराला खतपाणी,दलालांची साखळी यामुळेच आता सर्व प्रशासकीय कामांसाठी कायदेशीर कालमर्यादा निश्चित करावी,ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.
याशिवाय ऑनलाईन फाईल ट्रॅकिंग प्रणाली सक्तीची करावी,प्रत्येक विभागात डिजिटल समन्वय यंत्रणा निर्माण करावी.नागरिकांना अनावश्यक फे-यांपासून मुक्त करावे,व्हिडीयो प्रणालीचा अवलंब करुन सुनावणी घेणे,ऑनलाइन अनुपालन प्रणाली लागू करणे,विलंबित प्रकरणांवर संबंधित अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करने,ठरविक प्रकरणांमध्ये ‘डिमांड अप्रूवल’प्रणाली लागू करने,अनावश्यक कागदपत्रांची मागणी तात्काळ थांबवणे इत्यादी ,आमच्या पक्षाची मागणी असल्याचे याप्रसंगी प्रशांत पवार यांनी सांगितले.
आज देशाला फक्त आर्थिक काटकसरीची गरज नाही,तर प्रशासकीय नोकरशाहीच्या कार्यपद्धतीत कमालीची सुधारणा व उत्तरदायित्वाच्या भावनेची गरज असल्याचे ते म्हणाले.इंधन बचत केवळ नागरिकांनी वाहन कमी वापरल्याने साध्य होणार नाही तर,सरकारी नोकरशाहीने सर्वसामान्य नागरिकांचा अनावश्यक प्रवास थांबवणे देखील तितकेच म्हत्वाचे असल्याचे पवार यांनी सांगितले.
एकेकाळी आम्ही युथ काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी बिज्जू पांडे,अनिल वडपल्लीवार आदी मिळून दर शनिवार- रविवार म्हणजे सुटीच्या दिवशीही सरकारी वाहनांचा कुटूंबासाठी उपयोग होत असल्याचे बघितल्यास,त्या अधिका-याविरुद्ध आंदोलन करीत होतो.आमच्या आंदोलनानंतर सुटीच्या दिवशी सरकारी वाहनांचा दुरुपयोग थांबला होता.तीच चळवळ आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नागपूरात पुन्हा सुरु करणार असल्याचे सांगत,सुटीच्या दिवशी कोणत्याही विभागातील सरकारी वाहनांचा वापर स्वत: किंवा कुटूंबियांसाठी झालेला आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा याप्रसंगी प्रशांत पवार यांनी दिला.
पत्रकार परिषदेला मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे,सुखदेव वंजारी,प्रवीण मांडे,संदीप सावरकर,आल्हाद जंगम,महादेवकर आदी उपस्थित होते.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज sattadheesh official युट्यूबवर उपलब्ध)
…………………………………….
Advertisements
